डॉ. मुग्धा पत्की
इमारती बांधताना, जहाजं बांधताना, फर्निचर तयार करताना लाकूड वापरलं जातं. लाकडाचे तांत्रिकदृष्ट्या तीन प्रकार आहेत – हार्ड वूड म्हणजे जास्त घनतेचं लाकूड, सॉफ्ट वूड म्हणजे हलकं व मऊ लाकूड आणि इंजिनीयर्ड वूड म्हणजे कृत्रिमरीत्या प्रक्रिया करून बनवलेलं लाकूड. लाकडाचा वापर करताना गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचं लाकूड वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं. वरील प्रकारात हार्ड वूड हे लाकूड जास्त टिकतं. यामुळेच हे जास्त घनतेचं लाकूड फर्निचर, इमारती इत्यादीमध्ये वापरलं जातं. या लाकडाची रचनाच अशी असते की ते दीर्घकाळपर्यंत खराब होत नाही. चला तर हे कसं होतं ते आपण समजून घेऊया.
लाकूड हे सेल्युलोजच्या तंतूंचं जाळं असतं, ज्याला ‘लिग्निन’ या गुंतागुंतीच्या सेंद्रिय पॉलिमरमुळे कडकपणा मिळतो. सेल्युलोजच्या जाळ्याचे एकावर एक असे थर असतात. लाकडाची ताकद त्याच्या तंतूंच्या रचनेत असते. याला ‘ग्रेन’ म्हणतात. लाकडाचे तंतू कशा प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहेत, यावरून त्याची दाब किंवा वजन सहन करण्याची क्षमता ठरते. सरळ ग्रेन असलेलं लाकूड अधिक मजबूत असतं आणि अनियमित ग्रेन पॅटर्न असलेल्या लाकडाच्या तुलनेत ते फाटण्याची शक्यता कमी असते. याव्यतिरिक्त, लाकडामध्ये असलेल्या गाठी काही बाबतीत दिसायला आकर्षक वाटत असल्या तरी त्या लाकडाच्या रचनेत अडथळा आणून लाकडाची एकूण मजबुती कमी करू शकतात. त्यामुळे सरळ ग्रेन असलेलं लाकूड मजबूत व लवचीक असतं. लाकडाची रचना त्याला ताण सहन करायला मदत करते व वजन पेलण्यायोग्य बनवते.
याबरोबरच काही लाकडांत, उदाहरणार्थ सागाच्या लाकडात एक प्रकारचं नैसर्गिक तेल असतं, जे ओलेपणा अथवा किडे यापासून लाकडाचा बचाव करतं आणि त्याचा टिकाऊपणा वाढवतं. पर्यावरणीय समस्या म्हणजे वातावरणातला ओलावा, तापमान किंवा काही कारणास्तव होणारी झीज या गोष्टींना एखाद्या प्रकारच्या लाकडाचा प्रतिरोध कसा असतो यावर त्याचा टिकाऊपणा अवलंबून असतो.
लाकडातला ओलावा काढून टाकण्यासाठी त्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते यावरही त्याचा टिकाऊपणा अवलंबून असतो. उदा. भट्टीत वाळवल्याने जास्तीचा ओलावा निघून जातो आणि म्हणून कालांतराने लाकूड वाकण्याचा किंवा त्याला तडे जाण्याचा धोका कमी होतो. याशिवाय लाकडावर लावलेल्या वॉर्निश वा तेलामुळे लाकडावर पडणारे ओरखडे किंवा पाण्यामुळे होणारं नुकसान किंवा अतिनील किरणांमुळे होणारं नुकसान यापासून लाकडाचं संरक्षण होतं.
म्हणूनच लाकडाची मजबुती ही त्याचा कडकपणा आणि लवचीकता यांच्या संतुलनामुळे असते. साग, शिसम, साल, बाभूळ, देवदार ही टिकाऊ लाकडांची काही उदाहरणं आहेत.
डॉ. मुग्धा पत्की
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
