23 January 2021

News Flash

जंगलमयी

‘गुरुकुल’ सुरू झाल्यावर काही वर्षांनी सुप्रभा शेषन गुरुकुल परिवारात सामील झाल्या.

सुप्रभा शेषन

उष:प्रभा पागे ushaprabhapage@gmail.com

‘गुरुकुल’ सुरू झाल्यावर काही वर्षांनी सुप्रभा शेषन गुरुकुल परिवारात सामील झाल्या. त्या संचालक पदावर असल्या तरी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात. केरळच्या पेरिया या गावालगत ‘गुरुकुल वनश्री अभयारण्य’ बहरले आहे. निसर्गसंवर्धन आणि निसर्गशिक्षण या हेतूने ‘गुरुकुल’ काम करते. ‘जंगलातील शाळा’ ही कल्पना इथे साकार झाली आहे. रोजच्या सर्व कामांसाठी स्थानिक स्त्रियांची टीम सुप्रभा शेषन यांनी तयार केली आहे. ही टीम पर्जन्य जंगलाची जोपासना करते.

केरळच्या पेरिया या गावालगत ‘गुरुकुल वनश्री अभयारण्य’ बहरले आहे. निसर्गसंवर्धन आणि निसर्गशिक्षण या हेतूने ही संस्था काम करते. ‘गुरुकुल’ची सुरुवात केली ती वोल्फगँग थेऊरकौफ यांनी १९८१ मध्ये. ते जर्मनीहून भारतात आले १९८१ च्या पूर्वी. श्री नारायण गुरू या अध्यात्म मार्गातील भारतीय गुरूंच्या शिकवणीकडे ते आकर्षिले गेले आणि भारत ही त्यांनी आपली कर्मभूमी केली. त्यांनी केरळी स्त्रीशी लग्न केले. जमीन विकत घेतली आणि १९८१ मध्ये शून्यातून इथे त्यांनी ५५ एकर जागेवर लहान आश्रम सुरू करून वृक्षसंवर्धनाचे काम- खरं तर ‘साधना’ सुरू केली. या साधकाला आसपासचे लोक स्वामी म्हणू लागले. या साधनेचे फळ म्हणजे ‘गुरुकुल वनश्री अभयारण्य’.

‘गुरुकुला’च्या जागेवर या आधी चहाचे मळे होते, ते अर्थातच जंगल तोडून केलेले. त्यांनी प्राधान्य दिले ते जंगलाच्या पुनरुज्जीवनाला. पश्चिम घाटातील हजारो प्रकारच्या जाती-प्रजाती त्यांनी इथे लावल्या, जोपासल्या आहेत, त्याही बाह्य़ मदतीशिवाय. अवघ्या १०-१५ वर्षांत तिथे झुडपं, वेली आणि स्थानिक वृक्ष यांची चांगली वाढ झाली. स्थानिक लोक, त्यांची मुले, शालेय मुले यांच्यासाठी निसर्गशिक्षणाची शिबिरेही त्यांनी सुरू केली. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती वाढवणे, जोपासणे, पर्जन्य जंगलाचे संवर्धन, याच्या जोडीला सेंद्रिय भातशेती, मसाल्याचे पदार्थ उत्पादन, पर्यायी ऊर्जानिर्मिती, शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, गोबर गॅस प्रकल्प अशी स्वयंपूर्ण व्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्यांच्या केरळी पत्नीची त्यांना साथ होती. मदतीला स्थानिक आदिवासींना ते घ्यायचे, कारण आदिवासींमध्ये जंगलाचे, निसर्गाचे ज्ञान परंपरेने आलेले असते.

‘गुरुकुल’ सुरू झाल्यावर काही वर्षांनी सुप्रभा शेषन गुरुकुल परिवारात सामील झाल्या. त्या संचालक पदावर आहेत; पण तिथल्या सर्व उपक्रमांत त्या सहभागी आहेत. बाग आणि उद्यान, रोपवाटिका, वनश्री संवर्धन, निसर्ग शिबिरातून शिकवणे, आसपासच्या आदिवासींशी संवाद आणि मित्रभाव जोपासणे, ‘गुरुकुल’च्या कामात त्यांची मदत घेणे आणि त्यांचा, त्यांच्या ज्ञानाचा आदर ठेवणे हे सर्व काही गेली २५ वर्षे त्या करीत आहेत. ‘जंगलातील शाळा’ ही कल्पना इथे साकार झाली आहे. रोजच्या सर्व कामांसाठी स्थानिक स्त्रियांची टीम सुप्रभा शेषन यांनी तयार केली आहे. ही टीम पर्जन्य जंगलाची जोपासना करते. झाडे, प्राणी, कीटक, बुरशी, नेचे सगळे पर्जन्य जंगलचे रहिवासी. या जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी हवे. जंगले टिकली तर पाणी मिळणार. या पृथ्वीवरील जंगलांमुळेच वातावरण निर्माण झाले, जैवावरण आणि पर्जन्यचक्र सुरू झाले. सजीव सृष्टीचे अस्तित्व वनसृष्टीवर अवलंबून आहे. वनस्पतींच्या नैसर्गिक आच्छादनामुळे जमिनीखालील पाण्याचे प्रवाह वाहते राहतात. किती नि:स्वार्थपणे वनस्पती अन्न, पाणी देतात. सजीव सृष्टीतील सर्व घटकांमध्ये प्रेम आणि जीवनाचा उल्हास भरून राहिलेला आहे. गुरुकुल अभयारण्य पश्चिम घाटातील वनस्पतीसृष्टीला वाहिलेली आहे. राखीव पर्जन्य जंगलाच्या शेजारी ५५ एकरांत हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. अस्तित्व धोक्यात आलेल्या प्राण्यांचे- पक्ष्यांचे अधिवास जोपासून त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांचे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या मानवी समुदायाचे हितसंबंध जपणे, इथली हवा, पाणी जमीन आणि सजीव सृष्टी यांच्यातील परस्परसंबंध दृढ करणे यासाठी गुरुकुल प्रयत्नशील आहे. जमिनीची मशागत आणि जंगलांचे पुरुज्जीवन याचे हे प्रायोगिक अभिरूप आहे. यासाठी त्यांचे बहुविध कार्यक्रम आहेत. स्थानिक स्त्रियांना उद्यानविद्या देणे, त्यांना काम आणि मोबदला देऊन आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवणे, जंगलशेती आणि अन्नोत्पादन करणे, निवासी निसर्ग शिबिरे घेऊन निसर्ग संवेदना जागी करणे आणि स्थानिक आदिवासींशी संवाद राखणे. वनशेतीचे उत्पन्न दर वर्षी वाढते आहे. ‘गुरुकुल’ची दूध डेअरी आहे, गोबर गॅस आहे. भात आणि मसाल्याचे पदार्थ, फळ, भाजीपाला उत्पादन यामुळे गुरुकुल स्वयंपूर्ण आहे. जंगल पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नामुळे इथे आता विपुल दोन हजार विविध जाती-प्रजातींच्या वनस्पती नांदत आहेत. पक्ष्यांचे कूजन, कीटकांचा गुंजारव, वाऱ्याचा नाद आणि ओढय़ाच्या झुळुझुळीने इथले वातावरण भरलेले आणि भारलेले असते.

‘गुरुकुल’ सर्व सृष्टीला- पृथ्वी, तिच्यावरील पर्वत, जंगल, नद्या, जमीन, सागर यांना पवित्र मानते. स्थानिक लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर ठेवते. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर’ यांच्या जैवविविधतापूर्ण २५ ठिकाणांमध्ये ‘गुरुकुल’चा समावेश आहे. गुरुकुलला दरवर्षी दोन हजारांहून जास्त लोक भेट देतात. यात शास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, वनस्पती अभ्यासक, तंत्रज्ञ यांचा समावेश असतो. निसर्ग शिबिरामध्ये सहा वर्षांच्या मुलापासून मोठय़ांपर्यंत सर्व जण रमून जातात, कारण तिथले जीवन निसर्गाशी मत्र करते. मुले इथे गवताची झोपडी करतात, जमिनीच्या तुकडय़ावर शेती करतात, हाताने वस्तू बनवतात. कोणी चटया विणते, तर कोणी शिडी, तर कोणी हत्यारे. निसर्गाच्या इतिहासाबरोबर आरोग्य आणि पर्यावरणाची माहिती निसर्गात राहून त्यांना मिळते. रोजच्या जगण्यातील कौशल्य इथे मिळते, त्यामुळे मुले खूश असतात आणि सुजाण पालक आपल्या मुलांना पाठवायला उत्सुक असतात, कारण मुलांना इथे वेगळी सहज स्वाभाविक जीवनदृष्टी मिळते.

२५ वर्षांपूर्वी सुप्रभा शेषन या ‘गुरुकुल’मध्ये आल्या. त्या तिथे संचालक असल्या तरी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात. इथे लहानमोठा असा भेद नाही. संगीताने नादावून जाणाऱ्या सुप्रभा इथल्या निसर्गनादावर लुब्ध आहेत. जंगलाशी असलेल्या तादात्म्यभावाचे वर्णन त्या अशा काव्यमय भाषेत करतात- ‘‘स्टोन नदीच्या संगतीने जंगलात वळणावळणाने जाणारी अरुंद वाट हिरव्याकंच झाडीने झळाळून उठते. या नदीवर प्रकाशाच्या नवनवीन रचना खेळत असतात. सतत काही ना काही पदरात टाकणारी ही वाट मोठी उदार आहे. काही वेळेस ती सुरेल भावपूर्ण सुरावटी तरी ऐकवते किंवा गोष्टी तरी. बहुतेक वेळा ती नव्या कल्पना सुचवते, आठवणी जागवते अन् माझ्या अंगावर उल्हासाच्या लाटा पसरत जातात! पहाट असो, माध्यान्ह वेळ असो किंवा पूर्णचंद्र असो, मी इथेच सापडण्याची शक्यता अधिक. झाडातून वाऱ्याची बासरी वाजत असते, पानापानांतून प्रकाश पाझरत असतो, तीच वेळ या वाटेवरून चालण्याची-  जितकी जास्त मी इथे रेंगाळते तसतसे हे जंगल माझ्यावर पसरत राहाते. त्वचेच्या अणुरेणूंतून जंगल मी अनुभवते. ओढय़ाकाठी ‘आईना’च्या झाडाखाली पाण्यात पाय सोडून मी बसते. किती काळ या झाडाखाली मी घालविला आहे. माझ्या असण्याला आकार देण्यात त्याचाही वाटा आहे. मी, आम्ही या भूमीची लेकरे- आम्हीच वाघ, साप, आम्हीच प्रस्तर, आम्हीच दऱ्याखोरी, ही टेकडी, धुके, पाऊस, चांदणे आम्हीच, आम्हीच जंगल. मी जंगल होते, जंगल माझ्यातून उगवते, रुजते.

फार पूर्वी भूभागावर जंगले होती. जीवसृष्टी तेथे नांदत होती. Biome म्हणजे Bio-home. नैसर्गिक समुदायांचा- जंगल, दऱ्याखोरी, ओढेनाले, मानव आणि मानवेतर यांच्यासह सर्वाचा आसरा म्हणजे जंगल. मी वेगळ्या संस्कृतीतून निर्वासित अशी या जंगलात आले. टेकडीपलीकडील माझे पनीया आदिवासी बांधव हजारो वर्षांपूर्वी इथे आले. हे जंगल असेच टिकले तर मी इथेच मरणार. या सदाहरित जंगलात असंख्य हिरव्या छटा आहेत. आदिवासी म्हणतात, ‘‘आम्ही जंगलची लेकरे, आमचा जीवनक्रम जंगलला पूरक आहे, मारक नाही.’’ एका आदिवासी स्त्रीची निसर्ग संवेदनाइतकी तीव्र, की झाडे बोलताना तिला ऐकू येतात. त्यांच्या भावना तिला कळतात.

निसर्गप्रणालीऐवजी सुप्रभा ‘जीवसृष्टी समूह’ – ‘कम्युनिटी’ असा शब्द वापरते. ‘‘समूहात वाटून घेणे असते, देण्याचे औदार्य असते, उत्साह असतो. लहानथोर असा भेद नसतो. असमानता नसते. इथे आदिवासी

आणि अन्य जीवसृष्टीबरोबर जगणं किती आनंदाचे, समृद्ध करणारे असते. असे जगणे जैवविविधतेलाही पोषक असते. अर्थात

तुम्ही संवेदनशील असाल तरच! इथल्या प्रत्येक झाडाझुडपाला, ओढय़ाला, नदीला, आदिवासींना स्वतंत्र ओळख आहे,

अस्तित्व आहे.’’

परिसरातील टेकडीच्या नैसर्गिक पुनरुज्जीवनाचे त्या वर्णन करतात- ‘‘सुरुवातीला इथे दगडांवर शेवाळ आले, मग गवत उगवले, तणे आली,मुंग्यांनी भुयारी घरे केली, गवताचे बी घरात ओढून नेले. गांडुळे आली, नेचे उगवले. पतंग, फुलपाखरे वावरू लागली.’’.. जंगलाचा अनुभव सुप्रभा असा विविध प्रकारे तनामनाने त्या घेत होत्या. या अनुभवातून नवीन शक्यतांचा जन्म झाला, असे त्या म्हणतात. ‘‘भोवतालची वनसृष्टी सर्वागाने व्यक्त होताना मी बघतेय. त्या सृष्टीला दिलासा आहे की, ‘इथे कोणी आपल्याला बेघर तर करणार नाहीच, उलट इथे आपली अपूर्वाई आहे.’ – प्राणी- पक्षी फळे खाऊन बिया टाकताहेत, त्यातून झाडे उगवत आहेत- जंगल असे मला रोज नवे दिसते, नव्याने जाणवते, त्याची जिजीविषा मला नवी आशा आणि ऊर्जा देते.’’

मूलभूत जगण्याचा अनुभव गुरुकुलात आलेल्यांना मिळतो. इथे आले की बाहेरचे प्रदूषण, संघर्ष, ताणतणाव या सगळ्याचा विसर पडतो. निसर्गसंगतीत जगण्याची एक वेगळी वाट गुरुकुलात आहे हे नक्की.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:01 am

Web Title: suprabha seshan gurukula botanical sanctuary
Next Stories
1 कोळ्याची गोष्ट
2 नदीमय आयुष्य
3 स्वायत्त प्रतिभेची वृक्ष चित्रकार
Just Now!
X