प्रीती बेंद्रे
आज शीतपेय कंपन्या ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणून आकर्षक जाहिरात करून शीतपेय विकत आहेत. परंतु काही शीतपेयं आरोग्याला हानिकारक ठरू शकतात. शीतपेयांमध्ये साखर आणि कॅफिन हे घटक प्रामुख्याने आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेनं सांगतल्याप्रमाणे, दिवसभरात पुरुषांनी ३६ ग्रॅम म्हणजे ९ चमचे व स्त्रियांनी २५ ग्रॅम म्हणजे ६ चमचे यापेक्षा अधिक साखर खाऊ नये. शीतपेयांमध्ये साखरेचं प्रमाण यापेक्षा खूप जास्त असतं.

शीतपेयातल्या अतिसाखरेमुळे कॅलरीज मिळतात, परंतु पोषण होत नसल्यानं पुन्हा भूक लागते. इन्सुलिनचं कार्य बिघडतं, टाईप-२ मधुमेह होऊ शकतो. कॅलरी भरपूर असून पोट भरत नाही, कारण शून्य तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्वं तसंच प्रथिनांचा अभाव! मेंदूला ‘पोट भरलंह्ण असं न कळल्यामुळे, पुन्हा भूक लागत राहते. त्यातच साखर आणि कार्बन-डाय-ऑक्साईड या वायूमुळे लेप्टिन आणि घ्रेलिन या संप्रेरकांचं असंतुलन होतं. ‘भूक लागली की पोट भरलं?’ याविषयी मेंदूचा गोंधळ उडून, जास्तच खाल्लं जातं. लठ्ठपणा वाढतो. कार्बन-डाय-ऑक्साईडच्या बुडबुड्यांमुळे पोट फुगतं. अपचन, छातीत जळजळणं, आतड्याला सूज येणं असे प्रकार होतात.

शीतपेयातले फॉस्फरिक आम्ल, सायट्रिक आम्ल हे घटक दातावरचं आवरण विरघळवतात. दातांत पोकळी निर्माण होते. अतिथंड शीतपेय प्यायल्यास रक्तवाहिन्या झटकन आकुंचन-प्रसरण पावतात, पचन मंदावतं. शीतपेयांमध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असल्यामुळे यकृताचं कार्य बिघडतं.

‘डाएट’ शीतपेयांमध्येसुद्धा साखर नसली तरी एस्पार्टम आणि सुक्रालेजसारख्या कृत्रिम गोडी वाढवणार्‍या रासायनिक पदार्थामुळे गोडी मिळते, पण कॅलरीज नाही. म्हणून खाण्याची तीव्र इच्छा होते. आतड्यातील उपयोगी जिवाणू मरतात. अर्धांगवायू, विस्मरणाचा धोका निर्माण होतो.

गर्भवती स्त्रियांनी शीतपेय प्यायल्यामुळे त्यातील कॅफिनमुळे अर्भकाची वाढ खुंटते. नाळेमधून कृत्रिम गोड पदार्थ जाऊन मेंदू, यकृतावर ताण निर्माण होतो. सोडियम बेंझोएटसारखी परिरक्षकं म्हणजेच प्रिझर्वेटिव्ह्ज अर्भकाच्या यकृतांवर ताण निर्माण करतात.

शीतपेयातील कृत्रिम रंगही मुलांमध्ये अतिक्रियाशीलता व ॲलर्जी निर्माण करतात. शीतपेयं शरीरात रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, मधुमेह, पचनविषयक समस्या, फॅटी लिव्हर, लठ्ठपणा निर्माण करून आपलं स्वास्थ्य बिघडवतात. म्हणून शीतपेयांऐवजी काही नैसर्गिक पेयं, उदाहरणार्थ रक्तदाब नियंत्रित करणारं नारळपाणी; सी-जीवनसत्त्वयुक्त लिंबूपाणी; कोकम, आवळा, वाळा यांची सरबतं किंवा वेगवेगळ्या फळांचे रस प्यावेत. पचनासाठी विकरं स्रवण्यासाठी, विषारी पदार्थांच्या उत्सर्जनसाठी आणि वंगण म्हणून उपयोगी ठरणारं पाणी भरपूर प्यावं. ताकही पचनासाठी लाभदायक असून आपल्याला ताजंतवानं ठेवतं. दालचिनीयुक्त ग्रीन-टी, ब्ल्यू-टी अशासारखी नैसर्गिक पेयं दैनंदिन जीवनात आपण घेतली, तर बर्‍याचशा आरोग्यविषयक समस्या नक्कीच टाळता येतील.
प्रीती बेंद्रे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org