उष:प्रभा पागे

गर्भश्रीमंत कुटुंबातील अमला रुईया यांनी ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून बिहारच्या ‘रामरेखा’ नदीवर बंधारा घातला. इथे ८० टक्के लोक शेतीवर व त्यासाठी पावसावर अवलंबून होते. पावसाळी एकच भाताचे पीक निघायचे, बंधाऱ्यामुळे बारमाही पाणी मिळू लागले. भाताचे उत्पन्न दुप्पट झाले आणि शिवाय गव्हासारखी रब्बी पिकेही निघू लागली. ६ हजार कुटुंबांचे जीवनमान आता उंचावले आहे. अमला यांच्या या कामगिरीची पावती म्हणून ‘स्टार ऑफ आशिया’, ‘आशिया पॅसिफिक गोल्ड स्टार’, ‘नारीरत्न’,‘जलमाता’ आणि ‘रामगढरत्न’ असे सन्मान त्यांना मिळाले आहेत.

बिहारमधील गया हा सीमावर्ती इलाखा, म्हणजे जंगलाचा डोंगराळ भाग. नक्षलवादी चळवळीच्या प्रभावाखालचा भाग. या भागासाठी १९८० मध्ये दोन मोठय़ा कालव्यांची योजना जाहीर झाली होती. तिच्यावर लाखो रुपये खर्च झाले, पण योजना कागदावरच राहिली. १९५२ पासून प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी बंधाऱ्याचे आश्वासन देत होते. झाले काहीच नाही. दुष्काळाचा मार झेलत, कालव्याच्या आशेवर एक पिढी म्हातारी होऊन मेली, दुसरी पिढीही म्हातारी झाली, मुले पोटासाठी कामाच्या शोधात गाव सोडून शहरात पांगली, किंवा नक्षली चळवळीत सामील होऊन बंदूक खांद्यावर घेऊन जंगलात गेली.

गावच्या काही शहाण्या लोकांनी ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’च्या अमला रुईयांशी संपर्क केला. या ट्रस्टने राजस्थानात अनेक ठिकाणी बंधारे घालून पाणी अडविले होते आणि त्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठीही कायमस्वरूपी पाणी उपलब्ध झाले होते. बिहारमध्ये नक्षलग्रस्त भागात काम करायचा निर्णय सोपा नव्हता. परंतु समाजाप्रति समर्पित वृत्तीच्या असल्याने ‘अमलाजी’ यांनी बिहारमधील बुढा-बुढी गावालगत ‘रामरेखा’ नदीवर बंधारा घालायचा निर्णय घेतला आणि तो तडीला नेला. इथे यापूर्वी फक्त पावसाच्या पाण्यावर शेती होत होती, गावातील ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पावसाळी एकच भाताचे पीक निघायचे, बंधारा घातल्यामुळे आता बारमाही पाणी मिळू लागले. भाताचे उत्पन्न दुप्पट झाले आणि शिवाय गव्हासारखी रब्बी पिकेही निघू लागली. उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळायचे नाही. आता १२ महिने पाणी मिळू लागले आहे. ६ हजार कुटुंबांचे जीवनमान आता उंचावले आहे. शेतीतील उत्पन्न, चाऱ्याचे उत्पादन यामुळे लोकांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली. दूध, दही, तूप, खवा याचेही उत्पन्न लोकांना मिळू लागले आहे. गावात मोटरसायकली आल्या.

४-५ ट्रॅक्टर आले. एकेकाळी इथे सरकारी सव्‍‌र्हे होऊन जो बंधारा बनणार होता त्याचा खर्च साडे आठ कोटी रुपये दाखवला होता. ‘आकार ट्रस्ट’ने हा बंधारा केवळ ५० लाख रुपयांत पूर्ण केला. याच पैशांत २ कि.मी. लांब, १५ फूट रुंद, २३ फूट खोल कालवाही खोदला आहे. ‘आकार ट्रस्ट’ने स्थानिक लोकांच्या सहभागातूनच हे काम तडीला नेले आणि २० हजार लोकांच्या जीवनात आनंद फुलविला.

चेकडॅम म्हणजे बंधारा घालून पावसाचे पाणी, ओढे, नदीचे वाहते पाणी अडवायचे, तलावात साठवायचे. ते जमिनीत मुरवायचे, हे पाणी परिसरातील जलसाठय़ाचे पुनर्भरण करते. विंधण विहिरी, विहिरी, हातपंप याला पाणी पुरविते. बंधाऱ्याच्या खाली असलेल्या जलसाठय़ातही यामुळे वाढ होते. डोंगराळ भागात असे बांध घातल्याचे फायदे जास्त असतात. हे बांध दगड आणि मातीचे असतात. दगडी बांध घालून पाया पक्का करून मग त्यावर मातीचा भराव घालून मातीची भिंत बांधायची. बांधाची ही पद्धत पारंपरिक आहे. मोठय़ा धरणांचे कोणतेच तोटे यात नाहीत, खर्चही जास्त येत नाही. पर्यावरणाची हानी यात कमी होते. बांध योग्य जागी बांधला गेला तर सारा भवताल पाणलोट क्षेत्र बनतो. नदी-ओढे तुडुंब भरतात आणि बांधावरून पाणी वाहायला लागते. मागच्या तलावात साठते. आकार ट्रस्ट, देणगी देणारे आणि बांधासाठी आर्थिक मदत घेणाऱ्या गावामध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात, मुख्य म्हणजे चेकडॅम बांधायचे महत्त्वाचे काम करतात. ज्या गावकऱ्यांना गावाच्या प्रगतीची तळमळ आहे, ज्यांची आपल्या कामासाठी स्वत: राबायची तयारी आहे त्यांना ‘आकार ट्रस्ट’चे लोक मदत करतात. राजस्थानच्या खूपशा भागातील भू-चित्र पाण्याअभावी भकास दिसते. वाळलेली पिके, निराश माणसे, वृद्ध आणि अपंग, स्त्रिया आणि मुले सोडून देऊन, कर्ती माणसे कामाच्या शोधात शहरात गेलेली, बेभरवशाची पावसावरची शेती, कोरडय़ा विहिरी, हातपंप, बायकांची पाण्यासाठी वणवण असे पर्यावरणाचे उद्ध्वस्त चित्र होते. पण ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’चे लक्ष या प्रश्नाकडे गेले आणि जिथे जिथे म्हणून त्यांनी नदीवर बंधारे घातले तिथले, तिथले जीवनच बदलून गेले.

राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र आणि ओरिसा या राज्यातून ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’ने २७० बंधारे घातले आणि त्या त्या परिसरातील १९३ खेडय़ांचे जीवनमान बदलून गेले. त्या ठिकाणी समृद्धी अवतरली. त्याची सुरुवात झाली ती १९९८मध्ये राजस्थानात पडलेल्या दुष्काळापासून. शेतकरी, गरीब खेडूत यांना जगणे अशक्य झाले होते. राजस्थानमधील मूळ रामगढच्या असलेल्या अमला रुईया या दुष्काळाने अस्वस्थ झाल्या. या प्रश्नावर कायमस्वरूपी उत्तर शोधणे त्यांना अगत्याचे वाटले. चांगले जीवन जगायला मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे, त्यासाठी प्राथमिक गरज आहे ती पाण्याची. म्हणून त्यांनी २००१ मध्ये ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’ची सुरुवात केली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या योजनेतून त्यांनी निधी, डोनेशन जमा करून त्यातून सामाजिक कामाला सुरुवात केली. त्या पैशांचा विनियोग गरज असेल तिथे बंधारे बांधायचे काम ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’ करतो आहे. जिथे बंधारे बांधायचे त्या जागी ट्रस्टचे लोक जाऊन पूर्वपाहणी करतात, गावकऱ्यांना भेटतात, पाणी साठवायचे प्रयोजन सांगतात. ते त्यांची सुख-दु:खे समजून घेतात, त्यांच्या बरोबरीने कामे करतात. बांध कोठे बांधायचा यासाठी गावातल्या अनुभवी व्यक्तीचे मत विचारात घेतले जाते. खर्चामध्ये ३० ते ४० टक्के खर्च प्रत्येक गावकरी वर्गणी काढून जमा करतात. बांधकामासाठी सगळे गावकरी मिळून दगड, माती वाळू जमा करून ठेवतात. सगळ्या गावाची बैठक होऊन बंधारा बांधायचे नक्की होते. तत्पूर्वी गावकऱ्यांवर काही गोष्टी बंधनकारक आहेत. बालविवाह करायचे नाहीत, हुंडा कोणी घ्यायचा नाही, कुप्रथा टाळायच्या, दारू आणि तंबाकू वर्ज्य करायचे. लोकांनी हे मान्य केले की सर्वस्वी लोकांच्या सहभागातूनच त्यांच्या श्रमदानातून बंधारा उभा राहतो. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात हे आपल्या मालकीचे, आपले आहे हे जपायला हवे ही भावना निर्माण होते. नावे ठेवणारे लोकही असतात. सर्वाना बरोबर घेऊन काम करायचे हे ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’चे वेगळेपण. मोठय़ा बांधासाठी ७ ते ८ लाख रुपये खर्च येतो. त्यातले अडीच ते तीन लाख रुपये गावाचे असतात. शिवाय गाववाले बांध बांधण्यात श्रमदानही करतात. २००३ पासून गेल्या १७ वर्षांत ‘आकार’ने २८० बंधारे बांधले. राजस्थानात बंधाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’मुळे राजस्थानातील १०० गावांचा चेहरा बदलला. त्यांच्या जीवनात आनंद फुलला.

बांधामुळे ७, ८ गावांना फायदा होणार असेल तर मोठा बांध बांधावा लागतो आणि त्याचा खर्च २५ लाख रुपयांपर्यंत येतो. बांधकामाचे सारे काम गावकऱ्यांची समिती आणि ‘आकार ट्रस्ट’चे कार्यकर्ते मिळून करतात. कामात, खर्चात एवढी पारदर्शकता असते की बांधकामाचा जमाखर्च दगडावर कोरून तो दगड बांधाच्या भिंतीत बसविला जातो.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे अधिक जमीन लागवडीखाली आणता येते, हिवाळी पिके घेणेही त्यामुळे शक्य होते आहे. तिसरे पीक म्हणजे भाजीपालाही आता शेतकरी घेऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे स्त्रियांचा, मुलींचा लांबून पाणी आणण्यात वेळ जायचा, श्रम पडायचे ते वाचले. त्यामुळे मुली आता शाळेत जाऊ लागल्या आहेत. गावकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे गुरेपालनात वाढ अशी समृद्धीची वाटचाल राजस्थानातील शेतकऱ्यांची सुरू आहे. एकूणच जिथे जिथे ‘आकार ट्रस्ट’ने बंधारे बांधले त्या त्या गावाचे परिसराचे जीवन संपन्न झाले आहे. ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’ने अनेक उद्योजक जोडून घेतले आहेत. अनिवासी भारतीय, दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून निधी गोळा करून ‘आकार ट्रस्ट’ जल संवर्धनाचा वसा सांभाळत आहे. त्यांच्या प्रयत्नाने गावोगावी ‘जीवन’ फुलते आहे. गरनौ गावचे लोक म्हणतात, ‘आमच्याकडे पाण्यामुळे नंदनवन अवतरले आहे.’ बनसूर या ठिकाणी कुंडाचा बांध आहे. तेथील गावकऱ्यांची ‘आकार ट्रस्ट’च्या अमला रुईया यांच्याविषयीची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आणि प्रातिनिधिक आहे. – ‘‘पाणी आमच्यासाठी देव आहे. ते पाणी देणाऱ्या अमलाजी आमच्यासाठी ‘देवीस्वरूप’ आहेत.’’

अमलाजी अत्यंत संपन्न, गर्भश्रीमंत कुटुंबातील आहेत. पण त्यांचे सामाजिक भान आदर्श वाटावे असे आहे. त्यांना अनेक सन्मान त्यांच्या या जलदान कार्यामुळे मिळाले आहेत. ‘स्टार ऑफ आशिया’, ‘आशिया पॅसिफिक गोल्ड स्टार’, ‘नारीरत्न’,‘जलमाता’ आणि रामगढरत्न असे सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यांचे काम वाढत जाणारे आहे आणि त्यासाठी ‘आकार चॅरिटेबल ट्रस्ट’ पूर्णपणे कार्यमग्न आहे हे चित्र दिलासा देणारे आहे.

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com