– सुनील सुळे
बर्याचदा आपण, पौर्णिमेच्या दिवशी पश्चिमेला सूर्य मावळत असताना पूर्वेला संपूर्ण चंद्रबिंब उगवताना पाहिलं असेल. त्या दिवसानंतर तो हळूहळू उशिरा उगवत जातो आणि अमावास्येच्या आसपास तर जवळजवळ सूर्याबरोबरच मावळताना दिसतो. बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या हे लक्षात येईल की चंद्रोदयाची वेळ रोज सुमारे पन्नास मिनिटं उशिराची असते. हे असं का होत असेल?
सूर्यमालेमध्ये सूर्याचं स्थान अढळ आहे. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसांमध्ये फिरते आणि स्वत:भोवती २४ तासांमध्ये फिरते. आपण वेळ मोजण्यासाठी सूर्याचा उदय-अस्त आणि मुख्यत: मध्यान्ह या घटनांचा वापर करतो. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या काळाचे आपण २४ भाग केले आहेत आणि त्या एकेक भागाला ‘तास’ हे नाव दिलं आहे. आजची कालगणना ही केशियम मानकावर आधारित आण्विक घड्याळाद्वारे केली जाते, तरीही ती सौर संदर्भ वापरून केलेल्या कालगणनेशी खूपच मिळतीजुळती असते. म्हणूनच सूर्य आणि चंद्र यांच्या मार्गक्रमणेच्या वेगातल्या फरकाच्या मोजमापाला आधुनिक कालगणना पद्धत वापरली तरी चालते.
चंद्र पृथ्वीभोवती सुमारे २७ दिवसांमध्ये फिरतो, पण या २७ दिवसांमध्ये पृथ्वी आपल्या सूर्याभोवतीच्या मार्गावर काही अंतर पुढे गेलेली असल्यामुळे ते अंतर भरून काढायला चंद्राला आणखी अडीच दिवस लागतात. सूर्याच्या आधारे वेळ मोजताना आपल्याला हा काळ २९.५ दिवसांचा भासतो. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याने आपल्याला सूर्य स्थिर असूनही, आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. चंद्रही पृथ्वीच्या फिरण्याच्याच दिशेने पण पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या वेगापेक्षा काहीशा कमी वेगाने पृथ्वीभोवती फिरत असतो. यामुळे तो सूर्यापेक्षा रोज थोडाथोडा मागे पडताना दिसतो. हा मागे पडण्याचा वेग दिवसाला सुमारे पन्नास मिनिटं आहे म्हणून चंद्र आपल्याला दररात्री पन्नास मिनिटं उशिरा उगवताना दिसतो.
चंद्राच्या उदयास्ताचा हा ‘उशीर’ रोज थोडाफार पुढेमागे होत असतो म्हणून तो आपल्याला सुमारे पन्नास मिनिटं म्हणावा लागेल. त्यामागे चंद्राचा पृथ्वीला प्र्क्षिषणा घालण्याचा वेग कारणीभूत आहे. पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह सूर्याभोवती आणि चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गक्रमणा करत असतात. या मार्गक्रमणेदरम्यान चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचा मार्गक्रमणेचा वेग सरासरीपेक्षा वाढतो आणि तो जेव्हा पृथ्वीपासून दूर असतो, तेव्हा त्याचा मार्गक्रमणेचा वेग सरासरीपेक्षा थोडा कमी होतो. केप्लर या जर्मन खगोलशास्त्रज्ञाने सुमारे चारशे वर्षांपूर्वी ही निरीक्षणं नोंदवली होती. या बदलणार्या वेगांमुळे चंद्राच्या आकाशातल्या मार्गक्रमणेमध्ये अनियमितता येते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
