जांभई येते म्हणजे नक्की काय होतं? खरं तर जांभई येणं हे काही आळस आल्याचं लक्षण नाही, तर ती मेंदूच्या संदेशानुसार शरीरात घडणारी एक अतिशय शिस्तबद्ध, आपोआप घडणारी म्हणजेच अनैच्छिक प्रक्रिया आहे. जांभई येण्यामागे मस्तिष्कस्तंभ म्हणजे मेंदूचा सर्वात खालचा भाग आणि काही ‘न्यूरोट्रान्समीटर’ यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
न्यूरोट्रान्समीटर म्हणजे एका चेतापेशीकडून दुसर्या चेतापेशीकडे संदेश पोहोचवणारे रासायनिक दूत! डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि ॲसिटिलकोलिन हे काही यातलेच दूत! या दूतांनी एकमेकांना दिलेल्या संदेशांच्या साखळीनुसार जांभई येण्याची प्रक्रिया घडते.
जांभई आपण मुद्दाम देत नाही तर ती आपोआप येते हे आपल्याला माहीत आहे. यामध्ये तोंडातून मोठा, खोल श्वास घेतला जातो. त्या वेळी श्वसन पटल, घसा, स्वरयंत्र आणि चेहर्यावरील काही स्नायू ताणले जातात. यामुळे घशातून कानात जाणार्या नळ्या उघडतात आणि कानातील दाब संतुलित होतो. त्याच वेळी फुप्फुसांचे स्नायूही ताणले जातात आणि नंतर झटकन श्वास बाहेर सोडला जातो. यानंतर संपूर्ण शरीरात थोडी शिथिलता जाणवते.
पण हे सर्व का घडतं? आणि तेही आपोआप? पूर्वी असं मानलं जात होतं की, रक्तात ऑक्सिजन कमी झाला की जांभई येते. पण आधुनिक संशोधनानुसार जांभई येण्यामागे अनेक महत्त्वाची कारणं असू शकतात.
जांभईमुळे थंड हवा आत जाते आणि रक्तप्रवाह वाढतो. यामुळे मेंदूचं तापमान नियंत्रित राहतं. झोप येताना, झोपेतून उठताना, कंटाळा, ताण किंवा चिंता वाढली असताना जांभई येते. यामुळे हृदयाचे ठोके आणि मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा वाढतो आणि मेंदू अधिक जागा होतो. जांभईमुळे श्वसनाचे स्नायू ताणले जातात, फुप्फुसातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत हवा पोहोचते आणि श्वसननलिका कार्यक्षम राहतात. म्हणूनच गाडी चालवताना, घाटात चढताना किंवा उंचावर जाताना कानाला दडे बसतात किंवा ते बंद असल्यासारखे जाणवते आणि जांभई येते.
जांभई ही शब्दांशिवाय होणारी संवादाची भाषा आहे. समोरच्याला जांभई आली की आपल्यालाही येते, म्हणजे ती चक्क संसर्गजन्य आहे. संशोधनानुसार जांभईचा सहानुभूती, भावनिक जवळीक आणि सामाजिक बंध यांच्याशी संबंध असल्यामुळे, जवळच्या नातलग किंवा मित्रमैत्रिणींना जांभई देताना पाहून आपलाही मेंदू जांभई देण्याचा संदेश देतो!
तर पुढच्या वेळी जांभई आली की फक्त झोप येतेय असं न समजता; माझा मेंदू काही तरी महत्त्वाचं काम करत आहे, असं समजावं!
– डॉ. निलेश कोदे,
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org
