– सुजाता आग्रे
यो-यो याखेळण्याचं नाव ‘यो-यो’ असं का पडलं असेल? ‘यो-यो’ हा शब्द फिलिपाइन्समधल्या इलोकानो किंवा तागालोग भाषेतून आला असून त्याचा अर्थ ‘परत ये’ असा होतो. पण यो-यो हे खेळणं खाली फेकलं असता परत हातात का येतं? यामागची कारणं काय?
यो-यो हा साधा दिसणारा खेळ अगदी हुशारीनं बनवलेला आहे. यात दोन चकत्या असतात. या दोन चकत्यांमध्ये एक छोटासा दांडा बसवलेला असतो. पण यात महत्त्वाची भूमिका आहे ती दोरीची! ही दोरी दांड्याभोवती गुंडाळलेली असते आणि तिचं दुसरं टोक बोटाला अडकवलेलं असतं. दोन चकत्यांमधल्या छोट्याशा जागेत ही दोरी फिरते. यो-यो परत हातात येण्यामागचं कारण म्हणजे त्याच्या दोरीची गुंडाळी आणि फिरण्याची गती!
जेव्हा यो-यो हातात असतो तेव्हा त्यात स्थितिज ऊर्जा साठवलेली असते. यो-यो हातातून खाली सोडल्यावर तो गुरुत्वाकर्षणामुळे खाली ओढला जातो. पण तेव्हा तो फक्त खाली न पडता अधिकच वेगाने फिरायला लागतो! या प्रक्रियेत साठवलेल्या स्थितिज ऊर्जेचं गतिज ऊर्जेत रूपांतर होतं. मग हा फिरणारा यो-यो परत वर कसा येतो?
यो-यो हा फक्त वरखाली जात नाही, तर तो खूप वेगानेही फिरतो. ही फिरण्याची ताकदच त्याला स्थिर राहायला भाग पाडते. यो-यो फिरत राहिला, तरच तो स्थिर राहून वर येऊ शकतो. दोरीला जेव्हा झटका दिला जातो तेव्हा दोरीला चक्राकार गतीने वळवणारी ताकद किंवा पीळ निर्माण करण्याची क्षमता येते. हा दिलेला झटकाच यो-योला पुन्हा वर खेचायला आणि दोरीला परत गुंडाळण्यास मदत करतो. ही दोरी परत दोन चकत्यांमधील दांड्याभोवती गुंडाळायला सुरुवात करते. पूर्ण दोरी गुंडाळण्यासाठी लागणारी ऊर्जा ही त्या फिरत्या योझ्र्योमधूनच मिळते. यो-योचं फिरणं त्या दोरीला परत गुंडाळतं आणि त्यामुळे तो वर चढत हातात येतो. म्हणजेच फिरत्या यो-यो मधल्या गतिज ऊर्जेचे परत स्थितिज ऊर्जेत रूपांतर होतं.
थोडक्यात, गुरुत्वाकर्षण, फिरण्याची गती, दोरीला दिलेला झटका आणि दोरीची गुंडाळी या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे यो-यो परत वर येतो. या सगळ्या प्रक्रिया घडण्यासाठी यो-योच्या चकत्या काही विशिष्ट पदार्थांपासून बनवलेल्या असतात. यासाठी सहसा के-रेझिन नावाचं, दीर्घकाळ टिकणारं प्लास्टिक वापरतात. कधीकधी लाकूड किंवा ॲल्युमिनियमही वापरतात. अतिशय महत्त्वाच्या यो-यो स्पर्धांसाठी मात्र ॲल्युमिनियम बरोबर स्टेनलेस स्टील किंवा टिटॅनियम यांचाही वापर केला जातो, जेणेकरून यो-यो परत येण्याची क्रिया अधिक प्रभावीपणे होते.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
