ही पृथ्वी आपल्या मालकीची नाही. विश्वस्त म्हणून आपल्या हाती सोपवलेला हा खजिना भावी पिढीचा आहे. – नाबियातील एक प्रचलित म्हण.

एक चिनी गोष्ट वाचली. चीनमध्ये खेडय़ात राहणारी मुलगी मिंग ली नाव तिचे, आकाशात उडणारे पक्षी तिला खूप आवडायचे. पण एके दिवशी गावचा मुखिया फर्मान काढतो की, सगळ्या चिमण्या मारून टाका. कारण त्या शेतातले धान्य खातात. सगळे लोक फटाके वाजवतात, भांडी बडवतात, त्यामुळे घाबरलेल्या चिमण्या पटापट खाली पडतात आणि मरायला लागतात. आकाशात एकही पक्षी उडताना दिसत नाही, सगळं आभाळ सुनं सुनं होऊन जातं. मिंग लीला काही चैन पडत नाही. ती आपल्या अंगणातल्या काही चिमण्या आणि त्यांची अंडी घरात लपवते. तिथे त्यांना दाणापाणी देते. तिथे त्या सुखाने राहतात. काही दिवसांनी टोळधाड येते आणि सगळे शेतातील धान्य खाऊन जाते. गावकरी चिंताग्रस्त होतात, आता त्यांना चिमण्यांची आठवण येते. चिमण्या असत्या तर त्यांनी टोळ खाल्ले असते. पिके वाचली असती पण आता कुठून आणायच्या चिमण्या? मिंग ली मग पुढे येते आणि सांगते, चिमण्यांना मी वाचवले आहे माझ्या घरी! मी त्यांना सोडते, त्या टोळ, कीड खातील, पिके वाचतील. मुखियाला आपली चूक कळते. गावचा दुष्काळ संपतो.

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
how to find out job as a fresher
Job For Fresher : फ्रेशर म्हणून नोकरी कशी शोधायची? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स
idli or dosa batter is never over-fermented
World Idli Day : इडली स्वादिष्ट व्हावी म्हणून पीठ जास्त दिवस आंबवता का? ही सवय आताच थांबवा….

या गोष्टीचे मूळ एका सत्य घटनेत सापडले. चीन चा नेता ‘माओ झेडोंग’ १९५८ मध्ये सत्तेवर आल्यावर विकासाची झेप- ग्रेट लीप फॉर्वर्ड – घेण्यासाठी त्याने काही योजना आखल्या. त्यापैकी एक होती धान्याची नासाडी टाळण्यासाठी चिमण्या, माशा, उंदीर आणि डास नष्ट करायची. धान्य, बीज आणि फळे हे प्राणी खातात, त्यांच्यामुळे रोगराई वाढते. या मोहिमेची कडक अंमलबजावणी झाली. परिणामत: चीनमध्ये दुष्काळ पडला आणि भुकेमुळे प्राणहानी झाली. माओला हा आदेश मागे घ्यायला लागला. अर्थातच ही घटना चिनी भिंतीआड दडपण्यात आली.

आफ्रिका खंडातील केनियाची लहान मुलगी ‘वांगारी’. तिच्या जमातीतील सर्व जण निसर्गाची पूजा, आदर सन्मान करणारे, झाडे, ओढे परिसरातील प्राणी अगदी बेडूकसुद्धा -त्याची जपणूक करणारे असे होते. निसर्ग आहे तर आपण आहोत हे सत्य जाणणारे! वांगारी वरही हे संस्कार होते. तिलाही निसर्गाविषयी जिव्हाळा होता. तिची वृत्ती अभ्यासू होती. मुलगी असूनही तिच्या वडिलांनी तिला शाळेत घातले. (त्या काळी तिच्या समाजात मुलींना शाळेत पाठवत नसत.) शाळेत तिच्या बुद्धीला धुमारे फुटले. उच्च शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली. शिकून मायदेशी परतली आणि जीवनाधार असलेला निसर्ग वाचवायची गरज लक्षात आली. झाडे लावायची मोहीम तिने सुरू केली. स्त्रियांच्या हक्कांसाठीही तिने चळवळ सुरू केली. स्त्रीचे हक्क सुरक्षित असतील तर निसर्ग संवर्धनात त्या महत्त्वपूर्ण काम करतील हे तिला कळलेले होते. तिचे नाव पर्यावरणाशी जोडले गेले.

२०१० मध्ये मेक्सिकोजवळ गल्फच्या खाडीत मोठय़ा प्रमाणावर तेलगळती झाली. समुद्रातून तेल काढणाऱ्या बोटीला अपघात होऊन प्रचंड तेल समुद्रात सांडले, पसरले. त्याचा दुष्परिणाम समुद्री प्राण्यांवर झाला. प्रवाळाची बेटे नष्ट झाली. सांडलेले तेल काढून समुद्र स्वच्छ करण्याची पराकाष्ठा शास्त्रज्ञ करत होते. त्यासाठी निधी गोळा केला जात होता. अमेरिकेतील ओलिविया बाऊलर ही पक्षीप्रेमी मुलगी त्यावेळी ११ वर्षांची होती. ती चित्रे काढायची ती पक्ष्यांची. तेलगळतीमुळे सागरी पक्षीजीवन धोक्यात आल्याचे तिला फार दु:ख वाटले. तिने मदतीची इच्छा कळवली. आपण पक्ष्यांची चित्रे काढतो हेही कळविले. तिची चित्रे विकून ते पैसे निधीला द्यायची अभिनव कल्पना सर्वाना आवडली. तिने आपली ५०० चित्रे देऊ  केली. त्यातून १,७५००० डॉलर एवढा निधी जमा झाला. एवढय़ा लहान मुलीला पक्षी वाचावे निसर्ग वाचवा हे वाटणे किती महत्त्वाचे आहे.

माणसाचे निसर्गाशी नाते अगदी मानवजातीच्या आरंभापासूनचे. त्यातही स्त्रीचे भवतालाशी असलेले नाते अधिक जिव्हाळ्याचे. निसर्गाचे, पर्यायाने पर्यावरणाचे जतन संवर्धन करण्यात स्त्रियांची भूमिका खर तर खूप महत्त्वाची. पण तिचे समाजातील स्थान नेहमीच दुय्यम राहिले आहे. तिच्या कामाचे, क्षमतेचे योग्य मूल्यमापन पुरुषप्रधान समाजात कधीच झाले नाही.  पर्यावरणविषयीच्या चळवळीचे नेतृत्व प्राचीन काळापासून स्त्रिया करत आल्या आहेत. १८ व्या शतकात विश्नोई संप्रदायात अमृता देवीच्या नेतृत्वाखाली ३०० स्त्री पुरुषांनी झाडे वाचविण्यासाठी झाडांना मिठी मारून प्राणांचे बलिदान दिले. अमेरिकेत १९६० नंतर राचेल कार्सनने अपायकरक रासायनिक खते आणि कीटकनाशकविरोधी चळवळीची सुरुवात केली. तिला प्रचंड विरोध झाला. पण शास्त्रीय संशोधनाचा पाया आणि बिनतोड पुरावे यामुळे शासनाला त्यांच्या धोरणांचा पुनर्विचार करणे भाग पडले. लोकांचे आरोग्य, हित आणि पर्यावरणाचा प्रश्न पणाला लागले असल्याने अखेर शासनाला डीडीटीवर बंदी आणायलाच लागली. जागतिक पर्यावरण चळवळीचा पाया एका स्त्रीने घातला.

दुर्दैवाने बहुतांश राजकीय धोरणे ही नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घेण्याचीच असतात. तथाकथित विकासाच्या मार्गात जेव्हा नैसर्गिक परिसंस्था आणि पर्यावरणीय बाबींचा अडथळा वाटायला लागतो तेव्हा अविवेकाने त्यांचीच मोडतोड सुरू होते. मोठय़ा शहरातील कितीतरी विकास (!) योजना याची साक्ष देतील. पुण्याचेच उदाहरण घ्या ना. पुण्यातील देव नदी, राम नदी, ओढे नाले बिल्डर लॉबीला अडथळ्याचे वाटले आणि बिनदिक्कतपणे त्यांच्यावर अतिक्रमण झाले, नदीपात्राची, पूररेषेची मर्यादा उल्लंघून केलेली बांधकामे, पात्रात टाकलेला राडारोडा ही याची उदाहरणे.

निसर्ग संवर्धनाची नीती अनुसरणे ही आजच्या काळाची गरज नव्हे, निकड आहे. निसर्ग साधनांचे, निसर्गातील परिसंस्थांचे आणि निसर्ग मूल्यांचे जतन आणि संवर्धनाचा पट हा अत्यंत विस्तृत आहे. अनेक स्त्री, पुरुषांनी या पटावर आपली मुद्रा उमटवली आहे. अशांची आयुष्य मला नेहमीच आकर्षून घेतात. मला ती चालना देतात. प्रेरणा देतात. मला ती निसर्गाप्रति नम्र व्हायला शिकवतात.

महात्मा गांधी यांनी म्हटले आहे- ही पृथ्वी- (हवा, जमीन, पाणी) आपल्याला पूर्वजांकडून मिळालेला वारसा नसून आपल्या मुलांकडून आपल्याला मिळालेली ती उधारी आहे. ती जशी होती तशी त्यांच्या स्वाधीन करायची आपली जबाबदारी आहे. ज्या स्त्री-पुरुषांनी असा प्रयत्न केला त्यांचा जीवनपट वाचकांच्या साथीने वाचकांपुढे उलगडायचा संकल्प आहे.

उष:प्रभा पागे

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com