दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस १९३९ साली जर्मनी आणि सोव्हिएत सैन्याने पोलंडवर कब्जा केला आणि नाझी-सोव्हिएत करारान्वये या दोन सत्तांनी पोलंड आपसात वाटून घेतले. यामध्ये १९१९ साली पश्चिम युक्रेनचा जो काही प्रदेश पोलंडकडे गेला होता, तो सोव्हिएत संघाकडे आणि पर्यायाने युक्रेनमध्ये सामील झाला. विभागला गेलेला युक्रेन पुन्हा एकसंध बनला. जुलै १९४१ मध्ये हिटलरच्या नाझी जर्मनीने युक्रेनवर अतिक्रमण करून राजधानीचे शहर, कीव्ह घेतले. १९४१ ते १९४४ ही चार वर्षे युक्रेन जर्मनीच्या ताब्यात राहिले. या चार वर्षांत तीन लाख युक्रेनी सैनिक मारले गेले आणि दीड लाख युक्रेनियन ज्यूंना मारले गेले. या काळात पाच-सहा महिन्यांसाठी हिटलरने त्याचे प्रमुख कार्यालय आणि वसतीस्थान प्रशियातून युक्रेनमध्ये हलविले होते. सोव्हिएत फौजांनी जर्मनांवर प्रथमच प्रतिहल्ला करून नोव्हेंबर १९४३ मध्ये कीव्ह शहराचा ताबा घेतला. १९४३ व १९४४ मध्ये सोव्हिएत फौजांनी आगेकूच सुरू ठेवून जर्मन फौजेला युक्रेनबाहेर काढले. या युद्धात युक्रेनचे लाखो लोक जसे मारले गेले तसेच शेकडो शहरे आणि खेडी पूर्ण उद्ध्वस्त झाली, सरकारी सामायिक शेती उद्ध्वस्त झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर युक्रेन सोव्हिएत सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या राज्यघटनेत काही बदल केले गेले. युक्रेनची एक स्वतंत्र देश म्हणून ओळख जरी राखली गेली तरी त्यांच्या स्वायत्ततेवर नियंत्रण ठेवून त्याच वेळी युक्रेन हा सोव्हिएत युनियनचा एक भाग म्हणून कायम केला गेला. १९५३ साली स्टालिनचा मृत्यू झाला आणि सोव्हिएत युनियन आणि कम्युनिस्ट पक्षाची सूत्रे आता निकिता क्रुश्चेव्ह यांच्याकडे आली. रशियन आणि युक्रेनी संस्कृती आणि जीवनशैली यात मोठे साम्य आहे, रशियन लोक युक्रेनी लोकांना आपले भाऊबंद समजतात. १९५४ मध्ये निकिता क्रुश्चेव्ह यांनी युक्रेनच्या दक्षिणेला असलेला क्रीमिया हा छोटा रशियन प्रांत अचानक युक्रेनी प्रदेशात समाविष्ट केला. १९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर युक्रेन हा एक स्वतंत्र देश निर्माण झाला आणि क्रीमिया हा त्याचा एक प्रांत बनला. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com