‘अमेरिका, युरोप येथील हवामानाचा अंदाज अचूक असतो, पण भारतातला हवामानाचा अंदाज मात्र फारसा भरवशाचा नसतो’, अशी विधानं सतत आपल्या कानावर पडत असतात. याला कारण म्हणजे भारतीय हवामानाचा अंदाज तयार करणं किती आव्हानात्मक आहे याची वैज्ञानिक माहिती सर्वसामान्यांना नसते.
भारत देश हा तीन बाजूंनी समुद्राने व एका बाजूने जमिनीने वेढलेला आहे. शिवाय तो पृथ्वीच्या उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) व उपोष्णकटिबंधीय (सबट्रॉपिकल) भागात आहे. या भागातलं हवामान अस्थिर, म्हणजे सतत बदलणारं असतं. भौगोलिक स्थिती आणि वातावरणाची अस्थिरता यांसारख्या एकमेकांवर परिणाम करणार्या हवेच्या घटकांमुळे व त्यांच्या गुंतागुंतीच्या क्लिष्ट स्वरूपामुळे हवामानाचा अचूक अंदाज तयार करण्यामध्ये १०० टक्के यश मिळवणं अवघड असतं.
हवामानाच्या अंदाजासाठी लागणारी मूलभूत गोष्ट म्हणजे, सद्य:स्थितीतल्या व भूतकाळातल्या हवेच्या सर्व घटकांच्या अचूक नोंदी! आपल्या देशातल्या अनेक भागात, विशेषत: दुर्गम भागांत, निरीक्षणं घेण्याची यंत्रणा नसल्यामुळे तिथल्या नोंदी उपलब्ध नसतात. याचा परिणाम क्षेत्रनिहाय अंदाज देण्यावर किंवा दिलेल्या अंदाजाच्या गुणवत्तेवर होतो.
निरीक्षणांच्या नोंदींचं प्रमाण आणि गुणवत्ता, प्रारूपांचा दर्जा, हवेच्या कोणत्या स्थितीचा अंदाज तयार करायचा आहे त्याची माहिती व संगणकाची क्षमता यांवर हवामानाच्या अंदाजाची अचूकता अवलंबून असते.
अंदाजाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये भूतकाळातल्या हवामानाच्या नमुन्यांचा व हवेच्या घटकांच्या निरीक्षणांच्या नोंदींचा वापर करून, भूतकाळातल्या हवामानाशी मिळताजुळता अंदाज तयार केला जात असे. यात गणिती समीकरणं सोडवून, नोंदींचे आकडे जवळच्या पूर्णांकात घेतले जात असल्याने अंदाजाची अचूकता कमी होत असे. संगणकाचा वापर सुरू झाला, तेव्हा सुरुवातीला ते कमी क्षमतेचे होते व त्यावर चालणार्या प्रारूपांमध्ये वातावरणातल्या होणार्या सूक्ष्म बदलांची नोंद होत नव्हती. इतर देशांतल्या प्रारूपांमध्ये बदल करून ती हवामानाच्या अंदाजासाठी वापरूनही अंदाजात अचूकता येत नव्हती. १६ घटकांचं भारतीय प्रारूप म्हणजे ‘गोवारीकर प्रारूप’ वापरून तयार केलेला अंदाजही काही वर्षंच बरोबर ठरला.
गेल्या दोन दशकांमध्ये मात्र अत्याधुनिक निरीक्षण यंत्रणा, सक्षम व गतिशील संगणक, योग्य प्रारूपांची निर्मिती आणि विकास, तसंच प्रशिक्षित आणि कुशल शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ यांच्या उपलब्धतेमुळे व त्यांच्या संशोधनावर आधारित अथक प्रयत्नांमुळे भारतीय हवामानाच्या अंदाजाची अचूकता वाढते आहे. संपूर्ण देश, राज्यं, शहरं ते ५-६ किलोमीटर अंतरावरील ठिकाणांचा तसंच काही महिन्यांचा ते काही मिनिटांपर्यंतचा म्हणजे दीर्घ कालावधी ते सद्य:स्थितीच्या हवामानाचा अचूक अंदाज देणं आता शक्य झालं आहे. तरीही दूरवरच्या हवामानाच्या घटकांत अचानक होणारे तीव्र बदल हे अंदाजाच्या अचूकतेवर परिणाम करतातच.
– अनघा शिराळकर , मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
