कुठल्याही स्पर्धात्मक खेळाच्या सामन्याआधी खेळाडू नेहमीच सराव करताना दिसतात. जॉगिंग, हात-पाय ताणणं, उड्या मारणं, सांध्यांच्या विविध हालचाली करणं या प्रकारचे व्यायाम केले जातात. या व्यायाम प्रकारांना ‘वॉर्म अप’ असं म्हटलं जातं. टेनिससारख्या खेळात सामन्याआधीचा ठरावीक वेळ अशा सरावासाठी राखून ठेवलेला असतो. या वेळेत खेळाडू टेनिसमधील शॉट पूर्ण ताकदीने न खेळता हळूहळू खेळताना आपण टीव्हीवर पाहिलं असेलच. आपल्याला सामना कधी सुरू होतो याची उत्कंठा असते पण खेळाडू मात्र कोर्टवर लगेच खेळायला सुरुवात न करता असे लुटुपुटुचे फटके खेळत असतात.
‘वॉर्म अप’चा शब्दश: अर्थ ‘गरम करणं’ असा आहे. आपण जेव्हा हालचाल करत नसतो, तेव्हा आपलं शरीर थंड असतं. जेव्हा आपण कुठलाही व्यायाम करतो, तेव्हा शरीर गरम होतं. थंड तापमानापासून गरम होण्यापर्यंतच्या काळात, शरीराला या बदलाशी जुळवून घ्यावं लागतं. व्यायामामुळे शरीर अचानक गरम होतं. असं झाल्यास त्यामुळे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. ते टाळण्यासाठी प्रत्येकानेच खेळाआधी सराव करणं आवश्यक आहे.
सराव करण्यामुळे हळूहळू हृदयगती वाढते, श्वासाचा वेग वाढतो. यामुळे हृदयावर अचानक येणारा ताण टाळता येतो. रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. शरीरात आणि मुख्यत: स्नायूंमध्ये रक्ताभिसरण सुधारतं. फुप्फुसांतून ऑक्सिजन रक्तावाटे स्नायूंपर्यंत पोचतो. तसंच रक्तातून शर्कराही स्नायूंना उपलब्ध होते. खेळताना होणार्या श्रमांसाठी स्नायूंमध्ये जास्त प्रमाणात ऊर्जानिर्मिती आवश्यक असते. ती या साखरेतून मिळते. रक्ताभिसरणामुळे कार्बन डायॉक्साईड आणि लॅक्टिक आम्लासारखे टाकाऊ पदार्थ स्नायूंमधून लवकर बाहेर पडण्यास मदत होते. स्नायूंमध्ये येणारा थकवा टाळता येतो. स्नायूंचं तापमान वाढतं. गरम झालेले स्नायू जास्त वेगाने आकुंचन पावतात आणि शिथिलही होतात. यामुळे खेळासाठी आवश्यक लवचीकता येते. स्नायू आखडण्याची शक्यता कमी होते. यातून खेळताना अपेक्षित वेग, ताकद आणि चपळाई येते. स्नायू व सांध्यांना दुखापत होणंही टाळता येतं. खेळाआधीच्या सरावामुळे स्नायूंची कार्यक्षमता जास्त काळ टिकवता येते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाआधी व्यायाम केल्यामुळे खेळाडूची एकाग्रता वाढते. व्यायामामुळे त्याचं खेळाकडे लक्ष केंद्रित होतं. त्याच्यावरचं दडपण कमी होतं आणि त्याला खेळात अपेक्षित असलेल्या स्पर्धेला तोंड देण्याचा आत्मविश्वास मिळतो. अशा प्रकारे वॉर्म अपमुळे शरीर आणि मन यांच्यात समन्वय साधला जाऊ शकतो. तेव्हा आपल्याला जर कोणत्याही खेळात खेळाडूंची सर्वोत्तम कामगिरी बघायची असेल तर आपली सामना सुरू होण्याची उत्कंठा थोडी ताणून धरावी आणि खेळाडूंना त्यांचा सराव पूर्ण करू द्यावा!
– डॉ. राजेश पुसाळकर मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
