Leading International Marathi News Daily
बुधवार, १८ फेब्रुवारी २००९
विशेष
(सविस्तर वृत्त)

दुर्बिणीचा इतिहास

 

गॅलिलिओच्या काळापर्यंत काचा बनविण्याची कला आणि तंत्रज्ञान हे बऱ्यापैकी चांगले विकसित झाले होते. काचेचा उपयोग प्रामुख्याने अलंकारिक वस्तू बनविण्यासाठी होत होता. तसेच काचेला एक विशिष्ट आकार दिला तर त्यातून बघितल्यावर वस्तू मोठय़ा दिसतात हेही माहिती झालं होतं. अशा काचांना आपण भिंग म्हणतो. लेन्स हे नाव लेंटील, म्हणजे मसूराच्या दाण्यावरून आलं आहे. जर तुम्ही मसूराचा दाणा बघितला नसेल त्यांनी तो अवश्य बघा आणि तो भिंगासारखा दिसतो की नाही याची खात्री करून घ्या.
भिंग बनविणारे कारागीर आपल्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारची भिंग ठेवत असत. चाळिशी ओलांडलेले लोक ज्यांना जवळचं वाचता येत नसे ते या भिंग बनविणाऱ्या लोकांकडे जावून स्वतसाठी भिंग घेत असत. अर्थात अशा वाचकवर्गातील लोकांची संख्या कमीच होती आणि एक असापण काळ होता की चष्मा वापरणारा म्हणजे बुद्धिवान असे समीकरण असायचे. हॉलंडमधील एका चष्मे बनविणाऱ्या दुकानात दोन मुलांनी खेळता खेळता चष्म्याची दोन भिंगे अशी धरली की त्यांना दूरवरच्या चर्चच्या छतावर बसलेला पक्षी खूप जवळ आहे असा दिसला. दुर्बिणीतून बघणारे हे कदाचित पहिले मानव असावेत. ही गोष्ट किती खरी आहे याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही.
एकूण काय तर दुर्बिण बनविण्यास लागणारे साहित्य (म्हणजेच दोन भिंग) हे उपलब्ध होत. कदाचित अनेकांनी दोन भिंग एकामागे एक धरून दूरचे जवळ दिसते याचा अनुभवही घेतला असावा. पण ज्याला आपण दुर्बिण म्हणू शकू, असे उपकरण बनवून त्या त्या उपकरणासाठी पेटंट मागणारा हान्स लिरपर्शे हा पहिला व्यक्ती होता. हा मूळचा पषिम जर्मनीचा, पण नेदरलँडमध्ये स्थायिक झाला होता. त्याने पेटंटसाठी १० सप्टेंबर १६०८ रोजी अर्ज केला. त्याच्या अर्जावर विचार करण्यात आला आणि २ ऑक्टोबर रोजी त्याला पेटंट हे सांगून नाकारण्यात आले की त्याचा शोध गुप्त ठेवणे शक्य नाही आणि कुणालाही अशा प्रकारे दुर्बिण बनविता येणे सहजशक्य आहे. पण नंतर लिपरशेने दोन्ही डोळ्यांनी बघता येऊ शकतील अशा दुर्बिणी बनविल्या आणि त्यासाठी त्याला भरपूर मोबदलाही मिळाला होता. अशा दुर्बिणी युरोपमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या पण कदाचित फक्त श्रीमंतांच्या दिवाणखान्याच्या शोभेच्या वस्तू म्हणूनच.
जेव्हा लिपरशे आपली दुर्बिण घेऊन इटलीत व्हेनिसमध्ये शिकायला आला तेव्हा थोडी उशिरा का होईना ही माहिती गॅलिलिओच्या कानावर आली. त्याला या उपकरणाचे अनन्यसाधारण महत्त्व लगेच लक्षात आले. त्याच्या लगेच लक्षात आले की असे उपकरण वापरून सैन्याला शत्रूची चाहूल तो जवळ येण्याच्या कितीतरी अगोदर लागू शकेल. त्याने आपल्या सरकारात वट असलेल्या मित्राच्या मदतीने लिपर्शेला व्हेनिस शहरात काही काळ प्रवेश मिळू दिला नाही आणि स्वतसाठी एक दुर्बिण मिळविली. त्याने दुर्बिणीच्या रचनेचा अभ्यास करुन फक्त २४ तासांच्या अथक प्रयत्नांती लिपर्शेच्या दुर्बिणीपेक्षा जास्त चांगली दुर्बिण बनविली. ते वर्ष होते १६०९. गॅलिलिओने त्यानंतर दुर्बिणी आणि त्यांच्या रचनेचा खूप सखोल अभ्यास केला आणि त्याने अनेक दुर्बिणीपण बनविल्या. तो खूप परिश्रम घेऊन काळजीपूर्वक आपल्या दुर्बिणीसाठी लागणारी भिंग बनवित असे. त्याचा दावा असे की त्याच्यापेक्षा चांगली भिंग कोणी बनवू शकणार नाही. तो आपल्या दुर्बिणी श्रीमंत आणि मोठय़ा पदावरच्या व्यक्तींना भेट देत असे. पण दुर्बिणी एक कुतूहलाची आणि श्रीमंत लोकांच्या दिवाणखान्यात ठेवण्याची वस्तू मात्र नक्कीच नव्हती. दुर्बिणीचा पहिला व्यवहारिक उपयोग गॅलिलिओने सैन्यासाठी केला. दुर्बिणीचा वापर करून शत्रूच्या सैन्याची चाहूल ते आपल्या शहराच्या हद्दीजवळ येण्याच्या दोन तास अगोदर लागू शकते हे त्याने दाखविले आणि चांगल्या प्रतीची दुर्बिणी बनविण्यासाठी लागणारा पैसा त्याने मिळवला.
जरी भिंग बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असले तरी दुर्बिणीसाठी चांगल्या प्रतीचे भिंग बनविणे ही वेगळीच बाब होती. कारण यात भिंगाचा अचूक आकार आणि त्याचबरोबर भिंगाच्या काचेचे गुणधर्म या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. ज्या दुर्बिणींचा गॅलिलिओने स्वत निरीक्षणांसाठी वापर केला होता आणि ज्या दुर्बिणीतून त्याने ७ जानेवारी १६१० रोजी सर्व प्रथम गुरुचे उपग्रह बघितले होते त्या आणि गॅलिलिओने बनविलेल्या इतर दोन भिंगांचा जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यात आला तेव्हा हे भिंग इतर दोन्ही भिंगांपेक्षा जास्त चांगल्या प्रतीचे होते हेच दिसून आले.
दुर्बिणीचे भिंग नंतर त्याने ग्रॅण्ड डय़ूक फर्दिनांद द्वितीय याला भेट दिले. पुढे हे भिंग पडून त्याचे दोन तुकडे झाले पण हे तुकडे जपून ठेवण्यात आले. १६४२ साली गॅलिलिओच्या मृत्यूनंतर हे भिंगाचे तुकडे प्रिंस लियोपोल्द दे मेडिची- जो नंतर स्वत कर्डिनल झाला- याच्या हाती सुपूर्द करण्यात आले. १६७७ साली मेडिचीने शिसवी लाकडाच्या कोरीव चौकटीत हे भिंग बसवून घेतले. आज हे शिसवी लाकडाच्या कोरीव चौकटीत ठेवलेले हे भिंग आता फ्लॉरेंसमधील संग्रहालयात आपल्याला बघायला मिळते.
अरविंद परांजपे