एखादं लहान घर असो किंवा एखादी मोठी इमारत, गटाराचे नाले असोत किंवा एखादा पूल, सिमेंटचं कोणतंही बांधकाम पूर्ण झाल्यावर, त्याच्यावर पाणी मारण्याचं काम करताना आपण मजुरांना पाहतो. बांधकाम झाल्यावर साधारण दोन आठवडे अथकपणे चालणारं हे काम त्या बांधकामासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं.
बांधकामासाठी वापरण्यात येणार्या वेगवेगळ्या साहित्यातील सिमेंट हा एक आवश्यक पदार्थ आहे. सिमेंट हे चुनखडी, चिकणमाती, वाळू, आयर्न ऑक्साईड आणि जिप्सम हे पदार्थ एकत्र करून रासायनिक प्रक्रियेतून बनवतात.
बांधकामासाठी कधी जाड वाळू, तर कधी बारीक वाळू, छोटे- मोठे दगड, सिमेंट आणि पाणी यांचं मिश्रण वापरतात. त्याला ‘काँक्रीट’ असं म्हणतात. सिमेंट तयार करताना वापरलेल्या वेगवेगळ्या पदार्थांमुळे सिमेंटमध्ये पाणी घातलं की खूप उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे काँक्रीटमधल्या पाण्याची लगेचच वाफ होते. पाणी निघून गेल्यामुळे, त्या ठिकाणी काँक्रीटमध्ये सूक्ष्म पोकळ्या निर्माण होतात आणि काँक्रीटची मजबुती कमी होते.
काँक्रीटमधून पाणी निघून जाणं टाळण्यासाठी बांधकामावर सतत पाणी मारतात, बांधकामातील खांब (कॉलम) ओल्या पोत्याने झाकतात आणि ती पोती सुकू नयेत म्हणून त्यांच्यावरही सतत पाणी मारतात. स्लॅबवर पाण्याचं तळं तयार करतात. बांधकामावरील कोणताही भाग हवेच्या संपर्कात येऊन त्यातील पाणी निघून जाणार नाही याची काळजी घेतली जाते. बांधकामातील पाणी टिकवून ठेवणं आणि त्याचं तापमान कायम ठेवणं या प्रक्रियेला ‘क्युरिंग’ म्हणतात.
बांधकाम झाल्यानंतरचा सुरुवातीचा काळ या प्रक्रियेसाठी महत्त्वाचा असतो. कारण काँक्रीटला त्याची ६५ ते ७० टक्के ताकद पहिल्या आठवड्यात प्राप्त होते. काँक्रीटच्या बांधकामावर कमीत कमी एक ते दोन आठवडे पाणी मारलं जातं. यात कसूर झाल्यास काँक्रीटची मजबुती मोठ्या प्रमाणावर कमी होते. क्युरिंग अजिबात न केल्यास काँक्रीटची ताकद निम्म्याहून कमी होऊ शकते.
आजकाल सतत पाणी फवारत बसण्याऐवजी, बाजारात केवळ यासाठीच उपलब्ध असलेल्या काही रसायनांची एकदाच बांधकामावर फवारणी करतात. या रसायनांना ‘क्युरिंग कंपाउंड’ असं म्हणतात. ही रसायनं बांधकामावर फवारली की त्यांचा पातळ थर बांधकामावर तयार होतो. त्यामुळे बांधकामातील पाण्याची वाफ होत नाही, ते उडून जातं नाही, आतमध्ये भेगा आणि छिद्रही राहात नाहीत. बांधकामात ओलावा टिकून राहतो. बांधकाम मजबूत होण्यासाठी मदत होते. क्युरिंग कंपाऊंड वापरल्याने पाण्याचीही थोडी बचत होते.
बांधकामावर पाणी मारणं किंवा क्युरिंग कंपाऊंड फवारणं हे काँक्रीटला मजबूत करून त्याचं बांधकाम दीर्घायुषी करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org

