एकेकाळी पुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा आता दूषण झाल्या आहेत. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. हे चित्र बदलले पाहिजे, असे अनेकांना वाटत होते, त्याच निग्रहाने काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एकत्र आली. पर्यावरणाच्या प्रश्नांची जाण आणि अभ्यास असल्यामुळे शैलजा देशपांडेंच्या संवेदनशील मनाने तर हा संकल्प आपला मानला आणि ‘जीवित नदी संस्थे’ची पालखी आपल्या खांद्यावर घेतली.

जमिनीची मशागत झाली होती, बीज रुजले होते, पण व्यक्त होण्यासाठी अवकाश सापडत नव्हता. अचानक पावसाची सर येऊन जाते, दिशा उजळते. अवकाश गवसतो आणि अंकुर बाहेर फुटतो, अगदी तसेच तर झाले ‘जीवित नदी फाऊंडेशन’चे. निरंजनने मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला काही मित्र मंडळींना बोलावले, कोठे म्हणाल तर येरवडय़ाच्या ‘सलीम अली पक्षी अभयारण्यात’! तेथील नदीकाठाला साक्षी ठेवून निरंजनने सर्वापुढे एक आवाहन केले. (पुढील काळात ते एक आव्हानच ठरणार होते..) ‘‘माझा मुलगा पृथ्वी मुठेच्या या प्रदूषित पाण्यात पोहणार का? कदापि नाही, तुमच्या साक्षीने मी त्याला वचन देतो की येत्या काही वर्षांत तो मुठेच्या निर्मल पाण्यात पोहू शकेल.’’ नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प निरंजनने केला, पण आता एकटय़ाने नाही तर त्याचे सगळे मित्रमंडळही अर्थातच यात सामील झाले.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

इकॉलॉजिकल सोसायटीच्या ‘नॅचरल रिसोर्स मॅनेंजमेंट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या प्रकाश गोळे सरांचे बहुतेक सर्व माजी विद्यार्थी या समूहात होते. आदल्या वर्षी-२०१३ मध्ये प्रकाश गोळे यांचे निधन झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय ज्ञान-विज्ञान रुजवले होते. भवतालातील पर्यावरणीय समस्यांना हात घालावा, असे या सर्व मंडळींना वाटत होते. (ती गोळे सरांना उचित श्रद्धांजली ठरणार होती) या पाश्र्वभूमीवर हा संकल्प म्हणजे ‘नवा अवकाश’ची नवी दिशा ठरली. २०१४ जानेवारीतील ही घटना ‘जीवित नदी फाऊंडेशन’ या संस्थेच्या स्थापनेला कारण झाली.

नदी म्हणजे जीवनधारा. प्राचीन काळी नद्यांच्या काठी संस्कृती नांदल्या. आधुनिक काळात नद्यांवर धरणे झाली, लोकांना नळाने घरी पाणी मिळू लागले. धरणांमुळे नद्या संकुचित झाल्या. त्या प्रवाही, वाहत्या राहिल्या नाहीत. लोकसंख्या वाढत गेली, शहरीकरणाचा वेग वाढला, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश होऊ लागला. नदीचे किनारे नष्ट होऊ लागले, तिचे काठ सिमेंटने बांधले गेले. नदीच्या पात्रातील वाळू अवैधपणे उपसली जाऊ लागली. तिच्या काठांवर, पात्रात बेकायदेशीर बांधकामांना ऊत आला. तिच्यामध्ये प्रक्रिया न करता सांडपाणी, मैलापाणी सोडले जाऊ लागले. उघडय़ावर टाकलेला कचरा तिच्या पात्रात साठू लागला. दूर्गापूजा, गणेशउत्सवात मूर्तींचे विसर्जन नदीत होते. तो साठलेला गाळ पाण्याने विद्रूप झालेल्या अशा नदीपात्रात साठून प्रदूषण करतो. शिवाय कारखान्यांचे दूषित पाणी नदीत येऊन रासायनिक प्रदूषण होते ते वेगळेच. असे किती अत्याचार या पवित्र (?) नदीवर, जिला आपण माता म्हणतो अशा नदीवर करतो. एकेकाळी पुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा आता दूषण झाल्या आहेत.

त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. हे चित्र बदलले पाहिजे असे अनेकांना वाटत होते, त्याच निग्रहाने मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी एकत्र आली, प्राणवायू अभावी मृतप्राय झालेल्या नदीला संजीवनी देण्यासाठी.  पर्यावरणाच्या प्रश्नांची जाण आणि अभ्यास असल्यामुळे शैलजा देशपांडेंच्या संवेदनशील मनाने तर हा संकल्प आपला मानला आणि ‘जीवित नदी संस्थे’ची पालखी आपल्या खांद्यावर घेतली.

शैलजाच्या सोबत होती अदिती, कीर्ति, शीतल, प्रिया, मोनाली, मंजूषा, मनीष, धर्मराज आणि अर्थातच निरंजन- आणि कितीतरी. प्रत्येकाचं कशा ना कशामध्ये अनुभव, अभ्यास होता. आपआपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येकाचा प्रत्यक्ष कामात सहभाग असायचा, पण या सगळ्यांत कुठेतरी जे एक जोडणारे, समन्वय करणारे सूत्र हवे असते ते म्हणजे ‘शैलजा’. तिच्या कोशात शब्द नाही. कितीही आणि कोणतेही काम करायची तिची तयारी असते. प्रश्नाच्या मुळापर्यंत जायची तिची आणि तिच्या टीमची सवय असल्याने नदी ही एक स्वतंत्र स्वायत्त निसर्ग प्रणाली आहे, ती जाणून घेणे नदीसुधार योजनेसाठी गरजेचे आहे आणि माणसाच्या हिताचेही आहे. हा पर्यावरणाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. पुण्याच्या शासकीय नदीसुधार योजनेत हा दृष्टिकोन पुरेसा नाही, तो पर्यावरण पूरक कसा करता येईल याची योजना ‘जीवित नदी’च्या टीमकडे आहे. लोकसहभागाशिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही. लोकांचा नदीशी असलेला संबंध तुटला आहे. गरज आहे लोकांना नदीशी जोडण्याची. हे लक्षात घेऊन कितीतरी उपक्रम या टीमने आयोजित केले. नदीविषयी पोस्टरचे समर्ग प्रदर्शन, नदीकिनारी स्वच्छता मोहीम, नदीकाठी बसून चित्रे काढण्याचा उपक्रम. राष्ट्रीय नदी दिवशी मुठाई उत्सव साजरा करणे इत्यादी. ‘दत्तक घेऊ या नदीकिनारा’ हाही उपक्रम जीवित नदीने लोक सहभागातून हाती घेतला आहे.

महत्त्वाचा ठरलेला उपक्रम- ‘रिवर-वॉक’-नदीकाठी फेरफटका. या दीड तासाच्या नदी प्रभात फेरीत लोकांना नदीच्या जन्मापासून, तिचा इतिहास, भूगोल, तिच्या काठाचा निसर्ग, तिच्या किनाऱ्याचे महत्त्व सांगून आज प्रदूषणामुळे तिची कशी गटारगंगा झाली आहे आणि या प्रदूषणात लोकांचा वाटा असल्याची जाणीव दिली जाते, आपली जीवनशैली बदलली तर घरांमधून नदीत होणारे ७० टक्के प्रदूषण आपण कमी करू शकतो. ही माहिती सर्वसामान्यांना उद्बोधक वाटते. नदीच्या दुरवस्थेला आपण जबाबदार आहोत याचा माणसे आता विचार करू लागली आहेत.

निर्माल्य नदीत टाकले जाते त्याचाही नदी प्रदूषणात मोठा वाटा आहे. त्यासाठी लोकांचे प्रबोधन करणे गरजेचे होते, औंधच्या मुळा नदीच्या काठी असलेल्या विठ्ठल मंदिराबाहेर कुणाच्याही धार्मिक भावना न दुखवता निर्माल्यासाठी खत प्रकल्प करण्यात शैलजा यशस्वी झाली, हा जीवित नदीसाठी महत्त्वाचा टप्पा नक्की आहे.

आपली जीवनशैली विषयुक्त कशी आहे हे आपल्या गावीच नसते. शैलजा आणि निरंजन यांनी त्यासाठी एनसीएलमधील आंतररास्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांची भेट घेऊन त्यांची शिकवणीच लावली म्हणा ना. आपण जी प्रसाधने, टुथपेस्ट, साबण, शांपू, डिर्टजट वापरतो, घर, कपडे, भांडी, फरशी, संडास-मोरी इत्यादीसाठी जी कृत्रिम रसायनयुक्त गोष्टी वापरतो ती आपल्या   सांडपाण्यातून नाल्यात मग नदीत जातात. एक व्यक्ती ३० ते ४० ग्रॅम विविध रसायने रोज वापरते. पुण्याची लोक संख्या ५० लाख धरली तर २ लाख किलो रसायने रोज नदीमध्ये प्रक्रियेशिवाय जाऊन मिळतात. नदीचे पाणी निसर्गचक्रामधे शुद्ध होते खरे, पण त्यासाठी नदीत वाहाते पाणी हवे आणि नदी जिवंत हवी म्हणजे तिच्यात प्राणवायू पुरेशा प्रमाणात हवा. मुठा नदीतील प्रदूषणामुळे तिच्यात प्राणवायू पुरेसा नाही. महत्त्वाचे म्हणजे मानवनिर्मित विषद्रव्ये नदीत शुद्ध होत नाहीत. ती तशीच राहतात आणि एक दुष्टचक्र निर्माण होते. पाण्यातील घटक रसायने पिकांमध्ये शोषली जातात आणि आपल्या अन्न साखळीत प्रवेश करतात. आपल्या सकट सर्व जीवसृष्टीला हानी पोहोचते. यामुळे कर्करोगासारखे रोग, पोटाचे, त्वचेचे विकार, हृदयविकार, लठ्ठपणा, ग्रंथीविकार स्त्री पुरुषांमधील वंध्यत्व असे विकार संभवतात.

हे दुष्ट चक्र भेदायचे कसे? तर आपली जीवनशैली बदलून. घरातून बाहेर जाणाऱ्या पाण्यात विषद्रव्ये रसायने सोडली नाहीत तर आपण घरापासूनच नदी स्वच्छ ठेवायला मदत करू शकतो. जैव विघटनशील, विषद्रव्य विरहित पूर्वापार चालत आलेली घरगुती उत्पादने वापरणे हे त्याचे उत्तर, आपल्याही हिताचे आणि नदीसाठीही हितकारक. यासाठी शैलजा आणि तिच्या टीमने पर्यावरणपूरक घरगुती वापराचा एक संच कीट तयार केले आहे. त्याची माहिती ‘जीवित नदी’च्या संकेतस्थळावर आहे. यात दिलेली कृती वापरून कोणीही घरीसुद्धा ही उत्पादने करू शकेल. पण जीवनशैली बदलायला लोकांना वेळ लागणार, त्यामुळे नदी शुद्धीचे हे काम दीर्घ मुदतीचे आहे. शैलजाचा आता आणखी एक लढा सुरू आहे.

औंधला रामनदी जिथे मुळा नदीला मिळते त्यालगत दोन नद्यांच्या संगमामधील भूभाग म्हणजे अतिशय सुपीक मातीचा ‘दोआब’ प्रदेश निसर्गत: तयार झाला आहे. वृक्षांची इथे दाटी आहे. आल्हाददायक थंड हवा असते इथे. पण इथेही मानवी आक्रमण झाले. नवीन बांधकामांचा राडा रोडा मोठय़ा प्रमाणाबाहेर इथे टाकून दिल्यामुळे इथले पाण्याचे जिवंत स्रोत बुजून गेले. पालिकेच्या विकास योजनेत इथे रस्ता आणि काही इमारती बांधकामाचे नियोजन आहे. हा निसर्गाचा सुंदर ‘दोआब’ स्थानिक रहिवाशांच्या मदतीने वाचवायचा आहे  शैलजाला. हा लढा असमान शक्तींचा आहे आणि तिची मागणी अंतिम मानवी हितासाठी आहे हे नक्की.

ushaprabhapage@gmail.com

chaturang@expressindia.com