उष:प्रभा पागे

टणटणी ही आकर्षक पण विषारी वनस्पती, दुसऱ्या वनस्पतींचा नाश करणारी. म्हणून ‘वनस्पतीचे परिसरविज्ञान’चा अभ्यास करणाऱ्या गीता रामास्वामी यांनी त्यावर संशोधन केले. वनस्पतिशास्त्रात बी.एस्सी. आणि पर्यावरणीय जीवशास्त्रात एम.एस्सी. केलेल्या रामस्वामी ‘सीझन वॉच’ हा ‘पॅन इंडिया सायन्स प्रोग्राम फॉर सिटिझन्स’च्या प्रकल्प व्यवस्थापक असून त्यांना २०१४ मध्ये ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलोजीची यंग सायंटिस्ट’ शिष्यवृत्तीही मिळाली होती.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

टणटणी- आपल्या परिचयाची, रोज कुठे न कुठे दिसणारी, केसाळ काटेरी पाने आणि फांद्या असलेली, उग्र वासाची, आकर्षक गुलाबी, पिवळ्या, लाल फुलांची, गोड रसाळ फळांची, बुलबुलसारख्या पक्ष्यांनी सतत गजबजलेली आणि सर्वत्र संचार असलेली ही वनस्पती. पण अत्यंत उपद्रवी, विषारी!

१८व्या शतकापासून साम्राज्यवादी देश जगभर हिंडून नवनव्या वनस्पती, प्राणी-पक्षी, आपल्या साम्राज्यात नेऊ लागले होते, काही वनस्पती मात्र मूळ झाडांना त्यांच्या जागेतून त्यांनाच नामशेष करून विस्तारल्या.

गाजर गवत, रानमारी, जलपर्णी, सु(!)बाभूळ आणि टणटणी या विदेशी वनस्पती उपद्रवी वनस्पतींच्या यादीतल्या. १९व्या शतकात शोभेचे झाड म्हणून भारतात आलेली टणटणीकानामागून आली आणि तिखटच नाही तर विषारी ठरली.

गीता रामास्वामी यांचे याच विषयावर संशोधन आहे. ‘वनस्पतीचे परिसरविज्ञान’ हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यातही उपद्रवी झुडपांचा त्यांनी विशेष अभ्यास केला. दिल्लीला वनस्पतिशास्त्रात बी.एस्सी. आणि पर्यावरणीय जीवशास्त्रात एम.एस्सी. करून बंगळूरुच्या आयआयएस्सीमधून उपद्रवी वनस्पती लँटाना (Lantana) म्हणजे टणटणीवर २००६ ते २०१२ या काळात त्यांनी कर्नाटकातील मुडूमलाई, उत्तरेकडील राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली या ठिकाणी विशेष संशोधन केले.

टणटणीचे झुडूप विविध प्रकारच्या वातावरणात आणि कुठल्याही जागी रुजते, वाढते, आढळते. म्हणजे शेतजमीन, जंगलाकडेने, मोकळ्या जागी, नदी ओढे यांचे काठ, गवताळ राने, कुरणे, समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने अगदी कुठेही. या उपद्रवी वनस्पती दूरच्या देशातून येतात आणि परक्या मातीत आपली मुले घट्ट रुजवतात. मुळच्या वनस्पतीवर आक्रमण करतात, त्यांची मुळे सर्वदूर पसरतात. त्यांची संख्या वाढते आणि त्या भागातील मूळच्या वनस्पतींची वाढ खुंटते. त्या परिसरातील निसर्ग प्रणालीवर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण बदलते.

आगी लागण्याचे प्रमाण वाढते, मूळच्या प्रजातींची विविधता कमी करून स्थानिक पाण्याची नैसर्गिक व्यवस्थाही बिघडते. परागीकरण करणाऱ्या कीटक तसेच पक्ष्यांना आपल्याकडे आकर्षून घ्यायच्या युक्त्या ती वापरतात आणि आपल्यातील विषारी द्रव्य मातीत सोडतात मातीचीही हानी होते आणि इतर झुडपांचीपण. यांची फुले, फळे आकर्षक रंगाची मधुर रसाची असल्यामुळे पक्षी, प्राणी फळे खातात. ती दूर दूर जातात. त्या ठिकाणी त्यांची विष्ठा पडते आणि त्यातून दूर दूरच्या ठिकाणी नवी वाढ जोमाने सुरू होते. त्यांची पुनरुत्पादनाची साखळी निर्माण होते तर मूळच्या वनस्पतींची उत्पादन साखळी खंडित होते. टणटणीची झुडपे गर्दी करून एकत्र वाढतात. फळेही (बेरी) खूप निर्माण करतात. त्यामुळे एकाच जागी अनेक पक्ष्यांना स्वादिष्ट खाद्य मिळते. स्वाभाविकच त्यांचेच परागवहन जास्त होते.

हा जो परिणाम स्थानिक वनस्पतींवर होतो त्याचे संशोधन गीता यांनी केले. पक्ष्यांद्वारे बीजप्रसाराचे परिणाम आणि टणटणीचे व्यवस्थापन याचा अभ्यास राजाजी उद्यानात केला. तर टणटणी आणि स्थानिक झाडांचा बीजप्रसार यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास ऋषी व्हॅलीमध्ये केला. टणटणीचे दुष्परिणाम लक्षात आले असूनही इतक्या वर्षांमध्ये कुणालाही तिला आळा घालायला जमलेले नाही. अनेक शास्त्रज्ञ, वन व्यवस्थापक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करूनही रामबाण उपाय मिळालेला नाही.

या वनस्पतीजवळ अशा काही खुब्या आहेत की याचा प्रसार कुणी थांबवू शकत नाही. त्याचा शेंडा कापला की त्याची वाढ खुंटत नाही उलट त्याला अनेक फांद्या फुटतात. जमिनीखाली त्याला ‘मेरीस्टेम’ असते. जमिनीवरील झाडाचा भाग आपण छाटला की जमिनीखालील ‘मेरीस्टेम’ नवीन अंकुरातून अनेक खोडे, पर्यायाने अनेक रोपे निर्माण करते.

त्यामुळे नवीन देठ आणि मुळे फुटतात. झाडाचा बहू शाखा विस्तार होत राहतो. झाड मुळापासून उपटून काढणे एवढे आपण करू शकतो, पण तेवढय़ाने भागत नाही. या झाडांनी फळात हजारो बीजे निर्माण केलेली असतात. पक्ष्यांच्या विष्ठेतून दूर दूरच्या भागात याच्या बिया साठून राहिलेल्या असतात. टणटणी परदेशातून आणल्यामुळे इथे तिला नैसर्गिक शत्रू नाही. त्यामुळे या झाडांना, बियांना धोका काहीच नाही. बियांची रोपे विनासायास उगवतात. त्यांना अंकुरण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. आपण याचे एक झाड उपटले की माती वरखाली होते मातीतल्या बियांना सूर्य प्रकाश मिळतो आणि तोडलेल्या एका झुडपाजागी शेकडो झाडे उगवतात. वर्षभरात वाढतात. फुलतात, फळतात पक्ष्यांच्या पोटात फळे जातात, त्यांच्या विष्ठेतून बिया पडून पुन्हा नव्या रोपांची वाढ असे चक्र सुरू राहते.

काही शास्त्रज्ञांच्या मते टणटणी विषारी रसायने निर्माण करते आणि इतर झुडपांना वाढू देत नाही. ती जी जैविक संयुगे निर्माण करते त्यांची इतर झुडपांना सवय नसते. त्यांचा इतर झाडांवर विपरीत परिणाम होतो. त्यांची वाढ होत नाही आणि ती मरतात. त्यामुळे याची रोपे सतत उपटत राहणे याशिवाय गत्यंतर नाही.

गीता यांच्या या सर्व संशोधनात स्थानिक मदतनीसांची खूप मदत झाल्याचे त्या सांगतात. स्थानिक लोकांना निसर्ग, निसर्गातील दैनंदिन घडामोडी, निसर्गातील व्यवस्था यांचे परंपरागत आणि अनुभवातून आलेले ज्ञान तळहातावरच्या रेषांसारखे पक्के असते. संशोधनादरम्यान स्थानिक लोक गीता यांना अनुभव सांगायचे, हकिगती, गोष्टी सांगायचे. यामुळे त्यांचे संशोधन मनोरंजक झाले. वनस्पती पाहून मदतनीस स्थानिक नाव सांगायचे आणि या शास्त्रीय नाव सांगायच्या. त्यांचे मदतनीस त्यांना म्हणायचे आम्हाला तुमची नावे म्हणता येत नाहीत, लक्ष्यातही राहत नाहीत. तर तुम्ही स्थानिक नावे वापराना.

गीता म्हणतात की, ‘‘एका प्रकारे खरंच होते की ते शास्त्रीय नाव कदाचित आज उद्या बदलेल पण स्थानिक नावाच्या सांस्कृतिक मूल्यांची सांगड ही त्या नावाशी असते आणि त्या स्थानिक लोकांशीही आणि मूल्य बदलत नाहीत.’’

‘सीझन वॉच’ हा ‘पॅन इंडिया सायन्स प्रोग्राम फॉर सिटिझन्स’ आहे त्यासाठी त्या प्रकल्प व्यवस्थापक आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गीता ‘प्लॅन्ट फायनोलॉजी’ म्हणजे हवामान आणि ऋतूनुसार वनस्पतीत होणाऱ्या बदलांचाही अभ्यास करत आहेत. यापूर्वी ‘नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन’मध्ये त्या संशोधक सहकारी होत्या. डीएसटी- ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची यंग सायंटिस्ट’ शिष्यवृत्ती त्यांना २०१४ मध्ये मिळाली होती. त्यातून होनोलुलू-हवाई इथे झालेल्या ‘ट्रॉपिकल बायोलॉजी अ‍ॅण्ड कन्झर्वेशन’च्या वार्षिक अधिवेशनात त्यांना सहभागी होता आले. विज्ञान संशोधन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले पाहिजे असे त्यांना वाटते, म्हणून त्या वैज्ञानिक विषय साध्या भाषेत लिहितात. ‘हिंदू इन स्कूल’ या उपक्रमात त्या सहभागी आहेत.

टणटणी तोडून तिच्या लाकडापासून फर्निचर, खेळणी बनवण्याचा एक चांगला पर्याय आहे. त्यातून स्थानिक लोकांना रोजगार ही मिळतो. कर्नाटकात हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला. पण मागणीनुसार पुरवठा होत राहणे महत्त्वाचे. तसे अजून होत नाही.

एटीआरआयआय – अत्री या बंगळूरु संस्थेने मल्ले महादेव हिल या ठिकाणी लँटाना क्राफ्ट सेंटर सुरू केले आहे. टणटणी गाजर गवत, रानमारी अशी तणे, सुबाभूळ, जलपर्णी, ग्लिरिसिडियासारख्या आकर्षक दिसणाऱ्या वनस्पती बाहेरून आल्या, आक्रमक झाल्या, उपद्रवी ठरल्या. यापासून आपण बोध घेतला पाहिजे की यांना उत्तेजन देता कामा नये.

पुण्यासारख्या ठिकाणी दर वर्षी मुठा-मुळा, इंद्रायणी यांच्या पात्रात जलपर्णी इतकी फोफावते की पाण्याचा प्राण(वायू) गुदमरतो. सुबाभूळ गुरांना चारा, जळण म्हणून उपयोगी आहे, पण त्यापासून नुकसानही होते. ग्लिरिसिडिया हिरवे खत म्हणून वापरता येतो पण पुन्हा याचे तोटेही आहेतच.

म्हणूनच नवी वाणे, वनस्पती नव्याने आणताना त्यांच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास अपरिहार्य आहे हे खरे.

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com