23 January 2021

News Flash

कोळ्याची गोष्ट

अमेरिकन लेखक ई.बी. व्हाइट यांनी १९५२ मध्ये एक गोष्ट लिहिली होती.

|| उष:प्रभा पागे

लहानपणी कोळ्याची गोष्ट आवडलेल्या बडोद्याच्या मंजू सिलिवाल यांनी प्राणिशास्त्रात बी.एस्सी., एम.एस्सी. केले आणि पीएच.डी.ही केले ते कोळ्यांच्या अभ्यासामध्येच. मंजू यांचा भारतातील अनेक जातींच्या कोळ्यांचा अभ्यास आहे. ट्रॅप डोअर स्पायडरचा त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. कोळ्यांचे वर्तन, पुनरुत्पत्ती, त्यांची उत्क्रांती यावरील संशोधनाला खूप वाव आहे, असे त्या सांगतात. त्या सध्या कोळ्यांच्या उत्क्रांतीचा, रचनेतील सूक्ष्म कणांचा, मॉलेक्युल्सचा अभ्यास करीत आहेत.

अमेरिकन लेखक ई.बी. व्हाइट यांनी १९५२ मध्ये एक गोष्ट लिहिली होती. एक लहान मुलगी, डुकराचे पिल्लू आणि कोळी यांच्या मत्रीची. स्पायडर, कोळ्याविषयी सकारात्मक गोष्टीचे ते पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि त्याच्यावर चित्रपटही निघाला.. हा कोळी आपल्या जाळ्यामधून आपल्या मित्राचे- डुकराच्या गुणांचे वर्णन लिहितो. त्यामुळे त्याचा शेतकरी मालक डुकराला मारत नाही अन् त्याचे प्राण वाचतात. ही गोष्ट मंजू सिलिवालने वाचली होती आणि तिच्या कोवळ्या मनाला ती खूप भावली होती.

बडोद्याच्या या मुलीने, मंजू सिलिवालने पुढे मोठी झाल्यावर प्राणिशास्त्र विषयात बी.एस्सी. आणि एम.एस्सी. केले. त्यांच्या शिक्षकांनी एका प्रकल्पासाठी कोळ्यांविषयी झालेले लिखाण आणि संशोधन याविषयीची माहिती गोळा करून द्यायला  मंजू यांना सांगितले. हे करताना त्यांच्या लक्षात आले की, या विषयावर भारतात फार कमी अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच शोधनिबंध आहेत. ते लिखाण वाचताना त्यांनाही कोळी हा विषय रंजक वाटला. लहानपणी वाचलेल्या कोळ्याच्या गोष्टीने त्यांच्या मनावर तेव्हापासूनच मोहिनी घातली होतीच. मग मंजू यांचा पीएच.डी.चा विषय ठरला – ‘कोळ्यांचा अभ्यास आणि जैविक म्हणजे मुख्यत कीड नियंत्रणात कोळ्यांचा सहभाग’. भर ‘आदिम काळापासूनचे कोळी’ यावर होता. काही कोळ्यांना पकडून त्यांना पाळून त्यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास त्यांनी केला, तर काही कोळ्यांचा त्यांच्या नसíगक अधिवासात केला.

कोळी आपल्या सर्वाच्या परिचयाचा प्राणी, आठ पायांचा. अंटाíक्टका खंडाचा अपवाद सोडला तर जगभर आढळणारा; पण त्याविषयीची माहिती मात्र आपल्याला कुठे असते? स्पायडरमॅनवरील चित्रपटामुळे स्पायडर-कोळ्यांविषयी अद्भुत वलय निर्माण झाले. प्रत्येक घरी कोपऱ्यात, आढय़ाला कोळ्यांचा निवास असतो. झाडात, खडकात, जंगलात, जमिनीवर, पानामागे, अगदी जळीस्थळीकाष्ठी सर्वत्र तो असतो. खरे तर ते अगदी निरुपद्रवी असतात, पण ते विषारी असतात या समजुतीने आपण त्यांना घाबरतो. पण सगळे कोळी काही विषारी नसतात. ते माणसांच्या वाटय़ालाही जात नाहीत. चिरडले गेले तरी फारसा अपाय होत नाही. २० व्या शतकात कोळ्यांच्या विषाने १०० माणसे मेल्याची नोंद आहे. कोळी आपला जीव वाचवण्यासाठीच विषाचा उपयोग करतात का? बहुतेक कोळी आपले भक्ष्य शिकार करून मिळवतात. कोळ्यांच्या माहीत असलेल्या ४५ हजारांहून जास्त जाती आणि प्रजाती आहेत. त्यांच्यात लहानमोठे आकार आणि रचनावैविध्य आहे. कोळ्यांचेच रक्त निळे असते, कारण त्यांच्या रक्तातील प्राणवायू तांब्याच्या ‘रेणू’शी जोडलेला असतो. बहुतेक कोळी स्वत: केलेल्या जाळ्यात राहतात. जाळे विणण्यासाठी ग्रंथीमधून काढलेला धागा तलम आणि अत्यंत मजबूत असतो. कृत्रिम रासायनिक धाग्यापेक्षा कोळ्याचा धागा हलका, मजबूत आणि लवचीक असतो. द्रव रूपात बाहेर पडलेला धागा हवेमुळे घन होतो. अनेकपदरी धागा तर स्टीलपेक्षा मजबूत असतो. घट्ट विणीचे जाळे विमानाच्या गतीमध्येही अवरोध निर्माण करू शकते. बहुतेक जातींत मादी नरापेक्षा मोठी असते. तिची भूकही मोठी असते. ४० पेक्षा जास्त अंडी ती देते. त्यामुळे तिला जास्त ऊर्जेची गरज असते. काही जातींतील कोळी मादीला आकर्षति करायला नृत्य करतात. मीलनानंतर मात्र पटकन दूर पळून जातात आणि मीलनासाठी दुसरी मादी शोधतात, नाही तर मादीच्या तावडीत सापडले की ती नराला खाऊन टाकते. संशोधकांचे असे निरीक्षण आहे की, मादी नराला मीलनापूर्वी, मीलनादरम्यान किंवा नंतर केव्हाही खाते. इंग्लिशमध्ये कोळ्याला ‘ब्लॅक विडो’ असे म्हटले जाते ते याचमुळे. माद्या पिल्लांचे पालनपोषण करतात. त्यांच्याबरोबर अन्न वाटून घेतात. कोळी कोळ्याला खातो. कोळ्यांच्या काही जाती मांसाहारी, तर काही शाकाहारी आहेत. कोळी जाळ्यात कोठेही असला तरी जाळ्यात सापडलेले भक्ष्य त्याला जाळ्याच्या कंपनामुळे समजते. शिवाय त्यांची नजरही तीक्ष्ण असते. मांसाहारी कोळी, कीड कीटक, माशा, नागतोडे, डास, पतंग, लहान पाखरे खातात. मोठे कोळी प्रसंगी पक्षी, बेडूक, सरडे, मासे, वटवाघळे यांनाही खातात. त्यांना जबडा नसतो, पण तोंडाला सुळे असतात. त्यातून ते भक्ष्याला विष टोचतात, भक्ष्याला बेहोश करतात. त्यांची अन्ननलिका अरुंद असल्याने त्यांना घन पदार्थ खाता येत नाही. भक्ष्यावर ते पाचक रस सोडतात, त्यामुळे घन पदार्थ त्यात विरघळतात आणि कोळी तो रस ओढून घेतात. काही कोळी इतरांपेक्षा हुशार असतात. भक्ष्य शोधायच्या युक्त्या ते शोधून काढतात. लपून बसायचे, मेल्याचे सोंग करायचे असे. काही कोळ्यांच्या जाती सामुदायिक जाळे बनवितात, शिकारही सामुदायिक करतात आणि भक्ष्य वाटून घेतात. शाकाहारी कोळी फुलातील मधुरस, पानातील रस, परागकण शोषून घेतात. एका जातीचे कोळी बाभळीतील शर्करायुक्त द्रवावर जगतात. कोळ्यांची आयुर्मर्यादा २ वर्षे असते. जातीचे कोळी जास्त जगतात. काही कोळी झाडावरच्या पोकळीत, छिद्रामध्ये, जमिनीच्या फटीमध्ये अंगच्या धाग्याचे जाड अस्तर करून राहतात. असा सारा कोळ्यांचा अभ्यास मंजू यांनी केला.

मंजू सिलिवाल यांचा भारतातील अनेक जातींच्या कोळ्यांचा अभ्यास आहे. ट्रॅप डोअर स्पायडरचा त्यांनी विशेष अभ्यास केला आहे. ही प्रजाती पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. यातील काही जाती झाडांच्या किंवा खडक, जमीन यांच्या सांदीसापटीत, भेगातून राहतात. आतून धाग्याचे अस्तर लावून मजबुती आणतात. विशेष म्हणजे तोंडाशी धाग्याचे झापड किंवा दार तयार करतात. ते एका बाजूने उघडणारे असते. त्यावर बाहेरच्या बाजूने माती, वाळकी पाने, शेवाळ, बुरशी याचे लिंपण करतात. बाहेरून कुणालाच कळत नाही की इथे आत कोळ्याचे घर आहे.. भक्ष्य दाराशी आले की दार उघडून त्याला पकडतात. शत्रू आलाच तर दार आतून घट्ट बंद ठेवतात. शत्रू आत आलाच तर भेगेच्या दुसऱ्या दाराने बाहेर पडतात. नर कोळी मादीच्या शोधात दारापाशी येऊन, मादी दार उघडेपर्यंत दारावर थापा देत राहतो. एका पायाने मादीचे तोंड बंद करून समागम करतो आणि लगेच जिवाच्या भीतीने पळून जातो. मादीसोबत काही काळ पिल्ले राहतात, नंतर आसपासच्या सपाटीमध्ये राहतात, लांब जात नाहीत. मादी सहसा घर सोडत नाही. नर मात्र बाहेर मुसाफिरी करतो. भटक्या जमातीतील काही कोळी मात्र घर करीत नाहीत. वाळक्या पानांखाली लपून असतात. मोरपिसाच्या रंगाचा आकर्षक कोळीही त्यांच्या अभ्यासात त्यांना आढळलेला आहे. एखाद्या पत्रात कोळ्याला बंदिस्त ठेवले तरी त्यात तो अंगातील रसाच्या धाग्याने आतून अस्तर तयार करतो. नर कोळी बरोब्बर मादीचे जाळे शोधून काढतो. मंजू सिलिवाल यांचे अनुमान असे की, मादी विशिष्ट रसायन जाळ्यात सोडत असावी, त्यामुळे नर आकर्षति होत असावा.

कोळी दिसल्यापासून, त्यांची ओळख पटवून जाती-प्रजातीनुसार वर्गीकरण करून, त्यांची संपूर्ण माहितीसकट नोंद ठेवणे आणि त्या त्या प्रजातीची उत्क्रांती कशी झाली हा अभ्यास त्यांना रंजक आणि आव्हानात्मकही वाटतो. गटातील कोळ्यांचा अभ्यास करण्यासाठी त्या भारतभर फिरल्या. बहुतेक संरक्षित जंगलांना त्यांनी भेटी दिल्या. कोळ्यांच्या १५०० हून अधिक जातींचा संग्रह त्यांनी केला. त्यांच्यातील किती तरी नवीन जाती, प्रजाती त्यांनी शोधून काढल्या. शिकाऊ अभ्यासकांनी केलेली चुकीची ओळख- वर्गवारी तपासून योग्य त्या गटात टाकणे हाही त्यांच्या प्रकल्पाचा एक भाग असतो. त्यासाठी गेली १५ वर्षे त्या कोळी-स्पायडर विषयातील तज्ज्ञ, मार्गदर्शक, सल्लागार म्हणून भारतभरच्या महाविद्यालय, विद्यापीठांमधून कार्यरत असतात.

कोळ्यांच्या विषाचा उपयोग औषधे आणि कीटकनाशक म्हणून करता येईल का याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत. रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत याचे दुष्परिणाम कमीच आहेत. कोळ्याचे नरसाळ्यासारखे जाळे म्हणजे जंतुनाशकांसाठीचा खात्रीशीर कच्चा माल आहे. या प्रकारच्या कोळ्यांना बंदिस्त करून ठेवले तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि अभ्यासासाठी, औषधासाठी त्यातील कोळ्यांचा सातत्याने उपयोग करून घेता येतो आणि इलाज १०० टक्के परिणाम करतो. विषाचा उपयोग भविष्यात स्नायू शैथिल्य, अल्झायमर, अर्धागवायू इत्यादी गंभीर रोगांवर होऊ शकतो. कोळ्याचा रेशमी धागा मजबूत, टिकाऊ, लवचीक आणि वजनाला हलका असतो. त्यात प्रथिने असतात. त्या धाग्याची गुणसूत्रे वनस्पतीमध्ये घालून धागा मिळविता येईल का याचे प्रयोग शास्त्रज्ञ करीत आहेत. कोळ्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, कारण ते कीटकांना खातात, त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात. परिसर प्रणालीमधील त्यांचे हे काम महत्त्वाचे आहे. कोळ्याची पिल्ले स्वतंत्र झाली तरी मादी कोळ्याच्या परिसरातच सांदीफटीतून राहतात. त्यामुळे एक झाड कापले तर कोळ्यांची मोठी संख्या नष्ट होते, निर्वासित होते. कंबोडिया देशात जातीचे कोळी गोळा करून शिजवून आवडीने खाल्ले जातात. खाद्य म्हणूनही त्यांचा प्राणिसृष्टीत उपयोग आहे.

कोळ्यांचा बेकायदेशीर व्यापार हा फार मोठय़ा प्रमाणात चालतो. पाळीव प्राणी पाळणाऱ्या शौकीन लोकांसाठीही त्यांचा धंदा होतो. सर्वसामान्यांचे कोळ्यांविषयी अज्ञान आणि जहाजावरील तपासणी अधिकारी यांचे कायद्याच्या माहितीचेही अज्ञान यामुळे दर वर्षी भारतातून बाहेर पाठवल्या जाणाऱ्या कोळ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाची गरज आहे, असे मंजू सिलिवाल सांगतात.

प्रत्येक निसर्गभेटीत काही तरी नवीन शिकायला मिळते, हा त्यांचा अनुभव आहे. उत्तरपूर्व म्हणजे पूर्वाचलची सात भगिनी राज्ये, यांच्या अंतर्भागातील अनुभव अगदी निराळा, अनोखा वाटला त्यांना. पर्यटनाच्या यादीत  नसलेली किती तरी सुंदर ठिकाणे अभ्यासाच्या निमित्ताने त्यांनी पाहिली. उत्तर पूर्वाचल भाग स्त्रियांसाठी अतिशय सुरक्षित आहे असा त्यांचा अनुभव आहे. एक अडचण मात्र प्रत्येक वेळी जाणवायची, राहण्यासाठी जागा मिळवणे. काही प्रसंगी वन खात्याचे विश्रामगृह मिळायचे; पण बरेच वेळा ते अगदी अंतर्भागात असायचे. सुरक्षारक्षक स्वत:च रात्री वस्तीतील घरी निघून गेला, की त्या विराण जागी त्या एकटय़ा पडायच्या. अशा वेळी भीती नक्कीच वाटायची त्यांना. वेगवेगळ्या प्रसंगी अनेकांची मदत मिळाली, आप्तेष्टांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळे या विषयात आíथक साहाय्य पुरेसे नसूनही संशोधन चालू ठेवावे असे त्यांना वाटते.

कर्नाटक राज्यात कोइंबतूर इथे भारतातील अतिप्राचीन कोळ्याचे संग्रहालय आहे. त्याच्या त्या मार्गदर्शक आहेत. गुजरात राज्यात बडोद्याचे विद्यापीठ, राष्ट्रपती भवन यामध्ये स्पायडर डॉक्युमेंटेशनच्या त्या सल्लागार आहेत. कोळ्यांचे संग्रहालय व्यवस्थापनेचे विशेष प्रशिक्षण त्यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड इथे घेतले. ‘आय.यू.सी.एन.’च्या कोळी आणि विंचूविषयक कमिशनच्या त्या सदस्य आहेत. पौर्वात्य विभागाच्या त्या ‘रेड लिस्ट ऑथोरिटी’ आहेत. त्यांचे काम आणि अनुभव फार मोठे आहे.

कोळ्यांविषयी भारतात प्राथमिक स्वरूपाचे, नोंदींचे काम झाले आहे. जैवतंत्रज्ञानाच्या बहुविध पलूंवर किती तरी काम होणे गरजेचे आहे, तसेच कोळ्यांचे वर्तन, पुनरुत्पत्ती, त्यांची उत्क्रांती यावरील संशोधनाला खूप वाव आहे, असे त्या सांगतात. मंजू सध्या त्यांच्या उत्क्रांतीचा, रचनेतील सूक्ष्म कणांचा मॉलेक्युल्सचा अभ्यास करीत आहेत. डेहराडून येथील ‘वन्य जीव संस्थान’मध्ये ‘अ‍ॅनिमल इकॉलॉजी अ‍ॅण्ड कन्झव्‍‌र्हेशन बायोलॉजी’ या विभागात त्या कार्यरत आहेत. त्यांचे पतीही या संस्थेत शास्त्रज्ञ आहेत. अत्यंत साधेपणा आणि संशोधन आणि व्यासंग यांच्या त्या प्रतीक आहेत. म्हणूनच त्या अनेकांच्या आदर्श आहेत.

ushaprabhapage@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2018 12:06 am

Web Title: manju siliwal friendship with nature
Next Stories
1 नदीमय आयुष्य
2 स्वायत्त प्रतिभेची वृक्ष चित्रकार
3 बलाढय़ शत्रूशी लढण्याचे साहस!
Just Now!
X