23 January 2021

News Flash

प्रभावशील नेतृत्व

त्या वंदना शिवा. त्यांचे वडील वनखात्यात अधिकारी होते आणि आई शेतकरी होती.

त्यांचे व्यक्तिमत्त्व एवढे प्रभावी आणि कार्य इतके बहुआयामी आहे की, एका वाक्यात आणि विशेषणात त्यांना बसवणे अवघड आहे. त्यांना जे तीन आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत त्यावरून त्यांचे काम किती महत्त्वाचे हे नक्कीच कळावे. नोबेल पारितोषिकाइतकेच मोठे, ‘राइट लाइव्हलिहूड अ‍ॅवॉर्ड’ १९९३ मध्ये, त्यांना वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी मिळाला. त्यानंतर ‘सिडनी पिस प्राइझ’ २०१० मध्ये आणि फुकुओका एशियन कल्चर प्राइझ २०१२ मध्ये त्यांना मिळाले. भारतीय परंपरेची पाठराखण करणाऱ्या त्या उच्च विद्याप्राप्त विदुषी आहेत. पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यां आहेत. पारंपरिक सेंद्रिय शेतीच्या कृतिशील पुरस्कर्त्यां आहेत. स्वामित्व हक्कांसाठी लढणाऱ्या योद्धा आहेत. प्रखर स्त्रीवादी लेखिका आहेत. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी, हितसंरक्षणासाठी मोनसान्टोसारख्या रासायनिक खते, बियाणे विकणाऱ्या बलाढय़ कंपनीच्या विरोधात त्या ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.

त्या वंदना शिवा. त्यांचे वडील वनखात्यात अधिकारी होते आणि आई शेतकरी होती. नैनितालमध्ये शालेय शिक्षण घेऊन चंदिगडच्या पंजाब विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र विषयात त्यांनी पदवी घेतली आणि कॅनडामध्ये फिलॉसॉफी ऑफ सायन्स- फिजिक्स या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता ‘क्वांटम थिअरी’. भारतात येऊन बंगळूरुच्या आयआय.एससी. आणि मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटमधून त्यांनी ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय धोरण’ या विषयात पुन्हा पीएच.डी. केली.

जैवतंत्रज्ञान, जैवनीती आणि जनुकीय अभियांत्रिकी आणि भारतीय शेती परंपरा या विषयांचा सांगोपांग अभ्यास असल्यामुळे त्यांची मते स्पष्ट आणि निर्भीड आहेत. ‘जिवाणूमधून जनुक काढून बियाणात घातल्याने ते थोडेच जिवंत म्हणायचे? तुम्ही नवीन जीव निर्माण करत नाही तर तुम्ही त्याला विकृत करता.’ अभियांत्रिकी आणि रासायनिक तंत्रज्ञानाने बियाणांमध्ये बदल घडवून ते पेरून त्यापासून पीक उत्पादन घ्यायचे या शेतीतील तथाकथित प्रगत (!) तंत्रज्ञानाला त्यांचा ठाम विरोध आहे. त्या म्हणतात, जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरणाऱ्या कंपन्यांना जगाचे हित थोडेच करायचे आहे. त्यांना पृथ्वी आपल्या ताब्यात आणायची आहे, बियाणांवर एकाधिकार मिळवायचा आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांची बीजसत्ता नष्ट होऊन तो अधिक परावलंबी होणार. त्यांच्या शब्दांत-  ‘मोनसान्टो आधी बियाणांवर एकाधिकार मिळवणार, मग अन्नावर आणि मग आपल्या जीवनावर.’ जनुकीय बदलातून आलेल्या पिकांना त्यांचा कडाडून विरोध आहे. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूकबळी, कुपोषण, शेतकऱ्यांचे कर्जाच्या गर्तेत लोटले जाणे हे सर्व या तथाकथित प्रगत शेतीचे परिणाम आहेत. असं त्या म्हणतात. पारंपरिक, सेंद्रिय शेतीविषयी त्या म्हणतात, ‘भारतीय शेतकऱ्यांची पारंपरिक शेती पद्धत परिपूर्ण पद्धत आहे. सेंद्रिय शेती म्हणजे शाश्वत विकास. म्हणजे शांतीकडे नेणारी वाट. औद्योगिक शेती व्यवस्थेमध्ये हिंसा आहे, स्पर्धा आहे, मृत्यूचे तांडव आहे, विनाश आहे; भांडणे, लढाया आहेत. सेंद्रिय शेतीचा मार्ग सुख-शांती-समृद्धीचा मार्ग आहे.’ मात्र आधुनिक काळात पारंपरिक शहाणपणा सोडून आपण ज्ञानामागे, आता तेही सोडून माहितीच्या मागे लागलो आहोत; पण तीही एकांगी आहे. अशाने शेवटी आपण अपूर्ण मानव तर निर्माण करणार नाही? अशी शंका त्या व्यक्त करतात.

१९८४ मध्ये पंजाबमध्ये उसळलेली दंगल आणि भोपाळचे युनियन कार्बाइडचे वायुकांड या घटना त्यांच्या कामाची पाश्र्वभूमी ठरली.. शेतीमध्ये हरित क्रांती आणि त्यातून आलेल्या सीड केमिकल पॅकेजमुळे जमिनीची प्रत खालावत गेली, त्याने नैसर्गिक प्रणाली मारून टाकली, परिणामस्वरूप मानवी आरोग्यावर अनिष्ट परिणाम झाला, असे त्यांचे निरीक्षण आहे. १९८२ मध्ये त्यांनी ‘रिसर्च फाऊंडेशन फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड इकॉलॉजी’ सुरू केली. १९९१ मध्ये त्याचे विलयन ‘नवधान्य’ या संकल्पनेमध्ये, चळवळीमध्ये आणि नंतर संस्थेमध्ये झाले. ‘नवधान्य’ म्हणजे धान्याची, बियाणाची एकूणच जैविक सृष्टीतील विविधता, विपुलता आणि समग्रता कायम राहावी, सेंद्रिय शेतीचा मार्ग अनुसरावा, व्यापार साक्षेपी असावा, हितैषी असावा आणि अंतिम उद्दिष्ट शाश्वत विकास असावा या हेतूने ही संस्था वंदना शिवा यांनी सुरू केली. या शब्दाचा दुसरा अर्थ नवी भेट- देणगी असाही आहे. शेतकऱ्यांचे हक्क, बियाणे वापराचे त्यांचे सार्वभौमत्व जपणे हा मुख्य हेतू यामागे आहे. स्थानिक बियाण जमविणाऱ्या, सेंद्रिय शेती करणाऱ्यांची संपर्क यंत्रणा आता १६ राज्यांत तयार झाली आहे. ५४ ठिकाणी बियाणाच्या बँका निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना इथे प्रशिक्षण दिले जाते. ५ लाख शेतकरी अन्नसुरक्षा आणि अन्न स्वायत्तता यात प्रशिक्षित झाले आहेत. शेतकऱ्यांचा माल आता थेट ग्राहकांपर्यंत पोचतो, शेतकऱ्याला योग्य भाव मिळतो. ही चळवळ ‘भूमी’च्या लोकशाही हक्कासाठीची आहे. संस्थेने आता बीज विद्यापीठ – आंतरराष्ट्रीय कॉलेज डून व्हॅलीमध्ये सुरू केले आहे. जैविक, सांस्कृतिक विविधता जपण्याचे ध्येय बाळगणाऱ्या या संस्थेत स्त्रियाच कार्यरत आहेत.

वंदना शिवा स्त्रियांच्या हक्कांविषयी जागरूक आहेत. स्त्रियांचे कुटुंबातील महत्त्व समाज नाकारत असला तरी स्त्रिया कुटुंबासाठी जे करताहेत ते करायचे जर त्यांनी सोडले तर समाज मोडकळीला येईल. स्त्रीचे वास्तव चित्रण त्यांनी आपल्या पुस्तकातून केले आहे. स्त्रियांबद्दलच्या चुकीच्या समजुतींचे त्यांनी आपल्या लिखाणातून निराकरण केले आहे. ‘स्टेइंग अलाइव्ह’ या पुस्तकात त्यांनी तिसऱ्या जगातील स्त्रियांच्या दृष्टिकोनाची स्पष्ट मांडणी केली आहे. भारतातील बहुतेक शेती स्त्रियाच करतात, पण अन्न या विषयावरील धोरण आखणीत त्यांना काहीच स्थान नाही. ही विषमता त्या दाखवून देतात. स्त्रीचे शोषण आणि तिच्यावरचे पुरुषी आधिपत्य याची तुलना त्या पर्यावरणाशी करतात आणि दोन्हीतील साम्य दाखवितात. निसर्ग आणि स्त्री या दोन्हीचे शोषण इतिहास काळापासून होत आले आहे. कदाचित म्हणूनच स्त्रिया या निसर्गाविषयी अधिक संवेदनशील असतात. स्त्री कुटुंबाचे धारण करणारी म्हणून ती निसर्गाला धरून असते. निसर्ग शाश्वत राखायची अंगभूत जाण तिच्यात आहे. वंदना शिवांचा लढा स्त्री आणि निसर्ग दोन्हींसाठी आहे. निसर्गशोषणाविषयी त्या लिहितात, ‘भांडवल वाढते त्या प्रमाणात निसर्ग आटत जातो.’

स्त्रियांकडे नेतृत्व दिले नाही तर मनुष्यजातीपुढे भविष्यात अंधार आहे, असे त्या आग्रहाने सांगतात. ‘इको फेमिनिझम’ म्हणजे पर्यावरण, तंत्रज्ञान आणि स्त्रीवाद यांचा एकमेकाशी असलेला मेळ. या चळवळीच्या त्या प्रवर्तक आहेत. शाश्वत विकास आणि उत्पादनवाढ हवी असेल तर शेतीविषयक धोरण ठरवण्यात स्त्री केंद्रभागी हवी हे त्यांनी ठासून संगितले.

त्यांच्या लढाऊ वृत्तीचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांनी नीम, बासमती, तांदूळ आणि गहू यांच्या स्वामित्व हक्कासाठी बलाढय़ औद्योगिक समूहाविरुद्ध दिलेला यशस्वी लढा. वंदना शिवा अभ्यासू वृत्तीच्या विदुषी आणि कार्यकर्त्यां असल्यामुळे अनेक सरकारी मंडळांवर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांवर त्या सल्लागार आहेत. भूतान देशाने पूर्ण सेंद्रिय शेतीचे धोरण राबविले आहे. वंदना शिवा त्याच्या सल्लागार आहेत.

‘फोर्ब’च्या एका वर्षीच्या अत्यंत प्रभावी स्त्रीवादी स्त्रियांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर त्यांची निवड केली आहे. ‘टाइम’ मासिकाने तर त्यांना ‘पर्यावरण नायक- ‘Environment Hero’ म्हणून त्यांच्या गौरव केला. त्यांची पुस्तकेही वाचनीय आहेत. खरोखरच या युगातील त्या अत्यंत प्रभावशील नेतृत्व आहेत यात संशय नाही.

– उष:प्रभा पागे

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 12:11 am

Web Title: researcher vandana shiva friendship with nature
Next Stories
1 वृक्षगान
2 ओरांगुतानची पालक
3 कीटक संशोधनाचा पाया
Just Now!
X