30 March 2020

News Flash

‘मित्र’

मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन पुण्याला त्यांच्या घरी गेलो आणि नाटक वाचायला ताब्यात घेतलं.

‘मित्र’ नाटकाला ‘हॉरोवित्झ अ‍ॅण्ड मिसेस वॉशिंग्टन’ या हेन्री डेंकरच्या कादंबरीचा आधार आहे.

२००२ साल. सप्टेंबर-ऑक्टोबरचा महिना होता. मला एके दिवशी अचानक डॉ. श्रीराम लागूंचा पुण्याहून फोन आला. म्हणाले, एक नाटक वाचलंय, तुला वाचायला द्यायचं आहे. मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन पुण्याला त्यांच्या घरी गेलो आणि नाटक वाचायला ताब्यात घेतलं. डॉ. शिरीष आठवलेंनी लिहिलेलं नाटक. शिरीष आठवले एक चांगले अभिनेते आहेत हे मला माहीत होतं. त्यांचं ‘कन्यादान’ या विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकातलं काम मी पाहिलं होतं. पण लेखक म्हणून त्यांचा आणि माझा परिचय झाला नव्हता. डॉ. लागूंनी मला नुसतं नाटक वाचायला सांगितलं. स्वत:ची त्यावरची प्रतिक्रिया दिली नव्हती. मी नाटक वाचलं. मला ते खूपच आवडलं. मी डॉक्टरांना माझं प्रामाणिक मत दिलं. तेव्हा ते म्हणाले, ‘मलाही आवडलंय. मला दादासाहेबांचं काम करायचं आहे. तू नाटक दिग्दर्शित करशील का?’ मला खूपच आनंद झाला. मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. आयुष्यात जपून ठेवावा अशा क्षणांपैकी तो एक होता. डॉक्टरांनी नाटक वाचायला देताना ‘मला आवडलंय’ अशी स्वत:ची प्रतिक्रिया देऊन माझ्यावर दबाव टाकला नाही. मला हे फार महत्त्वाचं वाटलं. माझ्या होकारानंतर माझी आणि डॉक्टरांची थोडीशी चर्चा झाली. मग मी शिरीष आठवलेंशी बोललो. अशा रीतीने ‘मित्र’ नाटक सादर व्हावं या दिशेनं पहिलं पाऊल उचललं गेलं.

लेखक आणि दिग्दर्शक या नात्याने आम्ही नाटकावर चर्चा केली. पण जोवर निर्माता मिळत नाही तोवर त्यावरची चर्चा ही निव्वळ विचारांची देवाणघेवाण असते. २००२-२००३ मध्ये नाटकांना चांगली गर्दी होत असे. त्यामुळे निर्माते वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करायला उत्सुक असत. शिवाय डॉ. लागूंसारखा उत्तम अभिनेता नाटकात काम करायला तयार होता, ही निर्मात्यांसाठी पर्वणीच होती. त्यामुळे ‘मित्र’सारख्या नाटकाला निर्माता मिळणं अवघड नव्हतं. पण माझ्या मनात एकच निर्माता होता- ज्याच्याबरोबर माझं उत्तम टय़ूनिंग होतं. ‘सुयोग’चा सुधीर भट. माझा अत्यंत लाडका निर्माता आणि मुख्य म्हणजे अतिशय जवळचा मित्र. मी सुधीरला ‘मित्र’- बद्दल सांगितलं. मला का कुणास ठाऊक, हे नाटक सुधीरच्या गळी उतरवणं कठीण जाईल असं वाटलं होतं. खरं तर कारण मला माहीत होतं. नाटकात व्हीलचेअर होती आणि नाटक आजारी माणसावरचं होतं. या दोन्ही गोष्टी आमच्या सुधीरला वज्र्य. पण माझा अंदाज चुकला. डॉक्टर काम करणार असं म्हटल्यावर हा गृहस्थ नाटकाचं वाचन वगैरे न करताच तयार झाला. तरी मी त्याला जुजबी कथानक सांगितलं. ते ऐकून न ऐकल्यासारखं करीत त्यानं मला प्रश्न विचारला, ‘डॉक्टरांबरोबर कोण?’ मी म्हटलं, ‘माझी अत्यंत आवडती अभिनेत्री ज्योती चांदेकर.’ मी, डॉ. लागू आणि शिरीष आम्हा तिघांच्याही मनात सावित्रीबाईंचं काम करायला ज्योतीचंच नाव होतं. सुधीरला ही पात्रयोजना मान्य झाली आणि खऱ्या अर्थानं ‘मित्र’ या नाटकाचा प्रयोग सादर होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली. डॉक्टरांबरोबर मीटिंग झाली. शिरीष आणि सुधीरचंही बोलणं झालं आणि नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली.

‘मित्र’चे तंत्रज्ञ कोण असावेत याविषयी माझी आणि सुधीरची चर्चा झाली. राजन भिसे- नेपथ्य, प्रदीप मुळ्ये- प्रकाशयोजना आणि वेशभूषा, अशोक पत्की- पाश्र्वसंगीत. ‘मित्र’च्या प्रयोग परिणामात या तंत्रज्ञांचा फार मोठा सहभाग होता. ‘मित्र’च्या तालमी खूप दिवस सुरू होत्या. तालमी मुंबई, पुणे आणि गोवा अशा तीन ठिकाणी झाल्या. नाटकाच्या प्रत्यक्ष प्रयोगापेक्षा तालमींत जास्त गंमत असते. तालमीत नाटक खुलत जातं. मी आत्तापर्यंत दिग्दर्शित केलेल्या नाटकांपेक्षा याची संरचना वेगळी होती. शिरीषनं आशय-विषयाची मांडणी करण्याची जी पद्धत अवलंबिली होती ती छोटय़ा छोटय़ा प्रवेशांची होती. त्यामुळे प्रयोगात या छोटय़ा छोटय़ा प्रवेशांमध्ये तुटकपणा जाणवू न देता सलग परिणाम साधण्याचं आव्हान यात होतं. पटकथेच्या जवळ जाणारी ही संहिता. म्हणजे पहिल्या अंकात आठ प्रवेश आणि दुसऱ्या अंकात दहा. शिरीषनं छोटे प्रवेश आणि मोठा आशय असा फॉरमॅट ठेवला होता. या नाटकाला पूरक अशा लांबीचे प्रवेश ठेवून आलेख चढवत नेला होता. विजय तेंडुलकरांनाही ‘मित्र’चं लेखन आवडण्याचं हे एक प्रमुख कारण होतं. नाटकाचं नाटकपण कशात आहे? त्याच्या नाटक आणि नाटक असण्यातच! ‘मित्र’ बहुप्रवेशी असलं तरी ते नाटकच होतं. शिवाय ते अतिशय साध्या-सोप्या भाषेत लिहिलेलं होतं. त्यामुळे ते दिग्दर्शित करणं खूप अवघड होतं. याचा प्रयोग आत्ता प्रेक्षकांसमोर घडतोय इतक्या सहजतेने होणं अत्यावश्यक होतं. नाटक असूनही त्यात कुठेही नाटकीपणा डोकावू नये, ही प्रयोगाची प्रमुख गरज होती.

नाटकाच्या नावातच त्याचा आशय-विषय स्पष्ट झाला आहे. नाटक मैत्रीबद्दलचं आहे. दादासाहेब पुरोहित आणि सावित्रीबाई रुपवते यांच्या मैत्रीबद्दलचं. दादासाहेबांच्या पत्नीची पुण्यतिथी असते. ते हार आणायला घराबाहेर पडतात तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला कुणीतरी चपलांचा हार घातल्यामुळे दंगल सुरू झालेली असते. त्यात दादासाहेब काही मुलांना अडवायला जातात तेव्हा कुणीतरी फेकलेला दगड डोक्याला लागून ते जखमी होतात. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येते. तिथे त्यांच्यावर उपचार करीत असताना त्यांना ट्रान्झियट इस्कीमिक अटॅक येतो. त्यात त्यांची उजवी बाजू पॅरलाइज होते. दादासाहेबांची मुलगी अमेरिकेत असते. मुलगा नोकरीसाठी बंगळुरुला. दादासाहेब मुंबईत एकटंच राहणं पसंत करतात. त्यामुळे त्यांचा मुलगा माधव त्यांची देखभाल करायला एक नर्स नेमतो.. सावित्रीबाई. त्या दलित असतात. हट्टी दादासाहेबांचा सरुवातीचा प्रतिकार आणि हळूहळू त्या नकाराचं मैत्रीतलं रूपांतर. पुरोहित आणि रुपवते यांची मैत्री हा या नाटकाचा मूळ विषय. वरकरणी साध्या-सोप्या वाटणाऱ्या या नाटकाला सामाजिक , राजकीय आणि आपसातले नातेसंबंध असे अनेक पैलू आहेत. खोलात शिरल्यावर हे पदर उलगडायला लागतात. असंख्य अंत:प्रवाह असलेलं हे नाटक मला तेव्हाही महत्त्वाचं वाटलं होतं, आजही वाटतं.

‘मित्र’ नाटकाला ‘हॉरोवित्झ अ‍ॅण्ड मिसेस वॉशिंग्टन’ या हेन्री डेंकरच्या कादंबरीचा आधार आहे. अमेरिकेत गाजलेली ही कादंबरी. नंतर त्यावर अमेरिकेत नाटकही झालं. ‘मित्र’चं कथानक तसं जगाच्या पाठीवर कुठंही घडू शकेल असं आहे. त्यामुळे ते बऱ्याच देशांमध्ये, बऱ्याच भाषांमध्ये सादर केलं जाऊ शकतं. तिरकस विनोद हा या नाटकाचा स्थायीभाव. तोही सहज घडणारा. कथानकातील गुंतागुंतीपेक्षा स्वभावविशेष अधोरेखित करणारा. डॉक्टर आणि ज्योती या दोघांच्याही हे लक्षात आलं होतं. त्यामुळे विनोदाचा पोत लक्षात घेऊन ते अभिनय करीत असत. प्रेक्षक दादासाहेबांच्या हट्टीपणाला हसत असत; पण त्यांची मानसिकताही लक्षात घेत असत. शिरीष आठवलेंनी या नाटकात, मैत्री कशी असावी, यावर भाष्य केलं आहे आणि ते करत असताना त्यांनी नाटय़पूर्ण घटनांचा आधार घेतला आहे. कुठंही आणि कधीच भाषणबाजी केलेली नाही, किंवा उपदेशाचे डोसही पाजलेले नाहीत. म्हणूनच हे नाटक माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ‘मित्र’ हे वास्तववादी नाटक आहे. आणि सादरीकरणही त्याच पद्धतीचं होतं.

डॉ. लागूंबरोबर काम करणं नेहमीच आनंददायी असतं. ते जेव्हा नाटकाची निवड करतात तेव्हा त्यात केवळ त्यांची भूमिका चांगली आहे एवढाच निकष नसतो; तर त्यात सामाजिक वा राजकीय विधान असावं, हाही असतो असं मला जाणवलंय. त्यांना नाटकातला वैचारिकआशय अधिक महत्त्वाचा वाटतो आणि त्यात ते जीव ओतून काम करतात. ‘मित्र’मध्ये मैत्री या भावनेचा आधार घेऊन सामाजिक आशय मांडण्यात नाटककार यशस्वी झाला आहे. प्रयोगातसुद्धा याचं भान राखणं अतिशय आवश्यक होतं. डॉक्टरांनी हट्टी दादासाहेब फार परिणामकारकरीत्या साकारले होते. ‘मित्र’च्या लेखनातली खासियत अशी, की त्यात दादासाहेब एक व्यक्तिरेखा उरत नाही, तर स्वत:ची ठाम मतं असणाऱ्या म्हाताऱ्यांचं ते प्रतिनिधित्व करतात. तर सावित्रीबाई या अत्यंत कणखर आणि आत्मसन्मान असणाऱ्या एकटय़ा म्हाताऱ्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच या दोघांतला संघर्ष टोकदार होतो.. आपल्याला हसवता हसवता विचार करायला भाग पाडतो. ज्योती चांदेकर या समर्थ अभिनेत्रीनं सर्व बारकाव्यांसकट सावित्री उभी केली होती. नाटक जरी वास्तववादी असलं, तरी त्यातली सर्वच महत्त्वाची पात्रं समाजातील त्या- त्या वयाच्या व मानसिकतेच्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करणारी होती. प्रत्येक व्यक्तिरेखेचं वागणं त्या- त्या माणसांच्या परिघात पाहता योग्यच होतं. नाटकात संघर्ष जरूर होता; पण प्रेक्षकांपर्यंत जाणारा संदेश मात्र सकारात्मक होता. मुळात कुणीच वाईट नसतानाही संघर्ष निर्माण होऊ शकतो, आणि तो परिस्थितीमुळे निर्माण होऊ शकतो. संघर्ष परिस्थितीमुळे निर्माण झालेला असल्यानं त्यातून मार्गही निघतो. ‘मित्र’मध्ये लेखक शिरीष आठवलेंनी हे अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळं प्रयोगातही ते अधोरेखित झालं होतं. विशेषत: अभिनयामुळं!

दादासाहेब आणि सावित्रीबाई यांची आपसातली तेढ या नाटकात संवादांतून दाखवली आहे. त्यामुळे संवादलेखनात नेमकेपणा असणं आवश्यक होतं. दादासाहेब आणि सावित्रीबाई प्रथम एकमेकांना भेटतात तेव्हापासूनच त्यांच्यातल्या शाब्दिक चकमकींना सुरुवात होते. माधव- म्हणजे दादासाहेबांचा मुलगा सावित्रीबाईंबद्दल त्यांना सांगतो तेव्हा ते म्हणतात, ‘‘तुला सांगायला लाज नाही वाटत? माझी काळजी घ्यायला तू एका दलित बाईला बोलावणार? या लोकांनीच माझ्यावर हल्ला केला होता. विसरलास? मी त्या बाईला घरात पाऊलसुद्धा टाकू देणार नाही.’’ सावित्रीबाई दादासाहेबांचं बोलणं ऐकतात आणि म्हणतात, ‘‘तुमची गैरसोय होऊ नये म्हणून मी एक-दोन दिवस काम करीन. तोपर्यंत तुम्ही दुसरी बाई बघा. ब्राह्मणाची बघा. त्यांना बरं वाटेल.’’ अशा प्रकारच्या जुगलबंदीनं सुरुवात झालेल्या, स्वत:ची ठाम मतं असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांच्या मैत्रीबद्दलचं हे नाटक म्हणजे केवळ चमकदार संवादांची लडी नाही, तर त्यापलीकडचा सामाजिक आशय मांडणारं एक नाटय़ात्म विधान आहे. एकदा सावित्रीबाई दादासाहेबांना भाकरी खायला देतात. उजव्या हाताने खायला सांगतात. त्यावर दादासाहेब म्हणतात, ‘‘मला भाकरी खायला दिलीत. मला छळण्यासाठी तुम्ही हे करताय. तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं, की मला साधी भाकरीसुद्धा तोडता येत नाही. मी कसा अपंग आहे.’’ अशा प्रकारची बोलणी खाऊनही सावित्रीबाई जिद्दीनं दादासाहेबांकडे काम करतात. कारण कुठंतरी त्यांच्या माणूसपणावर सावित्रीबाईंचा विश्वास असतो. त्यांचा राग वा तुसडेपणा हा मुखवटा आहे, तो कधीतरी गळून पडेल याची खात्री असल्यामुळेही त्या दादासाहेबांना साथ देण्याचा निर्णय घेतात. आणि त्यांचा निर्णय बरोबर निघतो. हळूहळू पुरोहित आणि रुपवते एकमेकांना सहन करायला लागतात. दादासाहेबांना सावित्रीबाईंची सवय व्हायला लागते. आणि जातपात, धर्म यापलीकडे जाऊन त्यांची निखळ मैत्री होते. नवऱ्याच्या पश्चात ताठ मानेनं जगणाऱ्या सावित्रीबाईंकडे दादासाहेब आदरानं बघायला लागतात. ते एकमेकांशी मोकळेपणानं बोलायला लागतात तेव्हा दादासाहेब म्हणतात, ‘‘मिसेस रुपवते, काय गंमत आहे नाही- माणसांच्या जाती वेगळ्या असल्या तरी सुखदु:खं सारखीच असतात.’’ सावित्रीबाईंच्या हे लक्षात आलेलं असतं की, दादासाहेबांचा हट्ट त्यांचं अस्तित्व आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ नये यासाठी आहे.

‘मित्र’मध्ये पुरोहितांचं आजारपण रूपकासारखं वापरलं गेलं आहे. मला आजही हे नाटक महत्त्वाचं वाटण्याचं हेही एक कारण आहे. आपल्या प्रगतिशील देशात या काळातही जातपात, धर्म पाळण्याच्या नादात भेदभाव करण्याच्या रोगापासून आपली सुटका झालेली नाही. आणि या रोगातून मुक्तता होण्यासाठी मैत्री हा उत्तम उपाय आहे. ‘मित्र’मध्ये भिन्नलिंगी मैत्रीच्या नात्याकडे जितक्या समंजसपणे पाहिलं गेलं आहे तितक्याच सहिष्णुतेनं दलित आणि ब्राह्मण यांच्या मैत्रीकडे पाहिलं गेलं आहे. आपल्या देशातली आजची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा आदर करणारी, काळ कितीही वेगानं बदलला तरी माणुसकीची मूल्यं जोपासणारी मैत्री हीच आपल्या आजूबाजूला असलेल्या अशांत परिस्थितीकडे खुलेपणाने आणि निकोप दृष्टीनं पाहण्याची बुद्धी देईल.

‘सुयोग’ने ‘मित्र’ नाटकाचे तीनशेच्या वर प्रयोग केले. नाटकाच्या तालमींमध्ये बरीच चर्चा व्हायची. दादासाहेब उभा करण्यासाठी डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं शारीरभाषेचा वापर केला होता तो लाजवाब होता. नाटकाच्या सुरुवातीला उजवी बाजू पॅरलाइज झाल्यावर डाव्या हाताचा वाजवीपेक्षा जास्त केलेला वापर दादासाहेबांची अस्वस्थता अधोरेखित करण्यासाठी उपयुक्त ठरला. तसंच आपल्या मुलीकडे अमेरिकेला जाणं टाळण्यासाठी ते सावित्रीबाईंच्या साहाय्यानं अतिरिक्त व्यायाम करतात त्या प्रसंगात डॉक्टर हातातल्या काठीचा ज्या पद्धतीनं वापर करत ते विलक्षणच होतं. मी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग बघायला बसलो होतो. डॉक्टरांचा चालता चालता तोल जायचा. ते खरंच पडताहेत असं वाटून माझ्या पुढच्या रांगेतला एक माणूस त्यांना मदत करण्याच्या उद्देशानं उठून उभा राहिला आणि मग ओशाळला. माझ्या मते, डॉक्टरांच्या अभिनयाला एका प्रेक्षकानं दिलेली ती दाद होती. ज्योतींनी सावित्रीबाई उभी करताना ती कडक शिस्तीची आहे म्हणून वाक्यांचे शेवटचे शब्द न लांबवण्याचं तंत्र अवलंबलं होतं. फक्त डॉ. तेलंगांशी बोलताना आणि शेवटच्या प्रवेशामध्ये दादासाहेबांशी बोलताना हे तंत्र सोडलं होतं. शिवाय ताठ उभं राहणं आणि नेमके हातवारे करणं या प्रकारच्या छोटय़ा छोटय़ा बारकाव्यांनिशी त्यांनी सावित्रीबाई जिवंत केली होती. त्यांच्यानंतर फैयाजबाईंनीही ‘मित्र’चे बरेच प्रयोग केले. त्यांनी सावित्रीबाई वेगळ्या पद्धतीनं उभी केली. ‘मित्र’मधले इतर कलाकारही यथायोग्य होते. परितोष प्रधान, धनंजय गोळे, वृषाली काटकर, प्रेमचंद वाघमारे ही मंडळी नाटकाचा पोत समजून घेऊन अभिनय करत असत. माझ्यासाठी ‘मित्र’ नाटक दिग्दर्शित करणं हा सुखकारक अनुभव होता.

या नाटकाला प्रेक्षक प्रतिसादही चांगला मिळाला. तसंच समीक्षकांनीदेखील चांगली समीक्षा लिहिली. रंगभूमीवर तेव्हा कुठल्या एका प्रकारच्या नाटकांची लाट नव्हती. त्यामुळे वैविध्य होतं. काम करायला खूप मजा यायची. ‘मित्र’ करायला विशेष मजा आली कारण कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, निर्माते यांचे आपसातले संबंध उत्तम होते. सुधीर तर आमचे लाडच करायचा. आणि ‘मित्र’ नाटकाचं कौतुक झालं की विशेष खूश व्हायचा. कारण त्याला ते ‘सुयोग’च्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या नाटकांपैकी एक वाटायचं. ‘मित्र’चे परदेशातही प्रयोग झाले. तिथंही ते प्रेक्षकांना आवडलं. पण माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मित्र’ला कोलकात्याच्या नांदिकार महोत्सवात, दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़विद्यालयाच्या भारत रंगमहोत्सवात आणि संगीत नाटक अकादमीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नाटय़महोत्सवात प्रयोग करण्यासाठी मिळालेलं निमंत्रण आणि तिथे झालेलं कौतुक. मला आत्तापर्यंतच्या माझ्या कुठल्याच नाटकानं इतकं समाधान दिलेलं नाही. मला नेहमीच माझ्या नाटकाचा प्रयोग झाल्यावर वाटतं- नाही; आपलं काहीतरी चुकलंय. याहून अधिक चांगलं आणि अर्थपूर्ण नाटक केलं पाहिजे. ‘मित्र’चं एवढं कौतुक झाल्यावरही नेहमीप्रमाणं मला वाटलंच- हे माझं नाही; लेखक आणि अभिनेत्यांचं हे कौतुक आहे.. त्यांना मिळालेली ही दाद आहे.

‘मित्र’च्या वेळी घडलेल्या दोन छोटय़ा गोष्टी आठवतात, त्या नमूद करतो. दिलीप प्रभावळकर हे उत्तम अभिनेते; पण ते उत्तम प्रेक्षकसुद्धा आहेत. ते पाल्र्याला दीनानाथ नाटय़गृहात ‘मित्र’चा प्रयोग बघायला आले होते. त्यांची प्रतिक्रिया ऐकायला मी उत्सुक होतो. नाटक बघून ते म्हणाले, ‘नाटक बरं आहे रे.. पण मी आज एक गोष्ट शिकलो- डॉक्टर ज्या पद्धतीनं सहकलाकाराचं बोलणं ऐकतात, तसं ऐकता आलं पाहिजे. अफलातून. सर्वच अभिनेत्यांनी याकरता हे नाटक पाहिलं पाहिजे. हॅटस् ऑफ टू डॉक्टर.’ त्यांची ही प्रतिक्रिया माझ्या स्मरणात राहिली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सुधीर भटचे ज्येष्ठ बंधू उदय भट यांनी गडकरी रंगायतनचा प्रयोग पाहिला होता. त्यानंतर तीन-चार दिवसांनी त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले, ‘विजय, या आठवडय़ात मी तुझी तीन नाटकं पाहिली- ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘नकळत सारे घडले’ आणि ‘मित्र’! ‘प्रेमाची गंमत’ मी खूप एन्जॉय केलं. पण मी आणि बायको रिक्षात बसल्यावर वेगळ्या विषयावर बोलायला लागलो. ‘नकळत सारे घडले’ घरी येईपर्यंत माझ्याबरोबर राहिलं. पण ‘मित्र’ बघून तीन दिवस झाले, आजही ते माझी पाठ सोडत नाहीए. असे अनेक एकाकी म्हातारे आजूबाजूला दिसत राहतात.’ मी ऐकतच राहिलो. मनातून सुखावलो. नाटक कुणा एकाचं नसतं. त्यामुळे जर ‘मित्र’ चांगलं झालं असेल तर ते श्रेय सर्वाचं आहे. पुढं ते हिंदी, बंगाली या भाषांमध्येही सादर झालं. आज इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा ‘मित्र’चा प्रयोग करून बघावंसं मनापासून वाटून गेलं.
विजय केंकरे- vijaykenkre@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2015 1:01 am

Web Title: story of creation mitra marathi natak
Next Stories
1 ‘गांधी विरुद्ध गांधी’
2 ‘शोभायात्रा’
3 ‘सत्यशोधक’
Just Now!
X