चित्र रंगवताना आपण पानांचा रंग हिरवा आणि फुलांचा लाल असंच रंगवतो ना? कधी पानांचा रंग लाल असतो का? नाही ना? परंतु आपल्या आजुबाजूच्या परिसरात वड, पिंपळ यासारख्या झाडांचं कधी निरीक्षण केलंय का? या झाडांना जेव्हा नवीन, कोवळी पालवी फुटते तेव्हा ती पानं हिरवी नसून चक्क लाल असतात.
खरं तर पानांना हिरवा रंग ‘हरितद्रव्य (क्लोरोफिल)’ नावाच्या रंगद्रव्यामुळे येतो. परंतु कोवळ्या व अपरिपक्व पानांमध्ये ‘अँथोसायनिन’ नावाचं रंगद्रव्य असतं. पानांच्या पेशीतल्या पोकळ्या आणि पानांच्या वरच्या भागात हे अँथोसायनिन आढळतं. त्यामुळे कोवळी पानं लाल दिसतात. हे रंगद्रव्य नाजूक पानांना प्रखर उन्हापासून वाचवतं. दुष्काळी परिस्थिती, गारवा, विषम हवामान, उन्हातली प्रखरता आणि अतिनील किरण यापासून ही पानं सुरक्षित राहून त्यांच्या ऊती व पेशी यांची वाढ व्यवस्थित होते ती केवळ अँथोसायनिनमुळेच! हे रंगद्रव्य हिरव्या आणि निळ्या तरंगलांबीचा प्रकाश शोषून घेऊन लाल रंगाची तरंगलांबी बाहेर फेकतं. म्हणून आपल्याला पानांचा रंग लाल दिसतो. नवीन कोवळ्या पानांमध्येसुद्धा हरितद्रव्य अल्प प्रमाणात असतंच पण त्यात अँथोसायनिनचं प्रमाण जास्त असतं.
अँथोसायनिन हे रंगद्रव्य जसं कोवळ्या पानांमध्ये असतं, तसंच ते फळांच्या सालींमध्येसुद्धा असतं. तिथे आणि पानांमध्येही, हे रंगद्रव्य सनस्क्रीनसारखंच काम करतं असं म्हणायला हरकत नाही.
खरं तर हरितद्रव्य, कॅरोटीनॉइड व अँथोसायनिन ही रंगद्रव्यं सर्वच पानांत असतात. परंतु प्रकाशसंश्लेषण फक्त हरितद्रव्यच करू शकतं. प्रकाशसंश्लेषणाद्वारे सूर्यप्रकाशाच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचं रूपांतर साखरेत होतं आणि या पोषणामुळे झाडाची वाढ होते.
‘क्लोरोप्लास्ट’ म्हणजेच हरितलवक हा पानांच्या पेशींमध्ये असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यातच हे हरितद्रव्य असतं, ज्याच्यामुळे प्रकाशसंश्लेषण होऊन झाडाच्या वाढीसाठी पोषक अन्न तयार केलं जातं. हे रंगद्रव्य जसं पानात वाढत जातं तसं कोवळं असलेलं पान परिपक्व होण्यास सुरुवात होते. पानाच्या वरच्या भागात असणारं अँथोसायनिन हे या हरितलवकाचं रक्षण करतं. लाल पानांमध्ये अँथोसायनिनबरोबरच ‘टॅनीन’ नावाचं द्रव्यसुद्धा असतं. हे द्रव्य, पानं खाऊन जगणारे कीटक आणि इतर प्राणी यांना फारसं चवदार लागत नसावं. म्हणून त्यांना हिरवी पानं जास्त आवडतात. त्यामुळे ते हिरवी पानं सोडून ही लाल पानं खात नाहीत. या सगळ्या सुरक्षेमुळे कोवळं पान हळूहळू वाढून परिपक्व होतं व त्यात हरितद्रव्य वाढू लागतं. मग लाल पालवी हळूहळू हिरव्या रंगाच्या पानांत परिवर्तित होताना दिसू लागते.
- डॉ. श्वेता चिटणीस, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
