22 January 2021

News Flash

खडकाळ पठारे – जैव भांडारे

पश्चिम घाटातील किंवा सह्य़ाद्रीमधील खडकाळ पठारी भागाला सडा म्हणतात.

डॉ. अपर्णा वाटवे

डॉ. अपर्णा वाटवे यांनी २००२ पासून १० वर्षे उत्तर-पश्चिम घाटातील १९ खडकाळ पठारांचा आणि कोकणातील १९ सडय़ांचा अभ्यास केला. या सडय़ांना वाचविणे अगत्याचे आहे हे त्यांना तीव्रतेने जाणवले. पाचगणीच्या टेबललँडवर पावसाळ्यात फुलांचा उत्सव साजरा होतो. तिथे पर्यटकांसाठी घोडागाडय़ा फिरायच्या. दुर्मीळ वनस्पतींना हे घातक होते. यासाठी अपर्णा यांना न्यायालयात साक्ष द्यायला लागली होती. मात्र  पाचगणीचे पठार वाचवण्यात अपर्णा आणि सहकाऱ्यांना यश आले.

मे १२, २००४, दुपारी १.३०. तापमान ४४ अंश सेल्सिअस. खडकाचे तापमान ६० अंश सेल्सिअस. ‘‘उन्हात हेलपाटत मी अंजनीच्या झाडाच्या अल्पशा सावलीखाली येते. सावलीत किती गार वाटले, वाऱ्याच्या झुळकीने आमचे डोळे जडावले, काही काळ आम्ही सुस्तावलो. याच जागी आम्ही कालची रात्र थंडीने कुडकुडत जागून काढली होती, पहाटे ढग खाली आमच्यावर उतरले होते, आमचे अंथरूण-पांघरूण पार ओले झाले होते. या २४ तासांच्या निरीक्षणात गॉगल, स्वेटर, रेनकोट आणि छत्री हे सगळे एकाच ठिकाणी वापरायची वेळ आमच्यावर आली होती. आम्ही कासच्या जांभा दगडांच्या पठारावर होतो. टोकाचे तापमान म्हणजे रात्री कमालीचा गारठा, दिवसा खूप उष्मा, मातीची आद्र्रता हेच घटक इथल्या जीवसृष्टीला कारण ठरले होते, पोषक होते आणि त्यांचा अभ्यास करायचा असल्याने हा अनुभव मी घेत होते.’’ – डॉ. अपर्णा वाटवे यांच्या डायरीतील हा उल्लेख कास आणि तत्सम खडकाळ पठारे, सडे याविषयी उत्सुकता जागी करून गेला. आणखी काही माहितीचा धागा मी पकडला.

समुद्र, नदी, पर्वत, जंगल, जलयुक्त भूमी – (wet lands), वाळवंटी प्रदेश यांच्याप्रमाणे ‘खडकाळ पठारे आणि सडे’ ही स्वतंत्र स्वायत्त अशी निसर्गप्रणाली आहे आणि जैवविविधतेमध्ये अन्य प्रणालीचे जसे महत्त्व आहे तितकेच याही प्रणालीचे महत्त्व आहे हे काही अभ्यासकांना माहीत होते; पण या प्रणालीच्या संवर्धनासाठी काहीच होत नव्हते, किंबहुना या प्रणालीची सरकार दफ्तरी तशी नोंदही नव्हती. निरुपयोगी, वाया गेलेला भूभाग अशी त्याची संभावना होत होती. ‘रीमोट सेन्सिंग’ या तंत्रज्ञानाच्या मर्यादा अशा की, या तंत्राने केलेल्या चित्रणात तिथल्या अल्पजीवी, भक्कम खोड नसलेल्या वनस्पतींची नोंदच होत नाही. शिवाय खडकांच्या भेगेत, फटीत, जमिनीखालच्या खोलगटीत दडलेल्या साप, बेडूक, सरडे, कीटक, वटवाघुळे यांची नोंद होत नाही. त्यामुळे हा भाग निर्जीव वाटतो, उजाड वैराण वाटतो. त्यामुळे विकासाच्या (तथाकथित) योजनांसाठी या विशिष्ट पठारी भागाचा वापर होऊ लागला होता. उदाहरणार्थ जैतापूरच्या पठारावरील नियोजित अणुऊर्जा प्रकल्प. महाराष्ट्रात अशी पठारे पुणे, नाशिक, गोवा, कोल्हापूर, सांगली; कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग; कर्नाटक आणि केरळ राज्यात आणि समुद्रकाठी असा खडकाळ भूभाग आहे. पश्चिम घाटातील किंवा सह्य़ाद्रीमधील खडकाळ पठारी भागाला सडा म्हणतात. पाचगणीचे सडे म्हणजे तिथले टेबललँड. गोव्याच्या रस्त्यावर कॅस्टलरॉक, अनमोडचा घाट, तिलारी घाट, कोल्हापूरजवळ मसाई पठार, आंबाघाट, बरकीचे पठार, पुरंदरचे पठार, जुन्नर भागातील किल्ल्यांचा परिसर, कराडजवळील वाल्मीकीचे पठार या सर्व ठिकाणी पावसाळा सोडून अन्य वेळी तिथले तपकिरी शुष्क कोरडे खडक आणि सडे आपण पाहिलेले असतात. खडकाळ दगडांचा हा पसारा उघडा असतो. यावर मातीचा थर अल्प म्हणजे काही मिलिमीटर ते ३० सेंमी इतकाच असतो. कायमस्वरूपी झाडी यावर तगून राहत नाही. फटीमधून एखादे चिवट झुडूप जगतंही, पण फार तर मीटरभर वाढतं. काही वेळा खडकांच्या फटीतून, घळीतून, खड्डय़ातून माती साठते. ही माती बारीक वाळूसारखी असते, अ‍ॅसिडिक असते. उन्हाळ्यात तापमान जास्त, आद्र्रता कमी, तर पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर भरपूर पाऊस असतो. त्या काळात तिथे पाण्याची डबकी, तळी साठतात. जलमय भूमी निर्माण होते. मग जादूगाराच्या पोतडीतून बाहेर पडाव्या तशा पावसाळ्यापुरते मर्यादित आयुष्य असलेल्या विविध वनस्पती इथे फुलतात, बहरतात. फटीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातही वनस्पती फुलतात. शुष्क, तपकिरी, निर्जीव वाटणारे हे सडे किंवा खडकाळ भूमी विविध आकार, प्रकार, रंग, रूप, रस, गंध असलेल्या फुलांनी, यक्षपुष्पांनी ओसंडून जातात, भरभरून फुलतात. ठरावीक कालक्रमाने वेगवेगळ्या वनस्पतींचे प्रकार एकापाठोपाठ एक फुलतात. कीटक, भुंगे, मधमाशा, पक्षी यांची लगबग सडय़ांवर सुरू होते, निसर्गप्रेमी, पर्यटक यांची गर्दी होते. उन्हाळ्यातील तप्त, शुष्क सडय़ाचे रूपांतर पावसाळ्यात रंगीबेरंगी वनस्पतींच्या यक्षभूमीत होते.

अपर्णा यांनी वनस्पतिशास्त्र विषयात ‘एमएस्सी’ आणि नंतर ‘पीएच.डी.’ केल्यानंतर दुर्लक्षित अशा विषयाचा- महाराष्ट्रातील ‘खडकाळ पठारे आणि सडे’ यांचा अभ्यास केला. त्यांना २००३ मध्ये ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ची ‘यंग सायंटिस्ट’साठी असलेली विशेष शिष्यवृत्ती मिळाली. महाराष्ट्रातील अशा १२ भूभागांचा- खडकाळ पठारे व सडे यांच्या सजीव सृष्टीचा, अपर्णानी सामर्थ्यांने- शास्त्रीय, सामाजिक, सांस्कृतिक- अभ्यास केला, त्यातील काहींचा तर दिवसाच्या सर्व प्रहरी आणि वर्षांच्या सर्व ऋतुचक्रामध्ये. या प्रणालीचे संरक्षण आणि संवर्धन होण्याची गरज आणि निकड संशोधनातून त्यांच्या लक्षात आली. अशा प्रकारची ही जगातील एकमेव प्रणाली असल्याने ती वाचणे, तिचे अधिवास वाचणे जागतिक दृष्टीनेही महत्त्वाचे होते. या सडय़ांवर स्थळविशिष्ट वनस्पतींची संख्या खूप जास्त आहे. वनस्पती वैविध्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्या एकदा का नामशेष झाल्या की कायमच्या. या सडय़ांवर वनस्पतींची विविधता आहे तशी इतर कीटक, प्राणी यांचीही आहे. पाणी अल्पकाळ असले तरी त्यात मासे असतात, सरिसृप, वटवाघुळे आणि पक्षी यांचीही विविधता असते. गौ रेडे आणि बिबटे यांचाही इथे वावर असतो.

स्थानिक लोकांची गुरेढोरे इथे चरतात. धनगरांचे देव, मंदिरे या पठारावर असतात. त्यांचे सण या पठारावर साजरे होतात. अपर्णा यांनी २००२ पासून १० वर्षे उत्तर-पश्चिम घाटातील १९ खडकाळ पठारांचा आणि कोकणातील १९ सडय़ांचा असा अभ्यास केला. या सडय़ांना वाचविणे अगत्याचे आहे हे त्यांना तीव्रतेने जाणवले. त्यांनी याबद्दल शोधनिबंध लिहून पर्यावरणवाद्यांचे लक्ष याकडे वळवले. परिषदांमधून हा विषय उपस्थित केला. याचे संवर्धन परिणामकारकरीत्या व्हायला हवे, हे ओळखून संशोधकाच्या भूमिकेतून त्या संवर्धकाच्या भूमिकेत गेल्या. यासाठी सक्रिय झाल्या. हे सडे, खडकाळ पठारे म्हणजे निरुपयोगी जागा समजून इथे खाणकामाला परवानगी दिली जाते. त्या वेळी याचा निसर्गप्रणालीवर होणारा विपरीत परिणाम याचा विचारच होत नाही. या पठारांवर बाहेरून माती टाकून आंब्याची झाडे लावली जाऊ लागली, साताऱ्याच्या चाळकेवाडीला पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. यामुळे या अधिवासांना अपाय संभवतो हे कोणी लक्षात घेत नाही. महाबळेश्वर आणि पाचगणीच्या संवेदनशील निसर्गाच्या संवर्धनासाठी पर्यावरण आणि वन खात्याच्या उच्चस्तरीय अभ्यास समितीच्या त्या सदस्य आहेत. पाचगणीच्या टेबललँडवरही पावसाळ्यात फुलांचा उत्सव साजरा होतो. तिथे पर्यटकांसाठी घोडागाडय़ा फिरायच्या. दुर्मीळ वनस्पतींना हे घातक होते. यासाठी अपर्णाना न्यायालयात साक्ष द्यायला लागली होती; पण पाचगणीचे पठार वाचवण्यात अपर्णा आणि इतरांना यश आले. अंजनेरीचे परिसर पठार आणि माथा यांच्या संवर्धन कामातही यांच्या प्रयत्नांना यश आले. शास्त्रज्ञ आणि व्यवस्थापनात असणाऱ्यांचा एकमेळ झाला तर सडय़ासारखे संवेदनशील भाग राखीव संवर्धनाखाली सुरक्षित करता येतील असे त्यांना वाटते. कासला जागतिक निसर्ग वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे आता कासच्या बाबतीत लोकांमध्ये पुष्कळ जागरूकता आली आहे आणि आता हा भाग राखीव म्हणूनही जाहीर झाल्यामुळे संवर्धनासाठी उपाय योजले जाऊ  लागले आहेत. बऱ्याच स्वयंसेवी संस्था आता नैसर्गिक प्रणालीच्या संवर्धनाच्या कामात आपणहून पुढाकार घेत आहेत. आंबोलीजवळ चौकुलच्या सडय़ांचे संवर्धन स्थानिक तरुण एकत्र येऊन करीत आहेत. अपर्णा यांच्या दृष्टीने ही गोष्ट स्वागतार्ह आहे. लोकसहभागाशिवाय संवर्धन अशक्य आहे. केवळ कायद्याने परिस्थितीमध्ये बदल होणार नाही. त्यासाठी लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे त्यांना वाटते.

२०१७ पासून महाराष्ट्र राज्याच्या जैवविविधता बोर्डाच्या वनस्पतितज्ज्ञ समितीच्या त्या सदस्य आहेत. पर्यावरणवाद्यांसाठी ही दिलासा देणारी गोष्ट आहे. अपर्णा तुळजापूर येथील ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये चार वर्षे सहायक प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संमेलनात त्यांचा सहभाग असतो. त्यानिमित्ताने त्यांचे अनेक देश फिरून झाले आहेत. त्यांचा पती संजय ठाकूर हेही निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पक्षी आणि प्राणी त्यांचा अभ्यासविषय आहे. सडे आणि खडकाळ पठारे यांच्या अभ्यासभ्रमंतीमध्ये त्यांची साथ आणि सोबत होती, त्यामुळे ते त्यांचे जीवन साथीदार बनले. त्या दोघांचे मिळून प्राणी जीवनावरील शोधनिबंध विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. मुलाच्या शिक्षणासाठी अपर्णा आता पुण्यात आपल्या मूळ ठिकाणी परतल्या आहेत. सध्या त्या ‘सेंटर फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज’बरोबर एका प्रोजेक्टवर काम करतात.  अल्प कालावधीत ज्ञानाचा मोठा पल्ला त्यांनी गाठला आहे आणि संशोधन क्षेत्रात आपली मुद्रा उमटवली आहे.

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 3:59 am

Web Title: article on aparna watve fight to save kaas pathar in panchgani
Next Stories
1 ‘मुठाई’ला संजीवनी
2 संवर्धनाची पहाट
3 पिवळी पाने, हिरवी मने
Just Now!
X