१९९२ साली ब्राझील देशातल्या रिओ शहरात ‘वसुंधरा परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जागतिक स्तरावर ढासळणाऱ्या जैवविविधतेवर बराच ऊहापोह करण्यात आला. तरी त्यावेळी हवामान बदलाच्या संकटाचे रौद्र स्वरूप स्पष्ट दिसून येत नव्हते. या परिषदेत जगभरातल्या प्रदूषणाच्या अनेक घटनांमुळे पृथ्वीवरील नष्ट होत चाललेली जैवविविधता आणि विशेषत: महासागरातील जैवविविधता या मुद्दय़ांचा सखोल विचार करण्यात आला.

दरवर्षी ८ जूनला जागतिक महासागर दिन साजरा करण्याचा ठराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत २००८ साली मान्य झाला आणि २००९पासून तो अमलात येऊ लागला. या दिवसाच्या कार्यक्रमांना प्रयोजन असावे आणि लोकांच्या हातून काही भरीव घडावे या हेतूने ‘जागतिक महासागर दिन समिती’करवी एखादी संकल्पना (थीम) ठरवली जाते. प्रदूषण, मानवी हस्तक्षेप, कार्बन उत्सर्जन, हवामान बदल, अनिर्बंध मासेमारी यासारख्या असंख्य कारणांनी सागरी पर्यावरण व जैवविविधता धोक्यात आली आहे. यासंबंधी सरकारदरबारी तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी  लोकसहभागाची गरज अधोरेखित करण्यात आली. ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानंतर लगेचच ८ जूनला लोकांनी समुद्रकिनारी एकत्र यावे आणि विविध कार्यक्रम करून जनजागृती करण्यात यावी, हे जागतिक महासागर दिन साजरा करण्याचे प्रयोजन आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Why are we 50 years behind the world in the field of irrigation
आपण सिंचन क्षेत्रातच तेवढे जगाच्या ५० वर्षे मागे का?
solar waste in india
चिंताजनक अहवाल, २०३० पर्यंत भारतातील सौर कचऱ्यात होणार तब्बल २० पटींनी वाढ

२०२१ साली जागतिक महासागर दिनासाठी ‘महासागर: जीवन आणि उपजीविकेचे साधन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांपैकी चौदावे उद्दिष्ट ‘जलातील जीवन’ हे आहे. २०३० पर्यंत ही उद्दिष्टे पूर्ण होणे अपेक्षित आहे. २०२२ साली संयुक्त राष्ट्रसंघाने ‘शाश्वत सागरासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम’ ही संकल्पना आभासी माध्यमाद्वारे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीवरच्या जीवांचे रक्षण करणारा महासागर माणसाच्या बेपर्वाईमुळे अधिकाधिक संकटात सापडू नये आणि जनसामान्यांना महासागराचे महत्त्व कळावे, म्हणून हा दिवस साजरा केला जाणार आहे.

आपल्या पृथ्वीचा ७१ टक्के भूभाग महासागराने व्यापलेला आहे. आपण निर्माण करत असलेल्या  कार्बनडायऑक्साईड आणि अति-उष्णतेचे शोषण हाच महासागर करतो. जलीय वनस्पती प्लावकामुळे काही प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठादेखील होतो.  पृथ्वीवरील ८० टक्के जैवविविधता सागरात आढळते. अब्जावधी व्यक्तींच्या अन्नाची सोय महासागर करू शकतो, म्हणून आपण समुद्राचे पर्यावरण जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org