आपण अनेकदा पक्षी विजेच्या तारांवर निर्धास्तपणे बसलेले पाहतो. माणसाचा विजेच्या तारेला स्पर्श जरी झाला तरी त्याला विजेचा तीव्र धक्का बसतो, परंतु उच्च दाबाच्या तारेवर बसूनही पक्ष्यांना विजेचा धक्का कसा बसत नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो.
कुठलीही गोष्ट दोन बिंदूंमधून ‘वाहण्या’साठी त्या दोन बिंदूंच्या पातळीमध्ये फरक असावा लागतो. विद्युतप्रवाह वाहतानासुद्धा विद्युतप्रवाहाच्या सर्किट म्हणजेच परिपथाच्या दोन बिंदूंमध्ये व्होल्टेजचा फरक म्हणजेच विभवांतर असतं. जसं पाणी जास्त उंचीवरून कमी उंचीकडे वाहतं. तसाच विद्युतप्रवाह जास्त विद्युतदाबाकडून म्हणजे जास्त विभवाकडून, कमी विद्युतदाबाकडे म्हणजेच कमी विभवाकडे वाहतो.
आपल्या घरातल्या विजेच्या तारा सुरक्षित असतात; कारण त्यावर असलेलं प्लॅस्टिकचं आवरण (इन्सुलेशन) विद्युतरोधक असतं. या तारांमध्ये उच्च विद्युतदाब असतो तर जमिनीला ‘शून्य विद्युतदाब’ असतो. जर तारांवरचं आवरण नसेल आणि आपण त्या तारेला स्पर्श केला, तर आपल्या शरीरामुळे, तार आणि जमीन जोडले जातात. तार आणि जमीन यांच्यात विभवांतर असल्यामुळे साहजिकच विद्युतप्रवाह जास्त दाबाकडून, आपल्या शरीराच्या माध्यमातून जमिनीकडे वाहतो आणि आपल्याला विद्युतधारेचा धक्का बसतो.
पण कोणताही पक्षी जेव्हा विद्युतधारेच्या उघड्या तारेवर बसतो, तेव्हा त्याचे दोन्ही पाय एकाच तारेला स्पर्श करत असतात. त्या तारेवर विद्युतदाब सगळीकडे जवळजवळ समान असल्यामुळे, पक्ष्याच्या दोन्ही पायांमध्ये कोणतंही लक्षणीय विभवांतर नसतं आणि विभवांतर नसल्यामुळे विद्युतप्रवाह वाहत नाही. त्यामुळे विद्युतप्रवाह पक्ष्याच्या शरीरातून जात नाही. कोणत्याही उपकरणामधून वा तारेमधून विद्युतप्रवाह वाहत असेल, तर त्याला तारेकडून वा त्या उपकरणातल्या पदार्थाकडून थोडाफार रोध (विरोध) होत असतो. त्या पदार्थानुसार म्हणा किंवा धातूनुसार हा रोध कमी जास्त असतो. विद्युतप्रवाह नेहमी कमीत कमी रोधाचा मार्ग निवडतो. तारेचा रोध हा त्या तारेवर बसलेल्या पक्ष्याच्या शरीराच्या रोधापेक्षा खूप कमी असल्यामुळे, विद्युतप्रवाह पक्ष्याच्या शरीरातून न वाहता त्या तारेतून वाहतो.
थोडक्यात, विद्युतप्रवाह वाहणार्या कोणत्याही ‘एकाच’ तारेवर बसून, पक्षी आनंदाने झोके घेऊ शकतो. पण, जर एखाद्या पक्ष्याने एकाच वेळी, ज्यांच्यामध्ये विद्युतदाबाचा फरक आहे, अशा दोन वेगवेगळ्या तारांना किंवा एक तार आणि जमिनीला स्पर्श केला, तर सर्किट म्हणजे विद्युतपरिपथ पूर्ण होईल. अशा परिस्थितीत, विद्युतधारा त्या पक्ष्याच्या शरीरातून प्रवाहित होऊन त्याला तीव्र धक्का बसू शकेल. घार-गरुडासारख्या मोठ्या पक्ष्यांच्या बाबतीत, ते एका तारेवर असतील आणि जर त्यांच्या पंखाचा दुसर्या तारेला स्पर्श झाला तर त्यांना विजेचा धक्का बसण्याची शक्यता असते.
चारुशीला सतीश जुईकर
मराठी विज्ञान परिषद

