– मानसी राजेश हुले

रात्री रस्त्यावरून जाताना एखाद्या कुत्र्याचे, मांजराचे किंवा रानटी प्राण्याचे डोळे अचानक चमकल्यास आपल्याला भीती वाटते. अंधारात डोळे स्वत:हून प्रकाश देत आहेत की काय, असा प्रश्न पडतो. प्रत्यक्षात हे चमकणं म्हणजे त्यांच्या डोळ्यांतून निघणारा प्रकाश नसून, डोळ्यांतून परत फिरणारा म्हणजे परावर्तित होणारा प्रकाश असतो.

काही प्राण्यांच्या डोळ्यांच्या आत ‘टॅपेटम ल्युसिडम’ नावाचा एक विशेष थर असतो. हा थर डोळ्याच्या दृष्टीपटलाच्या म्हणजेच रेटिनाच्या मागे असतो. कमी प्रकाशात डोळ्यात शिरलेला प्रकाश हा काही अंशी डोळ्यातल्या डोळ्यात परत फिरतो आणि बाहेर जाण्याऐवजी पुन्हा या ‘टॅपेटम ल्युसिडम’ या थरावर आदळतो आणि परत दृष्टीपटलाकडे वळवला जातो. त्यामुळे तोच प्रकाश दुसर्‍यांदा वापरला जातो आणि अंधारात दिसण्याची क्षमता वाढते. अर्थात या प्रक्रियेमुळे, दृश्याची स्पष्टता काही प्रमाणात कमी होते, पण त्याला या प्राण्यांची नजर सरावते.

रात्री टॉर्च, वाहनांचे दिवे किंवा रस्त्यावरील प्रकाश अशा डोळ्यांवर पडला, की डोळ्याच्या आतला हा परावर्तित प्रकाश बाहेर येतो आणि त्यांचे डोळे चमकत असल्यासारखे दिसतात. काही प्राण्यांच्या डोळ्यात हिरवट चमक, काहींच्या डोळ्यात निळी तर उंदराच्या जातीतल्या काही प्राण्यांच्या डोळ्यात लालसर चमक दिसते. वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये या थराची रचना वेगळी असल्यामुळे चमकेचा रंग वेगवेगळा दिसतो.

निशाचर प्राण्यांसाठी, डोळ्यात दोनदा प्रकाश फिरण्याची ही रचना फार उपयोगाची आहे. शिकार शोधणं, भक्षकांपासून सावध राहणं आणि अंधारात सहज हालचाल करणं, यासाठी ही रचना महत्त्वाची ठरते. वाघ, बिबट्या, मांजर, कुत्रा, हरीण यांसारख्या प्राण्यांच्या डोळ्यांत अशी चमक दिसते.

वन्यजीव निरीक्षणातही ही चमक उपयुक्त ठरते. प्राणी कुठे आहेत, किती अंतरावर आहेत आणि हालचाल करत आहेत का, हे ओळखता येतं. शहरात वाहन चालवताना कुत्रे, मांजरं किंवा इतर प्राणी अचानक दिसतात. या चमकेमुळे आपोआपच चालकाचं लक्ष वेधलं जातं आणि अपघात टाळण्यास मदत होते. ग्रामीण भागात रात्री शेतात काम करताना अशा चमकणार्‍या डोळ्यांच्या प्राण्यांचा अनुभव अनेकांना येतो.

माणसांच्या डोळ्यांत टॅपेटम ल्युसिडम नसतो. त्यामुळे माणसांना कमी प्रकाशात मर्यादितच दिसतं. माणसाला जेवढ्या प्रकाशात दिसतं, त्याच्या एक षष्ठांश कमी प्रकाशातसुद्धा अशी रचना असणार्‍या निशाचर प्राण्यांना दिसू शकतं.

थोडक्यात रात्री चमकणारे प्राण्यांचे डोळे हे गूढ किंवा भीतीदायक नसून, निसर्गाने दिलेल्या वैज्ञानिक रचनेचं सोपं आणि सुंदर उदाहरण आहे. प्रकाश, परावर्तन आणि डोळ्यांची रचना यांचा हा साधा पण परिणामकारक मेळ आहे.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org