– मानसी राजेश हुले
घरगुती जनावरांसाठी शेतकरी मुद्दाम मिठाचे खडे ठेवतात, हे काही जणांना माहीत असेल. किंवा कधी जंगलात किंवा शेतात, गाय-म्हैस, हरीण, शेळी यांना जमिनीवर किंवा खडकांवर असलेलं मीठ चाटताना अनेकांनी पाहिलं असेल. या प्राण्यांनाही माणसांसारखीच मिठाची चव आवडते? की यामागे आणखी काही वेगळं कारण आहे?
मीठ म्हणजे सोडियम आणि क्लोरिन यांचं संयुग! यातील सोडियम हा घटक सर्व प्राण्यांच्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्नायूंची हालचाल, मेंदू आणि नसांमधून संदेश जाणं, शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं या सगळ्या कामांसाठी शरीरात योग्य प्रमाणात सोडियम असणं आवश्यक असतं. शरीरात सोडियमची कमतरता झाली तर अशक्तपणा, थकवा, स्नायू आखडणे असे अनेक त्रास होऊ शकतात.
काही शाकाहारी प्राणी गवत, झाडांची पानं, झाडांची सालं यावर जगतात. या अन्नानं त्यांचं पोटही भरतं आणि त्यातून त्यांच्या शरीराला आवश्यक इतर घटकही भरपूर प्रमाणात मिळतात, पण अशा अन्नात सोडियम मात्र कमी प्रमाणात असतं. त्यामुळे या प्राण्यांच्या शरीरात मिठाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी निसर्गाने त्यांना मिठाची तीव्र ओढ दिलेली आहे. म्हणूनच जंगलातल्या नैसर्गिक मीठ असलेल्या ठिकाणी, ज्यांना ‘सॉल्ट लिक्स’ म्हटलं जातं, अनेक प्राणी आवर्जून येतात. काही वेळा ते माती, दगड किंवा पाण्यात विरघळलेलं मीठ चाटतात. मीठ खाण्यामुळे, जनावरांची भूक, पचनशक्ती आणि दूध उत्पादनही सुधारतं.
समुद्रकिनारी असलेल्या जंगलांमध्ये काही वनस्पतींमध्ये सोडियम जास्त प्रमाणात असतं. म्हणून काही प्राणी किनार्यावरच्या या वनस्पती खातात. कधीकधी तर हत्तीसारखे काही प्राणी दाट जंगलांमध्ये असलेल्या गुहांमध्ये जाऊन ओलसर खडक खरवडून खातात. या खडकांवर असलेलं मीठ त्यांना या गुहांत जाण्यास भाग पाडतं. काही प्राणी मीठ मिळण्यासाठी विशिष्ट ठिकाणची माती खातानाही दिसतात.
डोंगराळ भागातील जंगली बकर्या किंवा हरणं, गिर्यारोहणाला आलेल्या माणसांचा घाम चाटून त्यांची मिठाची कमतरता भरून काढतात. त्यासाठी कधीकधी ते त्यांचा चक्क पाठलाग करतात. मांसाहारी प्राण्यांना मात्र अशी मिठाची वेगळी शोधाशोध करावी लागत नाही. कारण त्यांच्या अन्नातून, म्हणजे इतर प्राण्यांच्या मांसातूनच पुरेसं सोडियम त्यांना मिळतं. त्यामुळे मिठाची आवड ही प्रामुख्याने शाकाहारी आणि काही सर्वभक्षी प्राण्यांमध्ये जास्त दिसते. थोडक्यात, मीठ ही फक्त चवीची गोष्ट नाही. शरीर नीट चालण्यासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे काही प्राणी मिठाकडे ओढले जातात, हे मिठाच्या चवीपेक्षा त्यांच्या शरीराच्या गरजांमुळेच असतं.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
