– सुजाता आग्रे

फलंदाजाने मारलेला चेंडू दूरवर जाण्यामागे केवळ फलंदाजाची शरीरयष्टी किंवा ताकद नसते; तर त्यामागे विज्ञानाची मोठी किमया असते. क्रिकेट हा खेळ केवळ शक्तीचा नाही तर वेळ, ऊर्जा, बॅट पकडण्याची हातोटी आणि चेंडू बॅटच्या नेमक्या कोणत्या भागानं टोलवायचा याचा अचूक अंदाज या सर्वांचा एक सुंदर मिलाफ आहे.

चेंडूला जेवढ्या जोरात बॅटनं टोलवलं जातं तेवढा त्याचा वेग वाढतो. बॅटच्या वजनदार भागानं जेव्हा चेंडू मारला जातो तेव्हा बॅटमधली गतिज ऊर्जा चेंडूला हस्तांतरित होते आणि तो लांबवर फेकला जातो. बॅटचा वेग आणि हाताचा जोर जेवढा जास्त, तेवढा चेंडू लांब जातो. चेंडू बॅटला लागत असताना, तो काही सेकंदांसाठी किंचित दबला जातो आणि नंतर पुन्हा आपल्या मूळ आकारात येतो. ही प्रक्रिया एखाद्या स्प्रगिंसारखी काम करते, ज्यामुळे चेंडूला अतिरिक्त वेग मिळतो.

बॅटच्या मध्यभागी एक असा ‘जादुई’ बिंदू असतो, ज्याला ‘स्वीट स्पॉट’ म्हणतात. इथे चेंडू आदळल्यास ऊर्जा वाया जात नाही आणि चेंडू जास्त वेगाने जातो. म्हणूनच कधीकधी फलंदाज हलक्या हाताने मारतो असं वाटतं, पण चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडलेला असतो. रोहित शर्मा खेळताना हेच दिसून येतं. तो खूप जोरात मारतोय असं वाटत नाही, पण त्याचं अचूक टायमिंग आणि स्वीट स्पॉटचा वापर यामुळे चेंडू लांबवर जातो.

दुसरीकडे, जेव्हा महेंद्रसिंह धोनी त्याचा प्रसिद्ध ‘हेलिकॉप्टर शॉट’ मारतो, तेव्हा त्याच्या बॅटचा वेग इतका प्रचंड असतो की संथ चेंडूवरही जोरदार ताकद निर्माण होते आणि चेंडू लांबवर फेकला जातो.

यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कमी वेळेत जास्त बल लावणं! जेव्हा फलंदाज चेंडूला अगदी अचूक क्षणी टोलवतो तेव्हा चेंडूचा वेग अचानक वाढतो. जेव्हा बॅट चेंडूवर आघात करते, तेव्हा चेंडूसुद्धा बॅटला ‘प्रतिक्रिया आघात’ देतो. या प्रतिक्रियेमुळेच चेंडूला प्रचंड वेग मिळतो.

चेंडू लांब जाण्यात फक्त फलंदाजाची ताकद नसते, तर गोलंदाजाचा वेगही कारणीभूत असतो. जेव्हा गोलंदाज ताशी १४० ते १५० किलोमीटर वेगाने चेंडू टाकतो तेव्हा त्या चेंडूमध्ये खूप ऊर्जा सामावते. फलंदाजाला फक्त आपली बॅट योग्य कोनात लावायची असते. चेंडू जितका वेगवान तितकाच तो बॅटवरून वेगाने टोलवला जातो. शिवाय चेंडू जमिनीशी ४५ अंशाचा कोन करून हवेत गेला तर तो जास्तीत जास्त अंतर कापतो.
म्हणूनच तर ताकद, टायमिंग आणि विज्ञान यांचा अचूक संगम झाला की मिळतो एक खणखणीत षटकार!