Leading International Marathi News Daily                                  गुरूवार, ८ जानेवारी २००९
राज्य

(सविस्तर वृत्त)

प्रा. के.ज. पुरोहितांना ‘चंद्रपूर भूषण’ प्रदान
चंद्रपूर, ७ जानेवारी/ प्रतिनिधी

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. के.ज. पुरोहित उपाख्य शांताराम यांना यंदाचा ‘चंद्रपूर भूषण’
 
मंगळवारी आयोजित सोहोळय़ात प्रदान करण्यात आला. येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोहोळय़ाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नागपूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत सावरकर आणि प्रभा पुरोहित उपस्थित होते.
कायदेपंडित व तत्कालीन रचनात्मक राजकारणी लोकाग्रणी बळवंतराव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या स्मरणार्थ लोकाग्रणी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ‘चंद्रपूर भूषण’ दिला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणाऱ्या जिल्हय़ातील पाच सुपुत्रांचा आतापर्यंत गौरव करण्यात आला आहे. यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक के.ज. पुरोहित यांची निवड करण्यात आली होती. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते प्रा. के.ज. पुरोहित यांना ‘चंद्रपूर भूषण’ देऊन गौरवण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, आणि मानपत्र असे आहे. प्रा. केशव जगन्नाथ पुरोहित यांचे मूळगाव तत्कालीन चांदा जिल्हय़ातील व सध्या गडचिरोली जिल्हय़ातील चामोर्शी हे आहे. त्यांचे शालेय शिक्षण चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले आहे. अमरावती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मानही त्यांना प्राप्त झालेला आहे. शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त विविध सामाजिक संस्थांमध्येही त्यांनी योगदान दिलेले आहे.तरुणांनी वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन शांताराम यांनी यावेळी केले. नवीन साहित्य वाचनाने लेखक अधिक सक्षम बनतो, असेही ते म्हणाले. साहित्य क्षेत्रात पुरोहित यांचे उल्लेखनीय योगदान असल्याचे पोटदुखे यांनी सांगितले. पुरोहित यांचा ललित लेखनात हातखंड असल्याचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी सांगितले. श्रीकांत सावरकर यांनीही पुरोहित यांचा गौरव केला. याप्रसंगी प्रभा पुरोहित यांचाही साडीचोळी देऊन गौरव करण्यात आला.प्रास्ताविक लोकाग्रणी प्रतिष्ठानचे अॅड. चंद्रकांत देशमुख यांनी केले. मानचिन्हातील मजकुराचे वाचन प्राचार्य मदन धनकर यांनी केले. संचालन राजाभाऊ बोझावार यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्ना जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे, माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे, के.ज. पुरोहित यांचे पुत्र अवधूत पुरोहित, मुलगी मनिषा, विजय देवईकर, श्रीपाद जोशी, विनोद दुर्गपुरोहित, स्नेहांकितचे पदाधिकारी, लोकाग्रणी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्नेहांकितच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलीनवादक पंडित प्रभाकर जोग व त्यांच्या सहकारी कलावंतांचा ‘गाणारं व्हायोलिन’ हा लोकप्रिय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शहरातील बहुसंख्य रसिक श्रोते उपस्थित होते.