– गिरीश घाटे
गाडीत बसल्यावर इंजिन सुरू करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम सीटबेल्ट लावतो, नाही का? पण तो का लावतो? अनेकांना तो केवळ वाहतुकीचा एक नियम वाटतो. प्रत्यक्षात मात्र सीटबेल्ट हा आपल्या जिवाचं रक्षण करणारा सर्वात महत्त्वाचा सुरक्षा साथीदार आहे. अपघाताच्या वेळी तो गंभीर दुखापतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करतो आणि अनेकदा प्राणही वाचवतो. हे कसं घडतं ते समजून घेऊ या.
गाडी वेगात असताना आपलं शरीरही त्याच वेगानं पुढे जात असतं. अचानक ब्रेक लागला किंवा अपघात झाला, तर शरीर पुढे फेकलं जाऊन डॅशबोर्ड किंवा काचेवर आदळू शकतं. सीटबेल्ट आपल्याला सीटवर घट्ट धरून ठेवतो आणि गंभीर दुखापतीपासून संरक्षण करतो. तसंच, आजच्या गाड्यांमधील एअरबॅग सीटबेल्टच्या जोडीनं काम करण्यासाठी तयार केलेल्या असतात. त्यामुळे सीटबेल्ट लावला असेल, तरच एअरबॅग योग्य संरक्षण देतात. म्हणून ‘एअरबॅग आहे, मग सीटबेल्ट कशाला?’ हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
एक मोठा गैरसमज म्हणजे मागे बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावण्याची गरज नसते. प्रत्यक्षात मागच्या सीटवर बसलेल्यांनाही तितकाच धोका असतो. अपघाताच्या वेळी मागचा प्रवासी जोरानं पुढे फेकला जातो. तो पुढच्या सीटवर किंवा पुढच्या प्रवाशावर आदळू शकतो. म्हणून पुढे आणि मागे बसलेल्या प्रत्येकानं सीटबेल्ट लावणं तितकंच आवश्यक आहे. लहान मुलांसाठी तर अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांना मोठ्यांसारखा साधा सीटबेल्ट पुरेसा सुरक्षित नसतो. त्यांच्या वयानुसार आणि उंचीनुसार योग्य ‘चाइल्ड सीट’ वापरणं अधिक सुरक्षित ठरतं.
सीटबेल्टचं तंत्रज्ञानही खूप रंजक आहे. तुम्ही बेल्ट हळू ओढलात तर तो सहज बाहेर येतो. पण झटक्याने ओढला, तर तो लगेच अडकतो. कारण त्यामध्ये एक विशेष लॉकिंग यंत्रणा असते. गाडीला अचानक धक्का बसला किंवा जोरात ब्रेक लागला, की ही यंत्रणा क्षणार्धात कार्यरत होते. त्यामुळे बेल्ट पुढे सरकत नाही आणि प्रवाशाला सीटवर घट्ट धरून ठेवतो.
आजच्या काही आधुनिक गाड्यांमध्ये अधिक स्मार्ट सीटबेल्ट वापरले जातात. यात ‘प्री-टेन्शनर’ अपघाताच्या वेळी बेल्ट घट्ट करतो तर ‘लोड लिमिटर’ आवश्यक तेव्हा शरीरावरील दाब कमी करतो. काही प्रगत गाड्यांमध्ये ‘इन्फ्लेटेबल सीटबेल्ट’ आणि ‘व्हायब्रेशन अलर्ट’सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्येही उपलब्ध असतात. थोडक्यात सांगायचं तर सीटबेल्ट ही केवळ कायद्याची अट नसून जीवनाची हमी आहे. गाडीत पुढे बसला असाल किंवा मागे, प्रत्येकाने सीटबेल्ट लावलाच पाहिजे. ही एक छोटी सवय अपघात टाळू शकत नाही, पण अपघातात आपले प्राण मात्र नक्की वाचवू शकते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
