साबणाचा वास आणि आकर्षक रंग हे पाहूनच सहसा आपण साबणाची वडी खरेदी करतो. पण कोणत्याही रंगाचा साबण असला तरी त्याचा फेस मात्र पांढराच असतो. असं का बरं? सूर्यप्रकाश जरी वरकरणी पांढरा दिसत असला तरी तो सात रंगांचा बनलेला आहे, हे आपल्याला माहीत आहे. सूर्यप्रकाश लोलकातून गेल्यावर सात रंगांमध्ये विभागला जातो. त्याचप्रमाणे त्या सात रंगांचे प्रकाशकिरण जेव्हा एकमेकांत मिसळतात तेव्हा पांढरा रंग तयार होतो.
जेव्हा कोणत्याही वस्तूवर सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्या त्या वस्तूंच्या गुणधर्मानुसार सूर्यप्रकाशाच्या सात रंगांपैकी काही रंग त्या पदार्थात शोषले जातात तर काही रंग परत बाहेर फेकले जातात. म्हणजेच परावर्तित होतात. जो रंग शोषला न जाता परावर्तित होतो त्या रंगाचा तो पदार्थ दिसतो. उदाहरणार्थ, एखादा पदार्थ लाल रंगाचा दिसतो कारण सूर्यप्रकाशातले लाल सोडून इतर सर्व रंग या पदार्थात शोषले जातात आणि लाल रंग परावर्तित केला जातो. आपण एखाद्या चकतीवर सूर्यप्रकाशात असणार्या सात रंगांचे पट्टे रंगवले आणि ती चकती जोरजोरात फिरवली तर त्या पट्ट्याकडून परावर्तित होणारे वेगवेगळ्या रंगांचे प्रकाशकिरण एकमेकांत मिसळतात आणि ती फिरणारी चकती ‘पांढरी’ दिसते.
साबणाची वडी तयार करताना त्यामध्ये वेगवेगळी रंगद्रव्यं वापरली जातात. साबणावर सूर्यप्रकाश पडला असता, त्या साबणाच्या वडीमध्ये जे रंगद्रव्य असेल, तो रंग परावर्तित होतो. त्यामुळे आपल्याला ती साबणाची वडी त्या त्या रंगाची दिसते.
जेव्हा आपण पाणी लावून साबण घासतो तेव्हा फेस तयार होतो. म्हणजेच असंख्य छोटे छोटे हवेचे फुगे किंवा बुडबुडे तयार होतात. साबणाच्या अतिशय पातळ पापुद्र्याने तयार झालेले हवेचे असंख्य छोटे छोटे बुडबुडे एकमेकांना बिलगून असतात. ज्याला आपण फेस म्हणतो. सूर्यप्रकाश जेव्हा या बुडबुड्यांवर पडतो तेव्हा बुडबुड्यांच्या आरपार न जाता, तो या प्रत्येक बुडबुड्याच्या बाहेरच्या आवरणावर आदळतो आणि परत फिरतो. त्या वेळी तो काही अंशी वक्रही होतो आणि सर्व दिशांना पसरतो. हा सूर्यप्रकाश प्रत्येक बुडबुड्यावरून परावर्तित होऊन आजूबाजूच्या साबणाच्या थेंबांमधून परावर्तित झालेल्या किरणांवर सतत आपटत राहतो.
साबणाच्या वडीत जरी एकच रंगद्रव्य असलं तरी प्रत्येक साबणाच्या थेंबाच्या आवरणातून सात रंगांपैकी वेगवेगळे रंग परत फिरले जातात. परंतु हे सर्व परावर्तित रंग, एकमेकात मिसळल्याने पांढरा रंग तयार होतो. म्हणूनच साबणाची वडी कोणत्याही रंगाची असली, तरी तयार झालेला फेस हा पांढराच दिसतो.
