दिवस २४ तासांचा असण्यामागे वैज्ञानिक आणि ऐतिहासिक अशी दोन्ही प्रकारची कारणं आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी स्वत:च्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीची एक पूर्ण फेरी म्हणजे आपल्या आयुष्यातील एक दिवस. पृथ्वीच्या या फेरीमुळेच सूर्य उगवतो, मावळतो, पुन्हा उगवतो आणि दिवस आणि रात्रीचं हे सत्र निरंतर चालू राहतं. पण या एका पूर्ण फेरीसाठी नेमके २४ तासच का लागतात?
याच्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. २४ हा आकडा काही निसर्गानं ठरवलेला नाहीये, तर माणसांनी ठरवलेला आहे. या वेळेची २४ तासांत विभागणी करण्याचे श्रेय प्राचीन इजिप्शियन लोकांना जातं. आज आपण अंक लिहिण्यासाठी दहा पाया असलेली दशमान पद्धत वापरतो. पण प्राचीन काळी मोजणीसाठी १२ हा पाया असलेली द्वादशमान पद्धत वापरली जायची. आपल्या हाताच्या अंगठ्याने एकाच हाताच्या इतर चार बोटांची पेरं मोजली तर ती १२ भरतात.
यामुळे १२ हा आकडा मोजणीसाठी अत्यंत सोयीचा होता.
इजिप्शियन लोकांनी दिवसाचं मोजमाप करण्यासाठी सूर्यघड्याळाचा वापर केला. त्यांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळेचे दहा समान भाग केले आणि त्यात सकाळच्या व संध्याकाळच्या संधिप्रकाशाचा प्रत्येकी एक तास मिळवून दिवसाचे १२ तास निश्चित केले. रात्रीच्या वेळी वेळ मोजण्यासाठी त्यांनी आकाशातील ३६ नक्षत्रांचा अभ्यास केला. रात्रीच्या पूर्ण अंधारात यातील १२ नक्षत्रांचा उदय व्हायचा, त्यावरून रात्रीचे १२ तास ठरवण्यात आले. अशा प्रकारे १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असा २४ तासांचा एक पूर्ण दिवस त्यांनी निश्चित केला होता. हे सूर्योदय-सूर्यास्ताच्या आधारावर आणि १२ ही संख्या गणितीयदृष्ट्या सोयीची असल्यानं प्रचलित झालं. नंतर जगभर हेच प्रमाण स्वीकारलं गेलं.
विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर, पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे एक दिवस. पृथ्वी स्वत:भोवती पूर्ण फिरण्यासाठी साधारणपणे २३ तास, ५६ मिनिटे आणि ४ सेकंद घेते. याला ‘नक्षत्र दिन’ म्हणतात. पण पृथ्वी सूर्याभोवतीही फिरत असल्यामुळे, सूर्याला पुन्हा त्याच ठिकाणी आकाशात दिसण्यासाठी पृथ्वीला थोडे अधिक फिरावे लागते. या प्रक्रियेला साधारण २४ तास लागतात, ज्याला आपण ‘सौर दिवस’ म्हणतो.
कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीचा एक दिवस खूप लहान होता. कारण त्याकाळी पृथ्वी थोडी जलद फिरत असे. उदाहरणार्थ, डायनासोरच्या काळात एक दिवस साधारण २३ तासांचा होता. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात म्हणजे लाखो वर्षांनंतर आपला दिवस २४ तासांपेक्षा मोठा असेल.
– मकरंद भोंसले
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : ffice@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
