– डॉ. श्वेता चिटणीस

समुद्रकिनारी वाळूत आढळलेले सुंदर शंख-शिंपले आठवण म्हणून आपण घरी नेतो. परंतु आपल्याला रिकामे व बिनकामाचे भासणारे हे शंख-शिंपले सागरी प्राण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे कॅल्शियम कार्बोनेटचे स्रोत आहेत. भरती-ओहोटीच्या लाटांबरोबर ते किनार्‍यावर येतात किंवा समुद्रात जातात. शंख-शिंपल्यांतला महत्त्वाचा घटक आहे कॅल्शियम कार्बोनेट! हे कॅल्शियम कार्बोनेट किनार्‍यावर व समुद्रात मिसळतं. या कॅल्शिअम कार्बोनेटमधून मृदुकाय प्राण्यांच्या शरीराभोवती कठीण सुरक्षाकवच तयार होतं. त्यातही, शंख/शिंपले तयार होताना, समुद्राच्या पाण्यातला कार्बन वापरला जातो. त्यामुळे समुद्रात अतिरिक्त कार्बन साठून राहत नाही. या रासायनिक प्रक्रियेमुळे समुद्रातल्या पाण्याचं आम्लीकरण थांबतं. यामुळे पृथ्वीवरच्या प्रदूषणातून निर्माण होणारा अतिरिक्त कार्बन समुद्रात शोषला जाऊ शकतो; कार्बन चक्र संतुलित राहतं. त्यामुळे शंख शिंपल्यांतलं कॅल्शियम कार्बोनेट समुद्रात जाणं अत्यंत गरजेचं आहे.

किनार्‍यावर राहून, शंख-शिंपले हवामानबदल सुसह्य् करतात. समुद्री सूक्ष्मजीव व शेवाळ शंख-शिंपल्यामध्ये असतात. इतर प्राणी त्याचा वापर खाद्य म्हणून करतात. घर पाठीवर मिरवणारे मृदुकाय प्राणी केवळ या कवचामुळे सुरक्षित राहतात. यती खेकडे किनार्‍यावरच्या रिकाम्या शंखात घर करतात. हे खेकडे आपल्या शरीराच्या आकारानुसार राहण्यासाठी घर शोधतात. एखादा मोठा शंख रिकामा झाल्यावर आपल्या आकारमानानुसार हे खेकडे त्यात घर करतात. ही प्रक्रिया अतिशय जलदगतीने होत असते. मोठा खेकडा घर सोडून गेल्यावर, लगेच लहान खेकडा त्यात येऊन राहू लागतो. अशी एक प्रकारची साखळीसारखी व्यवस्था, हे हुशार खेकडे करतात. आपण मध्येच शंख उचलल्यास ही साखळी मोडते आणि या खेकड्यांना राहायला घर मिळत नाही. नाइलाजानं मग, हे खेकडे कचरापेटीतल्या प्लास्टिकच्या तुकड्यांमध्ये आपलं घर करू लागतात. त्यामुळे ते मरतात. वेळेवर घर मिळालं नाही तर किनार्‍यावरील उन्हामध्ये हे खेकडे शुष्क होऊन मरतात. किंवा शिकारी पक्षी व प्राणी या खेकड्यांची शिकार करतात. शंख-शिंपले किनार्‍यावरील वाळूचा महत्त्वाचा घटक आहेत. कारण ते किनार्‍याची होणारी धूप कमी करतात. दिवसभर अनेक पर्यटक किनार्‍यावर येत असतात. त्यापैकी प्रत्येकानंच जर निश्चय केला की, मी एकही शंख-शिंपला घेऊन जाणार नाही, तर पर्यावरणाचं कितीतरी मोठं नुकसान टाळता येईल.

समुद्रकिनारी, दुकानात विकल्या जाणार्‍या शंख-शिंपल्यांच्या कलात्मक वस्तू अनेक समुद्री प्राण्यांना अनधिकृत प्रकाराने मारून तयार करण्यात येतात. आपण त्या विकत घेणं थांबवलं तर अशा वस्तू बनवल्या जाणारच नाहीत. पर्यायानं सागरी जैवविविधतेचं रक्षण करण्यात आपला हातभार लागेल.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org