आपण आपल्या घरात वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरतो. ती प्रामुख्याने लोखंड, तांबं, ॲल्युमिनिअम यांसारख्या धातूंपासून किंवा स्टेनलेस स्टील, पितळ, कांस्य अशा मिश्रधातूंपासून तयार केलेली असतात. यातील काही भांड्यांचे पृष्ठभाग गुळगुळीत असतात तर काही भांड्यांचे खडबडीत असतात. भांड्यांचे पृष्ठभाग खडबडीत करण्यासाठी त्यावर वरून हातोड्याने ठोके मारले जातात.
भांड्यांना ठोके मारण्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे मजबुतीकरण! भांडी बनविण्यासाठी लागणारे धातू पत्र्याच्या रूपात उपलब्ध असतात. या पत्र्यावर वारंवार ठोके मारले की पदार्थांचे रेणू अधिक जवळ येतात. त्यामुळे पत्रा पातळ असूनदेखील भांडी कडक आणि मजबूत होतात. अशी भांडी सहजासहजी वाकत नाहीत किंवा त्यांना सहजासहजी तडे जात नाहीत.
पितळी भांड्यांना आतून कल्हई लावली जाते. कल्हई म्हणजे कथिलाचा पातळ थर असतो. ठोके मारून खडबडीत केलेल्या पितळी भांड्यांवर कल्हईचा थर चांगल्या प्रकारे बसतो आणि जास्त काळ टिकून राहतो.
भांड्यांना ठोके मारल्यामुळे पृष्ठभागावर लहान लहान खड्डे तयार होतात. त्यामुळे भांड्याचा पृष्ठभाग वाढतो. अशा भांड्याला खालून मिळणारी उष्णता संपूर्ण भांड्यात समप्रमाणात आणि लवकर पसरते. त्यामुळे अन्न लवकर शिजतं. एवढंच नव्हे तर ठोके मारलेल्या भांड्यात उष्णता जास्त वेळ साठवून ठेवली जाते. अशा भांड्यात अन्न जास्त वेळ गरम राहतं.
धातू आणि मिश्रधातूपासून वेगवेगळ्या घरगुती उपयोगासाठी भांडी बनविली जातात. रोजच्या वापरासाठी जशी पातेली, ताटं, वाट्या, कळशी, घागर अशी भांडी बनवतात तशीच प्रासंगिक उपयोगासाठी अत्तरदाणी, गुलाबदाणी, पुष्पपात्र हीदेखील कारागीर तयार करतात. ही भांडी नक्षीदार असतात. याचं बरंचसं श्रेय त्यावर हातोड्याने मारलेल्या ठोक्यांना जातं. असं केल्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर चांगली नक्षी तयार होते आणि वस्तू आकर्षक दिसते. ठोके मारलेल्या वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन ते चकाकतं. म्हणून भांड्यावर ठोके मारणं या कृतीला सौंदर्यात्मक पैलूदेखील आहे.
भांड्यावर ठोके मारणं हे कौशल्याचं काम आहे. यासाठी हातोडी किती जोराने आणि कुठे मारावी यांचं ज्ञान असावं लागतं. हे कौशल्य वर्षानुवर्षे सराव केल्यानं येतं. कारागीर अशा विविध आकारांच्या आणि विविध नक्षीकाम असलेल्या वस्तू तयार करतात. मात्र ही कला आता अस्तंगत होत आहे. जुन्या काळात कलाकारांनी बनवलेल्या अशा अनेक वस्तू आजही आपलं मन मोहून घेतात. अशा वस्तू आता संग्रहालयात पाहायला मिळतात. त्यासाठी शक्य झालं, तर जवळच्या संग्रहालयाला नक्की भेट द्या.
