19 January 2021

News Flash

गोरिलांची कैवारी

मानव आफ्रिकेमध्ये उत्क्रांत झाल्याचा सिद्धान्त लिकी यांनी मांडला.

‘गोरिला इन द मीस्ट’ हे डियान फोस्सी (१६ जानेवारी १९३२ ते २६ डिसेंबर १९८५)हिची जीवनकहाणी तिच्याच शब्दांत सांगणारं पुस्तक तुम्ही वाचलं आहे? किंवा या नावाचा चित्रपट तुम्ही पाहिला आहे? नसेल तर त्यांच्यासाठी मला तिची रोमहर्षक गोष्ट सांगायची आहे. आफ्रिकेतील रवांडाच्या पर्वतीय अरण्यभागात राहणाऱ्या गोरिलांबरोबर १८ वर्षे राहून तिने त्यांचा अभ्यास केला. त्यामागची तिची प्रेरणा होती लुईस लिकी या केनियातील सुप्रसिद्ध मानववंश आणि पुरातत्त्व संशोधक शास्त्रज्ञाची!

मानव आफ्रिकेमध्ये उत्क्रांत झाल्याचा सिद्धान्त लिकी यांनी मांडला. प्रथम श्रेणीतील प्राण्यांच्या अभ्यासात मानवी उत्क्रांतीची गुरुकिल्ली असल्याचा त्यांचा विश्वास होता. त्यासाठी त्या प्राणांच्या नैसर्गिक अधिवासात राहून अभ्यास करणे गरजेचे आहे हे त्यांनी जाणले होते. प्रथम श्रेणीतील सस्तन प्राण्यामधील एक गट म्हणजे एप्स (वानर) कुळातील गोरिला, चिंपान्झी, ओरांगुतानसारखे धिप्पाड प्राणी. (मानव प्राणीसुद्धा या वर्गातलाच.) या तीनही प्राण्यांचा सखोल अभ्यास करणाऱ्यांमध्ये आघाडीची तीन नावे स्त्रियांचीच आहेत. जेन गुडाल, बिरुते गाल्डिकास आणि डियान फोस्सी. यापैकी प्रत्येकीच्या अनुभवात थोडे समान आणि बहुतांश: वेगळे धागे आढळतात. यापैकी डियानची कहाणी रोमहर्षक पण करुण शेवट असलेली आणि विषण्ण करणारी आहे.

डियान अवघी सहा वर्षांची होती तेव्हा तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. डियानला सावत्र वडिलांनी सावत्रपणानेच वागविले. आईसमवेत जेवायलाही तिला बंदी होती. कडक शिस्तीत तिचे बालपण कोमेजून गेले. तिला भावनिक आधार कधी मिळालाच नाही. या असुरक्षेपोटी ती पाळीव प्राण्यांकडे वळली. त्यांनी आपल्याला स्वीकारावे असे तिला वाटायचे. प्राण्यांविषयी तिचे हे प्रेम तिच्या मृत्यूपर्यंत राहिले, नव्हे ते वाढत गेले. (इतके की त्यापायी तिची हत्या झाली.) लहानपणापासून तिची घोडेस्वारी सुरू झाली. महाविद्यालयीन काळात तिने त्यात प्रावीण्यही मिळवले. वडिलांच्या सांगण्यावरून उद्योगविषयीचा अभ्यासक्रम तिने घेतला खरा पण पूर्ण केला नाही. वडिलांच्या इच्छेविरुद्ध तिला प्राण्यांचा डॉक्टर व्हायचे होते. तेही जमले नाही, मग व्यावसायिक चिकित्सा यामध्ये तिने पदवी संपादन केली. काही काळ इस्पितळामध्ये काम केले. पण शेतावर काम करणे आवडत असल्याने ती गावाबाहेर शेतावर जाऊन राहिली. तिथे तिला प्राण्यांसोबत काम करायला मिळाले. पण आता तिला जग बघायचे होते. प्रवास करायचा होता. एका मैत्रिणीने तिला आफ्रिकेतील वन्य जीवनाचे फोटो दाखविले. तिला तिथली ओढ वाटू लागली. पण पुरेसे पैसे नव्हते. तिने बँकेचे कर्ज काढले. केनिया, टांझानिया, झिंबाब्वे, कांगो इथे तिने प्रवास केला. एक ब्रिटिश शिकारी तिचा वाटाडय़ा झाला. त्याने तिला आफ्रिकेतील वन्यजीवन असलेली अभयारण्ये दाखवली. ज्या पुरातन अवशेष असलेल्या भूमीवर लुई लिकी आणि त्यांची पत्नी मेरी संशोधन करीत होते ती जागा तिने पहिली. जॉर्ज शेल्लर हा प्राणिशास्त्रज्ञ त्यावेळी-१९५९ मध्ये – कांगोमध्ये गोरिला आणि चिंपान्झीवर सुरुवातीचे संशोधन करत होता. आता डियानच्या मनाची मशागत झाली होती. डॉ. लिकीने बीज पेरले होते आणि शेल्लरनी वाट घालून दिली होती. हीच ती वेळ – डियानच्या जीवनाचे ध्येय तिला सापडले. ‘पर्वतीय गोरिलांचा अभ्यास करायला मी इथे एक ना एक दिवस नक्की येणार.’ तिने जणू स्वत:ला वचन दिले. घरी परतून तिने आधी काम करून कर्ज फेडले, काही पैसे साठवले. मित्रमंडळी, आप्त-स्वकीय, आई-वडील आणि तिची कुत्री यांची समजूत पटवणे तिला अवघड गेले. आपल्या मनाची ओढ ती त्यांना कशी सांगणार? त्यांना ती कशी पटणार? आफ्रिकेला गोरिलांच्या अभ्यासाला जाण्यासाठी तिला आपले ठरलेले लग्नही मोडावे लागले. इतकेच नव्हे तर आफ्रिकेत गेल्यावर व्यवहार अडू नये म्हणून ती पुस्तकावरून स्वाहिली शिकली.

आफ्रिकेत आल्यावर वन्यजीवांचे छायाचित्रण करणाऱ्या अ‍ॅलन रूट्सची तिला खूप मदत झाली. प्रथम ती रवांडाजवळ वीरुंगामध्ये राहिली. तेव्हा अभ्यासासाठी तिला परमिट मिळवून देण्यात, तिचे सामान आणायला तिला भारवाहक मिळवून देण्यासाठी, कॅम्प लावण्यासाठी त्याने मदत केली. तो त्याच्या कामावर गेल्यावर डियानला तिच्या एकटेपणाची जाणीव झाली. मग मात्र गोरिला हाच तिचा ध्यास आणि श्वास झाला. पहिल्याच दिवशी तिला एक गोरिला ऊन शेकताना दिसला. हा चांगला शकुन होता. जेवण म्हणजे डबाबंद अन्न आणि उकडलेले बटाटे. ७ बाय १० फुटांचा तंबू हे तिचे घर. चार चाकी लँड रोवर हे तिचे वाहन, जवळच्या गावात जाऊन सामान भरायचे. आफ्रिकेतील स्थानिक आदिवासींनी तिला गोरिलांचा माग काढण्यातील बारकावे शिकविले. त्याच्यामुळे तिला गोरिलांच्या एकेक गटाची ओळख झाली.

‘किंगकाँग’ चित्रपटातील गोरिलामुळे हा राक्षसी प्राणी माणसाला मारतो, असे चित्र जनमानसात निर्माण झाले होते. मात्र डियान आफ्रिकेत येऊन तिचा गोरिलांचा अभ्यास सुरू झाला तेव्हा गोरिला त्याच्या अगदी विरुद्ध लाजाळू, गरीब आणि अतिशय कुटुंबवत्सल असल्याचे तिला आढळले. डोंगर  उतारावरील जंगल भागात ती जेव्हा जायची तेव्हा ते भीतीने पळून जायचे. त्यांची भीती जावी आणि आपण त्यांच्यापैकीच आहोत असे त्यांना  वाटण्यासाठी ती, गोरिला चालतात तशी  गुडघ्यात वाकून, हात टेकून चालायची.  त्यांचे आवाज ऐकून ती तसेच आवाज काढायची. त्यांच्यासारखेच- खोटे खोटे खायची. अखेरीस तिने त्यांचा विश्वास संपादन केला. गोरिला तिच्याजवळ येऊ लागले. त्यांच्या पिल्लांसोबत ती खेळायची. गोरिलांची ताकद माणसाच्या १० ते २० पटीने जास्त, पण त्यांनी आपल्या ताकदीने हिला कधी घाबरवले नाही. त्यांच्या आहारविहार सवयींचा, त्यांच्या ‘कुटुंबाचा’ तिने अभ्यास केला. त्यांच्या जवळ गेल्यामुळे त्यांच्याविषयी संशोधनाच्या संधी तिला मिळाल्या.

पुढे पुढे रवांडाचे शेतकरी वसाहतीसाठी गोरिलांच्या अधिवासावरच आक्रमण करू लागले. गोरिला हतबल होते, ते प्रतिकारही करू शकत नव्हते. ते अधिकाधिक पर्वतीय भागाकडे ढकलले जात होते. त्याविरुद्ध आवाज उठविल्यामुळे स्थानिक लोक तिच्या विरोधात होते. नव्या अधिवासात कित्येक गोरिला थंडीने न्यूमोनिया होऊन मेले. भरीस भर म्हणजे राष्ट्रीय उद्यानाची निम्म्याहून अधिक जंगल जमीन सरकारने शेतकऱ्यांना दिली. आणखी मोठा छुपा धोका गोरिलांच्या शिकारीचा आणि तस्करीचा होता. गोरिलांना, त्यांच्या कातडीला, हातापायांना बाजारात चांगली किंमत मिळायची. या सर्वाचा परिणाम गोरिलांची संख्या कमी होण्यात झाली. डियान वारंवार गोरिलांविषयी लेख लिहायची, परदेशी व्याख्याने द्यायची. त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध पोटतिडकीने आवाज उठवायची. १९८०मध्ये प्राणिशास्त्रात तिने पीएच.डी. मिळवली. त्यानंतर १८ महिने ती कार्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होती. पण तिचे सारे लक्ष गोरिलांकडे असे. ती परत आपल्या कर्मभूमीत आली, लाडक्या गोरिलांकडे. १९७७ च्या सुमारास डियानने तस्करांविरुद्ध जोरदार आघाडीच उघडली. ती माणसे पाठवून त्यांना पकडायची. त्यांचे फासे उद्ध्वस्त करायची. त्यांना धाकदपटशा दाखवायची. त्यांना ती कर्दनकाळ वाटायची. सामोपचाराने घेणे तिच्या स्वभावात नव्हते. तिला योग्य वाटेल तसेच ती वागायची. तस्करांच्या हितसंबंधांच्या आड आल्यामुळे तेही सुडाने पेटले होते. तिच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी तिच्या २९ संशोधन गटांपैकी एका गटातील  सगळ्या गोरिलांना संपवून टाकले.  तिच्या लाडक्या ‘डिजिट’चे डोके आणि पंजे कापून त्याचे धड फेकले, काय झाली असेल तिची अवस्था?

आपलाही मृत्यू छुप्या पावलांनी आपल्या मागे येतो आहे हे तिला त्यावेळी वाटले असेल का? माहीत नाही. पण तसा तो आलाच. रवांडापासून लांब असलेल्या वीरुंगाच्या सुप्तज्वालामुखीच्या डोंगरातील तिच्या तंबूत अत्यंत क्रूरपणे तिची हत्या झाली. तिला शत्रू अनेक होते. दुखावलेल्या तस्करांनी तिची हत्या केली असावी असा तर्क केला जातो. यातील सत्य एकच ‘गोरिलांची कैवारी हरपली.’

– उष:प्रभा पागे

ushaprabhapage@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:26 am

Web Title: american researcher dian fossey friendship with nature
Next Stories
1 वन्यजीवांची कैवारी
2 हिरवाई इथे जन्मली
3 चिरंतनाकडे नेणारी निसर्ग मैत्री
Just Now!
X