24 August 2019

News Flash

ओरांगुतानची पालक

बिरुतेचा जन्म १० मे १९४६ ला जर्मनीमध्ये झाला. आईवडील लिथुंनियाचे. ते कुटुंब कॅनडामध्ये आले.

बिरुते गलदीकस

आशिया खंडातील सर्वात मोठय़ा अशा बोर्निओ बेटावर असलेले विषुववृत्तीय पर्जन्यवृक्षाचे दाट सदाहरित जंगल म्हणजे ओरांगुतानचे अधिवास. बिरुतेने सलग ३० वर्षे बोर्निओला राहून त्यांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला. हे नंदनवन वाचविण्यासाठी निसर्गप्रेमी आणि संशोधक असलेली बिरुते गलदीकस प्रयत्नांची पराकाष्ठा करते आहे.  आता तिच्या प्रयत्नांना यश येते आहे, ही गोष्ट दिलासा देणारी आहे.

ओरांगुतान हा एप म्हणजे वानरकुलातील एक ताकदवान प्राणी, त्याच्या नावाचा अर्थ ‘पीपल ऑफ द फॉरेस्ट’ -जंगलातला माणूस. गार्डन ऑफ एडन म्हणजे नंदनवन. ओरांगुतानचे हे नंदनवन म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठय़ा अशा बोर्निओ बेटावर असलेले विषुववृत्तीय पर्जन्यवृक्षाचे दाट सदाहरित जंगल. पृथ्वीवरील अतिप्राचीन चिरंतन निसर्गठेवा. प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती यांच्या विविधतेचा खजिना. पण मानवाच्या स्वार्थी वृत्तीचे ग्रहण त्या निसर्गठेव्यालाही लागते आहे, त्यामुळे अस्वस्थ झालेली निसर्गप्रेमी आणि संशोधक असलेली बिरुते गलदीकस इथे आली, इथलीच झाली आणि ओरांगुतान आणि त्यांचा अधिवास असलेले हे नंदनवन वाचविण्यासाठी ती प्रयत्नांची पराकाष्ठा करते आहे. तिच्या प्रयत्नांना यश येते आहे ही गोष्ट दिलासा देणारी आहे.

बिरुतेचा जन्म १० मे १९४६ ला जर्मनीमध्ये झाला. आईवडील लिथुंनियाचे. ते कुटुंब कॅनडामध्ये आले. बिरुते टोरण्टो इथे शिकली. लहानपणीची तिची स्वप्ने जंगलांची, त्यातल्या प्राण्यांची अशीच होती. ‘क्युरिअर जॉर्ज’ या खोडकर माकडाची करामत सांगणारे पुस्तक तिने वाचले. आणि प्राण्यांच्या जगात काम करायचे तिने ठरवूनच टाकले. पुढे त्यांचे सगळे कुटुंब कॅलिफोर्नियाला आले. तिने तिथे मानसशास्त्र आणि प्राणिशास्त्रात एमएस्सी केले. मानवी वर्तन आणि मानववंश शास्त्रातही तिने एमए केले. त्याच वेळी थोर संशोधक डॉ. लिकी यांच्याशी तिची भेट झाली. ते त्या वेळी केनियात मानवी अश्मिभूत अवशेषांचा अभ्यास करत होते. मानव कसा उत्क्रांत झाला याचा शोध घेताना ते एपपर्यंत आले होते. त्यांच्या प्रेरणेने जेन गुडालने चिम्पांजीवर आणि डियानने गोरिलावर आफ्रिकेतील त्यांच्या अधिवासात राहून अभ्यास आणि संशोधन सुरू केले होते. त्याविषयी वाचून बिरुते झपाटून गेली. एप्सपैकी ओरांगुतानविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती आणि पिल्ले पाळण्यासाठी त्यांची तस्करी होत होती. बिरुतेने त्यांच्यावर काम करायचे ठरवले. त्यासाठी इंडोनेशियाच्या ताब्यात असलेल्या बोर्निया बेटावर राहायला लागणार होते. बिरुतेने डॉ. लिकी यांना बोर्निओ इथे अभ्यास केंद्र सुरू करण्याची  विनंती केली. नॅशनल जिओग्राफिक मॅगेझिन आणि डॉ. लिकी यांच्या साहाय्यामुळे ३ वर्षांनी निधी उपलब्ध झाला, मग बिरुते आपल्या नवऱ्यासह बोर्निओतील कालिंमंतन या ठिकाणी आली. तिने डॉ. लिकी यांच्या नावाने  संशोधन केंद्र सुरू केले ते वर्ष होते १९७१.

बोर्निओतील ‘कॅम्प लिकी’ जावा समुद्राच्या निकट होता. मानवी वस्ती नाही, दलदलीचा प्रदेश. सुरुवातीला या जोडीला खोडाच्या आधाराने उभारलेल्या छपराखाली मुक्काम ठोकावा लागला. जंगली प्राणी, विशेषत: ओरांगुतानची पिल्ले पळविणारे चोरटे, तस्कर, जळवा, रक्तपिपासू कीटक यांच्याशी त्यांना दोन हात करायला लागत होते. त्या काळी १९७१चा तो मागास भाग, टेलिफोन नाही, रस्ते नाहीत, वीज नाही, टपाल सेवा नाही, दलदलीचा, शिवाय दाट झाडींचा प्रदेश. तिच्या अमेरिकेतील प्रोफेसरने तिला संगितले होते की, तुम्हाला ओरांगुतानचा अभ्यास करताच येणार नाही, माणसाच्या वाऱ्यालादेखील उभे राहत नाहीत ते. पण बिरुतेने ते शक्य केले. परिश्रम आणि निश्चय या बळावर तिने आपले ध्येय साध्य केले. तिच्या अभ्यास, निरीक्षण, अनुभव या शिदोरीवर ‘नॅशनल जिओग्राफिक’ मॅगेझिनच्या दर्शनी मुखपृष्ठावर ओरांगुतानचे फोटो झळकले. त्यांचा दैनंदिन जीवनक्रम लोकांपुढे आला. त्यांच्या अस्तित्वाला असलेल्या धोक्यांची जाणीव झाली. तिने त्यांच्या अभ्यासाचा पाया तर घातला आणि त्यावर संवर्धनाची इमारतही उभी केली.

सुरुवातीला तिच्यापुढे ओरांगुतानचे जंगलात पुनर्वसन करायचे काम आले. ती वनाधिकाऱ्यांना या कामात मदत करत होती. तस्कर लोकांचा पैसे मिळवायचा हा एक व्यवसाय होता. जंगलात जाऊन लेकुरवाळ्या माद्या पकडायच्या, त्यांना मारायचे आणि पिल्ले विकायची. पाळीव प्राणी पाळण्याचा शौक असलेले लोक या प्राण्यांना लाडाने पाळत असत. ती मोठी होऊन नियंत्रणाबाहेर जायला लागली की त्यांना ती नकोशी होत. मग वन खाते त्यांना प्रशिक्षण देऊन पुन्हा जंगलात सोडायचे. बिरुते त्या कामात मदत करायची. तस्करांवर तर तिचा मोठा राग होता. कारण ते क्रूरपणे माद्यांची हत्या करून पिल्ले नेत. निसर्गप्रेमी असलेल्या बिरुतेपुढे आणखी एक आव्हान होते. पाम तेलाचे उत्पादन वाढविण्याचे धोरण देशाने आखले. त्यासाठी जंगले जाळून साफ करायची आणि पामची लागवड करायची असा उद्योग सुरू झाला. यात किती तरी जंगली प्राणी होरपळून मरून जात. ओरांगुतान यांचा अधिवास अगदी मर्यादित म्हणजे फक्त इंडोनेशिया आणि मलेशिया या दोन देशांतील विषुववृत्तीय पर्जन्य वनामध्येच आहे. नंदनवन असलेले त्यांचे अधिवास वाचले तर त्यांचे अस्तित्व राहणार. त्यांचा अधिवास वाचावा म्हणून तिला मोठी चळवळ उभी करायला लागली. त्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी म्हणून १९८६ मध्ये तिने लॉस एंजेलिस इथे संस्था स्थापन केली, ‘ओरांगुतान फाऊंडेशन इंटरनॅशनल’. स्थानिक लोकांना आपण परके वाटू नये म्हणून तिने इंडोनेशियाचे नागरिकत्व घेतले.

बिरुतेने सलग ३० वर्षे बोर्निओला राहून त्यांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला. ओरांगुतान हा एकांतप्रिय प्राणी आहे, ते एकेकटे राहतात. झाडांवरच त्यांचा वावर असतो. रोज रात्री ते झोपायची जागा बदलतात. स्वत:ची पर्णशय्या स्वत: तयार करतात. मुख्यत: रसाळ गराची ६०- ७० प्रकारची फळे, पाने, फुले, पर्णशाखा, कीटक, पक्ष्यांची अंडी, मध असे सर्व प्रकारचे खाद्य खातात. माती आणि खडक चाटून ते क्षार मिळवतात. बिरुतेने त्यांच्या आहारात ४०० प्रकारचे खाद्य असल्याची नोंद केली आहे. मीलनाच्या काळातच फक्त नर-मादी एकत्र येतात. पिल्ले ४ वर्षांपर्यंत आईच्या केसाळ अंगाला धरून असतात आणि ८ वर्षांची झाल्यावर आईवेगळी होतात. १५ व्या वर्षी मादी पिल्लाला जन्म द्यायला सक्षम होते. पहिल्या विणीनंतर ८ वर्षे ती गर्भ धारण करत नाही. नैसर्गिक अधिवासात ते ६५ ते ७० वर्षे जगतात. प्राणिसंग्रहालयात मात्र कमी वर्षे जगतात अशी अभ्यासपूर्ण निरीक्षणे तिने नोंदवली आणि ही वानरांची जात उत्क्रांत का झाली नाही याचाही तिने अभ्यास केला. तिचा निष्कर्ष असा की कदाचित त्यांचा अधिवास असलेली जंगले गेली कोटय़वधी वर्षे जशीच्या तशी टिकली त्यामुळे हे प्राणीही बदल न होता तसेच राहिले, उत्क्रांत झाले नाहीत. त्यांच्या वर्तनाचा आणि भवतालचा, लोकजीवनाचाही तिने मागोवा घेतला. ‘मी एकटा बरा, माझे जंगल बरे’ असा ओरांगुतान मस्तमौला जगतो. पण माणूस असा प्राणी आहे की तो इतरांना सुखाने जगू देत नाही. या पर्जन्य जंगलांचीही बेसुमार कत्तल होते आहे. ओरांगुतानना त्यांच्या नंदनवनात राहता यावे यासाठी ती सतत सरकारचा पाठपुरावा करते आहे. अधिवासाचा संकोच झाल्यामुळे त्यांची संख्या रोडावली आहे. येत्या काळात कदाचित ते फक्त प्राणिसंग्रहालयात शिल्लक राहतील अशी परिस्थिती आहे. आता ती तिथली नागरिक झाली आहे. सातत्याने ३० वर्षांहून अधिक काळ एकाच प्राण्याच्या संवर्धनात असे उदाहरण फारच दुर्मीळ आहे. तिच्या चळवळीमुळे बोर्निओला ओरांगुतानचे अभयारण्य १९८६ मध्ये स्थापन झाले आणि आता त्याचे रूपांतर राष्ट्रीय उद्यानात झाले आहे.

पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यावर तिने इंडोनेशियाच्या स्थानिक आदिवासी टोळीच्या शेतकरी प्रमुखाशी सोयरीक केली आहे. तो बिरुतेच्या कामात तिला सर्व मदत करतो. पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि नंतरच्या लग्नाची २ अशी तीन अपत्ये तिला आहेत. तिची डॉक्टरेटही मधल्या काळात झाली आणि आता ती अनेक ठिकाणी व्याख्याती म्हणून जाते. अनेक ठिकाणी तिने ओरांगुतान संवर्धनासाठी ट्रस्ट स्थापले. तिला कॅनडाचा ‘ऑफिसर्स ऑर्डर ऑफ कॅनडा’ हा सन्मान मिळाला. इंडोनेशियाला तिने आपलेसे केले, तिथल्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी आयुष्यभर तपश्चर्या केली याची जाणीव त्यांनी ठेवली, इंडोनेशियन प्रजासत्ताकाचा पर्यावरणातील उत्कृष्ट नेतृत्वाचा ‘कल्पतरू’ हा सर्वोच्च सन्मान तिला मिळाला. हा सन्मान मिळालेली ती पहिली विदेशी व्यक्ती आणि पहिली स्त्री आहे. तिच्या कामाचे मूल्य ओळखले गेले हे कौतुकाचे खरेच, पण तिच्या कामामुळे ओरांगुतानांचे अधिवास वाचले तर ते केवढे भाग्याचे ठरेल.

उष:प्रभा पागे ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on March 24, 2018 1:01 am

Web Title: environmental lovers and researchers birute galdikas study on borneo island