09 July 2020

News Flash

यळकोट यळकोट जय ‘श्यामराव’!

समीक्षकांनाही या प्रवासात सामील करून घेऊन एक अभ्यासपूर्ण वाटचाल सुरू केली.

lr03१९९० सालानंतर नवी रंगसंवेदना आणि वेगळा दृष्टिकोन घेऊन लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, नट-नटय़ांची एक फौजच नाटय़क्षेत्रात कार्यरत झाली. त्यांना नाटक परंपराही ठाऊक होती आणि त्यांच्याकडे आधुनिक नजरही होती. १९९० ते २००० या दशकात नाटकाच्या आशय-आकृतिबंधात झालेले वेगळे प्रयोग आणि विषयांचं नावीन्य बघितलं तरी हे सहज लक्षात येतं.
हे दशक माझ्यासाठी तर खूपच विशेष ठरलं. मी या काळात प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर सुमारे ३० नाटकं सादर करूशकलो. ही ऊर्जा, उमेद आणि विश्वास मला या दशकानंच प्रदान केला. या काळाकडे पाहताना काही ठळक वैशिष्टय़ं जाणवतात. लेखक-दिग्दर्शकांनी नाटकांचा बाज बदलला. नाटकाला ठोकळेबाजपणातून बाहेर काढलं. ‘पक्कं कथानक हवंच, घटनाप्रधान नाटकंच चालतात, गंभीर नाटकांना ‘रीपिट ऑडियन्स’ नसतोच’ अशा तथाकथित अंधश्रद्धांचं निर्मूलन केलं. प्रेक्षकांची अभिरुची बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. निर्मात्यांचा विश्वास संपादन केला. समीक्षकांनाही या प्रवासात सामील करून घेऊन एक अभ्यासपूर्ण वाटचाल सुरू केली. विशेषत: व्यावसायिक रंगभूमीवर नाटककारांची एक नवी फळीच कार्यरत झाली. ज्यांनी त्याज्य विषय धाडसानं हाताळले आणि नाटय़संस्थांच्या मदतीनं दिग्दर्शकांनी ते यशस्वीही करून दाखवले. एक सळसळतं नाटय़चतन्यच उभं राहिलं या दशकात. वैयक्तिकरीत्या मी ‘रंग उमलत्या मनाचे’ (ले. वसंत कानेटकर), ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ (ले. अजित दळवी), ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’ (ले. प्रशांत दळवी), ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ (ले. अभिराम भडकमकर), ‘गिधाडे’ (ले. विजय तेंडुलकर), ‘वाडा चिरेबंदी’ (नाटय़त्रयी.. ले. महेश एलकुंचवार), ‘आम्ही जगतो बेफाम’ (ले. डॉ. आनंद नाडकर्णी), ‘सती’ (एकांकिका- संजय पवार), ‘घोटभर पाणी’ (एकांकिका- प्रेमानंद गज्वी) ही काही महत्त्वाची आणि आगळीवेगळी नाटकं याच काळात सादर करू शकलो. यातलं तेवढंच महत्त्वाचं आणखी एक नाटक म्हणजे ‘यळकोट’! नाटककार श्याम मनोहरांनी मांडलेला मध्यमवर्गीय मानसिकतेचा वैचारिक ‘यळकोट’! जगण्याचा अग्रक्रम न ठरवता आल्यामुळे सुखाच्या शोधात आपली झालेली हास्यास्पद फरफट म्हणजेच ‘यळकोट’!
बिनमौजेच्या गोष्टींमधली वेगळीच मौज शोधणारे, आपली स्वतंत्र तिरकस लेखनशैली निर्माण करणारे हे महत्त्वाचे नाटककार. नाटय़तंत्राच्या आहारी न जाता ते मोकळेपणानं, पण उपहासानं, वेगळ्या निरीक्षणशक्तीनं आशय अधोरेखित करतात. ही ‘मनोहारी’ शैली नाटय़-दिग्दर्शकाला एक आव्हानच ठरते. त्यांची ‘हृदय’ आणि ‘यळकोट’ ही दोन नाटकं दिग्दíशत करण्याची संधी मला मिळाली. औरंगाबादला ‘जिगीषा’तर्फे मी ‘हृदय’ केलं आणि ‘यळकोट’ (खरं तर ‘सेक्स यळकोट’!) मुंबईत ‘आविष्कार’ संस्थेतर्फे दिग्दíशत केलं. औरंगाबादच्या पं. सत्यदेव दुबे नाटय़महोत्सवात श्याम मनोहर- लिखित ‘यकृत’ नाटक पाहून मी वेगळ्याच विश्वात गेलो होतो. माझी नाटय़जाणीव प्रगल्भ होण्याच्या काळातलं एक महत्त्वाचं नाटक म्हणून ‘यकृत’ माझ्या मेंदूच्या ‘पर्मनंट मेमरी’मध्ये ‘स्टोअर’ झालेलं आहे. (लेखन-दिग्दर्शन-अभिनय या तिन्ही दृष्टीनं!)
मुंबईला व्यावसायिक रंगभूमीवर एकापाठोपाठ नाटकं करत असतानाच हे नाटक माझ्या हाती आलं. व्यावसायिक-प्रायोगिक असा अग्रक्रम किंवा भेदाभेद मी कधीच केला नाही. जे नाटक त्याक्षणी ज्या मंचावर करावंसं वाटलं ते मी बेधडकपणे केलं. ‘यळकोट’ वाचून मी अक्षरश: उडालोच. यातले संवाद कोणते नट-नटय़ा बोलतील? enact करू शकतील? कुठली संस्था हे नाटक उभं करायला तयार होईल? हे प्रेक्षकांना रुचेल, झेपेल? त्यातला वरवरचा boldness झटकून टाकून त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल?.. असे असंख्य प्रश्न ‘आ’ वासून उभे राहिले. पण नाटक ‘आतून’ आवडलं होतं. त्याची काहीतरी अर्थपूर्ण गंमत मला दिग्दर्शक म्हणून खुणावत होती. मी ते करायला घेतलं आणि २९ मे १९९३ रोजी ‘आविष्कार’नं ते रंगमंचावर आणलं. किशोर कदम, गणेश यादव, प्रतीक्षा लोणकर, रेणुका शहाणे, निर्मिती सावंत, विश्वास सोहोनी, मंगेश सातपुते, दिनकर गावंडे अशी पात्रयोजना ठरत गेली. नुकतंच महिना- सव्वा महिन्यापूर्वी लग्न झालेले दोन विरुद्ध स्वभावाचे इंजिनीअर्स आणि त्यांच्या बँकेत नोकरी करत असलेल्या बायका अशा जोडय़ा ‘यळकोट’मध्ये आहेत. ‘थंड’ श्रीधर, ‘धसमुसळा’ अशोक, ‘उत्तान’ सुनंदा, ‘सोशिक’ वनिता, ‘घायकुतीला आलेल्या’ मीनाक्षीकाकू, ‘समोरच्या घरात टक लावून बघणारे’ विश्वासराव.. अशी ही सहा अर्कचित्रं! श्यामरावांच्या स्वच्छ आणि आपल्याला सवयीच्या नसलेल्या मराठीतून ही पात्रं बोलत राहतात. सेक्सविषयीच्या रूढ समज-गरसमजांचं ओझं वाहत, शरीरसुखाच्या ‘फँटसीज्’ प्रत्यक्षात आणू पाहणाऱ्या या दोन तरुण जोडय़ा आणि सुखाच्या अपेक्षाभंगाने पोळलेली मीनाक्षीकाकू आणि विश्वासरावची मध्यमवयीन प्रौढ जोडी अशी ही सहापदरी धावपळ. त्यामुळे सगळ्याच वयाचे प्रेक्षक या ना त्या स्वरूपात आपलं प्रतििबब या पात्रांमध्ये पाहतात आणि त्यांच्याविषयीची एक करुणा बघणाऱ्यांच्या मनात दाटून येते.
किशोर-गणेश ही दुबेजींच्या तालमीतली ‘टय़ुिनग’ असलेली जोडगोळी, ‘आंतरनाटय़ संस्थे’मध्ये तयार झालेली रेणुका, ‘जिगीषा’च्या नाटय़चळवळीतून उभी राहिलेली प्रतीक्षा, त्याकाळी राज्य नाटय़स्पध्रेमधून ठसठशीत कामगिरी करून दाखवणारी निर्मिती, एकांकिका स्पर्धाचा विनर दिग्दर्शक विश्वास अशी ही नट मंडळी असल्यामुळे नाटक वाचण्यापासून ते उभं राहीपर्यंत अखंड ऊर्जेचा जणू स्रोतच वाहत होता.improvisations, सगळ्यांचीच उत्तम नाटय़समज यामुळे तालमी खूपच एनर्जेटिक झाल्या. वेगळेच हातवारे (श्यामरावांच्या भाषेत तर ‘पायवारे’सुद्धा!) करत करत आणि बोलून बोलून दमवणारे संवाद म्हणत म्हणत प्रत्येकानं जीव ओतून आणि मेंदू थकवून कामं केली. पण सगळ्यात अवघड एक १७-१८ मिनिटांचा सलग संवादखंड निर्मितीच्या वाटय़ाला होता. अक्षरश: ७०-८० च्या मराठी typing speed ने असलेलं हे सगळं बोलणं ही त्या नटीसाठी एक अंतिम परीक्षाच होती. ‘भारतासारख्या डेव्हलिपग कंट्रीमध्ये.. विकसनशील राष्ट्रामध्ये..’ असं म्हणत म्हणत ही मीनाक्षीकाकू जी बोलत जाते ते ऐकून ऐकून प्रेक्षक दमून जातो. निर्मितीनं त्यासाठी अक्षरश: स्वत:ला झोकून दिलं आणि त्याचं श्रेयही तिला पुरेपूर मिळालं.
दिग्दर्शक म्हणून एका theatre game च्या पेसने मी जाणीवपूर्वक वेगवान हालचाली आणि compositions करत करत नाटक गतिमान ठेवलं होतं. शिवाय श्याम मनोहरांच्या अचूक बोलीभाषेकडे, प्रवाहीपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतंच. गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीनं ‘यळकोट’चे उत्तम प्रयोग झाले. पुण्याच्या भरत नाटय़मंदिर, टिळक स्मारक मंदिरात या प्रायोगिक नाटकाचे त्याकाळी होणारे ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग हा तेव्हा चच्रेचा विषय होता. याच कलाकारांना घेऊन िहदी रूपांतर केलेल्या ‘आंगन टेढा’चेही प्रयोग पृथ्वी थिएटर्समध्ये असेच भरगच्च झाले. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही अतिशय भरभरून दाद दिली. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाच्या पारितोषिकासह किशोर आणि रेणुकालाही उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसं मिळाली. याच वर्षी ‘ध्यानीमनी’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट व्यावसायिक दिग्दर्शक आणि ‘यळकोट’साठी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक असा दुहेरी पुरस्कार मला ‘नाटय़दर्पण’नं दिला. ‘व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीच्या सीमारेषा धूसर करणारा दिग्दर्शक’ अशी नोंदही समीक्षकांनी घेतली.
प्रदीप मुळ्येनं जाणीवपूर्वक केलेलं ‘बुटकं’ नेपथ्य, विवेक लागूचं ‘मॅड’ पाश्र्वसंगीत, असिता जोशीची ‘अ‍ॅप्ट’ वेशभूषा आणि श्यामरावांचे अफलातून संवाद! नाटक पाहताना प्रेक्षागृहात जो बौद्धिक हास्यकल्लोळ निर्माण व्हायचा तो अवर्णनीय होता! नवविवाहित नवरा-बायकोच्या वादाचे अजब विषय, शरीरसुखाच्या गरसमजुती, सामाजिक तथाकथित रूढ संकल्पनांना सुरुंग लावणाऱ्या कॉमेंट्स या सगळ्यातून प्रतिसादी हसण्याचा जो सातमजली स्फोट व्हायचा तेव्हा नटांना स्टेजवर अक्षरश: एक ते दीड मिनिट शांत उभं राहावं लागायचं. मी स्वत: माटुंग्याच्या कर्नाटक संघ थिएटरमध्ये घेतलेला हा अनुभव आजही जस्साच्या तस्सा आठवतोय. अत्यंत तणावपूर्ण प्रवेशात इंजिनीअर असलेले अशोक-श्रीधर सेक्सविषयी बोलताना संभ्रमितपणे एकमेकांना म्हणतात, ‘आपल्याला बारावीमध्ये ९२ % मार्क्‍स होते तरीही आपली ही दशा! ५० % वाल्यांचं काय होत असेल?’ या संवादावर एखादा बॉम्बस्फोट व्हावा तसा जो प्रतिसाद निर्माण व्हायचा तो विरायलाच खूप वेळ लागत असे. तर दुसरीकडं ‘मेंदूत सेक्स ही डेंजरस गोष्ट आहे.. शरीरात सेक्स ही सुंदर गोष्ट आहे!’ हा संवाद प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडत असे.
एकूणच standard casting असल्यामुळं संवादांना अजिबात अश्लीलला प्राप्त झाली नाही. अन्यथा काही संवाद जर आवश्यक त्या गांभीर्यपूर्वक समजेनं बोलले गेले नसते तर misinterpretation, repulsiveness ला ठायी ठायी वाव होता. (माझ्याकडे नाटक येण्यापूर्वी पाच-सहा संस्थांनी श्यामरावांकडून प्रयोगाची परवानगी घेतली. पण दिग्दर्शकांना असे ‘बोल्ड’ संवाद म्हणणारी नटमंडळी न मिळाल्यानं प्रयोग झालाच नव्हता म्हणे.) नाटक नाजूक होतं. तारेवरची अवघड कसरतच होती ती. पात्रांच्या भिरभिरण्यातून, वेगवेगळ्या मनोवस्थांमधून पुढे एका realisation पर्यंत पोहोचण्याची ही वळणावळणांची बिकट वाट श्यामरावांनी ‘यळकोट’मध्ये जाणीवपूर्वक निवडली होती. ‘आविष्कार’च्या या प्रयोगानं हा अवघड प्रवास आनंददायी झाला यात शंका नाही.
जाता जाता एक गंमत.. ‘यळकोट’ हे संपूर्ण नाटक अशोक-सुनंदाच्या घरात घडतं. मात्र फक्त एकच प्रवेश हॉटेलमध्ये घडतो. अशा प्रकारची दिग्दर्शकाला पेचात पाडणारी नाटय़रचना श्यामराव आवर्जून करतात की काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो. (उदा. ‘यकृत’मध्ये प्रत्येक प्रवेश वेगवेगळ्या ठिकाणी. ‘हृदय’मध्ये संपूर्ण नाटक तारा-विठ्ठलच्या घरात.. मात्र फक्त पहिला पार्टीचा प्रवेश मोहन-वसूच्या घरी. तर ‘यकृत’ नाटकात आता हे वाक्य बोलताना अमुक एका पात्राची स्टेजवर गरज नाही म्हणून श्यामरावांनी त्याला सरळ बाथरूममध्ये लघुशंकेसाठी पाठवून दिलं आहे.) पात्रांच्या एंट्री-एक्झिट्स, त्यांना वेशभूषा बदलासाठी द्यावा लागणारा वेळ याविषयी हा नाटककार अजिबात विचार करत बसत नाही. ‘प्रेम म्हणजे काय?’, ‘ज्ञान म्हणजे काय?’, ‘ग्रेट म्हणजे काय?’, ‘आपण स्वभावाला इतकं का महत्त्व देतो?’, ‘निर्मळ आनंद मिळवण्यासाठी आपण नेमकं काय करतो?’ अशा असंख्य मूलभूत प्रश्नांचा मागोवा घेणं हाच त्यांचा खरा उद्देश असतो. अंधारात बसलेल्या सर्व काळ्या मठ्ठ बलांना गदगदून जागं करण्याचा जणू ते प्रयत्न करत असतात. आताच ताजी खबर आलीय की श्यामरावांनी ‘यळकोट’च्या काही प्रवेशांचं पुनल्रेखन केलंय. चला श्यामराव, करू या का पुन्हा ‘यळकोट’?
चंद्रकांत कुलकर्णी – chandukul@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2015 1:01 am

Web Title: different experiment of drama
Next Stories
1 यदाकदाचित
2 नव्वदोत्तरी नाटकं : ‘साठेचं काय करायचं?’
3 नव्वदोत्तरी नाटकं : ‘ऑल दि बेस्ट’
Just Now!
X