News Flash

यदाकदाचित

पोलीस संरक्षण मागायचं तर एकतर ते ‘प्रयोग करू नका’ सांगायचे, किंवा संरक्षण दिलंच तर सिक्युरिटीचं भलंमोठं बिल पाठवून द्यायचे.

| September 6, 2015 12:50 am

नाटकात आपलं करिअर व्हावं वगैरे अजिबात डोक्यात नसताना ज्याने मला बरंच काही दिलं व शिकवलं ते नाटक म्हणजे ‘यदाकदाचित’! स्टेजची प्रचंड आवड होती. ती जोपासायची म्हणून ‘महाराष्ट्राची लोकधारा’मध्ये नृत्य करायला लागलो. त्यातून गण, गवळण, बतावणी, भारूडातून अभिनय करायला मिळत होता आणि ते करत असताना चालू घडामोडींवर भाष्य करायची सवय लागली. हे सगळं सुरू असतानाच एकांकिका स्पर्धा पाहण्यात आल्या आणि डोकं शिवशिवायला लागलं. आपल्यालाही असं काहीतरी करता आलं पाहिजे. पण एक पक्कं ठरवलं होतं, की काहीतरी वेगळं करायचं. म्हणून पहिली एकांकिका लिहिली- ‘अटेन्शन.’ पोलिसांच्या फ्रस्ट्रेशनवर भाष्य करणारी ही गंभीर विषयावरची एकांकिका धमाल करत सादर केली. ती प्रेक्षकांना तर आवडलीच; विशेष म्हणजे परीक्षकांनाही आवडली. ‘अटेन्शन’च्या यशाने आत्मविश्वास मिळाला आणि दुसरी एकांकिका लिहिली- ‘सुयोग्य असा मी, अशी मी’! तिलाही दणदणीत प्रतिसाद मिळाला. इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थेने त्याचं नाटक करण्याची संधी दिली आणि तेही यशस्वी झालं.यादरम्यान गावी पाहिलेले नमन, खेळे, दशावतार, बाल्यांचा नाच या लोककला मनात घुमत होत्या. या लोककलांमध्ये एवढी ताकद असताना त्यापासून आपली रंगभूमी दूर का, हा प्रश्न छळत होता. आणि नमनाच्या फॉर्ममध्ये काहीतरी करायचं ठरवलं. संधीही चालून आली. एच. आर. कॉलेजचे विनय व विनीत हे नलावडे बंधू त्यांच्या बाबांसह मला भेटायला आले होते. त्यांना त्यांच्या कॉलेजमधून आयएनटीसाठी एकांकिका करायची होती. संधी मिळाली. फॉर्मही तयार होता, पण विषय सापडत नव्हता. आणि अचानक आठवलं- अरे, विषय तर डोक्यातच आहे.. ‘सत्याचा विजय शेवटीच का होतो?’ आणि डोक्यात असलेले वेगवेगळे मुद्दे आणि फॉर्म यांची सांगड घालणारी एकांकिका डोळ्यासमोर दिसू लागली.कॉलेजमध्ये गेलो तर समोर बरीच मुलं-मुली. तोवरच्या तुटपुंज्या अनुभवावरूनसुद्धा कळलं होतं की यातले बरेचजण टाइमपास करायला आलेले असतात. काही आवड म्हणूनही येतात. पण चिकाटी असणारे कमी. मी मुलांशी जुजबी गप्पा मारून तिथेच कागद-पेन घेऊन लिहायला सुरुवात केली. मुलांची कुजबुज सुरू झाली. असं सात-आठ दिवस चालू होतं. नलावडे बंधूंना आणि त्यांच्या वडिलांना काही कळेनासं झालं होतं. अशात एक दिवस मी त्यांना म्हटलं, ‘मला भगवद्गीता लागेल.’ ते थिजलेच. त्यांना वाटलं, मी काहीतरी गंभीर, वैचारिक चर्वतिचर्वण असलेलं करणार की काय? मी त्यांना समजावलं, की विषय गंभीरच आहे, पण आपण मांडायचाय मात्र धमाल करत.एव्हाना बरीच मुलं गळली होती. ज्यांना खरंच काही करायचं होतं तेवढेच उरले. पण तेही माझ्या तिथे जाऊन लिहिण्याच्या प्रोसेसला कंटाळले होते. राजकीय पार्टीचे कार्यकत्रे काही काम नसलं की कसे बिथरतात तसे या कलाकारांचं झालं होतं. त्यामुळे आता रिहर्सल सुरू करू म्हणून उभा राहिलो तर वेगळाच प्रॉब्लेम लक्षात आला. जी मुलं उरली होती त्यात अध्रेअधिक अमराठी होते. त्यांना नीट मराठी बोलता येत नव्हतं. आणि एकांकिकेत तर बाणकोटी बोलीत बोलायचं होतं. मग आधी मराठी, मग त्याचं बाणकोटी रूपांतर असा वर्ग सुरू झाला. नंतर वर्ग घ्यावा लागला तो नृत्याचा. कारण वेस्टर्न डान्समध्ये निपुण असलेली ही मुलं जाखडी नृत्य, नमन, गवळण वगरे करताना पाहून माझेच धाबे दणाणले. माझा मित्र सचिन गजमल यावेळी मदतीला धावून आला. लहान मुलांना शिकवावं तसं त्यांना त्याने डान्स शिकवले. सर्वानीच मर मर मेहनत केली. एकांकिकेतल्या सगळ्या मूव्हमेंट ढोलकीच्या तालावर होत्या. तोवर स्पर्धेतील हमखास यशाची गणितं ठरली होती. पण मला ती मोडून काढायची होती. मी रंगमंच पूर्ण मोकळा ठेवला होता. जनरल लाइट्समध्येच संपूर्ण एकांकिका केली. संगीतासाठी ढोलताशे, संबळ, चंडा, झांजा, ड्रमसेट अशा वाद्यांचा ताफा वापरला. कारण माझ्याकडे ती बाजू सांभाळणारा हुकमी एक्का होता.. विवेक मेस्त्री त्याचं नाव. प्रकाशयोजनेसाठी सुनील देवळेकर. एकांकिका आकार घेत होती. परंतु आíथक गणितं माझ्यासह मित्रांच्याही डोक्यात नव्हती. सारे काहीतरी धमाल करायचं, याच भावनेने भारलेले. पण एकांकिकेसाठी लागणाऱ्या खर्चाचं सोंग आणता येत नव्हतं. पण तो भार विनय-विनीतच्या बाबांनी उचलला. त्यामुळे ते जुळे असूनही त्यांना नकुल-सहदेव करता येत नव्हतं. त्यांना मेन रोल देणं भाग होतं. विनय दुर्योधन आणि विनीत अर्जुन अशी पात्रयोजना ठरली. यातला गमतीचा भाग सोडला तर दोघं खरंच सुंदर काम करत होते. बाकी मुलं अमराठी. नकुल-सहदेव म्हणून जुळ्या मुलींना उभं केलं. पण साऱ्यांच्या मेहनतीचे चीज झाले. प्रयोग दणदणीत झाला. पण परीक्षकांनीही त्यांचे रंग दाखवले. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता- विनय नलावडे, सर्वोत्कृष्ट संगीत- विवेक मेस्त्री, सर्वोत्कृष्ट लेखक- संतोष पवार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- संतोष पवार’ अशी पुकार प्रेक्षकांतून होत असताना आम्हाला उत्तेजनार्थ साधं प्रशस्तिपत्रकही मिळालं नाही. बक्षीस समारंभ आटोपला. साहित्य संघाबाहेर पडलो. अनेकांनी आवर्जून भेटून माझी पाठ थोपटली. काही माझं सांत्वन करायला आलेले तर उडालेच. कारण मी, विवेक, सुनील आणि सचिन वाद्यं वाजवून बक्षीस मिळालेल्या इतर ग्रुप्सबरोबर नाचत होतो. तिथून आमची वरात गिरगावच्या आंग्रेवाडीतल्या त्या हॉलमध्ये आली- जिथे आम्ही दिवसरात्र घाम गाळला होता. आणि सगळ्या मुलांचा रोखून धरलेला बांध फुटला. सारे एकमेकांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडू लागले. मी मात्र एकटा हसत होतो. विवेक, सचिन चिडले माझ्यावर. मुलंही बावरली. विचारू लागली, की तुम्ही हसू कसे शकता? मी म्हटलं, ‘अरे, आपण आपलं काम चोख केलं ना! प्रेक्षक खूश झाले ना! प्रतिस्पर्धी कॉलेजेसची मुलं आपल्या नावाचा पुकार करत होती तिथेच आपण जिंकलोय. आपली मेहनत वाया जाणार नाही. तुम्ही पाहत राहा- याचे रिटर्न्‍स कसे मिळतात ते.’ हे मी बोलायचं म्हणून बोललो नव्हतो, तर मला ठाम विश्वास होता.या विश्वासावरच आम्ही एकांकिकेचे प्रयोग करायचे ठरवले. पण प्रत्येक प्रयोगाला काही ना काही प्रॉब्लेम्स उभे राहायचे. मात्र त्यावर मात करायच्या आयडियाही सुचत गेल्या. एकदा तर कहर झाला. अख्खी मेकअपची बॅगच विसरलो. विगही नव्हते. मला फोन आला. मी म्हटलं, पोस्टर कलर्स विकत घ्या. ब्राऊन पावडर थापा. कपाळावर नाम रंगवा आणि दाढी-मिश्याही रंगवा. फोन कट् झाला. एकांकिका संपल्यावर फोन आला- ‘एकांकिका छान झाली. पण गांधीजींची भूमिका करणारा मुलगा यापुढे काम करणार नाही म्हणतो.’ मी विचारलं, ‘का?’ उत्तर मिळालं, ‘त्याचे बाबा ओरडले.’ ‘अरे पण का?’ ‘आज गांधीजींचा विग नव्हता. त्यामुळे आम्ही रेझरने त्याचं टक्कल केलं. ते बाबांना कळलं. म्हणून..’ मला हसावं की रडावं कळेना. फक्त कळली- त्या मुलांची कमिटमेंट!एकांकिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून मला खात्री पटली, की याचं व्यावसायिक नाटक प्रेक्षक डोक्यावर घेतील. ‘यदाकदाचित कर्मस्य’ या एकांकिकेच्याच नावाने नाटक लिहून काढलं. त्याचे दोन-चार कंत्राटी प्रयोगही केले. पण बाकी व्याप सांभाळता येत नव्हता. अशात वाई युवक केंद्र या संस्थेकडून राज्य नाटय़स्पध्रेसाठी नाटक करण्यासाठी विचारणा झाली. मी हेच नाटक करायचं ठरवलं. पण आधीच स्पष्ट केलं- ‘नाटकाला बक्षिसं मिळणार नाहीत; पण प्रेक्षक बेहद्द खूश होतील.’ ती मंडळीही म्हणाली, ‘आम्हाला चालेल.’ पुन्हा मी, सचिन, विवेक, सुनील कामाला लागलो. नवे कलाकार व नव्या गोष्टी अ‍ॅड झाल्या. दादा कोंडके माझ्या आवडत्या कलाकारांपकी एक. त्यांची गाणी चालीसह मला तोंडपाठ. त्या गाण्यांचं लोकांवर असलेलं गारूडही माहीत होतं. म्हटलं, याच गाण्यांच्या चालीत गाणी रचायची. गाणी लिहून काढली आणि विवेकने धमाल उडवून दिली. ही गाणीच नाटकाचा प्लस पॉइंट ठरली. वाईसारख्या घाटावरच्या कलाकारांनी बाणकोटी बोली, बाल्या डान्स, नमन, नृत्य वगरे गोष्टी उत्तम आत्मसात केल्या. प्रयोगही ताकदीने केला. परीक्षकांनीही आमचा भ्रमनिरास केला नाही. उत्तेजनार्थ प्रमाणपत्रही मिळालं नाही! मात्र सातारा, कऱ्हाड, कोल्हापूरला या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा तिथल्या रसिकांनी नाटय़गृह दणाणून सोडले. तेव्हा तर हे नाटक व्यावसायिकला व्हावं म्हणून जीव तळमळू लागला.तोवर या नाटकाबद्दल काही निर्मात्यांना कळलं होतं. काहींनी बोलावणं धाडलं. मीही मीटिंग्ज केल्या. काहींना स्क्रिप्ट दिलं. वाचून त्यांना ते कळणार नाही हे माहीत असूनही वाचून दाखवलं. काहींनी आश्वासन दिलं- करू या. काहींनी बदल सुचवले. उदा. भाषा बदल. गाणी काढून टाक, वगरे. मी म्हटलं, ‘नाही.’ यात माज नव्हता, तर विश्वास होता की याच गोष्टी लोकांना आवडणार आहेत. त्याचदरम्यान नाटक संजय नार्वेकरकडे वाचलं. त्याने नाटकाबद्दल घोसाळकर बंधूंना सांगितलं. त्यांचं बोलावणं आल्यावर मी गेलो. पण स्पष्ट सांगितलं, ‘वाचून काही कळणार नाही. माझ्यावर विश्वास असेल तर करा.’ त्यांनी विश्वास ठेवला. माझ्या कामात ढवळाढवळ न करता मला हवे होते ते कलाकार दिले. तालमी सुरू झाल्या. संजय नार्वेकर दुर्योधन करत होता. तो गाणीही गाणार होता. चार-पाच दिवस रिहर्सल केल्यावर एके दिवशी त्याने मला विचारलं, ‘संतोष, काय करू? हिंदी पिक्चर मिळतोय.’ मी म्हटलं, ‘तुझं नुकसान करू नकोस.’ तो गेला. आम्ही सारे कपाळाला हात लावून बसलो. ‘आता काय?’ दत्ता घोसाळकर म्हणाला, ‘तुला हवा तो आर्टिस्ट बोलवू या.’ मी म्हटलं, ‘नको. नवीनच आर्टिस्ट घेऊ; जेणेकरून नाटक कोणा एकटय़ाचं होणार नाही. साऱ्यांचं होईल.’ पुन्हा तालमी सुरू झाल्या. बाहेरून रिहर्सल पाहणाऱ्यांना माझी रिहर्सल म्हणजे आखाडय़ातली तालीमच वाटायची. दोन-अडीच महिने तालमी केल्या. तालीम केल्यावर कोणाला घरी जाण्याचेही त्राण नसे. कधी गडकरी रंगायतनला खाली तालीम करायची आणि वर गेस्टरूमवर जाऊन देह टाकायचा, तर कधी दत्ताच्या मित्राच्या फ्लॅटवर.. असं आमचं रूटीन झालं होतं. पायात तर इतके गोळे यायचे, की सकाळी प्रातर्विधीसाठी बसताना िभतीचा आधार घेऊन बसावं लागे. रंगीत तालमीला तर कहर झाला. सकाळी दहा ते दहा तालमी चालायच्या. नंतर रात्री ११ वाजेपर्यंत ठाण्यात रेकॉर्डिगला जायचं. सकाळी ८ वाजेपर्यंत रेकॉìडग करून पुन्हा सकाळी १० वाजता शिवडीला पोहोचायचं. पाच रात्री आणि पाच दिवस असा उपद्व्याप मी न झोपता, न आंघोळ करता केला…आणि प्रयोगाचा दिवस उजाडला. उपस्थितांनी प्रयोग डोक्यावर घेतला. प्रयोग सुरू झाले. पण सुरुवातीला म्हणावी तशी गर्दी होत नव्हती. कारण ओळखीचे, नाववाले चेहरे नाटकात नव्हते. माणसं बोलवावी लागत. काही तर बोलावूनही येत नसत. शिवाजी मंदिरचा पहिला प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होता; पण बुकिंग अवघं तीन हजार होतं. हळूहळू माऊथ पब्लिसिटीने गर्दी वाढू लागली.आणि.. तो प्रयोग सुरू झाला- ज्याला काहींनी आक्षेप घेऊन तो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी विरोध करून त्यांना बाहेर काढलं. आम्हाला वाटलं, आम्ही जिंकलो. पण पुढच्या प्रत्येक प्रयोगात हेच होऊ लागलं. धमक्या येऊ लागल्या. प्रयोग होऊ नये म्हणून पोलिसांना निवेदनं दिली गेली. आणि पोलिसांनी संरक्षण द्यायचं सोडून आम्हालाच ‘प्रयोग करू नका’ असं सांगायला सुरुवात केली. अर्थात काही पोलीसवाले अपवाद होते. धर्माच्या गोष्टी सांगणाऱ्यांना ते खडसवायचे. पण हे सारं असह्य़ होत होतं. कधी निदर्शक मला घेराव घालायचे. त्यांच्याशी संवाद साधताना काहीजण वाद घालायचे, तर काही अंगावर धावून यायचे तेव्हा त्यांचीच माणसं त्यांना आवरायची. त्यांच्या एक-दोन पुढाऱ्यांना आमची दया आली असावी. म्हणून एकदा त्यांनी आम्हाला स्पष्टच सांगितलं, ‘काही घाबरू नका रे. आम्हाला माहितेय- तुम्ही आमचेच आहात. पण आम्हाला फक्त इश्यू हवा असतो. तो नंतर आम्ही सोडून देतो.’ बापरे! हे सगळं नवीनच होतं मला. काही कलाकारांनी तर आशाच सोडली. पण मी, दत्ता आणि सुरेश वणवण भटकत होतो. याला भेट, त्याला भेट करत होतो. तशात एका राजकीय पक्षाकडून निरोप आला, ‘तुम्ही प्रयोग करा. आम्ही संरक्षण देतो.’ मी निर्मात्यांना समजावलं, ‘या नाटकाला धार्मिक रंग आलाच आहे; आता आणखी राजकीय रंग नको.’ अशातच आनंद दिघेसाहेबांशी भेट झाली. त्यांना नाटक पाहण्याची विनंती केली. मध्यरात्री तो खास प्रयोग सुरू झाला. दिघेसाहेबांसह नाटकाला विरोध करणारेही खो-खो हसत होते. नंतर मीटिंग झाली. त्यांनी स्पष्ट केलं, ‘यात देवांची विटंबना नाही, तर छान विडंबन आहे.’ त्यांनी फक्त एक बदल सुचवला- यातलं वाजपेयींचं कॅरेक्टर काढून टाका. मी ते मान्य केलं. कारण त्याने नाटकाच्या आशयाला बाधा येत नव्हती. देवानंदचं कॅरेक्टर आणून सीन नव्याने लिहिला. पुन्हा प्रयोग सुरू झाले. अचानक दिघेसाहेबांचं निधन झालं आणि पुन्हा वाद सुरू झाले. मुंबई-पुण्यात विरोध व्हायचाच; पण परगावीही कधी गाडीवर दगडफेक व्हायची, कधी स्टेजवर येऊन कलाकारांना दमदाटी केली जायची. एकदा तर थिएटरवर पेटते गोळे फेकले गेले. पोलीस संरक्षण मागायचं तर एकतर ते ‘प्रयोग करू नका’ सांगायचे, किंवा संरक्षण दिलंच तर सिक्युरिटीचं भलंमोठं बिल पाठवून द्यायचे. प्रयोग सुरू असताना कोणी लघुशंकेला जरी उठला तरी साऱ्यांच्या छातीत धडधड व्हायची. पण करणार काय? मेहनत मर मर केली होती. डोक्यात नको नको ते विचार यायचे. ज्या विषयावर नाटक केलं त्या सत्याचा कोणीच वाली नाही का, हा विचार डोक्यात थमान घालायचा. मी विरोध करणाऱ्यांना एकच विचारायचो, ‘देव वा धर्माची विटंबना करणारं खरंच नाटकात काही असतं तर पंढरपूर-तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्री नाटकाला बोलावणं आलं असतं का? ‘मार्मिक’च्या वर्धापनदिनाला खुद्द बाळासाहेबांसमोर प्रयोग करण्याची संधी मिळाली असती का?’ पण या प्रश्नांची उत्तरं कोणीच देत नव्हतं. आणि आम्हालाही नाटकातल्या कौरव-पांडवांमध्ये कोणी देव दिसत नव्हता. अपवाद- नाटकातल्या कृष्णाचा. पण तो तर लहानपणापासून तमाशात गण-गवळणीत पाहिलेला. तो तसाच या नाटकात सादर केला होता. मग विरोध का होतोय? तणावातही प्रयोग सुरूच होते. सुरुवातीला वादंगामुळे कमी झालेली गर्दी प्रयोग सुरू आहेत म्हटल्यावर वाढू लागली. हाऊसफुल्लचे बोर्ड लागू लागले. पण मग आमच्याच लोकांच्या खोडय़ा सुरू झाल्या. ‘ही नवी मुलं दाढी-मिश्या लावून काहीही करतात. हे नाटक नाही. संतोष पवारला रंगभूमीच्या फळ्या काढून मारला पाहिजे..’ असं आधी म्हणणारी मंडळी आम्हाला तारखा विकू लागली. कॉन्ट्रक्टने शो लावू लागली. दिवसाला तीन-तीन प्रयोग करता करता आम्ही एकाच दिवशी एकाच संचात वेगवेगळ्या पाच थिएटर्समध्ये पाच प्रयोग करण्याचा रेकॉर्डही केला. पण तो आमच्यापुरताच सीमित राहिला. कारण आम्ही प्रयोग संपला की वाद कसा मिटेल यामागे लागायचो. त्यामुळे या रेकॉर्डबद्दल ना मीडियामध्ये बोलण्याचं सुचलं, ना रेकॉर्ड बुक्सवाल्यांना बोलावणं जमलं. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिटय़ा आणि हशा ऐकला की सगळी टेन्शन्स विसरायला व्हायचं.पण हळूहळू याच प्रतिसादामुळे नवीन टेन्शन्स सुरू झाली. काही कलाकारांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांची जाणीव झाली. आपण फार मोठे कॉमेडियन असल्याचं त्यांना वाटू लागलं आणि नाटकात नको नको त्या अ‍ॅडिशन्स सुरू झाल्या. नुसत्या अ‍ॅडिशन्स नाहीत, तर एकमेकांना चिमटे काढणं, चालू प्रयोगात एकमेकांची नक्कल करणं, िवगेतल्या लोकांना हसवणं- असे प्रकार सुरू झाले. त्यातून माझे त्यांच्याशी खटके उडू लागले. मी आलोय हे कळलं की प्रयोग नीट करायचे; इतर वेळी पिकनिकला आल्यासारखे उधळायचे. ‘एवढे प्रयोग झाल्यावर आता दिग्दर्शकाचं काय काम?’ असं विचारलं जाऊ लागलं तेव्हा म्हटलं, आता बस झालं. आपला यांच्याशी संबंध संपला. या नाटकासाठी सर्वस्वानं राब राब राबलेलो मी आता नाटकाची जाहिरातही पाहिनासा झालो. मी प्रयोगाला येत नाही म्हटल्यावर मानधनही बुडवलं जात होतं. काहींनी मला सल्ले दिले- ‘नोटीस पाठवून नाटक बंद कर.’ मी म्हटलं, ‘नाही. या नाटकाने मला मन:स्ताप जरूर दिलाय; पण ओळखही त्यानेच दिलीय. मी माझ्या नाटकाला नाट लावणार नाही. मी नेहमी ज्यांच्याकडे काम नाही अशा कलाकारांना संधी देत आलोय. त्यामुळे मी त्यांच्या पोटावर पाय आणणार नाही.’ मला कळत नव्हतं- माझं काय चुकलं! ‘तुला हवे ते कलाकार घे,’ असं निर्मात्याने सांगूनही ज्यांना कोणी ओळखतही नव्हतं अशा कलाकारांना मी घेतलं- हे माझं चुकलं? की कुणाला सीरियल वा फिल्म मिळाल्यावर त्याचं नुकसान होऊ नये आणि प्रयोगही थांबू नयेत म्हणून मी माझ्यातल्या कलाकारावर अन्याय करून सर्वाच्या रिप्लेसमेंट करत बसलो, हे माझं चुकलं? काहीच कळत नव्हतं.दुसरीकडे विरोधकांचा विरोधही वाढत होता. तशात एकदा बसला प्रचंड अपघात झाला. मोठय़ा दुखापती होऊनही कलाकार पुन्हा प्रयोगात उभे राहिले याकरता- आणि विरोधकांना न जुमानता प्रयोग सादर करण्याकरता मी कलाकारांना मनातल्या मनात ‘हॅटस् ऑफ’ करत होतो. पण त्यांच्या टिवल्याबावल्या मात्र थांबत नव्हत्या. निर्मात्यांना काही आवरत नव्हते, तर मी ठरवून नाटकाकडे दुर्लक्ष करत होतो. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. नाटक आचके देऊ लागलं. असं सगळं निगेटिव्ह घडत असताना एक गोष्ट पॉझिटिव्ह घडत होती. प्रेक्षकांचा माझ्यावर विश्वास बसला होता. ‘यदाकदाचित’मधून मानसिकदृष्टय़ा बाहेर पडल्यावर  मी ‘जाणूनबुजून’सारखं वेगळ्या धाटणीचं नाटक केलं. ज्याला खूप बक्षिसं मिळाली. समीक्षक व प्रेक्षकांनी त्यांचं खूप कौतुक केलं. ते ‘यदाकदाचित’च्या यशापुढे झाकोळलं गेलं नाही. त्यानंतर ‘यदा यदाही अधर्मस्य’, ‘यदाकदाचित- भाग २’,  ‘नाय नो नेव्हर’ आदी नाटकं केली. त्यांनाही हाऊसफुल्लचे बोर्ड लागले.तोवर ३५०० प्रयोगांनंतर ‘यदाकदाचित’ बंद करावं लागल्याने मन अस्वस्थ होत होतं. कारण ‘यदाकदाचित’ आणि संतोष पवार हे समीकरण पक्कं झालं होतं. पण मग विचार केला की, त्याच्या फॉर्मबद्दल कोणाचाच आक्षेप नाहीए, तर तोच फॉर्म वापरून नाटक नव्यानं लिहिलं- ‘आम्ही पाचपुते’! चुलतभावांमध्ये पानाच्या गादीसाठी चालू असलेला संघर्ष त्यात रंगवला. ‘यदाकदाचित’मधल्या मूव्हमेंटस् आणि प्रसंग तसेच ठेवून पात्र आणि संवाद बदलले. याही नाटकाला हाऊसफुल्लचे बोर्ड लागू लागले. मला वाटलं, माझ्या या स्किलचं कौतुक होईल. पण झालं भलतंच. ही ‘यदाकदाचित’चीच नवी आवृत्ती आहे असं समजून विष्णुदास भावे नाटय़गृहात बॉम्ब ठेवला गेला, तर गडकरी रंगायतनमध्येही बॉम्बस्फोट घडवला गेला. तेव्हा म्हटलं, आता पुरे झालं. इतिहास घडवणाऱ्या ‘यदाकदाचित’लाच आता इतिहासजमा करू या. कारण मला क्रांती करायची होती ती नाटकात; धर्मात नाही. म्हटलं, ज्या देवांची विटंबना केली असे माझ्यावर आरोप झाले त्या देवांनी मला काय बुद्धी दिलीय हे लोकांना दाखवून देऊ असं ठरवून ‘पचान कौन’, ‘दिवसा तू, रात्री मी’ ‘ए भाऊ, डोकं नको खाऊ’, ‘यंदा कदाचित’, ‘जरा हवा येऊ द्या’ अशी ४२ नाटकं मी आजवर केली. सगळीच यशस्वी झाली. पण हे करत असताना मी आतल्या आत जळत असतो. कारण माझ्या आयुष्याचा टìनग पॉइंट ठरलेल्या ‘यदाकदाचित’च्या बाबतीत माझं काय चुकलं, हा प्रश्न आजही मला सतावतो.
santoshppawar69@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 12:50 am

Web Title: coincidentally
Next Stories
1 नव्वदोत्तरी नाटकं : ‘साठेचं काय करायचं?’
2 नव्वदोत्तरी नाटकं : ‘ऑल दि बेस्ट’
3 ‘चाहुल’ घेताना…
Just Now!
X