आपल्या घरातला आरसा खाली पडला तर काच फुटते आणि तिचे तुकडे इकडेतिकडे उडतात. हे तुकडे धारदार, टोकदार असल्यामुळे ते गोळा करताना बोटांना इजा होऊ शकते. मात्र गाडीच्या काचा फुटल्यावर असे धारदार, टोकदार तुकडे होताना दिसत नाहीत. असं का होतं?

गाडीच्या काचा या आरशाच्या काचेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं तयार केल्या जातात. फुटलेल्या काचेमुळे माणसांना इजा होऊ नये म्हणून विशिष्ट रचना आणि तंत्रज्ञान वापरून अशा काचा घडवलेल्या असतात.

आरशासाठी वापरली जाणारी साधी काच आणि गाडीची काच यांच्यातला फरक समजून घेण्यासाठी त्या कशा तयार केल्या जातात ते पाहू या.

साधी काच तयार करण्यासाठी वाळू (सिलिका), सोडा ॲश आणि चुनखडी हे पदार्थ योग्य प्रमाणात एकत्र करून भट्टीत उच्च तापमानाला वितळवले जातात. या वितळलेल्या मिश्रणाला हवा तसा आकार देऊन काच हळूहळू थंड केली जाते. अशी काच तुटली तर ती मोठ्या व धारदार, टोकदार तुकड्यांत फुटते. त्यामुळे ही काच गाड्यांमध्ये वापरली तर अपघाताच्या वेळी गंभीर जखमा होऊ शकतात.

गाड्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या काचा मुख्यत: दोन प्रकारच्या असतात; लॅमिनेटेड काच आणि टेम्पर्ड काच. लॅमिनेटेड काच प्रामुख्याने गाडीच्या पुढच्या बाजूसाठी  (विण्डशील्ड) वापरली जाते. या काचेत सँडविचप्रमाणे दोन काचांच्या थरांमध्ये मजबूत, लवचीक आणि चिकट असा पॉलिव्हिनाइल ब्युटिराल या प्लास्टिकचा थर असतो. सुरुवातीला सर्व थर हलक्या उष्णतेनं जोडले जातात. त्यानंतर एका विशिष्ट भट्टीमध्ये १३० ते १५० अंश सेल्सियस तापमानाला दाब देऊन ते गरम करतात. त्यामुळे प्लास्टिकचा थर काचेला घट्ट चिकटतो. काच फुटली तरी तिचे तुकडे या प्लास्टिकच्या थराला चिकटून राहतात. फुटलेल्या काचेचे तुकडे खाली पडत नाहीत किंवा प्रवाशांवर उडत नाहीत.

गाडीच्या बाजूच्या आणि मागील काचा टेम्पर्ड काचा असतात. या काचा उच्च तापमानाला गरम करून पटकन थंड केल्या जातात. या प्रक्रियेमुळे त्या साध्या काचेपेक्षा चार ते पाचपट अधिक मजबूत होतात. अशा काचा फुटल्यावर मोठे धारदार तुकडे न होता छोटे, बोथट तुकडे तयार होतात. त्यामुळे प्रवाशांना होणारी इजा टाळता येते किंवा जखमांची तीव्रता कमी होते. अशा काचा वापरायला सुरक्षित असल्यानं त्यांना सुरक्षित काचा म्हणतात.

अपघात झाल्यावर फुटलेल्या काचांमुळे गाडीतील माणसांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणून गाडीत अशा सुरक्षित काचा वापरल्या जातात. त्यामुळे जीवितहानी टाळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.

शुभदा चंद्रशेखर वक्टे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org