कुत्र्यासारखा प्राणी समोर आला की मांजर घाबरतं. आपलं अंग ताठ करतं आणि केस फुगवतं, त्यामुळे त्याच्या आकारापेक्षाही ते मोठं दिसतं. कुत्र्याचा गोंधळ उडतो आणि मांजर कुत्र्यापासून आपला बचाव करू शकतं. आपल्या अंगावर शहारा येण्याचं मूळ कारणही स्वत:चा बचाव हेच आहे. हे कदाचित अविश्वसनीय वाटेल; पण तेच खरं आहे!
हजारो वर्षांपूर्वी आदिमानवाच्या अंगावर खूप जाड केस होते. थंडीमध्ये किंवा समोर संकट उभं राहिल्यास, या केसांच्या मुळाशी असलेले स्नायू आकुंचन पावत आणि त्यामुळे प्रत्येक केस ताठ उभा राही. केस उभे राहिल्यामुळे अंगात उष्णता कोंडून राहत असे आणि त्यामुळे थंडीपासून बचाव करता येई किंवा भक्षक प्राण्यांपासून स्वत:चा बचाव करता येई.
संकटकाळी प्राण्याकडून होणार्या या प्रतिक्षिप्त क्रियेला ‘अंगावर शहारा येणं’ असं म्हणतात. ही क्रिया शरीराच्या स्वायत्त मज्जासंस्थेच्या मदतीने घडते. ताण, भीती किंवा धोक्याच्या परिस्थितीत ‘फाइट ऑर फ्लाइट’ म्हणजे ‘लढा अथवा निघून जा’ असा प्रतिसाद ही संस्था कार्यान्वित करते. ‘धोक्याचा सामना करा’ अथवा ‘इथून पळ काढा’ असा संदेश दिल्यामुळे प्राण्याला आपलं अस्तित्व टिकवायला मदत होते. उत्क्रांतीनंतर मानवाच्या शरीररचनेत बदल झाला आहे. त्याकाळी अंगावर असणारे केस तेवढ्या प्रमाणात आता नाहीत. मात्र जगण्याची मूलभूत अंत:प्रेरणा मात्र कायमच आहे. थंड हवामान, तापाआधीची थंडी, भीती, धक्कादायक घटना, उत्तेजित करणार्या तीव्र भावना किंवा काही वेळा अतिकर्कश आवाज यासारख्या गोष्टींना शरीर प्रतिसाद देतं आणि स्वायत्त मज्जासंस्था पूर्वीसारखीच कार्यान्वित होते. केसांच्या मुळाशी असलेले स्नायू या अनैच्छिक प्रतिक्षिप्त क्रियेमुळे पूर्वीसारखेच आकुंचन पावतात. मात्र आता केस कमी झाल्यामुळे केसांच्या मुळाशी असलेली त्वचा फुगून तिथे छोटे फोड आल्यासारखं दिसतं. हे होणं म्हणजेच अंगावर काटा येणं किंवा शहारा येणं होय! काही व्यक्तींना तर गुदगुल्या झाल्यावर किंवा प्रभावी संगीत ऐकल्यावरही असाच शहारा येऊ शकतो. भारतानं टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यावर, ऋषभ पंतनं ‘चित्तथरारक सामन्यानंतर अंगावर रोमांच उभे राहिले’ अशी प्रतिक्रिया दिली होती. हासुद्धा अतितीव्र सुखद घटनेनंतर शहारा येण्याचा प्रकार म्हणता येईल.
शहारा येणं ही शरीराची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. त्याची तीव्रता उत्क्रांतीनंतर कमी होत गेली आहे. उत्क्रांतीनंतर मानवाची शेपूट गळून जसं फक्त माकडहाड शिल्लक राहिलं आहे तसंच आता तीव्र घटनांना प्रतिसाद म्हणून हे सौम्य स्वरूपातले अंगावर शहारे आहेत असं म्हणता येईल!
– डॉ. राजेश पुसाळकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa. org
संकेतस्थळ : www. mavipa. org
