आपण आपल्याही नकळत डोळ्यांच्या पापण्यांची सतत उघडझाप करत असतो. मुद्दाम काही करावं लागत नाही. जसं हृदय आपोआप धडधडत असतं, तशाच पापण्याही आपोआप लवत असतात. अर्थात, आपल्या लहान मेंदूतल्या लंब मज्जारज्जूच्या अनेक कामांपैकी हेही एक काम आहे.

दोन परिस्थितीत पापण्या लवतात. एक म्हणजे दर मिनिटाला १५-२० वेळा आपोआप होणारी पापण्यांची उघडझाप! या क्रियेमुळे डोळ्यातल्या अश्रूग्रंथीमधून सतत स्रवणारे अश्रू, पापणीच्या प्रत्येक लवण्याबरोबर डोळ्यात पसरतात आणि या क्रियेमुळे डोळ्यातला सूक्ष्म कचरा डोळ्याच्या एका कोपर्‍यात नेला जातो. तसंच अश्रूंमुळे डोळ्याला वंगण मिळतं. ते कोरडे होऊ दिले जात नाहीत. डोळे शुष्क किंवा पूर्ण कोरडे झाले तर डोळ्यांची आग होते. कधी कधी कायमचा दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो. अश्रूंमुळे डोळे सतत निर्जंतुक ठेवले जातात. डोळ्याच्या पृष्ठभागात रक्तवाहिन्या नसल्याने, अश्रूंमुळे तिथल्या पेशींना पोषकद्रव्यं आणि प्राणवायू मिळतो.

डोळ्यावर अश्रूंची तीन आवरणं किंवा पदर असतात. सर्वात बाहेरचा पदर हा तैल पदार्थाचा असतो, जो अश्रू सुकून जाऊ नयेत म्हणून संरक्षण करतो. मधला पाणीदार पदर, डोळ्याला आवश्यक ती पोषणद्रव्यं आणि प्राणवायू पोहोचवतो. आणि सर्वात आतला पदर हा बुब्बुळावर असतो. पापण्या लवण्यामुळे हे सर्व थर एकसमान प्रमाणात डोळ्यांवर पसरून राहतात.

दुसरी परिस्थिती म्हणजे एखादी गोष्ट डोळ्यांच्या दिशेने येत असेल, तीव्र प्रकाश डोळ्यांवर येत असेल किंवा वार्‍याबरोबर धूळ उडत असेल तर प्रतिक्षिप्त क्रियेने पापण्या लवतात. भावनांना वाट करून देणं हेसुद्धा अश्रूंचं काम आहे. आपल्याला दु:खाचे किंवा आनंदाचे अश्रू येतात, हे आपण सर्वांनी अनुभवलं आहेच.  काही लोकांच्या पापण्या कायमच्या लवलेल्या असतात. त्यामुळे त्यांचे डोळे अर्धवट झाकलेले दिसतात. अशी माणसे अर्धवट झोपेत असल्याचा भास होतो. हा आजार नसून वृद्धांमध्ये वयामुळे निर्माण होणारा दोष आहे. पापण्या उचलण्याची शस्त्रक्रिया करून हा दोष दूर करता येतो. हा दोष लहान मुलांमध्येही आढळू शकतो. पापणीचे अशक्त स्नायू, मज्जातंतूंना दुखापत या कारणांनीदेखील पापण्या खाली झुकतात.

डोळ्यांचे एकंदर आरोग्य चांगले राहण्यासाठी व पापणी झुकणं टाळण्यासाठी ‘तीस बाय तीस बाय तीस’ या नियमाचं पालन करावं असं तज्ज्ञ म्हणतात. दर ३० मिनिटांनी, ३० सेकंदांसाठी किमान ३० फूट अंतरावर असलेल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. हे तंत्र डोळ्यांना ओलावा द्यायला मदत करतं आणि डोळ्याची वस्तूवर नजर केंद्रित करणारी यंत्रणा कार्यान्वित राहते.

– हेमंत साने ,मराठी विज्ञान परिषद