Leading International Marathi News Daily                                  रविवार , १५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

राजा खूश झाला!
रवींद्र पाथरे, कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी

वृद्ध नाटय़कलावंतांच्या मानधनात घसघशीत वाढ (आतापेक्षा दुप्पट मानधन), गरजू कलावंतांच्या गृहयोजनेस भूखंड देण्याचा निर्णय महिनाभरात, सांस्कृतिक कार्य विभागासाठी प्रतिवर्षी ५० कोटी रु.ची तरतूद, कलावंतांसाठी सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा देण्याकरिता स्वतंत्र इस्पितळ उभारण्यासंदर्भात चर्चेची तयारी, तसेच बीड-परळी रेल्वेमार्गासाठी राज्य शासनातर्फे पाठपुरावा करून २०० कोटी रु.च्या या प्रकल्पातील राज्याचा हिस्सा अग्रक्रमाने देण्याची घोषणा.. अशा चौफेर आश्वासनांची आणि घोषणांची खैरात करीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत आणि बीडवासीय या दोघांनाही येथे भरलेल्या ८९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात खूश केले.
बीड येथे भरलेल्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्या वेळी ते बोलत होते. राजकारण्यांचे संपूर्ण वर्चस्व असलेल्या या संमेलनात ऐनवेळी अर्धाडझन मंत्री अनुपस्थित राहिले. हिंदी चित्रसृष्टीतील तारे-तारकांना संमेलनास आणण्याचे संयोजकांचे प्रयत्न तोकडे पडल्याने सामान्य रसिकांचा थोडासा विरस झाला, तरी बीडच्या सुपुत्राने- अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी खास मायबोलीत केलेल्या खुमासदार आणि हृद्य भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
वर्तमान नाटय़संमेलनाध्यक्ष रमेश देव यांची तब्येत अचानक बिघडल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवे संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांना संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सुपुर्द करण्यात आली; परंतु दुपारी पाऊणच्या सुमारास रमेश देव अकस्मात संमेलनस्थळी आल्याने पुनश्च एकदा संमेलनाध्यक्षपदाचा पदभार सुपुर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला.

चौघडे आणि तुताऱ्यांच्या निनादात नाटय़दिंडीचे जोरदार स्वागत
बीड, १४ फेब्रुवारी/वार्ताहर

पडदा उघडला आणि चौघडे आणि तुताऱ्यांच्या निनादात हत्ती, घोडे, उंटासह नाटय़दिंडीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर रांगोळी, जागोजागी औक्षण, देशभक्तीपर गीतांच्या गजरात विविध शाळांतील मुले आणि देखाव्यांनी नाटय़दिंडी मार्गस्थ झाली त्यावेळी हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन स्वागत करीत सामील झाले.बीड शहरात शनिवारी सकाळी ८.३० वा. जिल्हा क्रीडा संकुलाच्या

 

मैदानावरून नाटय़दिंडीला सुरुवात झाली. संकुलाच्या प्रवेशद्वाराचा पडदा उघडताच ढोल, ताशा, तुताऱ्यांच्या निनादात वाद्यांच्या गलबलाटात नाटय़ संमेलन अध्यक्ष रामदास कामत यांनी श्रीफळ वाढवून आणि नटराजची मूर्ती असलेली पालखी उचलली. रामदास कामत, परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, स्वागताध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, कार्याध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, दीपा क्षीरसागर, दिलीप प्रभावळकर, स्मिता तळवलकर यांच्या समवेत दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीसमोर एक हत्ती, पाच घोडे, पाच उंट त्याचबरोबर विविध शाळांतील मुलींचे लेझिम पथक, पाच देखाव्यांच्या गाडय़ा तर शाळा महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी आणि नाटय़रसिक सामील झाले होते. सुभाष रोडमार्गे दिंडी माळीवेसला पोहोचली त्यावेळी पारंपरिक बंजारा वेशातील मुलींनी नृत्य केले. तर जागोजागी महिलांनी रांगोळ्या काढून दिंडीतील कलावंतांचे औक्षण केले. प्रमुख चौकात बलभीम, कारंजा, शिवाजी चौक, राजुरी वेस येथे पुष्पवृष्टी करण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या कलावंतांना आपल्या कॅमेऱ्यात व मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकजण धडपडत होते, तर कलावंतही तेवढय़ाच उत्स्फूर्तपणे चाहत्यांना साथ देत होते. रस्त्याच्या दुतर्फा उभा राहिलेल्या मुली त्याचबरोबर वृद्ध महिला व रसिकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेले. व्यापाऱ्यांनी दुकानासमोर येऊन कलावंतांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देत उत्स्फूर्तपणे स्वागत केले. दिंडी शहरातील नागरिकांचे स्वागत स्वीकारीत शिवाजी चौकात पोहोचली. त्यावेळी गर्दीने उच्चांक केला व सर्व रस्ते माणसांनी फुलून गेले. दिंडीतील देखाव्यातील संत ज्ञानदेव व चांगदेव या बांधवांची भेच हे आकर्षण ठरले, तर साई दरबाराची प्रतिकृती आणि संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांना खास रथातून दिंडीत सहभागी करण्यात आले होते.

बीड नाटय़संमेलनात मुख्यमंत्र्यांची खैरात
रवींद्र पाथरे, कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी

नाटय़ परिषदेने जे जे प्रश्न शासनासमोर मांडले, ते ते सोडविण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केले. भविष्यातही करू; परंतु नाटय़कलावंतांनीही मुंबई-पुण्याच्या पलीकडे असलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील सामान्य रसिकांची सांस्कृतिक आणि कलात्मक भूक भागविण्यासाठी आपली कला त्यांच्यासमोर सादर करायला हवी. त्यासाठी जिल्हा पातळीवर नाटय़गृहे आणि तालुका पातळीवर अ‍ॅम्पी थिएटर बांधण्याचा शासनाचा संकल्प आम्ही जोमाने राबवीत आहोत. तेव्हा कलावंतांनीही पुढे येऊन आम्हा रसिकांची कलेची भूक भागविली पाहिजे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
नाटय़कलावंतांची अत्यल्प उपस्थिती असलेल्या ८९व्या नाटय़संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास बीडवासीयांनी तुडुंब गर्दी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक नाटय़ तसेच साहित्यसंमेलनाला शासन २५ लाख रु.चे अनुदान देते; परंतु ते अपुरे पडले. याकरिता कॉर्पोरेट सेक्टरनेही निधी उभारण्याच्या कामी साहाय्य केले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले, की ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्र, शासन आणि नाटय़-साहित्य क्षेत्रातील धुरिण यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सांस्कृतिक क्षेत्रास आर्थिक हातभार लावल्यास कॉर्पोरेट क्षेत्रास करांमध्ये सवलती देण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दाखविली.
अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी पुढील नाटय़संमेलन अमेरिकेतील न्यू जर्सी येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा आपल्या भाषणात केली. त्याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री म्हणाले की, आता साहित्य व नाटय़संमेलने परदेशांतही भरविली जात आहेत याचा मला मनापासून आनंद होत आहे. आजच्या ग्लोबल वर्ल्डमध्ये आम्हीही कोणत्याही बाबतीत कमी नाही, हेच यातून सिद्ध होते. परदेशस्थ महाराष्ट्रीय मंडळींची सांस्कृतिक भूक शमविण्यासाठी दर दोन वा तीन वर्षांनी मॉरिशस, तसेच अन्यत्र जगभरात साहित्य व नाटय़संमेलने भरवावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. त्याकरिता शासन सर्वतोपरी साहाय्य करील, असे तोंडभरून आश्वासनही त्यांनी दिले.मराठवाडय़ातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या भागात रेल्वेचे जाळे विणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने बीड-परळी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रेल्वेच्या येत्या अर्थसंकल्पात समाविष्ट केला जाईल आणि २०० कोटी रु.च्या या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या वाटय़ाचा खर्चाचा हिस्सा आम्ही उचलायला तयार आहोत, असेही ते म्हणाले. नाटय़संमेलनाचे स्वागताध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात मराठवाडय़ातील समृद्ध कलापरंपरेचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘राजकारण’ नावाच्या नाटकात गेली ३०-३५ वर्षे विविध भूमिका वठवीत असताना लोकांची विकासाची अनेक कामे केली; परंतु मानवी जीवनात केवळ भौतिक समृद्धीमुळेच माणूस समाधानी होतो असे नाही, तर त्याच्या मनाला, आत्म्याला शांती देणाऱ्या गोष्टीही त्याला हव्या असतात. ही त्याची वेगळी भूक असते. संतसज्जन, साहित्यिक आणि कलावंतांच्या सत्संगानेच ही भूक भागते. म्हणूनच आम्ही बीडमध्ये नाटय़संमेलनाचा घाट घातला.बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी, नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देऊन, राज्य शासनाने त्याकरिता आर्थिक, तसेच अन्य साहाय्य देण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.याप्रसंगी गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रांत यशोशिखर गाठलेल्या अभिनेते दिलीप प्रभावळकर, भार्गवी चिरमुले, नृत्यांगना संयोगिता पाटील, माया खुटेगावकर, तंत्रज्ञ अनिरुद्ध भावे, बीडचे सुपुत्र मकरंद अनासपुरे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, बीडचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, मावळते संमेलनाध्यक्ष रमेश देव यांचीही या वेळी भाषणे झाली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार मनोहर जोशी, खासदार सुप्रिया सुळे यांनी नाटय़संमेलनास शुभेच्छा संदेश पाठविले होते. त्यांचे वाचन अभिनेते अतुल परचुरे आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांनी केले.
प्रारंभी, आज सकाळी शहरभरातून भव्य नाटय़दिंडी निघाली; त्यात मराठवाडय़ाच्या समृद्ध कला व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारे देखावे, लेझीम पथके, लोककलांचे दर्शन घडविणाऱ्या कलावंतांचा सहभाग होता. संमेलनाचा प्रारंभ डॉ. दीपा क्षीरसागर दिग्दर्शित देशभक्तीपर गीत-संगीत- नृत्याच्या कार्यक्रमाने झाला.

‘म्युझिकल ड्रामा स्कूल’ हवे! -रामदास कामत
कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड) १४ फेब्रुवारी / नाटय़-प्रतिनिधी

आज संपूर्ण मरगळ आलेल्या संगीत रंगभूमीला संजीवनी देऊन तिचे पुनरुज्जीवन करावयाचे असेल तर दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या (ठरऊ)धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय पातळीवर ‘स्कूल ऑफ म्युझिकल ड्रामा’ (रटऊ)स्थापन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षण व्यवसायाभिमुख असेल तरच विद्यार्थ्यांचा त्याकडे ओढा असतो, ही बाब ध्यानी घेऊन या म्युझिकल ड्रामा स्कूलमधल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक रंगमंडळ (रेपर्टरी) उभारावी आणि या रंगमंडळातर्फे गुणी विद्यार्थ्यांकरवी जुन्या-नव्या सुविहित संगीत नाटकांचे प्रयोग महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही करावेत, अशी सूचना ८९ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली.
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट असलेल्या रामदास कामत यांनी आपले संपूर्ण अध्यक्षीय भाषण संगीत रंगभूमीचा ‘काल, आज आणि उद्या’चा विस्तृत परामर्श घेण्याभोवतीच गुंफले होते. त्याच वेळी तिच्या आजच्या दुखण्यावर त्यांनी काही विधायक उपायही सुचविले. आजवरच्या अध्यक्षीय भाषणांचा ठरीव साचा बाजूला ठेवून रामदास कामत यांनी आपल्याला ज्ञात असलेल्या आणि ज्यावर त्यांनी प्रत्यक्ष काम केले आहे, अशा संगीत रंगभूमीबद्दलच मतप्रदर्शन करून आपल्या विवेकाचं दर्शन घडवलं. ‘‘संगीत नाटकात अपरिहार्यपणे भावपरिपोषासाठी आणि नाटक पुढे नेण्यासाठी आवश्यक तेवढेच संगीत असावे,’’ अशी भूमिका मांडून त्यांनी, ‘याकरिता नवी संगीत नाटकं लिहिणारे लेखक, तसेच तरुण गायक नट मंडळी निर्माण करण्यावर भर द्यायला हवा,’ असे सांगितले. संगीत नाटकांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्याकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी संगीत एकांकिका स्पर्धा आणि संगीत बालनाटय़ स्पर्धा यांसारखे उपक्रम राबवायला हवेत, असेही ते म्हणाले.

‘व्यावसायिक रंगभूमी जगविण्याची जबाबदारी सर्वाचीच’
कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी

व्यावसायिक रंगभूमी जगविण्याची, ती प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी केवळ प्रेक्षकांची- कलावंतांची नसून, सर्वच घटकांची आहे. अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या पहिल्या दिवसातील एकमेव परिसंवादामध्ये सर्वच वक्तयांनी असा सूर लावला. मुख्य सभामंडपातील आद्यकवी मुकुंदराज रंगमंचावर आज सायंकाळी ‘व्यावसायिक रंगभूमी जगविण्यासाठी प्रेक्षक व कलावंतांची जबाबदारी’ या विषयावर परिसंवाद झाला. त्याचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी केले. अजय अंबेकर, जयंत पवार, राम रानडे, अशोक पाटोळ, दिलीप शेंडे, प्रा. शशिकांत चौधरी, शिवराम कुलकर्णी, किशोर फुले, बापू लिमये सहभागी झाले होते.रंगभूमी जगविण्याची जबाबदारी लेखक, कलावंत, निर्माता, समीक्षक, प्रेक्षक अशा सर्वच घटकांची आहे. सशक्त व्यावसायिक रंगभूमीसाठी या सर्वानीच जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे श्री. डहाळे म्हणाले. संहिता महत्त्वाची आहे, असा मुद्दा मांडून श्री. अंबेकर म्हणाले की, मराठी व्यावसायिक रंगभूमीची जुनी जादू हरपली आहे.डॉ. चौधरी म्हणाले की, जागतिकीकरणाच्या परिणामी या क्षेत्रातही व्यवहारवाद आला आहे. श्री. किशोर फुले म्हणाले की, टीव्हीवरच्या मालिका म्हणजे ‘व्हच्र्युअल’ नाटक आहे. उत्तम, दर्जेदार नाटकांना प्रेक्षक अवश्य प्रतिसाद देतात.लिहिणाऱ्याला, करणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला अस्वस्थ करते तेच खरे नाटक. ही जबाबदारी सर्वाचीच आहे, असे राम रानडे म्हणाले. श्री. बापू लिमये म्हणाले की, या व्यवसायाशी निगडित सर्वच घटकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. सर्व जबाबदारी प्रेक्षकांवर ढकलू नका, असे बजावून श्री. कुलकर्णी म्हणाले की, यातील चळवळ संपली असून केवळ व्यवसाय उरला आहे. नाटकातील वैविध्य संपल्याची टिका श्री. पवार यांनी केली.

मकरंद अनासपुरेच्या ‘गोष्टी गावाकडील..’
सतीश कुलकर्णी
केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १४ फेब्रुवारी

अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या शानदार उद्घाटनासाठी जमलेल्या हजारो रसिकांना आज जिंकले अभिनेता मकरंद अनासपुरे याने! उद्घाटनाच्या या सोहळ्यात बाजी मारून गेला तो बीडचा हा सुपुत्रच!
‘‘माझ्यावर अभिनयाचे संस्कार झाले ते याच आणि याच मातीतून,’’ असी कृतज्ञता व्यक्त करीत मकरंदने ‘गोष्टी गावाकडील मी वदता गडय़ा रे’ असाच सूर लावला. त्यात हळवेपण होते, कृतकृत्यतेची भावना होती, गावाबद्दल आणि गाववाल्यांबद्दल ओसंडून वाहणारे प्रेमही होते.
‘‘आज एक परिक्रमा पूर्ण झाली,’’ अशी सुरुवात करून मकरंद म्हणाला, ‘‘चंपावती शाळेचा, बलभीम कॉलेजचा मी विद्यार्थी. तेथेच अभिनयाचे धडे गिरविले. या गावातून १९९० मध्ये मी मुंबईस जाण्यासाठी निघालो. तेथे स्थिरावलो. नायक बनण्यासाठी एक तप लागलं. बीडमध्ये, मुंबईमध्ये भेटलेल्या माणसांनी मला समृद्ध केले, याचे मला भान आहे.’’ ‘‘माझी भाषा तशीच राहिली; तीच राहिली. भारतातून ‘इंडिया’मध्ये गेल्यावर ती बदलली नाही. गावाची, मातीची भाषा सोडण्यात फार शहाणपण नाही, हे उमगलेला मी माणूस आहे,’’ असे भावनोत्कट उद्गार मकरंदने काढले आणि बीडकरांनी त्याला समरसून दाद दिली. ‘‘या मातीचं प्रेम माझ्यावर आहे. माझे पाय जमिनीवर आहेत; ते तसेच राहोत,’’ अशीही भावना त्याने व्यक्त केली. त्याच्या १३ मिनिटांच्या भाषणात किस्से होते, धडपडीची कहाणी होती, गमती होत्या आणि होता मराठवाडी मातीचा सार्थ अभिमान!

‘माणसाच्या समाधानासाठी मनाला, आत्म्याला सुखावणाऱ्या गोष्टी हव्यात’
बीड, १४ फेब्रुवारी/वार्ताहर
अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे स्वागताध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या भाषणाचा संपादित भाग..
जग ही रंगभूमी आहे आणि आपण सारे त्यातील कलावंत आहोत आणि तो जगन्नियंता दिग्दर्शक आहे, अशा अर्थाचे भाष्य शेक्सपीअर या महान नाटककाराने केले आहे. त्या भाष्याप्रमाणे राजकारण नावाच्या नाटकात गेली ३०-३५ वर्षे विविध भूमिका पार पाडीत असताना अनेकांशी जवळचे नाते निर्माण झाले.
एक गोष्ट जाणवत असे की, माणूस समाधानी होतोच असे नाही. मनाला, आत्म्याला सुखावणाऱ्या व शांती देणाऱ्या गोष्टी त्याला पाहिजे असतात. ही त्याची वेगळी भूक असते, ती भागवण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे. संत सज्जन, साहित्यिक आणि कलावंतांच्या सत्संगाने हे साध्य होऊ शकते हे कळू लागले आणि ध्यानी-मनी नसताना नाटय़ संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड झाली आणि या संधीचे सोने जरी नाही तरी केशर करून सर्वाना आनंद देण्याचा मनोमनी संकल्प सोडला.
बीड हा बराच काळ निजाम अंमलाखाली असलेला जिल्हा. तरीही इथल्या नाटय़कर्मीनी व रसिकांनी नाटय़कला जपली, जोपासली. बीड जिल्ह्य़ाचा नाटय़ इतिहासही समृद्ध आहे. पाटांगण, शिरसाळा, विडा, गेवराई, कुसळंब इत्यादी देवस्थानच्या उत्सवांतून लळीत सादर करण्याची प्रथा गेल्या ४०० वर्षांपासून आहे. त्यातून नाटय़ फुलत गेले. जिल्ह्य़ातील कलावंतांमध्ये कै. गोपाळबुवा कानिटकर, कै. मांडे गुरुजी, कै. राम मुकादम, श्रीमती ललिता मुकादम, वामन केंद्रे, मकरंद अनासपुरे, डॉ. दिलीप घारे, शशिकांत बऱ्हाणपूरकर, मधुकरराव गोडसे या कलावंतांनी नाटय़ क्षेत्राला वैभवाच्या शिखरावर नेले आहे. वामन केंद्रे व मकरंद अनासपुरे या कलावंतांनी तर मराठी मनाला भुरळ घातली आहे. मत्स्यगंधा हे संगीत नाटक बीडच्या रंगकर्मीनी सादर करून प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. यात मांडे बंधू, श्रीराम व रश्मी बडे यांचे मोठे योगदान होते.
नाटक हे संवादाचे सशक्त माध्यम आहे. या माध्यमाची ताकद महात्मा ज्योतिबा फुलेंनी ओळखली आणि सामाजिक परिवर्तनाच्या एका नाटकाचा प्रारंभ झाला हा इतिहास आहे. बहुजन समाजाला, दलित समाजाला १००-२०० वर्षांपूर्वी मनोरंजनाचे व प्रबोधनाचे कुठलेही माध्यम नव्हते. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक जलसे, आंबेडकरी जलसे यांतून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य त्या काळात झाले. गोंधळ, भारूड यांतून सगळा समाज ढवळून निघाला.
आजकाल मनोरंजनाच्या इतर माध्यमांची उपलब्ध कमी खर्चामध्ये घरबसल्या होत असल्यामुळे नाटकाकडे ओढा कमी होत आहे. संगीत रंगभूमीचा पुनर्वैभवाचा काळ परत आणण्याच्या दृष्टीने नव्या मराठी संगीतकारांना प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे. उद्याचा भारत घडविण्याची प्रचंड शक्ती बालकांत आहे. बालनाटय़ चळवळ सुयोग्य दिशेने गतिमान करावी.
नाटय़ चळवळीतील सर्व प्रवाहांसाठी स्पर्धाचे तालुकास्तर, जिल्हा, प्रांत असे आयोजन व्हावे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून धोरणात्मक निर्णय म्हणून तालुकास्तरावर छोटे नाटय़गृह ही कल्पना त्वरेने अमलात येण्याची आवश्यकता आहे. राज्य नाटय़ स्पर्धेचे केंद्र बीडच्या स्व. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात सुरू करावे.

नाटय़ संमेलनात आज ‘उंच माझा झोका’
लातूर, १४ फेब्रुवारी/वार्ताहर

बीड येथे होणाऱ्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनात लातूर येथील सूर्योदय सांस्कृतिक कला मंचची अ‍ॅड्. शैलेश गोजमगुंडे लिखित मराठी एकांकिका ‘उंच माझा झोका गं!’चा प्रयोग उद्या (रविवार) सायं. ४ वा. यशवंतराव चव्हाण नाटय़ संकुल येथे होणार आहे. दर संमेलनात अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध स्पर्धामध्ये विजेत्या एकांकिकांपैकी निवडक एकांकिकांचे प्रयोग सादर होत असतात. यात लातूरच्या ‘उंच माझा झोका गं!’ या नाटकाचा समावेश आहे. या एकांकिकेचे लेखन-दिग्दर्शन शैलेश गोजमगुंडे यांनी केले असून प्रकाशयोजना संजय अयाचित, सुधीर राजहंस, नेपथ्य लक्ष्मण वासमोडे, संगीत राजकुमार गोजमगुंडे यांनी, तर प्रमुख भूमिका वैभवी सबनीस, जान्हवी सबनीस, संतोष साळुंके, रेश्मा माने, बालाजी सूळ, बालाजी शेळके, गोविंद जोशी, दीपक गायकवाड, शिल्पा जाधव, प्रिया जाधव आदींनी साकारल्या आहेत.

४८ व्या महाराष्ट्र नाटय़महोत्सवात आज अचलायतन
मुंबई, १५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अचलायतन हे नाटक सादर करणारी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) ही संस्था प्रा. भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू आणि सहकाऱ्यांनी १९५१ मध्ये स्थापन केली. या संस्थेने राज्य नाटय़ स्पर्धेच्या पहिल्या वर्षांपासून उत्तमोत्तम नाटके स्पर्धेत सादर केली आहेत. आजवर या संस्थेने (पीडीए) पंचाहत्तरच्या वर नाटकांचे दोन हजारांच्या घरात प्रयोग सादर केले आहेत. संगीत, तसेच गद्य प्रायोगिक नाटकांचे प्रयोग, नाटय़महोत्सवांचे आयोजन, पुस्तक प्रकाशन आणि लहान व मोठय़ा गटांसाठी नाटय़ शिक्षणाचे फार मोलाचे कार्य पीडीए पुण्यात सध्या करीत आहे. गेल्या पंधरा वर्षांत पीडीएच्या शिबिरांतून तयार झालेली तरुण पिढी पुण्याच्या प्रायोगिक रंगभूमीवर मोलाचे काम करताना दिसत आहे. पीडीएच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ या नाटकाने गतवर्षी राज्य नाटय़ स्पर्धेत पुणे विभागात प्रथम व अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावला होता.
रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यातील उत्तमोत्तम नाटकांपैकी महत्त्वाचे नाटक असे ‘अचलायतन’बाबत म्हणता येईल. धर्म-परंपरा, रूढी यांच्या अवडंबराबद्दल आणि दांभिकतेने जगण्याबद्दल भाष्य करणारे हे नाटक रवींद्रनाथांनी १९१२ साली लिहिले आहे आणि दुर्दैवाने आजच्या समाजावरही ते भाष्य करायला समर्थ ठरत आहे. दांभिकतेने, देवा-धर्माच्या जरबेखाली जगणे आणि त्याविरुद्ध रसरशीतपणे जगणं हा प्रत्येक कलाकाराला भावणारा विषय अत्यंत मार्मिक आणि चटपटीत शैलीत रवींद्रनाथांनी मांडला. मूळ बंगाली नाटक सहा अंकी आहे. प्रदीप वैद्य यांनी त्यांचे स्वैर मराठी रूपांतर करताना ते दोन अंकात मांडले आहे. नाटकाचे दिग्दर्शन, तसेच नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीतही त्यांचेच आहे. प्रमुख भूमिकांमध्ये स्वानंद बर्वे (पंचक), निखिल मुजुमदार (महापंचक), आशिष वझे (आचार्य), केदार दिवेकर (दादा) यांचा समावेश आहे. याशिवाय हर्षद राजपाठक, सौरभ मुळे, अमित श्रृंगारपुरे- पाटील, अनिरुद्ध हर्डिकर आदी कलाकारांनी इतर भूमिका केल्या आहेत.

माध्यम प्रायोजक, लोकसत्ता
उद्याचे नाटक :
मंगळवार, १७ फेब्रुवारी २००९
सायंकाळी ७.३० वाजता.
शिवाजी मंदिर
ललित कलाभवन, सूर प्रवाह, वरळी, मुंबई. प्रस्तुत ‘रंगबेरंग’
लेखक - सुनील देवळेकर

‘काळानुरूप नवे संगीत नाटक यायला हवे!’
रवींद्र पाथरे, कै. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १५ फेब्रुवारी

संगीत रंगभूमी ही काळानुसार नेहमीच बदलत आलेली आहे. परंतु आता संगीत रंगभूमीचा वेगळ्या प्रकारे विचार व्हायला हवा. नवे लेखक, नवे दिग्दर्शक, नव्या प्रकारचं संगीत आता संगीत नाटकांसाठी आवश्यक आहे, या मुद्यावर एकमत प्रकट करीत ‘संगीत रंगभूमी आधुनिक काळानुसार बदलता येईल का?’ या परिसंवादातील वक्त्यांनी ‘बदल ही काळाची गरज असते,’ या प्रचलित सत्यावर शिक्कामोर्तब केलं.
नाटय़संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिसंवादात अ‍ॅड. सतीश भोपे, डॉ. एन. व्ही. चिटणीस, शुभदा दादरकर, डॉ. रवींद्र घांगुर्डे, सुरेश साखळकर, शुभदा दादरकर आणि प्रमोद पवार यांनी भाग घेतला. संगीत नाटक हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ आहे आणि ते टिकविणे गरजेचे आहे, याबद्दल कुणाचेच दुमत नाही. परंतु काळानुसार जुन्या संगीत नाटके संपादित स्वरूपात सादरी केली गेली पाहिजेत. त्यातील गाण्यांनाही यथायोग्य कात्री लावून ती आटोपशीर करायला हवीत. त्याचबरोबर संगीत नाटकांकडे नव्या पिढीला आकृष्ट करण्यासाठी त्यांची रुची लक्षात घेऊन त्यानुरुप नव्या आशय-विषयांची नाटकं लिहिली जायला हवीत आणि आधुनिक संवेदना असलेल्या नाटय़कर्मीकडून ती सादर व्हायला हवीत. मात्र, हे करत असताना लोकानुयन की अभिरुचीवृद्धी, याचं तारतम्य बाळगायला हवं, अशी अपेक्षा बहुसंख्य वक्त्यांनी व्यक्त केली.
संगीत नाटक काळानुरुप बदललेलं आहे. फक्त ते अपवादात्मकच राहिले, याचं कारण संगीत नाटकं करणाऱ्यांनी त्याचा जाणीवपूर्वक पाठपुरावा केला नाही, असे सांगून शुभदा दादरकर म्हणाल्या की, अलीकडच्या काळात संगीत नाटकांत बदल करण्याचे काही प्रयत्न झालेही, परंतु त्यांना प्रेक्षकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. तेव्हा या स्थित्यंतरांमध्ये प्रेक्षकांचाही सक्रिय सहभाग असायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
साठीच्या पुढचे लोकच संगीत नाटकांना येतात, हे संपूर्णत: खोटे आहे. माझा अनुभव यापेक्षा वेगळा आहे, असे सांगून नाटय़संमेलनाध्यक्ष रामदास कामत म्हणाले की, लोकांना आजही नाटय़संगीत आवडते. त्यामुळे त्यातील गाण्यांच्या चाली बदलणे योग्य नाही. फक्त ही गाणी आटोपशीरपणे सादर व्हायला हवीत. मात्र, त्याचबरोबर संगीत नाटक लिहिणारे नवे लेखक निर्माण व्हायला हवेत, हेही तितकेच खरे आहे.

‘बालनाटय़ : तंत्र, आशय, विषय यात बदल हवा’
सतीश कुलकर्णी, केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १५ फेब्रुवारी

‘तेव्हा आणि आत्ता’ची चर्चा करीत आणि उद्याबद्दल प्रष्टद्धr(२२४)ष उपस्थित करीत; तंत्र, आशय आणि विषय यात कालानुरूप बदल करण्याची सूचना करीत आज दुपारी वक्तयांनी ‘बालनाटय़-तेव्हा आणि आत्ता’ या विषयावरचा परिसंवाद रंगविला. (कै.) मनोहर मांडे रंगमंचावर होत असलेल्या या परिसंवादाला संयोजकांच्या अनास्थेचा फटका बसला. वक्ते येऊन ताटकळत उभे राहिल्यानंतर सुमारे अध्र्या तासाने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. परिसंवाद रंगत मध्यावर आला असतानाच दोन वक्तयांची चकमक उडाली. देवदत्त पाठक फार वेळ घेत आहेत, अशी तक्रार आधी संजय कुलकर्णी व नंतर संजय पाटील देवळाणकर यांनी केली. नंतर तर ‘पाठक या व्यासपीठाचा उपयोग स्वत:च्या व्यवसायाच्या ‘मार्केटिंग’साठी करीत आहेत.’ असा आरोप करीत व्यवसायाने पत्रकार असलेल्या कुलकर्णी यांनी त्यांचा निषेध केला! अरविंद जगताप यांनी या चर्चेला पूर्ण वेगळे वळण दिले. बालनाटय़ाचा संबंध महिलांशी अधिक आहे, असे सांगून ते म्हणाले की, या चळवळीत त्यांचा सहभाग जोवर वाढत नाही, तोवर अस्सल बालनाटय़ येणार नाही. आपल्या परंपरा जपून नाटक पुढे न्यावे. आपल्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विषय निवडावा. परीकथा, राजा-राणी, राक्षस असे बालनाटय़ांचे विषय आता नकोत. समकालीन विषय हवेत, असा मुद्दा काही वक्तयांनी मांडला.तो खोडून काढताना संजय पेंडसे म्हणाले, ‘‘सज्जनांचा विजय आणि दुर्जनांचा नाश, हे तत्त्व कायम ठेवून काहीही द्या. नाटकाचा ‘फॉर्म’ तोच ठेवून, त्यातील आशयात बदल करा. प्रकार आणि शैलीबाबत मूलभूत काम झाले पाहिजे.’’व्यावसायिक रंगभूमीवर स्थित्यंतरे होत असताना बालनाटय़े अदृश्यच झाली, अशी खंत व्यक्त करून संजय कुलकर्णी म्हणाले की, ‘बालनाटय़ प्रशिक्षण शिबिरे म्हणजे केवळ धंदा झाली आहेत. बालनाटय़ाच्या नावाखाली बाजारू स्वरूपाचे खपविले जात आहे. सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी आदींच्या बालनाटय़ांनी व्यावसायिक रंगभूमीला लेखक, अभिनेते मिळवून दिले. पद्मनाभ फाटक यांनी सूत्रसंचालन केले.

नाटय़संगीत मैफलीने
प्रेक्षक मंत्रमुग्ध, केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १५ फेब्रुवारी/वार्ताहर

कायम लोकप्रिय असणाऱ्या ‘प्रथम तुझ पाहता’ या गीताची रसिकांनी केलेली फर्माइश पूर्ण करत संमेलन अध्यक्ष रामदास कामत यांनी नाटय़ संगीताची मैफल रंगवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नाटय़संमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांच्या नाटय़ संगीताचा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील राम मुकादम रंगमंचावर झाला. या वेळी ‘प्रथम तुझ पाहता जीव वेडावला’ हे नाटय़गीत कामत यांच्या स्वरातून प्रेक्षकांना प्रत्यक्ष ऐकता आले. ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ या गीताने सुरुवात करून ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘प्रेम वरदान स्वर सदा आणि आनंदसुद्धा बरसे’ या गीतांनी नाटय़संगीत रंगले. ‘श्रीरंगा कमला कांता हरी पदराते सोड रे’ या भैरवीतील नाटय़गीताने संगीताचा समारोप झाला. पण रसिकांनी ‘प्रथम तुझ पाहता’ हे कायम लोकप्रिय असलेल्या गीताची उत्स्फूर्त मागणी केली. त्या वेळी रसिकांच्या फर्माइशाला दाद देत कामत यांनी गीत गावून नाटय़रसिकांना मंत्रमुग्ध केले. कामत यांचे स्वागत प्राचार्या डॉ. कांचन श्रृंगारपुरे व महेश वाघमारे यांनी केले.

शिलेदार आणि भाकरे यांनी गाजवली दुसऱ्या दिवशीची सकाळ
केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी
(बीड), १५ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कीर्ती शिलेदार आणि निरंजन भाकरे! या दोन कलावंतांनी नाटय़संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. दोन वेगवेगळ्या माध्यमांच्या साहाय्याने त्यांनी रसिकराजाचे मनोरंजन तर केलेच; सोबत प्रबोधनाचा डोसही पाजले!
आद्यकवी मुकुंदराज रंगमंचावर आज सकाळी पहिला कार्यक्रम झाला. नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचा. ‘संगीत शारदाचं घडलंय ते बिघडलंय’ या वगनाटय़ाची भट्टी अगदी जमून आली होती.
छोटा पडदा आणि रंगभूमी यांच्यातील द्वंद्वावर भाष्य करणारा हा प्रयोग कीर्ती शिलेदार यांनी रंगवून टाकला. त्यांना दीपक रेगे, संजय डोळे, विजय पटवर्धन, विनोद खेडकर, मानसी लोणकर, योगिनी पोफळे, साईश्वरी शेट्टी, सिद्धेश्वर झाडबुके, दादा पासलकर, चंद्रशेखर भागवत, शेखर लोहकरे, श्यामल वाडदेकर, चिन्मय पाटसकर यांनी चांगली साथ दिली.
त्यानंतर ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धमाल केली. वासुदेव, नंदीबैल आणि ‘बुरगुंडा होईल गं’ या तीन प्रकारांनी मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही केले. हे प्रबोधन केवळ आध्यात्मिक नव्हते, तर त्याला आधुनिक जगातील आधुनिक गोष्टींची जोड होती. विवाहयोग्य वय, बाळाला आवश्यक असलेले स्तनपान याबाबत त्यांनी केलेल्या प्रबोधनाला श्रोतृवर्गाने जोरदार दाद दिली.

बालनाटिकांनीही प्रेक्षकांना जिंकले एकांकिकेतून समाजातील वास्तवावर प्रहार
केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १५ फेब्रुवारी/वार्ताहर

नाटय़ संमेलनात पहिल्या दिवशी सादर झालेल्या एकांकिकेतून कलाकारांनी समाजातील बदलते प्रवाह आणि अस्वस्थतेवर प्रहार केले. तर बालनाटय़ांनी प्रेक्षकांचे डोळे पाणवणारे प्रयोग सादर करून प्रेक्षकांना जिंकले.
स्व. केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरीत शनिवारी कै. राम मुकादम रंगमंचावर पाच एकांकिका सादर झाल्या. सुरुवातीलाच नाटय़ परिषदेच्या सांगली शाखेने ‘गलबत’ ही एकांकिका सादर केली. बेरोजगारी आणि प्रेमविवाहातून विभक्त झालेल्या घरामुळे निर्माण होणाऱ्या वाईट प्रसंग व परिस्थिती मांडली तर विभक्त पती-पत्नी या परिस्थितीतून जाणाऱ्या दोघा जुन्या मित्र-मैत्रिणींनी विवाहाचा घेतलेला निर्णय यातून प्रस्थापित होणारी मनशांतता मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नाशिक नाटय़ शाखेने ‘ट्रेलर’ ही एकांकिका सादर करून गलिच्छ राजकारणावर व त्यातून निर्माण होणाऱ्या देशातील अस्वस्थ परिस्थितीवर प्रहार केला. विविध पक्ष-संघटनांचे मोर्चे, आंदोलने यातून सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या त्रासाची चिंता व्यक्त करण्यात आली. नगरच्या चिंतामणीया शाखेने ‘ए प्रेस विथ द पिग्ज’ आणि ‘माझ्या प्रिय मित्रास’ या एकांकिका सादर केल्या. रसिकांनी या एकांकिकेतून मांडलेल्या समाजातील बदल आणि वास्तव याला दाद दिली. कै. मनोहर मांडे गुरुजी रंगमंचावर बालनाटय़ाच्या प्रयोगांनीही रसिकांना जिंकले. किल्लेधारूर येथील असीफ अन्सारी लिखित ‘ओसामा’ तर पुणे येथील विद्या हॉली स्कूलच्या देवदत्त पाठक लिखित इमारत व झोपडी आणि नाटय़शाखेच्या ‘क्रांतीसूर्य’ या बालनाटकांनी धमाल केली. बालनाटय़ नाटिकेतून विद्यार्थ्यांची जीवनगाथा, मैत्री, जातीय एकता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात कलाकारांनी कस लावला. त्यामुळे प्रेक्षकांची दाद त्यांना मिळाली.

लावण्ययात्रेला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी!
सतीश कुलकर्णी, केशरबाई क्षीरसागर नाटय़नगरी (बीड), १५ फेब्रुवारी

एकोणनव्वदाव्या नाटय़ संमेलनाची गर्दी ‘रेकॉर्ड ब्रेक’ करणारी ठरणार, असे भाकीत उद्घाटनाच्या सोहळ्यातच वर्तविण्यात आले आणि ते खरे करण्याचा विडाच जणू बीडकरांनी उचलल्याचे काल आणि आजही दिसून आले. आमची सांस्कृतिक भूक किती मोठी आहे, हेच त्यांनी दाखवून दिले.
नाटय़दिंडीला बीडच्या रसिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. उद्घाटनाच्या सोहळ्याला मुख्य सभामंडप खचाखच भरला होता. पण गर्दीमुळे डोळे विस्फारण्याची वेळ आली ती संध्याकाळी. सव्वा-दीड तास रंगलेल्या लावण्यांच्या कार्यक्रमासाठी मुख्य सभामंडप खचाखच भरला होता. मुंगी शिरायला जागा नाही, म्हणजे काय हेच दिसून आले.
संजीवनी मुळे नगरकर, माया खुटेगावकर, ग्लोरिया सॅमसन, संगीता वडवळकर या नृत्यांगनांनी साऱ्या रसिकांना खिळवून ठेवले. ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’ असे आवताण संजीवनी मुळ्यांनी दिले आणि टाळ्या-शिट्टय़ांनी सारा परिसर दुमदुमून गेला. ‘माझ्या नवऱ्याने सोडलिया दारू’चे सादरीकरण करताना तर त्यांनी बहार आणली. साऱ्या श्रोतृवर्गावर त्यांनी तेवढय़ा काळात कब्जाच मिळविला होता.
माया खुटेगावकर यांनी ‘विचार काय हाय तुमचा’ या लावणीने असेच सर्वाना खिळवून ठेवले. नंतर त्यांनी ‘ठुमकत ठुमकत चाले’ ही पारंपरिक लावणी सादर केली. ग्लोरिया सॅमसन यांच्या ‘उगवली शुक्राची चांदणी’आणि ‘खेळताना रंग बाई होळीचा’ या दोन लावण्यांनी त्यांच्या सुरेख पदन्यासाचे आणि विभ्रमाचे दर्शन घडविले. ‘फड सांभाळ तुऱ्याला आला’ या लावणीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीता वडवळकर यांच्या ‘दादला नको गं बाई’ने या लावणी-उत्सवाची सांगता झाली. मनीषा निजामपूरकर यांनी स्वराची साथ दिली.
आठ लावण्यांचा आनंद हजारो बेभान रसिकांनी मनमुराद लुटला. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते आणि स्वागताध्यक्ष जयदत्त क्षीरसागर या लावण्ययात्रेचे वारकरी बनले होते. त्याहून विशेष म्हणजे महिलांची असलेली लक्षणीय उपस्थिती. आपल्या मुली-बाळींसह आयाबायांनी अतिशय तन्मयतेने या लावण्यांचा आनंद लुटला. लावण्यांनंतर कलावंतांची रजनी झाली. त्यालाही रसिकांची अशीच गर्दी होती.
परिसंवादांना विशेष गर्दी नसली तरी मुख्य रंगमंचाच्या बाजूला असलेले स्टॉल मात्र मोकळे नव्हते. पुस्तक विक्रेत्यांना उसंत नव्हती आणि खाद्यपदार्थाच्या बशा भरून विक्रेत्यांचे हात दुखू लागले होते. पुस्तकांच्या स्टॉलवर दिसणारी किशोरवयीन मुला-मुलींची गर्दी आश्वासक होती. पुस्तक विक्रेते खूश होते आणि विक्री होईल की नाही, ही सांगलीच्या फळविक्रेत्यांची चिंता कधीच पसार झाली होती.
काष्ठ शिल्पांचे आणि मराठी रंगभूमीचे दर्शन घडविणारी दुर्मिळ छायाचित्रे, ही दोन प्रदर्शने आगळीवेगळी आहेत. पण तिथे मात्र फारशी गर्दी नव्हती. (कै.) राम मुकादम रंगमंच आणि (कै.) मनोहर मांडे रंगमंच येथे आज सकाळी प्रायोगिक नाटय़महोत्सव आणि बालनाटय़े रंगली. तेथे गर्दी नव्हती; पण मोजकेच दर्दी होते.