– विजया चौधरी

झाडाच्या पानांचा हिरवागार रंग आपल्याला नेहमीच सुखावतो. अगदी एकाच झाडावर दिसणार्‍या हिरव्या रंगाच्या अनेक छटा मन मोहून टाकतात. पालवी फुटताना गुलबट हिरवी दिसणारी पानं, पोपटी रंगाची कोवळी पानं, गर्द हिरवी पानं, पिवळट हिरवी झाक असलेली म्हणजे हळुहळू ‘वृद्धत्वा’कडे वळलेली पानं आणि पिवळी-तपकिरी पिकली पानं!

सूर्यप्रकाश शोषून घेऊन, प्रकाशसंश्लेषण करून वनस्पती स्वत:चं अन्न स्वत: तयार करतात. त्यासाठी त्यांच्या पानात ‘हरितद्रव्य (क्लोरोफिल)’ हे हिरव्या रंगाचं रंगद्रव्य असतं, म्हणून पानं हिरवी असतात. हे पानातलं हरितद्रव्य सतत वापरलं जातं आणि नव्याने निर्माणही होत असतं. नव्यानं हरितद्रव्य निर्माण करण्यासाठी झाडाला खूप ऊर्जेचा वापर करावा लागतो. त्यामुळे, जसजसं एखादं पान म्हातारं व्हायला लागतं, तसतसं झाडं त्या पानाची ‘हरितद्रव्या’ची रसद बंद करतं. पानाचा हिरवा रंग हळूहळू विरायला लागतो. आता मात्र इतका वेळ हरितद्रव्याच्या अस्तित्वानं झाकली गेलेली, पानामधली इतर रंगद्रव्यं, विशेषत: ‘कॅरोटिनॉईड्स’, म्हणजे पिवळ्या किंवा नारिंगी रंगाची रंगद्रव्यं, आपले रंग दाखवायला लागतात. पान हळुहळू पिवळेपणाकडे झुकायला लागतं.

वृद्धापकाळाकडे झुकणार्‍या पानामध्ये, त्या झाडासाठी, पानानं तयार केलेलं अन्न आणि पोषणद्रव्य साठवलेलं असतं. पान गळून पडण्याआधी हे अन्न वाया न जाऊ देण्याचं भान निसर्गत: झाडाला असतं. त्या पानामध्ये आधी असलेल्या हरितद्रव्याचं विघटन व्हायला लागतं, तसं त्यातली पोषणद्रव्यं बाहेर काढून घेतली जातात. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पानाच्या देठाच्या बाजूला एक प्रकारचा थर तयार होऊ लागतो, ज्यामुळे पानाला होणारा पाण्याचा पुरवठा थांबतो. पानातली कॅरोटिनॉईड्स आणखी स्पष्ट दिसू लागतात. पान पूर्ण पिवळं किंवा तपकिरी होतं आणि अखेर गळून पडतं.

काही प्रदेशात, थंडीच्या दिवसात दिवस खूप लहान आणि रात्री खूप मोठ्या असतात. अशा वेळी सूर्यप्रकाश फार कमी वेळ असतो. अशा काळात हरितद्रव्याच्या कामाची गतीही मंदावण्याची गरज असते. तेव्हा पानांमधलं हरितद्रव्य विघटित व्हायला लागतं, नवीन हरितद्रव्य तयार होत नाही. त्यामुळे पानातली, आत्तापर्यंत लपून राहिलेली कॅरोटिनॉईड्स, अँथोसायानिन्स अशी काही रंगद्रव्यं खुलायला लागतात. कॅरोटिनॉईड्समुळे पानांना पिवळा किंवा केशरी असा रंग यायला लागतो तर कधी अँथोसायानिन्समुळे काही पानांना, लाल किंवा जांभळा रंग मिळतो. मात्र कधी झाडांना लागलेल्या एखाद्या रोगामुळे पानं पिवळी किंवा तपकिरी पडू लागतात. अशावेळी त्यांना योग्य त्या औषधोपचाराची गरज असते.

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org