सतराव्या शतकात कीटकांचा साकल्याने अभ्यास झालेला नव्हता. कीटकांविषयी सर्वसामान्यांना फारशी माहितीही नव्हती. कीटकांचा जन्म चिखलातून होतो, कुजलेल्या पदार्थातून होतो अशा समजुती रूढ होत्या. या समजुतीला धक्का दिला चित्रकार असलेल्या एका निसर्गप्रेमी संशोधक स्त्रीने. तिचे नाव ‘मारिया मरियन’.

कीटकांच्या शास्त्रीय अभ्यासाचा पाया तिने घातला. डार्विनप्रमाणे तिने जीवविज्ञान बदलून टाकले नाही, पण त्यापूर्वी १५० वर्षे तिने सजीवांच्या अभ्यासाचे कलापूर्ण दालन खुले केले. त्या काळी कीटकांवर पुस्तके होती, पण मारियाप्रमाणे त्यांचा संपूर्ण जीवनक्रम कोणी चित्रांकित केला नव्हता. तिने कीटक आणि वनस्पती यांच्यातील सहसंबंध, अन्योन्यसंबंध दाखवून दिला. इतर शास्त्रज्ञ वनस्पती आणि प्राणी यांचे साचेबंद वर्गीकरण करत होते तेव्हा तिने निसर्ग साखळीतील त्यांचे स्थान दाखवून दिले. तिचा जीवनप्रवास मला अतिशय वेधक वाटला. मारियाचा जन्म २ एप्रिल १६४७ मध्ये जर्मनी मधला. तिचे कुटुंब खोदकाम (engraving) आणि मुद्रण कलेसाठी प्रसिद्ध होते. ती तीन वर्षांची असताना तिचे वडील वारले. आईने जेकब मॅर्रल यांच्याशी पुनर्विवाह केला. ते चित्रकार होते. त्यांनी मारियाला चित्रे काढायला शिकविले आणि उत्तेजन दिले. ती १३ वर्षांची होती तेव्हा प्रथम हातात आलेल्या वनस्पतीच्या नमुन्याचे तिने रेखाटन केले. मग तिचा तो छंदच झाला. वडिलांसाठी झाडाचे फुलांचे नमुने गोळा करायचे आणि त्यांची रेखाटने करायची. तिने चित्रकलेचा ८ वर्षे अभ्यास केला. निसर्ग इतिहासाची बरीच पुस्तकेही तिने वाचली होती. एकदा तिचे लक्ष रेशमाच्या किडय़ाकडे गेले. तिचे कुतूहल जागे झाले. रेशमाच्या कीटकाची अंडी, अळी, कोश आणि कोशातून बाहेर आलेले पाखरू यांचे ती दिवस दिवस निरीक्षण करायची. तुतीच्या झाडाची पाने खाणारी अळी तिने ब्रशने रंगवली. त्या गिळगिळीत अळीची, केसाळ कीटकांची तिला कधी किळस वाटली नाही. कोशातून बाहेर येणाऱ्या अळीचे असे पतंग किंवा फुलपाखरांमध्ये रूपांतर झालेले पाहून ती चकित झाली. मग घरातच ती कीटक, अळ्या पाळून त्यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास करू लागली, टिपणे नोंदवू लागली, त्यांचा कॅटलॉग ठेवू लागली. प्रत्यक्ष निरीक्षणातून तिला किती तरी गोष्टी नव्याने कळल्या. तिची अभ्यासाची ही थेट पद्धत फार उपयुक्त ठरली.

वयाच्या १८व्या वर्षी तिने वडिलांच्या एका शिष्याशी लग्न केले. तिचा चित्रांचा छंद तिने चालू ठेवला होता. कातडय़ावर, कापडावरही ती चित्रे काढायची. श्रीमंत आणि उपवर तरुण मुलींना ती चित्रे काढायला शिकवायची. त्यातून तिला पैसा, प्रतिष्ठा आणि लौकिक मिळाला. या श्रीमंत कुटुंबांच्या मोठाल्या बागा तिला पाहायला मिळाल्या. तिथून ती कीटकांचे विविध नमुने गोळा करायची, त्यांचा अभ्यास करायची. लवकरच कीटकांवरील तिचे पहिले पुस्तक दोन भागांत प्रसिद्ध झाले, तेही सचित्र रेखाटनासह. एव्हाना ती दोन मुलींची आई झाली होती. पण तिचा विवाह मात्र सुखाचा ठरला नाही. ती आपल्या आईबरोबर राहू लागली. काही काळ आपल्या कुटुंबासह ती आपल्या सावत्र भावाकडे राहायला गेली.

मारियाच्या थोरल्या मुलीचे लग्न होऊन ती दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यालगतच्या सुरिनाम इथे राहत होती. घरात बसून अभ्यास करण्यापेक्षा प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहून अभ्यास करणे महत्त्वाचे म्हणून मारियाने सुरिनाम इथे अभ्यास मोहीम आखली. तेथील नवनवीन कीटकांच्या जातींचा तिला अभ्यास आणि रेखाटणे करायची होती. जाण्यापूर्वी तिने अन्य संशोधकांच्या कीटकसंग्रहांचा अभ्यास केला होता. खर्चाची तरतूद म्हणून तिने आपली २५० चित्रे विकली. सुरिनाम इथे डच वसाहत होती. वसाहतीत जाऊन असा अभ्यास करण्यासाठी फक्त पुरुषांना राजदरबारातून किंवा शासकीय पातळीवर आर्थिक निधी मिळायचा. त्या वेळी संशोधक स्त्रिया एक तर कमी होत्या आणि अभ्यासमोहिमांवर जाणारी मारिया ही पहिलीच स्त्री असावी. एक स्त्री अभ्यासमोहिमेवर पार दुसऱ्या खंडात जाते आहे म्हटल्यावर सामाजिक वर्तुळात हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला होता. सुरिनामच्या अंतर्भागातील अपरिचित प्राणी आणि वनस्पतींचा तिने प्रयत्नपूर्वक शोध घेतला, त्यांचा अभ्यास केला, वर्गीकरण केले, त्यांची वर्णने बारकाईने लिहिली. त्यांचा निवास, सवयी, जीवनक्रम आणि स्थानिक लोकांना त्यांच्यापासून होणारा उपयोग हीसुद्धा माहिती तिने लिहून ठेवली आहे. कोश करणारे सर्व कीटक, त्यातील दिनचर, निशाचर, किडे, माश्या आणि मधमाश्या यांचाही तिने अभ्यास केला. लढाऊ  मुंग्या, पाने कातरणाऱ्या मुंग्या आणि इतर सजीवांवर त्यांचा होणारा परिणाम सांगणारी ती युरोपातील पहिली शास्त्रज्ञ होती. विशिष्ट कीटक विशिष्ट वनस्पतींवरच पोसले जातात आणि अंडीही त्या वनस्पतीवर घालतात हे तिने पाहिले. कीटकांच्या संदर्भात उत्क्रांतीवर तिने लिखाण केले. तिचे वेगळेपण म्हणजे तिने वनस्पती आणि प्राण्यांना स्थानिक नावे वापरली. सुरिनामला पाच वर्षे थांबायचे म्हणून ती धाकटय़ा मुलीसह आली होती. पण वारंवार होणाऱ्या मलेरियामुळे दोन वर्षांनी, १७०१ मध्ये तिला हॉलंडला आपल्या घरी परतावे लागले. स्वगृही नेदरलँडला परतल्यावर तिने दुकान उघडले. कीटकांची चित्रे, वनस्पतींचे नमुने यांची विक्री ती करायची.

१७०५ मध्ये तिचे सुरिनामच्या कीटकांवरील पुस्तक प्रसिद्ध झाले. यात १८६ कीटकांचा जीवनक्रम तिने अभ्यासला आहे. सुरिनाम वसाहतीचे डच मळेवाले स्थानिक लोकांना अपमानास्पद वागवितात, काळ्या लोकांना गुलाम करतात याविषयी तिने नाराजी व्यक्त केली आहे. गंमत म्हणजे तिच्या पदरीही तिने दोन गुलाम बाळगले होते. त्यातील एक स्त्री तिच्याबरोबर राहून वनस्पती आणि कीटकांचे नमुने गोळा करायची. स्वीडनला परतताना ही स्त्री तिच्याबरोबरच होती १७१५ मध्ये मारियाला अर्धागवायूचा झटका आला. तिने तिचे कीटकांच्या चित्रांचे काम सुरू ठेवले खरे, पण तिच्या आजारपणाचा तिच्या कामावर परिणाम होणे स्वाभाविक होते. ‘पीटर द ग्रेट’ने तिचे काम अ‍ॅमस्टरडॅममध्ये बघितले होते. तिच्या मृत्यूनंतर तिची चित्रे मोठय़ा संख्येने त्याने विकत घेतली आणि सेंट पिट्सबर्गच्या संग्रहालयात ठेवली. १३ जानेवारी १७१७ ला अ‍ॅमस्टरडॅममध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या मुलीने- डोरोथीने- आईच्या पश्चात तिच्या संशोधनपर लेखांचा संग्रह प्रसिद्ध केला आहे.

मारियाची सर्व चित्रे जलरंगातील आहेत. पाण्यात खळ मिसळून त्या माध्यमात ती जलरंगांचा प्रभावी वापर करायची. (त्या काळी स्त्रियांच्या तेलरंगांच्या वापरावर आर्टिस्ट गिल्डचा र्निबध होता म्हणे.) तिची अनेकानेक चित्रे हौशी कलाप्रेमी आजही गोळा करतात.

विसाव्या शतकाच्या अखेरीस तिच्या कामाचे नव्याने मूल्यांकन झाले, त्याला शास्त्रीय जगात मान्यता मिळाली. तिचे संशोधन नव्याने छापले गेले. जर्मनी देशाच्या नोटेवर-चलनावर तिची प्रतिमा छापली गेली. तिची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकीटही निघाले. शिक्षण संस्थांना तिचे नाव दिले गेले. मोझार्टच्या रेकॉर्डवर तिची सुंदर अशी फुला-पानांची चित्रे अवतरली. २००५ मध्ये जर्मनीतील एका संशोधन मोहिमेवरील जहाजाला तिचे नाव देण्यात आले. गेल्याच वर्षी तिच्या पुण्यतिथीला अ‍ॅमस्टरडॅममध्ये तिच्या कामावर परिसंवाद भरविण्यात आला. गूगल डूडलवरही तिची प्रतिमा अवतरली. तिच्या हयातीत तिचे लिखाण दुर्लक्षित राहिले कारण ते स्थानिक, प्रचलित भाषेत लिहिले होते. त्या वेळची संशोधनाची शिष्टसंमत भाषा लॅटिन होती. संशोधक म्हणून तिच्या काळी तिची योग्य दखल घेतली गेली नाही याचे कारण कदाचित तिचे ‘स्त्री’ असणेही असू शकेल. सुप्रसिद्ध निसर्ग अभ्यासक आणि शास्त्रज्ञ ‘डेविड एटमबरो’ यांनीही कीटकशास्त्रातील तिच्या कामगिरीचा गौरव केला आहे.

– उष:प्रभा पागे

ushaprabhapage@gmail.com