उन्हात थोडा वेळ घालवल्यानंतर आपल्या त्वचेचा रंग बदलतो. ती गडद दिसू लागते म्हणजे ‘टॅन’ होते. पण काहीजण पटकन आणि जास्त काळवंडतात, तर काही जण कमी. असं का? मुळात लोकांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा का असतो? याचं उत्तर दडलंय ‘मेलॅनिन’ नावाच्या नैसर्गिक रंगद्रव्यामध्ये.

मानवी त्वचेचे तीन मुख्य थर असतात. सर्वांत बाहेरचा पातळ थर म्हणजे एपिडर्मिस. धूळ, जंतू आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणं हे याचं काम! याच बाह्यथरात ‘मेलॅनोसाइट्स’ पेशी आढळतात, ज्या मेलॅनिन तयार करतात. याखालचा थर रक्तवाहिन्या, घामग्रंथी, केसांची मुळं आणि मज्जातंतू यांनी तयार होतो. तर सर्वांत आतला थर चरबी आणि ‘संयोजी’ ऊतींनी तयार झालेला असतो.

मेलॅनिन नैसर्गिक छत्रीसारखं काम करतं. ते सूर्याकडून येणार्‍या हानीकारक अतिनील किरणांना शोषून घेतं आणि त्वचेच्या खालच्या थरांपर्यंत पोहोचू देत नाही. जगभरातल्या सर्व लोकांमध्ये मेलॅनोसाइट्स पेशींची संख्या जवळपास सारखीच असते. तरीही त्वचेतल्या मेलॅनिनचा प्रकार आणि त्याचं प्रमाण यावर त्वचेचा रंग ठरतो. आफ्रिका, दक्षिण आशिया किंवा ऑस्ट्रेलियासारख्या भागांत तीव्र सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांचा सामना करण्यासाठी लोकांच्या त्वचेत जास्त प्रमाणात तपकिरी, काळ्या रंगाचं गडद मेलॅनिन आढळतं. त्यामुळे त्यांची त्वचा नैसर्गिकरीत्या गडद दिसते. याउलट विषुववृत्तापासून दूर असलेल्या प्रदेशात अतिनील किरणांची तीव्रता आणि प्रमाण कमी असल्यामुळे, तिथल्या लोकांच्या त्वचेत तांबूस लाल रंगाचं फिकट मेलॅनिन आढळतं आणि ते गोरे दिसतात. हे आनुवंशिक रंग बदलायला हजारो वर्षं लागतात. टॅन मात्र अल्पकालीन असतं.    

त्वचेचा प्रकार आणि जनुकीय रचना यानुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे टॅन होतो. फिकट त्वचेत मेलॅनिन कमी असल्यामुळे ती आधी जळते आणि नंतर टॅन होते. गडद त्वचेत मेलॅनिन जास्त असल्याने नैसर्गिक संरक्षण अधिक असतं. 

सूर्यप्रकाशात अतिनील ‘अ’ आणि अतिनील ‘ब’ असे दोन प्रकारचे किरण असतात. अतिनील ‘अ’ किरणांमुळे त्वचा लगेच टॅन होते कारण यात आधीपासून असलेल्या मेलॅनिनचा रंग गडद होतो तर अतिनील ‘ब’ किरणांनी झालेलं टॅन एक ते तीन दिवसांनी दिसतं आणि जास्त काळ टिकतं, कारण यात नवीन मेलॅनिन तयार केलं जातं. मात्र काही आठवड्यांतच आपला रंग पूर्ववत होतो, कारण आपली त्वचा सतत नवीन पेशी तयार करत असते आणि जुन्या पेशी मृतत्वचेच्या रूपात टाकून देत असते. या मृतत्वचेसोबत, काळवंडलेलं मेलॅनिनही निघून जातं. अशा प्रकारे टॅनिंग ही शरीराची स्वत:ची सनस्क्रीन प्रणाली आहे. आपण मात्र त्वचेच्या रंगांना सौंदर्याचं मोजमाप लावतो.  

चूकभूल : ‘तेल- कच्च्या घाण्याचं की रिफाइंड?’ हा १५ जून रोजी प्रसिद्ध झालेला लेख, १८ जून रोजी अनवधानाने पुन्हा प्रसिद्ध झाला.

– उमा रानडे, मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org