Leading International Marathi News Daily
रविवार, १५ फेब्रुवारी २००९

अमेरिकेत सॅन होजे येथे भरणाऱ्या पहिल्यावहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गंगाधर पानतावणे यांचे नाव जाहीर झाले आणि मराठी संमेलनक्षेत्रातील एक रेंगाळत राहिलेला वादग्रस्त प्रश्न झटकन सुटला. खरे तर, आपण सगळेच साहित्यप्रेमी मराठीजनही सुटलो. डॉ. पानतावणे यांना मराठी साहित्यविश्वात मोठीच प्रतिष्ठा आहे, विश्वसनीयता आहे, याचेच ते निदर्शक मानले पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची निवड व्हावी आणि जवळपास त्याच सुमारास मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानतावणे यावेत, हा मोठाच अर्थपूर्ण योगायोग म्हणावा लागेल.
डॉ. पानतावणे व माझे स्नेहसंबंध गेल्या सुमारे ४५ वर्षांचे आहेत. त्यामुळे एक निकटचा मित्र या नात्याने मला त्यांच्या या अध्यक्षपदाबद्दल खूप आनंदही वाटतो आणि अभिमानही! अमेरिका तथा जगातील इतर काही प्रगत देश आणि त्यातील साहित्याचे, विशेषत: मराठी साहित्याचे अभ्यासक व विद्यार्थी या बाबी डॉ. पानतावणे यांना नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे त्यांचा परदेशी मराठी अभ्यासक, संशोधक इत्यादींशी वरचेवर संबंध आला आहे. आपण जाणतोच, की डॉ. पानतावणे हे डॉ. आंबेडकर, धम्म, दलित समाज व समस्या आणि विसाव्या शतकातील आंबेडकरवादी चळवळी यांचे निष्ठावंत अभ्यासक व मीमांसक आहेत. त्यांच्या पंचवीसएक स्वतंत्र व संपादित पुस्तकांतील बहुतेक सर्वाचे आशयविषय हेच आहेत आणि आपण हेही जाणतो, की आजकाल आपल्या देशाची व संस्कृतीची ओळख जगभरच्या समाजाला आहे, ती म. गांधी व डॉ. आंबेडकर या महापुरुषांच्या रूपाने! डॉ. पानतावणे यांना हे नक्कीच माहीत आहे. मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला म्हणूनच या संदर्भात न्याय देण्याची अध्यक्षीय क्षमता त्यांच्यात आहे, असे मला वाटते.
डॉ. पानतावणे यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. (त्यांची जन्मतारीख- २८ जून १९३७). मुळात ते नागपूरचे! नागपूर
 

महाविद्यालयातील विद्यार्थी. पुढे औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. इथेच माझा त्यांच्याशी १९६४च्या सुमारास परिचय झाला. मिलिंद कॉलेजचा नागसेन वनाचा परिसर हा त्या काळात तरी एक मंतरलेला आसमंत होता. डॉ. आंबेडकर, म. भि. चिटणीस, भालचंद्र फडके हे तिथे होते. नंतर म. ना. वानखेडे होते. मे. पुं. रेगेही तिथे असल्याचे कळते. या नागसेन वनाने पानतावणे घडले, मी घडलो, ल. बा. रायमाने घडले. प्र. ई. सोनकांबळे, योगिराज वाघमारे, वामन निंबाळकर, यशवंत मनोहर यांसारखे साहित्यिक घडले. खूप व्यक्ती खूप प्रकारे घडल्या. विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रमुख डॉ. सुखदेव थोरात हेही नागसेन वनाचे असल्याचे परवा समजले. या तत्कालीन नागसेन वनाचे सुंदर वर्णन पानतावणे यांनीच एका लेखात केले आहे : ‘औरंगाबादच्या नागसेन वनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पदचिन्हे पाहिली, त्यांची बुलंद वाणी ऐकली, त्यांचे क्रांतिकारी विचार ऐकले आणि सारा आसमंत भारावून गेला.. खेडय़ापाडय़ांतून शिकण्याच्या जिद्दीने आलेली मुले जीवनाचा नवा अर्थ शोधू लागली. चार भिंतींतले शिक्षण त्यांना अपुरे वाटत होते.. ज्यांच्या पूर्वजांनी कधी लेखणी पाहिली नाही, ज्यांनी कधी अक्षरे गिरवली नाहीत, अशा घरांतून आलेल्या मुलांना आता अक्षरांचा सुगंध येऊ लागला होता.. कोणी कविता लिहिली, कुणी कथा, कुणी नाटक, कुणी कादंबरी! आंबेडकरी मनोविश्व आकारू लागले..’
त्या सर्जनशील उत्थानपर्वाच्या मनोविश्वाला म. ना. वानखेडे यांच्याप्रमाणेच पानतावणे तथा काही सहकारी प्राध्यापक यांनी तेव्हाच अचूकपणे ओळखले आणि त्या दलित सर्जनाच्या उधाणाला वाव देण्यासाठी, उत्तेजन व मार्गदर्शन करण्यासाठी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाची अवघड धुरा आपल्या खांद्यावर घेतली. लो. टिळक-आगरकरांच्या काळापासून पुण्यातील फर्गसन कॉलेजचा परिसर हा जसा स्वातंत्र्यवेडय़ा मुला-मुलींना प्रेरणा देणारा, घडवणारा होता, तद्वतच मिलिंद कॉलेजचा १९६०च्या दशकातील नागसेन वनाचा परिसर हा आंबेडकरवादी दलितमुक्तीचा सर्वागीण ध्यास मुला-मुलींमध्ये निर्माण करणारा होता.
गेली चाळीस वर्षे ‘अस्मितादर्श’, डॉ. पानतावणे आणि दलित साहित्य, संस्कृती व समाज यांचे ऐतिहासिक महत्त्वाचे समीकरण सिद्ध होत गेले आहे. नवसाहित्याच्या संगोपन-संवर्धनात ‘सत्यकथे’चे जे स्थान आहे, तेच आधुनिक दलित साहित्याच्या संगोपन-संवर्धनात इतरही काही नियतकालिकांबरोबरच, पण मुख्यत: ‘अस्मितादर्श’चे आहे. या प्रकारची नियतकालिके चालवणे फक्त काही एका ध्येयवादी भूमिकेलाच शक्य असते. डॉ. पानतावणे यांच्यापाशी स्वच्छपणे समजलेला आंबेडकरी ध्येयवाद आहे व साहित्य म्हणजे काय याची त्यांना तेवढीच स्वच्छ जाणीवही आहे.
आंबेडकरी ध्येयवादाने एक नियतकालिक विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सातत्याने चालविणे, त्याच ध्येयवादाने संशोधन करणे, वैचारिक व ललित साहित्यनिर्मिती करणे, साहित्यसमीक्षा करणे, साहित्यसंपादन करणे आणि विलक्षण उलटसुलट कल्पनांनी, विचारांनी अहोरात्र आंदोलत राहिलेल्या साहित्यक्षेत्रात तथा सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत स्थिरपणे उभे राहणे या सर्व गोष्टी आपण आज समजतो तेवढय़ा सरळ, सोप्या नव्हत्या. या सर्व चाचण्यांत पानतावणे उत्तीर्ण झाले आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील दलित व दलितेतर सर्जनशील क्षेत्रे तशी एकमेकांपासून अलग करता येणार नाहीत, हे उघडच आहे. पण तरीही कधी कधी वाटते, त्या काळातील व आजही दलित सर्जनशील परिसरातील ताणतणावांची रंगरूपे तुलनेने दलितेतर क्षेत्रातील तशा ताणतणावांपेक्षा अधिक बोचरी होती. डॉ. पानतावणे आणि त्यांच्यासारख्याच इतरही अनेक आंबेडकरी ध्येयवादी लोकांना या वस्तुस्थितीला तोंड देतच काम करावे लागले यात शंका नाही.
तथापि, मला नेहमीच जाणवत राहिले, की डॉ. पानतावणे हे मुख्यत: हाडाचे साहित्यप्रेमी आहेत, सारस्वत आहेत. कथा-कविता-कादंबरी-नाटक अशा साहित्याचे जग हेच त्यांचे खरेखुरे जग आहे. त्यांचे वाचनही चौफेर आहे. धर्म-जाती-देश-निरपेक्ष अशा ‘साहित्यिक’ या भूमिकेवरच ते प्रेम करीत आले आहेत. त्यांचे ‘स्मृतिशेष’ हे पुस्तक पहा. या स्मृतिकोशात अनेक वृत्तिप्रवृत्तींचे, विचारप्रणालींचे साहित्यिक आहेत. विचारवंत आहेत. ‘दुसऱ्या पिढीचे मनोगत’ या ग्रंथातील लेखावरून पानतावणे यांच्या खुल्या स्वागतशील संस्कारग्रहणाची व जडणघडणीची कल्पना येते. या जन्मजात शब्दवेडाने, वागर्थाच्या रसिकतेने आणि वाङ्मयीन अभिरुचीने डॉ. पानतावणे यांचे एका उदार, स्वागतशील, सुजाण अशा सुसंस्कृत माणसात रूपांतर केले आहे. डॉ. पानतावणे यांचा हा सुसंस्कृतपणा मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा व वैचारिकतेचा एक अंगभूत घटक वाटतो. त्यांचे वक्तृत्व ऐकताना एका बाजूने त्यांच्या अभिजात भाषाशैलीचा प्रत्यय येत राहतो व दुसऱ्या बाजूने संयत समंजस विवेकशीलतेची जाणीव होत राहते. साहित्याचे वेड हे माणसाला, पुष्कळदा त्याने स्वत:च स्वीकारलेल्या इतर काही वेडाच्या वेडय़ावाकडय़ा वळणांना आळा घालून त्याला एका सुसंस्कृतपणाच्या कक्षेत आणून सोडते. विशुद्ध साहित्यसृष्टी, साहित्यप्रेम हे माणसाला धर्म, विचारप्रणाली इत्यादींच्या महत्त्वांची मर्यादा कळत-नकळतपणे सूचित करून जाते, जाणवून देते. माणसाला माणसांचा लळा लावते.
डॉ. पानतावणे यांचा मला जाणवलेला सुसंस्कृतपणा यासारख्या प्रकारचा असावा! खरे तर, हा सुसंस्कृतपणा, ही वैचारिक-भावनिक-भाषिक प्रगल्भता एक स्वतंत्र अभ्यासविषय ठरावा, कारण असा सुसंस्कृतपणा विविध क्षेत्रांत विविध प्रकारच्या ध्येयवादाने जगणाऱ्या व लढणाऱ्या काही व्यक्तींत आढळून येतो. स्वत:ची भूमिका न सोडता इतरांच्या भूमिकांशी समरस होऊ शकणारी व त्यांना न नाकारणारी ही ‘सविकल्प’ समाधी म्हणजेच मी म्हणतो तो सुसंस्कृतपणा! अशा सर्वच व्यक्ती साहित्यप्रेमी असतात असे नाही. मग हा सुसंस्कृतपणा येतो कुठून? कसा? कदाचित महाराष्ट्राच्या मध्ययुगीन संतपरंपरेतून सहिष्णू उदारमतवाद झिरपत आला आहे, मात्र आजकाल तो आटलासे वाटते.
आंबेडकरी ध्येयवाद, अस्मितादर्श व पानतावणे ही युती अतूट आहे, असे वाटते. ‘अस्मितादर्श’सारखी नियतकालिके ही विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीची, आव्हानांची गरज म्हणून निर्माण होतात. समाजशील व संवेदनशील अशा तरल व्यक्तींना इतिहासाची अशी आव्हाने कधी स्पष्टपणे, तर कधी अंधूकपणे जाणवतात व मग त्या व्यक्ती कार्यप्रवृत्त होतात. इतिहास बदलला, की नियतकालिकांसारखी त्याची विशिष्ट अपत्ये आपली प्रस्तुतता हरवू लागतात. या सर्व गोष्टी डॉ. पानतावणे जाणतातच.
आता डॉ. पानतावणे एका मोक्याच्या टप्प्यावर उभे आहेत. अमेरिकेतील मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ते आता आहेत. त्यांनी आजवर निष्ठेने जपलेले साहित्यप्रेम, आंबेडकरी ध्येयवाद आणि र्सवकष सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाची आकांक्षा या सर्व आंतरिक मूल्यप्रेरणांना तसेच एकूण आधुनिक मराठी साहित्याला कदाचित एका नव्या वैश्विक परिप्रेक्ष्यात पाहण्याची किंवा त्या मूल्यप्रेरणा व आधुनिक मराठी साहित्य यांना तशा नव्या वैश्विक परिप्रेक्ष्यात दिसण्याची संधी त्यांना लाभेल, लाभण्याची शक्यता आहे.
त्यांचा एक मित्र म्हणून, म्हणूनच मला डॉ. पानतावणे अधिक मोठे मोठे होत गेल्याचे पाहण्याची इच्छा आहे. महाराष्ट्राने मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा रास्त सन्मान केला आहे. त्यांचे अध्यक्षीय विचार व कारकीर्द आपणा सर्वाना उद्बोधक व मार्गदर्शक ठरून त्यांनी सर्वथा यशस्वी व्हावे, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.