हिवाळ्यात सूर्यास्त अधिक गडद लाल किंवा केशरी दिसतो. असं का होतं? याला वातावरणातला बदल आणि त्या वातावरणात होणारं प्रकाशाचं विकिरण कारणीभूत असतं. सूर्यास्ताच्या वेळी सूर्य क्षितिजाजवळ असतो. त्यामुळे प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वातावरणाच्या जाड थरातून जावं लागतं.
पांढरा सूर्यप्रकाश हा खरंतर सात रंगांनी बनलेला असतो. निळ्या आणि जांभळ्या रंगाची तरंगलांबी तुलनेने कमी असल्याने हवेतल्या सूक्ष्म कणांमुळे हे रंग जास्त पसरतात आणि ते हवेत लवकर विखुरतात. म्हणूनच आपल्याला आकाश नेहमी निळं दिसतं. लाल आणि नारिंगी रंगाची तरंगलांबी तुलनेने जास्त असल्यामुळे ते न विखुरता वातावरणाचा जाड थर पार करून थेट डोळ्यांपर्यंत पोहोचतात. हिवाळ्यात थंड हवेमुळे ही प्रक्रिया स्पष्टपणे जाणवते. वारा संथ वाहतो, त्यामुळे प्रदूषकं वातावरणात खालच्या स्तरावरच साचून राहतात.
वातावरणातले हे घटक जेव्हा सूर्याच्या प्रकाशात येतात, तेव्हा ते निळ्या रंगाला रोखतात आणि फक्त लाल रंगाच्या छटांना पुढे जाऊ देतात. यामुळेच कधीकधी क्षितिजावर आगीसारखा गडद लाल किंवा किरमिजी रंग दिसतो. थंड हवा दाट असते. ती भिंगासारखी काम करते. जेव्हा प्रकाश या हवेतून जातो, तेव्हा त्याचं जास्त अपवर्तन होतं आणि सूर्याची प्रतिमा थोडी मोठी आणि रंगाने गडद दिसते.
हिवाळ्यात हवेतील आर्द्रता ही उन्हाळ्याच्या किंवा पावसाळ्याच्या तुलनेत खूप कमी असते. हवेत बाष्प कमी असल्यामुळे प्रकाश विखुरण्याचं प्रमाण कमी होतं. कोरड्या हवेमुळे प्रकाशाचे रंग अधिक ‘शुद्ध’ आणि ‘तीक्ष्ण’ दिसतात. त्यामुळे सूर्यास्ताचा लाल रंग अधिक उठावदार दिसतो. याच कारणामुळे हिवाळ्यात सूर्य खरोखर मावळल्यानंतरही काही मिनिटे त्याचा लाल गोळा दिसत राहतो.
मकरंद भोंसले
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
