हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

आभासी विश्वातील वावरच नव्हे, तर त्या आभासी विश्वाचे थेट प्रकटीकरण आणि त्यात खऱ्याखुऱ्या भौतिक वस्तूंचा समावेश करणाऱ्या नव-तंत्रज्ञानाबद्दल..

मागील लेखात आपण ५-जी, फायबर नेटवर्कबद्दल चर्चा केली. आजच्या लेखात ‘ऑगमेण्टेड रिआलिटी / व्हर्च्युअल  रिआलिटी’ (एआर/व्हीआर) याबद्दल थोडक्यात जाणून घेत. १९९६च्या आसपास भारतात मोबाइल सेवा सर्वप्रथम सुरू झाली. तेव्हा प्रतिमिनिट कॉलची किंमत होती १६ रुपये, जी आज जवळजवळ मोफतच झालीय. तीच कहाणी साध्या २-जी फोनपासून गेल्या दोन दशकांत प्रत्येकाच्या आवाक्यात येऊ  शकलेल्या स्मार्ट-फोन, टच-फोन इत्यादींची. कारण सतत उतरत्या किमती. सध्या २५ हजार ते दोन लाख किमतीच्या एआर/व्हीआर सेटच्या बाबतही असेच पुढील काही वर्षांत नक्कीच होईल आणि एकदा का किमती चार-पाच हजापर्यंत घसरल्या की प्रत्येकाच्या हाती आज स्मार्ट-फोन दिसतो तसाच गळ्यात एआर/व्हीआर सेट अडकवलेला दिसणार!

एआर/व्हीआर  म्हणजे नक्की काय?

चौथ्या औद्योगिक क्रांतीपर्वात सुरू असलेल्या सध्याच्या सायबर-फिजिकल विश्वातील डिजिटल दुनियेचा अनुभव आपण फक्त द्विमितीपर्यंतच (२-डी) घेऊ  शकतोय, ते संगणक वा मोबाइल वापरून. पण तेच जर कोणी तुम्हाला त्या आभासी विश्वाच्या आत शिरून प्रत्यक्ष अनुभवायला दिले तर? फक्त डोळे, कान यांच्यापलीकडे स्पर्श, गंधदेखील अनुभवायला मिळाले तर? ही चेष्टा नव्हे, हे सर्व शक्य आहे. पण ‘आभासी अनुभव’ म्हणजे नक्की काय, ते पुढे पाहू.

व्हर्च्युअल  रिआलिटी (व्हीआर) :

संगणक प्रणालीद्वारा निर्माण केलेले आभासी वातावरण, ज्यामध्ये व्हीआर हेडसेट (चष्म्यासारखा एक प्रकार) घालून तुम्ही स्वत: त्या ठिकाणी असल्याचा, वावरल्याचा अनुभव घेऊ  शकता. उदा. संगणकाच्या पडद्यावर व्हिडीओ गेम खेळण्याची पुढची पायरी म्हणजे असले हेडसेट घालून तुम्ही त्या गेमच्या वातावरणामध्ये प्रत्यक्ष वावरण्याचा अनुभव घेत खेळणे. किंवा क्रिकेटचा सामना टीव्हीवर न पाहता, मैदानातील सीमारेषेवर उभे राहून पाहताय असा आभासी अनुभव घेत तो पाहणे. इथे दोन्ही ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष घरीच बसलेले असता, फक्त ते व्हीआर हेडसेट नामक चष्मे घालून.

ऑगमेण्टेड रिआलिटी (एआर) :

इथेही संगणक प्रणालीद्वारा निर्माण केलेले आभासी वातावरणच असते; फरक फक्त इतकाच की, एआरमध्ये ते दृश्य तुमच्यासमोर ३-डी रूपात प्रकट केले जाते. तुम्ही मग ३-डी सिनेमा बघावा तसा अनुभव घेऊ  शकता. उदा. तुम्ही फर्निचर विकत घेताय ऑनलाइन, पण खरेदीच्या आधी ते तुमच्या घरात प्रत्यक्ष कसे दिसेल हे पाहायचेय, तर एआर फीचर ऑन करताच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ते फर्निचर ३-डी रूपात दृश्यमान होईल. मग मोजमाप, रंगसंगती वगैरे पडताळून खरेदी.

ऑगमेण्टेड रिआलिटीमध्ये दोन प्रकार येतात :

(१) फक्त एआर दृश्य बघणे, जे हल्ली मोबाइल कॅमेरा वापरूनही शक्य झालेय. थोडक्यात, ३-डी सिनेमा बघण्यासारखे.

(२) एआर हेडसेट घालून असल्या विश्वाशी तुम्ही संवाद, स्पर्श अनुभवा शकता.

मिक्स्ड रिआलिटी (एमआर) :

ऑगमेण्टेड रिआलिटी आणि व्हर्च्युअल  रिआलिटीची सांगड घालून निर्माण केलेले आभासी विश्व, ज्यात तुमच्या अवतीभोवतीच्या भौतिक गोष्टीदेखील अंतर्भूत आहेत.

थोडक्यात व्हीआर म्हणजे आभासी वातावरणात तुमचा वावर, एआर म्हणजे आभासी वातावरण तुमच्या समोर प्रकट आणि एमआर म्हणजे आभासी विश्वामध्ये खऱ्याखुऱ्या भौतिक वस्तूंचा समावेश!

एआर/व्हीआर सेवेमधील प्रमुख घटक :

(१) संगणक सॉफ्टवेअर, अ‍ॅप्लिकेशन्स

(२) हार्डवेअर : एआर/व्हीआर सेट्स, सेन्सर्स

(३) कण्टेण्ट : २-डीपासून ३-डी दृश्य, व्हिडीओ आदी बनविलेला मजकूर

(४) टेलिकॉम नेटवर्क : ४ जी/ ५ जी, हाय स्पीड ब्रॉडबॅण्ड

एआर/व्हीआर सेवा समाविष्ट करता येतील असे उद्योग :

(१) व्हिडीओ गेम इंडस्ट्री : सध्याचा सर्वाधिक वापर. वापरकर्ता गेममधील खेळण्याच्या मैदानावर, युद्धभूमीवर वगैरे प्रत्यक्ष वावर करू शकल्यामुळे निर्माण होणारा उत्कट अनुभव असल्या व्हिडीओ-गेमप्रेमींना वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतोय म्हणे.

(२) वैद्यकीय : नवीन डॉक्टर, परिचारिका यांना प्रशिक्षण, प्रत्यक्ष शस्त्रक्रियेपूर्वी उपचार पर्याय ३-डी रूपात रुग्णाला दाखवता येणे, आदी.

(३) अवजड उद्योग : ‘डिजिटल ट्विन’ नावाची संकल्पना बरीच जोर धरू लागली आहे. इथे अवजड उपकरणांची आभासी नक्कल बनवली जाते. खऱ्या उपकरणांमध्ये आयओटी संवेदक बसवून, त्यातील रिअल टाइम विदेद्वारा आभासी नक्कल हुबेहूब रचली जाते. आणि मग अशा नकलेचा एआर/व्हीआर हेडसेट घालून प्रशिक्षण, दुरुस्तीच्या आधी चाचपणी असे उपयोग केले जाताहेत.

(४) करमणूक / क्रीडा / संगीत कार्यक्रम  : ‘महफिल में तेरी हम न रहें जो, गम तो नहीं है.. किस्से हमारे नजदिकियो के कम तो नहीं हैं’ असे आळवत बसण्यापेक्षा जिथे कार्यक्रम सुरू आहे, तिथे तुम्ही पोहोचू शकाल, तेही रिअल-टाइम घरबसल्या! मग तो सार्वजनिक संगीत कार्यक्रम असो, क्रिकेट सामना असो किंवा अगदी लांबवर असलेल्या जिवलगाचा वाढदिवस. हे सारे आता काल्पनिक वाटत असले, तरी या गोष्टी पुढील पाच-दहा वर्षांत नक्कीच जनसामान्यांच्या आयुष्यात प्रवेश करतील.. विशेषत: ५-जी प्रत्यक्षात उतरल्यावर!

(५) रिअल इस्टेट : स्वत:च्या घराचे स्वप्न अनेक जण पाहतात. ही सारखी सारखी न घडणारी बाब. पण बिल्डरकडे गेल्यावर- २२व्या मजल्यावरील दृश्य कसे दिसेल, व्ह्य़ू कसा असेल, प्रत्यक्ष घरातील वावर कसा असेल, हे सर्व न अनुभवताच तळमजल्यावरच मोठय़ा रकमेचा धनादेश फाडून, कर्ज काढून, मग पुढे दोन-पाच वर्षे वाट बघणे.. आणि कधी कधी पदरी निराशा. एआर/व्हीआरचा प्रसार रिअल इस्टेटमध्ये झाल्यास वरील सर्व मुद्दे बाद होतील.

(६) लष्कर : एकदम जिवंत युद्धभूमीवरील अनुभव देऊन प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष मोहिमेपूर्वी विविध पर्याय ३-डी रूपात दाखवून सराव. याद्वारे धोके, जीवितहानी कमी करण्याचा प्रयत्न.

(७) रीटेल : सामान्यपणे प्रत्यक्ष दुकानात जाऊन महागडा पोशाख ट्रायल रूममध्ये घालून, मग आरशासमोर उभे राहून, इतरांना दाखवून आपण खरेदी करतो. असा ‘वैयक्तिक’ अनुभव ऑनलाइन स्टोअरवर शक्य नाही. पण भविष्यात एआर/व्हीआर वापरून ऑनलाइन रीटेलमध्ये मोठी क्रांती घडवू शकेल हे तंत्रज्ञान.

(८) शैक्षणिक, प्रशिक्षण : आधी होते तोंडी ज्ञान, मग पुस्तके आली आणि त्यानंतर ऑडिओ-बुक्स बनली. आता त्यांचे शैक्षणिक व्हिडीओमध्ये रूपांतर होतेय. आणि पुढची पायरी असेल ‘इमर्सिव्ह व्हिडीओ-बुक्स’ म्हणजे एआर/व्हीआर सेट घालून पुस्तक एखाद्या ३-डी सिनेमासारखे बघता येणे किंवा त्यातील पात्रांना अनुभवता येणे.

२०२५ पर्यंतच्या जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास, व्हिडीओ गेम इंडस्ट्री (११.६ अब्ज डॉलर, ३०-३५ टक्के वाटा), त्यापुढे वैद्यकीय/ अवजड उद्योग/ करमणूक व्यवसाय (प्रत्येकी १०-१५ टक्के) असे उद्योग असतील.

एआर/व्हीआरमधील प्रमुख कंपन्या :

(१) मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स (२) गूगल ग्लास (३) सॅमसंग गियर (४) मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स किनेक्ट  (५) व्हीआर अ‍ॅप्लिकेशन्स : माया, ३-डी मॅक्स डिजाइन, यूनिटी, कण्टेण्टफूल, अनरिअल इंजिन (६) एआर अ‍ॅप्लिकेशन्स : एआर-किट, एआर-कोर, होलो-बिल्डर, थिंग-वोर्क्‍स, इत्यादी.

आभासी अनुभव

एआर/व्हीआर जागतिक बाजारपेठत वार्षिक ५० टक्के वृद्धी बघायला मिळतेय. संगणक अ‍ॅप्लिकेशन्स/ हार्डवेअर/ नेटवर्कमध्ये अभियांत्रिकी रोजगार निर्माण होतीलच, पण त्यासाठी एआर/व्हीआर संदर्भित प्रशिक्षण घेणे गरजेचे ठरेल. सर्वात मोठी संधी आहे ती कण्टेण्ट निर्मितीत. कारण वरील जागतिक कंपन्या त्यांचे सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क घेऊन बाजारात सिंहाचा वाटा मिळवतीलच; पण एआर/व्हीआर कण्टेण्टशिवाय सगळे मुसळ केरात. म्हणूनच वेब डिझायनर, वेब आर्टिस्ट यांना सध्या उपलब्ध असलेला मजकूर एआर/व्हीआर स्वरूपात बनविण्याची कंत्राटे अनेक वर्षे मिळू शकतील.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com