पश्चिम घाटातील सर्वात संपन्न, अत्यंत प्राचीन, आदिम स्वरूपातील एकमेव सदाहरित पर्जन्य जंगल म्हणजे पुराणकालीन निसर्ग ठेवा असलेले ‘सैरंध्रीवन’. इंग्रजांनी केले त्याचे ‘सायलेंट व्हॅली’- (नीरव वन) केरळच्या पालक्कड जिल्ह्य़ातील हे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून १९८४ ला अस्तित्वात येण्यासाठी त्यामागे फार मोठी चळवळ उभी रहावी लागली. त्या काळातील सर्वात मोठी आणि स्फोटक चळवळ ठरली ती. निसर्ग ठेवा जतन करण्यासाठी निसर्गप्रेमी, बुद्धिजीवी, वनतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ यांची एकजूट झाली तर काय होते ते या चळवळीच्या यशाने दाखवून दिले.
महाभारताचा कालखंड- पांडव अज्ञातवासात गेले ते नावे आणि वेश बदलून. ते दक्षिणेकडे जात राहिले. एका मोहमयी वन परिसरात ते आले. दाट कुरणे, रंगीत पक्षी, त्यांच्या ताना, झाडीतून वाट काढत जाणारी नदी, निर्झरांचे गाणे, मानवी वावर अगदी नाही, त्यामुळे सूर्योदय, सूर्यास्ताला नदीवर एकाच ठिकाणी नि:शंक मनाने पाणी पिणारे वाघ, हत्ती आणि हरणे. निसर्गलुब्ध द्रौपदीचे मन इथे रेंगाळले नसते तर नवल. तिच्या परिमळाने दरवळलेले हे वन म्हणून प्राचीन काळापासून ते झाले सैरंध्रीवन. इंग्रजांनी केले त्याचे सायलेंट व्हॅली. (एरव्ही किरकिरणारे सिकाडा इथे आवाज करत नाहीत म्हणून म्हणे ही सायलेंट व्हॅली.)
या वनातून वाहणारी मुख्य नदी ‘कुंतिपूज्जा’. (महाभारतातील कुंतीचा हा संदर्भ.) या वनातून ती १५ कि.मी. प्रवास करते. १९२८ मध्ये या नदीवरील ‘सैरंध्री’ हे ठिकाण जलविद्युतनिर्मितीसाठी सुयोग्य म्हणून निवडले गेले. १९७० मध्ये केरळ राज्य विद्युत मंडळाने या नदीवर वीजनिर्मितीसाठी धरण बांधायची योजना तयार केली. हे धरण सायलंट व्हॅलीमध्येच होऊ घातले होते. १९७३ मध्ये नियोजन आयोगाने २५ कोटी रुपयांचा प्रकल्प त्यासाठी मंजूर केला. या योजनेमुळे या बहुमूल्य, एकमेव, प्राचीन अशा पर्जन्य जंगलाचा बराच भाग डूब क्षेत्राखाली नष्ट होणार होता. त्याच्या बचावासाठी आता मात्र हालचाल करायला हवी होती. खरोखरच आंदोलनाला सुरुवात झाली, दिवसांगणिक त्याची तीव्रता वाढत गेली. १८४७ मध्ये या वनातील सजीव सृष्टीचा शोध वनस्पती संशोधक रॉबर्ट व्हाइटने घेतला होताच, त्याची उजळणी झाली.. १९७१-७२ मध्ये स्टीवन ग्रीन या शास्त्रज्ञाने तिथल्या primatesचा अभ्यास केला. ‘लायन टेल मकोक’ यांची संख्या अगोदरच कमी झाल्यामुळे त्यांचा मुख्य अधिवास असलेले सायलंट व्हॅली वाचणे हेही एक महत्त्वाचे कारण होते. चेन्नईच्या सर्पोद्यानाचा निर्माता आणि मगर प्रजनन केंद्राचे संचालक रोमूलस विटेकर याने या मुद्दय़ावर साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न चर्चिला गेला. केरळच्या थिरुवनंतपूरमच्या सुगथकुमारी या सुप्रसिद्ध कवयित्री, पर्यावरणीय आणि स्त्रीवादी चळवळीच्या आघाडीच्या कार्यकर्त्यां. त्यांच्या आई वी. वी. कार्तियायिनी या संस्कृतच्या पंडिता आणि शिक्षक, तर वडील बोधेस्वरन हे कवी आणि स्वातंत्र्यसेनानी, गांधींच्या मुशीतील विचारवंत. सामाजिक कार्याचा वारसा असा वडिलांकडून सुगथकुमारींकडे आलेला. प्रखर सामाजिक जाणिवा आणि कवीची संवेदनशीलता यामुळे त्या सायलेंट व्हॅली बचाव आंदोलनाकडे ओढल्या जाणे अगदी स्वाभाविक होते. त्या ‘प्रकृती संरक्षण समिती’च्या संस्थापक सचिव होत्या. समाजात होत असणारे बदल आणि त्यावरच्या प्रतिक्रिया त्या त्यांच्या कवितांत व्यक्त करतात. निसर्गसंपत्तीची राजरोस होणारी लूट, जंगलांवर अवलंबून असलेल्या आदिवासींचे शोषण याविरुद्ध आपल्या काव्यातून, भाषणातून त्या आवाज उठवत राहिल्या. पालक्कडमधील सायलेंट व्हॅलीलगतच्या भागात काही लोक बेकायदा गांजाचे पीक घेतात. त्यासाठी झाडे कापतात, त्यामुळे निसर्गसंपत्तीची हानी होते. याविरुद्ध तिने आणि तिच्या प्रकृती संरक्षण समितीच्या सहकाऱ्यांनी आघाडी उघडली. ‘केरळ साहित्य शास्त्र परिषदे’च्या त्या सदस्य होत्या. या परिषदेनेही आंदोलनासाठी जनमत जागृत केले. १९७० पासून राष्ट्रव्यापी सायलेंट व्हॅली बचाव मोहिमेचे नेतृत्व सुगथकुमारी यांच्याकडे आले. वृक्षांचे महत्त्व विशद करणारे ‘वृक्षगान’ हे त्यांचे गीत आंदोलकांचे जणू ‘मंत्र’गीत बनले. आंदोलकांच्या बैठकींची सुरुवात याच गीताने व्हायची. बुद्धिवादी लोकही आंदोलनाकडे ओढले गेले.
डॉ. सलीम आली हे सुप्रसिद्ध पक्षितज्ज्ञ, बीएनएचएसचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी सायलेंट व्हॅलीला भेट दिली आणि ही परियोजना रद्द करायची शिफारस केली. त्यासाठी केरळ उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल केले की, या जंगलात झाडे कापायला मनाई करावी. न्यायालयानेही तसा निर्णय दिला. सुप्रसिद्ध शेतीशास्त्रज्ञ आणि शेतकी खात्याचे सचिव डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांनी सूचना केली की, या क्षेत्रासोबत लगतचे क्षेत्र यात समाविष्ट करावे आणि हे राष्ट्रीय पर्जन्य जंगल जीवावरण राखीव क्षेत्र म्हणून घोषित करावे.
१९७७ मध्ये केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूटने नियोजित विद्युत परियोजनेच्या ‘पर्यावरणीय साधकबाधक परिणामांचा’ अभ्यास केला आणि प्रस्ताव मांडला की, सायलेंट व्हॅली हे ‘जीवावरणीय राखीव क्षेत्र’ घोषित करावे. १९७८ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काही अटींवर या परियोजनेला मंजुरी दिली. त्याच वर्षी एक महत्त्वाची गोष्ट झाली- आययूसीएन या संघटनेने ‘लायनटेल मकाक’ला संरक्षण द्यायचा ठराव केला. त्यामुळे चळवळीला जोर आला. १९७९ मध्ये केरळ सरकारने सायलेंट व्हॅलीला संरक्षण देण्याचा ठराव पास केला. त्यानुसार जलविद्युत योजनेचे क्षेत्र प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानातून वगळण्यात येणार होते.
पर्यावरणीय हानीशिवाय ही परियोजना अमलात आणता येईल का याचा अभ्यास करून अहवाल सादर करावा म्हणून केरळ उच्च न्यायालयाने १९८२ मध्ये एक समिती नेमली. माधव गाडगीळ हे त्याचे एक सदस्य होते. त्यानंतर १९८३ मध्ये मेनन समितीने आपला अहवाल सादर केला. या सर्वाचा परिपाक म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही परियोजना रद्द करायचा निर्णय घेतला. ३१ ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांनी १५ नोव्हेंबर १९८४ला ‘सायलेंट व्हॅली राष्ट्रीय पार्क’ची घोषणा केली. सायलेंट व्हॅलीच्या ‘बफर झोन’ (संधिक्षेत्र)ला २००७ मध्ये केरळ कॅबिनेटने मंजुरी दिली. त्यासाठी कर्मचारी वर्ग नेमण्यात आला. अवैध दारूचा धंदा, गांजाची लागवड, जंगलतोड आणि तस्करी, माओवादी लोकांचे हल्ले आणि मुद्दाम लावलेले वणवे यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते.
आज ‘निलगिरी जीवावरण राखीव’ क्षेत्रामधील गाभा (कोर एरिया) म्हणजे सैरंध्री वन किंवा सायलेंट व्हॅली अशी स्थिती असल्यामुळे ते सुरक्षित आहे. यशस्वी झालेली ही सर्वात मोठी पर्यावरणीय चळवळ असे म्हणायला हरकत नाही. तिथली जैवविविधता फुलते आहे, फळते आहे. दुर्मीळ वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटकांचे ते अभयस्थान आहे. सायलेंट व्हॅलीची निसर्गप्रणाली शाश्वत राहण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना अनेक संवर्धन संस्था तिथे राबवीत आहेत. सुगथकुमारी आज ८४ वयाच्या आहेत. पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्ष लागवडीचा उपक्रम यासाठी दिला जाणारा पहिला ‘इंदिरा गांधी वृक्षमित्र सन्मान’ त्यांना १९८६ मध्ये मिळाला. त्यांचे विपुल काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काव्याचे विषय निसर्ग, मनाचे व्यवहार आणि मानवी नातेसंबंध असे आहेत. वंचितांविषयी विशेषत: स्त्रियांविषयी त्यांना विशेष आस्था आहे. निराधार आणि मनोरुग्ण स्त्रियांसाठी त्यांनी ‘अभया’ ही संस्था सुरू केली. तिचा व्याप खूप वाढला आहे. आता त्या जोडीला व्यसनमुक्ती केंद्रही सुरू केले आहे. त्यांच्या संवर्धनाच्या कक्षा किती विस्तारत राहिल्या आहेत हे पाहून चकित होतो आपण. १९७८ मध्ये त्यांना साहित्य अकादमी अॅवॉर्ड मिळाले. २००१ मध्ये केरळ राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या. २००४ मध्ये त्यांना साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली. २००६ मध्ये पद्मश्री सन्मान त्यांना प्राप्त झाला. संपन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या सुगथकुमारी यांच्या मल्याळम भाषेतील कविता आपण वाचू शकत नाही ही खंत मात्र वाटते.
– उष:प्रभा पागे
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2018 5:15 am