– शालिनी जोशी
स्वयंपाकघरातील स्टेनलेस स्टीलची भांडी म्हणजे दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक! याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्टेनलेस स्टील गंजत नाही. खरं तर हे स्टेनलेस स्टील लोखंडापासून तयार करतात आणि तरीही ते गंजत कसं नाही?
पाण्याच्या संपर्कात आल्यावर सर्वसाधारण लोखंडाच्या वस्तूंवर लालसर थर जमा होतो. यालाच आपण लोखंड ‘गंजलं’ असं म्हणतो. पाणी किंवा दमट हवेमध्ये लोखंडाची हवेतल्या ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि लोखंडाचं ऑक्साइड हा नवीन पदार्थ तयार होतो, तोच हा गंज! असा गंज जर आपल्या पोटात प्रमाणाबाहेर गेला तर अपायकारक ठरू शकतो. शिवाय आपल्या शरीरावर असलेल्या एखाद्या उघड्या जखमेला गंज थोड्या प्रमाणात जरी चिकटला तरी आपल्याला ‘टिटॅनस’ म्हणजेच धनुर्वातासारखा भयंकर आजार होण्याची शक्यता असते.
म्हणून जर हवेतला ऑक्सिजन लोखंडापर्यंत पोहोचूच दिला नाही तर ते गंजणार नाही आणि त्यामुळे होणारी ही हानी टाळता येईल, या विचारातून एका नवीन पदार्थाचा जन्म झाला. लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल एकत्र करून एक नवीन मिश्रधातू तयार केला गेला. त्याचं नाव स्टेनलेस स्टील! लोखंड ६६ ते ७५ टक्के, क्रोमियम १८ ते २० टक्के, निकेल ८ ते १० टक्के व कार्बन ०.०३ ते ०.०७ टक्का असं यातल्या घटक धातूंचं प्रमाण असतं. स्टेनलेस स्टीलचा वापर कशासाठी करायचा यानुसार हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकतं. याशिवाय आवश्यकतेनुसार इतर धातूही मिसळले जातात.
स्टेनलेस स्टीलच्या गंजरोधकतेत महत्त्वाची भूमिका असते क्रोमियमची. स्टेनलेस स्टीलमधल्या क्रोमियमबरोबर हवेतल्या ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया होते. त्यातून ‘क्रोमियम ऑक्साइड’ हे एक निष्क्रिय रसायन तयार होतं. त्याचा थर वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो. तो हवेतल्या ऑक्सिजनला, स्टेनलेस स्टीलमधल्या लोखंडापर्यंत पोहोचू देत नाही. परिणामी ते गंजत नाही. हा थर अगदी सूक्ष्म जाडीचा म्हणजे काही नॅनोमीटरचा असल्यामुळे, नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. शिवाय काही कारणाने तो नाहीसा झाला, तरी रासायनिक अभिक्रियेमुळे तो पुन्हा आपोआप तयार होतो. त्यामुळे स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचं प्रमाण जितकं जास्त, तितकं गंजण्यापासून संरक्षणही जास्त! अशा प्रकारे एका धातूचं अपायकारक ऑक्साइड तयार होऊ नये यासाठी दुसर्या धातूचं ऑक्साइडच कामी येतं!
पण यातही कार्बनचं प्रमाण जर ०.०७ पेक्षा वाढलं तर त्याची क्रोमियमबरोबर क्रिया होऊन क्रोमियम कार्बाइड तयार होतं आणि परिणामी क्रोमियम ऑक्साइडचा थर तयार करण्यासाठी क्रोमियम फारसं उपलब्ध होत नाही. अशा प्रकारची स्टेनलेस स्टीलची वस्तूही गंज पकडू शकते.
