28 March 2020

News Flash

‘सत्यशोधक’

‘सत्यशोधक’चा कन्नड भाषेतील साठावा प्रयोग होणार होता. तेवढय़ात बातमी आली..

या नाटकात जोतिबांना ठार मारायला सुपारी घेऊन मारेकरी येतात असा एक प्रसंग आहे.

एक..

‘सत्यशोधक’ नाटकाने अनेक प्रकारचे अनुभव दिले. जोतिरावांचे साहित्य समजावून घेणे, अभिव्यक्त करणे आणि सफाई कर्मचाऱ्यांबरोबर काम करणे या  सुरुवातीला हे नाटक करण्यामागच्या मुख्य प्रेरणा होत्या. नाटकाच्या प्रवासात अनेक समविचारी व्यक्ती आणि संस्था आपोआप जोडल्या गेल्या. गेल्या तीन वर्षांत आजूबाजूच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीने भारतीय राजकारणात नवे वळण घेतले आहे. त्यातील घटनांचे संबंध या नाटकाशी आपतत: लागत गेले. त्यामुळे हे नाटक माझेच मला दरवेळी वेगळे दिसत चालले आहे.

दोन..

‘सत्यशोधक’चा कन्नड भाषेतील साठावा प्रयोग होणार होता. तेवढय़ात बातमी आली.. विचारवंत आणि लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गीचा निर्घृण खून!!! वृद्ध कलबुर्गी सरांच्या थेट कपाळात गोळ्या घालून मारेकरी पळाले!!!

खून करायची पद्धत काय? तर गाडीवरून यायचे, गोळ्या घालायच्या आणि पळून जायचे!!! या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशी यंत्रणा असल्याशिवाय आणि ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे साटेलोटे असल्याखेरीज दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गीचा खून होऊ शकेल?

या तिघांचा गुन्हा काय? तर ते मुख्यत्वे आताच्या काळात धर्मचिकित्सा करीत होते!!! धर्मचिकित्सा करायची, धर्माला प्रश्न विचारायची आपली मोठी परंपरा आहे. या परंपरेमुळे धर्म काळाबरोबर पुढे जातो, प्रवाही बनतो. असे झाले नाही तर धर्म म्हणजे डबके होईल. या डबक्यापासून धर्माला वाचवण्याच्या या परंपरेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रबोधनकार ठाकरेही सहभागी होते, हे कसे विसरता येईल?

धर्मचिकित्सा करणाऱ्या सर्वच माणसांना त्यांच्या काळात त्रास सहन करावा लागला. पण आताच्या काळात? थेट गोळ्याच!!! अशा कृत्यांनी आजच्या काळातील खुन्यांना अपेक्षित असलेला धर्म वाढेल? चिकित्सेचा, अभ्यासाचा आणि विचारांचा अवकाश संकुचित करणारी ही माणसे धर्म वाढवतात की बुडवतात? खऱ्या धर्माची मूल्ये कोणती? सहिष्णुता, अहिंसा, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता यांची जोपासना करणे म्हणजेच धर्म ना? आज जे स्वत:ला धर्माचे प्रवक्ते मानतात, ते यातील नेमके कुठले तत्त्व आचरणात आणतात? म्हणजे खरे धर्मप्रेमी कोण आणि खरे धर्मद्रोही कोण? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी की खुनी?

कर्नाटकात आम्ही त्या दिवशीचा प्रयोग दंडाला काळ्या फिती बांधून केला. धर्मचिकित्सा करणाऱ्या जोतिराव फुले या महान आद्य व्यक्तिमत्त्वाला भिडणारे ‘सत्यशोधक’ हे नाटक आम्ही करीत होतो. या नाटकात जोतिबांना ठार मारायला सुपारी घेऊन मारेकरी येतात असा एक प्रसंग आहे. तो मला या क्षणी आठवू लागला. तो संपूर्ण प्रसंग असा..

तीन..

(अंधुक प्रकाश. जोतिबा व सावित्री झोपलेले आहेत. खिडकीतून धोंडिबा रामोशी उडी मारून येतो. त्या आवाजाने सावित्री जागी होते. शेजारचा कंदील मोठा करते. त्या प्रकाशात रामोश्याची कुऱ्हाड चमकते. सावित्री एकदम भीतीने ओरडते. जोतिबा उठतात. सावित्री त्यांना बिलगते. रामोशी आणि धोंडीराम कुंभार मागे दबा धरून उभे.)

जोतिबा- कोण आहे तिकडे? कोण आहे? असे समोर या..

(दोघेही कुऱ्हाड पाजळत पुढे येतात. डोळ्यात अंगार.)

रामोशी- एऽऽऽ आवाज बंद.. एकदम आवाज नको..

सावित्री- अहो.. पण.. तू..

धोंडीराम- एऽऽऽ चूप.. थोबाडातून आवाज आला तरी मुंडकं बाजूला पडंल.. गप ऱ्हावा..

जोतिबा- हे पाहा.. हे सारं मान्य.. तुम्ही आम्हाला जरूर मारा, पण तुम्ही आहात तरी कोण? आणि आमचे मुडदे पाडायला का आलात, हे तरी सांगाल?

रामोशी- तुमचा निकाल लावायला आलो आहोत..

जोतिबा- हो, पण का बाबा? काय गुन्हा घडला आमच्या हातून ते तरी सांगाल?

धोंडीराम- ओ.. ते आम्हाला काय ठावं नाय. ए.. बघतोस काय, छाट मुंडकं..

(जोतिबा अजिबात हलत नाहीत. शांत आहेत.)

जोतिबा- अहो, पाहताय काय? जरूर उडवा माझं आणि या बाईंचं मुंडकं.. फक्त अजून एक मला सांगा.. आम्ही तुमचा काही अपराध केला आहे काय?

रामोशी- नाय.. तुम्ही आमचं कायबी वाईट केलेलं नाहीये.. तुमचा निकाल लावण्याकरता आमाला धाडलं आहे..

जोतिबा- ते तर तुम्ही आलात तेव्हाच जाणलं होतं.. आता मला अजून एक सांगा, की हे कृत्य करून तुम्हाला काय फायदा होणार आहे?

रामोशी- फायदा म्हंजे? पैका मिळणार आहे.. तशी सुपारीच घेतलीय आमी.

जोतिबा- वा! तर मग फारच चांगलं आहे.. केवढय़ाची होती सुपारी?

धोंडीराम- पन्नास रुपयांची.

जोतिबा- (गंभीर मुद्रेने) मग मारा मला. माझ्या मृत्यूनं तुमचा फायदा होणार आहे तर हे घ्या माझे डोके. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात मी अन् या सावित्रीनं धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावरून सुरी फिरवावी हे आमचे सद्भाग्य आहे. माझ्या मरणामुळं एका अतिशूद्राचं कल्याण होणार असेल तर मी मरायला तयार आहे.

(शांतता. धोंडीराम कुऱ्हाड वर घेतो तेवढय़ात रामोशी मधे येतो.)

रामोशी- धोंडय़ा, दम धर.. बाजूला हट.. (अचानक जोतिरावांच्या पाया पडून) तात्यासाहेब, या धोंडिबा रामोश्याला क्षमा करा.. तुमच्याविषयी माझ्या चुलत्याकडून ऐकलं होतं.. आज प्रत्यक्ष अनुभवाला आलं.. तुम्ही देवमानसं आहात.. तुमच्या शाळंत आमची विद्या येती नव्हं? अवं, या रामोश्याला क्षमा करा.. तुमास्नी मारलं तर माझा भाऊ अन् वहिनीबी जीव देनार हैत.. धोंडय़ा, ती कुऱ्हाड फेक.. अन् चल आल्या पावली माघारा..

(धोंडीराम कुऱ्हाड बाजूला करतो. तोही पाया पडतो.)

धोंडीराम- आमाला माफ करा ताई.. या धोंडीरामावर राग नगा धरू.. आमी आडाणी मानसं.. पोटाकरता अशी कामं करून पैका कमवावा लागतो.. आमच्यावर राग नगा धरू..

जोतिबा- धोंडीभाऊ, तुमच्यावर कशाला राग धरू? चूक अज्ञानाची आहे बाबा! तुम्हीच विचार करा. पन्नास रुपये तुम्हाला किती दिवस पुरणार? तुमचं कल्याण विद्येनेच होणार आहे. ते होऊ नये म्हणून हा सुपारीचा घाट आहे, एवढं लक्षात घ्या. ज्ञानासारखं प्रायश्चित्त नाही. ते ज्ञान तुमच्यापासून लपून राहावं म्हणून हा सगळा खटाटोप आहे. आणि माझ्यावर राग का? तर मी बहुजनांना ज्ञानाचे महत्त्व पटवितो, धर्माला प्रश्न करतो. जातिभेद नष्ट करा म्हणतो. कष्टकऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांविषयी भांडतो. घातक रूढी-अंधश्रद्धा दूर करतो. स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये मानतो. समाजातील गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे म्हणतो. म्हणून माझे हे विचार काही धर्माध आणि विचारांनी बुरसटलेल्यांना खुपतात.

(मारेकऱ्याला जवळ घेतात.)

सावित्री- भाऊ, तुम्ही शिका. ही कुऱ्हाड सोडा, लेखणी हातात घ्या. लिहा-वाचायला शिका.

जोतिबा- विद्येचा विचार करा माझ्या भावंडांनो,

दुर्दशा ती अविद्येपायी।

कुऱ्हाड ती अविद्येपायी।

विद्येविना मती गेली।

मतीविना नीती गेली।

नीतीविना गती गेली।

गतीविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले।

एवढे अनर्थ एका अविद्येने केले।

सूत्रधार- विद्येचं महत्त्व लक्षात आलं अन् रामोशी आणि धोंडीराम नामदेव कुंभारात बदल झाला..

स्त्री- अहो, ते स्वत:च चक्क जोतिरावांच्या शाळेत शिकू लागले..

सूत्रधार- आता बोला! ही घडलेली गोष्ट आजच्या काळात कोणालाही खोटी वाटावी अशी- त्या काळात घडली महाराजा!!!

स्त्री- तर रामोशी रोडे पुढे जोतिरावांचा अंगरक्षकच बनला, तर धोंडीराम नामदेव कुंभार हा जोतिरावांच्या प्रेरणेनं शिकून विद्वान झाला.

सूत्रधार- विद्वान.. होय विद्वान.. जोतिरावांनी काढलेल्या सत्यशोधक समाजाचा आधारस्तंभ बनला.. अन् त्यांनी काही ग्रंथही लिहिले..

(प्रसंग संपतो.)

चार..

नाटकातला हा प्रसंग जोतिरावांच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेला. अपवादात्मकच; पण तरीही आपल्याच संस्कृतीत घडलेला! जोतिबांना मारायला आलेले मारेकरी निदान ऐकायला, बोलायला आणि नंतर चुका कळून सुधारायला तयार झाले. इतकेच नव्हे, त्यातील एक अंगरक्षक आणि दुसरा विद्वान झाला. सामान्यत: कुणीही मारेकरी हल्ल्याआधी कधी बोलत नाहीत अथवा थांबतही नाहीत, हे उघड आहे. पण ते थांबोत अथवा न थांबोत, त्यांच्यातील बहुतांश वेळा सामायिक गोष्ट असते ती म्हणजे त्यांची खून करण्याकरता असलेली आर्थिक दुर्बलता! प्रत्यक्ष मारेकऱ्याचे जर वैचारिक भांडण असेल तर तो खुनानंतर त्या जागेवर थांबेल किंवा खुनाची जबाबदारी उघडपणे घेईल. प्रत्यक्ष खुनी आणि त्यांना फूस लावणारे यांच्यात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत टोकाची तफावत दिसून येते. म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचीतरी बंदूक असते. दुर्बलतेचा फायदा घेऊन वर्षांनुवर्षे खेळले जाणारे राजकारण खुन्यांना कळत कसे नाही? आश्चर्य वाटते ते याचे!!!

‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक या राजकारणाविषयीच बोलते. (अर्थात म्हणूनच त्याच्यावरही हल्ले झाले!) त्यातील नाना फडणवीस घाशीरामाला स्वत:च्या स्वार्थासाठी पुण्याचा कोतवाल केल्यावर म्हणतो, ‘‘चित्पावनाच्या वर असणार तुझा झोक. ठेवशील वचक चोख. करशील कारभार सवाई. चिंता नको. पुन्हा होतील आमचे प्रमाद तुझ्या खाती जमा, परस्पर. करने को हम, भरने को हमारा कोतवाल. सोय खाशी, नानास घाशी.’’

पाच..

प्रा. गो. पु. देशपांडे यांनी ‘भारत- एक खोज’ या श्याम बेनेगल यांच्या मालिकेकरिता जोतिबांविषयीचे काही भाग लिहिले होते. त्यानंतर ते नाटकस्वरूपात सफदर हश्मींच्या ‘जनम’ संस्थेकरिता एकत्रित करून सुधन्वा देशपांडे यांनी सादर केले. मग कोल्हापूरच्या ‘प्रत्यय’ संस्थेच्या डॉ. शरद भुताडिया यांनी ते मराठीत सादर केले. मग परत संकलित करून ते मी ‘पुणे मनपा कामगार युनियन’करिता मराठीत आणि हेग्गोडूच्या ‘जनमनदाटा’ संस्थेकरिता कन्नड भाषेत केले. ही सारीच नावे आणि संस्था महत्त्वाच्या आहेत, कारण त्या ठोस राजकीय-सामाजिक भूमिका घेऊन उभ्या आहेत. नव्वद सालानंतर जे चक्रावून टाकणारे वातावरण बनले आहे त्यात अशा नाटकांचे अर्थ अधिक व्यापक होत आहेत. महात्मा फुले यांचे आजच्या काळात स्मरण करणे म्हणजे नुसता इतिहास आठवून फक्त छाती फुगवणे नव्हे. ‘ऐतिहासिक नाटक म्हणजे स्मरणरंजन’ या सवयीच्या दोन पावले पुढे हे नाटक जाऊ पाहत होते, म्हणूनच ते मला दोन वेळा करावेसे वाटले.

सहा..

इतिहासाकडे पाहणे म्हणजे वाचलेल्या, ऐकलेल्या अथवा दंतकथाही झालेल्या गोष्टींचे नव्याने आकलन करून घेऊन अर्थ लावणे होय. प्रा. गो. पु. देशपांडे हे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या निमित्ताने हे करू पाहत होते.. त्या इतिहासाचा सध्याचे राजकारण-समाजकारणाशी संबंध लावून दाखवत होते. महात्मा फुले यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व इतके जाज्ज्वल्य आणि उत्तुंग, की ते समजावून घेताना सारे धैर्य एकवटण्याची गरज लागते. जोतिबांचे विचार आणि कार्यविश्वात अनेक प्रश्नांना स्थान होते. शूद्रातिशूद्रांची दास्यातून मुक्तता, स्त्री आणि बालककेंद्री समाजव्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य याबाबतचे समान हक्क, मानवीय अधिकार, गुलामगिरी, स्वातंत्र्याचे मूल्य, इथली जात-धर्मव्यवस्था, जातीची उतरंड, आहे रे-नाही रे गट, आर्थिक दुर्बलता, वर्णव्यवस्था, मनुवादी कारभार, कठोर धर्मचिकित्सा, शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न असा मोठा व्यापक पट जोतिबांच्या राजकारणाचा होता. ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे जगलेल्या तुकारामांनंतरचे हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व! ‘तृतीय रत्न’ हे त्यांनी लिहिलेले नाटक त्या काळात नाकारले गेले. पुढे शंभर वर्षे ते दुर्लक्षित राहिले. जोतिबांबाबत महाराष्ट्रात घोषित आणि अघोषित ‘सेन्सॉरशिप’ कायम होती आणि आजही आहे. पण जोतिबा ठामपणे अभेद्य राहिले आहेत. ‘सत्यशोधक’ हे नाटक करायला हे मुख्य कारण होते. एकाधिकारशाहीचा बुभुत्कार, धर्माधतेचे शंखनाद, जातीयवादी दहशत, प्रतिगामी संघटन आणि फॅसिझम हे या काळात परत विखारीपणे एकीकडे गर्जत असताना कॉ. गोविंदराव पानसरे म्हणायचे तसे- निदान आपला शत्रू नेमका कोण, हे तरी आपल्याला कळायला हवे. अशा विषारी विचारसरणीच्या विरुद्ध असणे, हीच आपली भूमिका असायला हवी. हे नाटक ही त्याची अभिव्यक्ती आहे.

‘सत्यशोधक’ नाटकाच्या साधेपणाने, सच्चेपणाने आणि वैचारिक प्रगल्भतेने प्रेक्षक अंतर्मुख होत. त्यातल्या शाळेत जाण्याकरिता पोत्यात लपवून आणलेल्या मुलीच्या प्रसंगाने लोक हादरून जात. गळ्यात गाडगी आणि कमरेला झाडू लावलेले शूद्र पाहून मान शरमेने खाली जाई. काळवंडलेली सामाजिक परिस्थिती पाहून जोतिबा क्षणभर खिन्न होतात आणि अशा अवस्थेत सावित्रीबाई त्यांना बळ देतात. या प्रसंगाने लोकांचे मनोबल वाढे. नाटकातली गाणी थेट काळजाला हात घालीत. अनेकदा नाटकाला ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळत असे. कोल्हापूरला कॉ. गोविंदराव पानसरेंनी थेट रंगमंचावर येऊन या नाटकाचे प्रयोग खासबाग मैदानात करण्याची घोषणा केली होती. ज्या पुण्याने फुल्यांचा अपमान केला त्या पुण्याच्या तत्कालीन सत्ताकेंद्राचे प्रतीक असलेल्या शनिवारवाडय़ावरच्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून पानसरेसरच उपस्थित होते. मराठी ‘सत्यशोधक’ने महाराष्ट्रात एका वर्षांत शंभर प्रयोग केले. दौऱ्याची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी साताऱ्यात पहिला प्रयोग लावून केली. आज हे आठवताना व्याकूळ व्हायला होते आहे. अजून एक-पुण्यात फुलेवाडय़ाच्या शंभराव्या मराठी प्रयोगाला डॉ. भालचंद्र नेमाडे आले होते. त्यांनी या नाटकाचे कौतुक केले. (नुकतेच त्यांनाही धमकीचे पत्र आले आहे. गुन्हा काय? तर लोकांना विचार करायला भाग पाडणे!!!)

सात..

कन्नड ‘सत्यशोधक’ला भिडण्याची पूर्वतयारी म्हणून हेग्गोडूत आम्ही कार्यशाळा आयोजित केली होती. डॉ. हरी नरके हे तीन दिवस तिथे आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आणि कर्तृत्व, पेशवाईचा उन्नत व अवनत काळ, इंग्रजी राजवट, जोतिबांचे प्रश्न, सावित्रीबाईंचे योगदान, स्त्री-दास्य, जातीयता, शिक्षणाचा प्रसार आणि विरोध, बालजरठ विवाह, सतीची चाल, विधवांचे प्रश्न अशा विषयांवर ते बोलले. या साऱ्याचा अनुवाद डॉ. डी. एस. चौगले यांनी केला. त्यावर प्रश्नोत्तरे झाली. त्यात आजच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सामाजिक-राजकीय परिस्थितीविषयीही बोलले गेले. त्यात बसवण्णा, यू. आर. अनंतमूर्ती आणि कलबुर्गी असेही विषय येत गेले. या साऱ्यांची बंडखोरी हा त्यातील महत्त्वाचा भाग होता. जोतिबांचे हे वैचारिक सहप्रवासीच होत. या सहविचारांची गाणी ‘सत्यशोधक’चा महत्त्वाचा भाग होती.

वीर नादरे जोतिबा फुले यागु।

धीर नादरे जोतिबा फुले यागु।

सत्यशोधका चळुवळी यन्नु सृष्टिसिदवने।

दलितरगागी शालेय तेरेयलु व्होरटवने।

किंवा..

बा फुले जोतिबा फुले।

क्रांतिकेंडवा होतिसि।

कुलदबेरुणु कित्तिरुवे।

हेण्णिगे शिक्षण कोट्टिरुवे।

मानपमानदि बेंदिरवे।

बा फुले जोतिबा फुले।

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंत समाजसेवकांचा निर्घृण खून झाला आहे. आपण वृत्तपत्रांत वाचतो की, या खुन्यांनी अशीच मोठी यादी केली आहे. याला खून म्हणण्यापेक्षा कत्तली म्हणावे का? चिकित्सक विचार करायला लावणाऱ्या आणि विचार करू पाहणाऱ्यांच्या ‘धर्माचे शुद्धीकरण’ या नावाखाली आता कत्तलीच होणार आहेत?

अशा वातावरणात आज जोतिरावांच्या सत्यधर्माचे अर्थ नव्याने उमगत आहेत.

– अतुल पेठे
atul_pethe@hotmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2015 12:23 am

Web Title: article about satyashodhak play
Next Stories
1 रणांगण
2 ‘राहिले दूर घर माझे’
3 यळकोट यळकोट जय ‘श्यामराव’!
Just Now!
X