Leading International Marathi News Daily

रविवार , २२ फेब्रुवारी २००९

(सविस्तर वृत्त)

चेकनाका!
आत्माराम नाटेकर

वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून ओळखला जातो. संपादक हा यातील केंद्रबिंदू. त्याच्याच

 

नेतृत्वाखाली सहसंपादक, मुख्य उपसंपादक, उपसंपादक, वार्ताहर काम करत असतात. विविध पुरवण्यांची जबाबदारी त्या त्या संपादकावर सोपविलेली असते. मुद्रितशोधक हा वर्तमानपत्रातला तितकाच महत्त्वाचा घटक. संपादकांचा ऑपरेट झालेला मजकूर वाचण्यासाठी मुद्रितशोधकाकडे पाठवला जातो. त्यातील चुका काढून तो मजकूर पुन्हा करेक्शनसाठी संगणक विभागात जातो. केवळ ऱ्हस्व-दीर्घ एवढेच करेक्शन न पाहता मजकुराची वाक्यरचना, संदर्भ तपासून त्याच्यावर आवश्यक ते संस्कार केले जातात. उपसंपादकाच्या बरोबरीचा आणि संपादकीय विभागाचाच घटक असलेला हा श्रमिक पत्रकार आजवर मात्र उपेक्षितच राहिला आहे. पत्रकांरासाठी नेमण्यात आलेल्या पालेकर आयोगाने मुद्रितशोधकाला अधिकृत पत्रकारितेचा दर्जा दिला.
पूर्वी लायनो, कंपोझिंग या माध्यमाद्वारे वर्तमानपत्राचे काम चालत असे. कंपोझिंग म्हणजे खिळे जुळवणे. हे फार जिकिरीचे काम होते. यासाठी केस तोंडपाठ असावी लागे. मजकूर कंपोझ झाला की तो पेजकटने बांधून प्रूफ काढावा लागे. प्रूफाची ही गॅली वाचण्यासाठी मुद्रितशोधकाच्या टेबलावर जाऊन पडे. प्रूफरीडिंग झाल्यावर पुन्हा तो मजकूर करेक्शनसाठी कंपोझिटरकडे जाई. काळ बदलला. मुद्रण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाली. कंपोझ विभागात संगणक आले आणि कंपोझिटर ऑपरेटर बनले. कामाचा वेग वाढला तशी त्यात सुसूत्रताही आली. संपादक, वार्ताहर आपापला मजकूर स्वत:च ऑपरेट करू लागले. मात्र मुद्रितशोधकाचे काम तसेच राहिले. गॅलीऐवजी प्रिंट आल्या. चुका दुरुस्त करण्यासाठी ‘स्पेल चेकर’ आणण्याचेही प्रयत्न झाले, पण मराठी भाषेसाठी त्याचा काहीच उपयोग नसल्याचे लवकरच दिसून आले. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली. पत्रकारितेत क्रांतिकारक बदल झाले. बातम्यांपेक्षा जाहिरातीला अनन्यसाधारण महत्त्व आले. या जाहिराती मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. तोच उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला. जाहिरातींचे दोन-दोन वेळा वाचन होऊ लागले. मात्र बातम्यांच्या वाचनाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी दररोजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांत अनेक दोष आढळून येऊ लागले. मुद्रितशोधकाला शुद्धलेखनाबरोबरच भाषेचेही परिपूर्ण ज्ञान असावे लागते. केवळ व्याकरणदृष्टय़ा मुद्रितशोधन करून शुद्धलेखन सुधारणार नाही, की त्यातील दोष दूर होणार नाही. मराठी भाषा अधिक प्रगल्भ करायची असेल तर चौफेर वाचनाची आवश्यकता आहे. भाषेवर हुकुमत असली तरच मराठी समजणे अधिक सोपे जाईल. भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील अशी गोष्ट आहे. ती बोली स्वरूपात असते, तेव्हा तिच्यात बदल होत असतात, आणि लेखी स्वरूपात येते तेव्हाही तिच्यात बदल होत असतात. भाषेचे उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी शुद्धलेखनाची फारशी गरज लागत नसल्याने शुद्धलेखनाचे महत्त्व बहुसंख्य व्यक्तींच्या लक्षात येत नाही. शुद्धलेखनामध्ये ऱ््हस्व-दीर्घाच्या अनेक चुका अनेक व्यक्तींकडून घडत असल्याने शुद्धलेखन म्हणजे ऱ्हस्व-दीर्घ असा त्यांचा समज होतो. परंतु शुद्धलेखन म्हणजे केवळ ऱ्हस्व-दीर्घ नव्हे. अनुस्वार, सामान्यरूप, अनेकवचन, जोडाक्षर, विसर्ग, रफार, विरामचिन्हे, वाक्यरचना आदींचा अंतर्भाव शुद्धलेखनात होतो. शुद्धलेखनाला महत्त्व न देता प्रत्येकाने स्वत:च्या मर्जीप्रमाणे लेखन केले तर अनेक शब्दांचे अर्थ बदलतील आणि विरुद्धार्थी, द्वयर्थी किंवा निर्थक वाक्ये तयार होतील.
मराठी साहित्य मंडळाने १९६१ साली १४, १९७२ साली ४ असे मराठी शुद्धलेखनाचे १८ नियम केले. महाराष्ट्र शासनाने या नियमांना मान्यता दिली आणि सर्वच क्षेत्रांत या नियमानुसार लेखन व्हावे असे जाहीर केले. आज या गोष्टीला ५० वर्षे होत आली, तरी दहावीच काय, पण मराठी घेऊन एम. ए. होईपर्यंतसुद्धा हे सर्व नियम शिकवण्याची सोय आपल्या अभ्यासक्रमात नाही. मुद्रितशोधनाचे जसे नियम आहेत तशी चिन्हेही आहेत. त्या चिन्हांच्या आधारे प्रूफाचे करेक्शन केले जाते. चुकलेल्या शब्दावर काट मारून तो शब्द बाजूला लिहिला जातो, तर गाळलेला शब्द लिहिताना त्या जागी विशिष्ट खूण करून तो शब्द लिहावा लागतो. शुद्धलेखनाचे हे नियम ऑपरेटरलाही माहीत असावे लागतात. आजची पिढी वर्तमानपत्रात प्रसिद्ध आलेला मजकूर योग्य असल्याचे मानते, आणि तेच त्यांच्या मनावर कायमचे बिंबले जाते.
मुद्रितशोधक म्हणून पत्रकारितेची सुरुवात करणारे अनेकजण पुढे नाटककार झाले, लेखक झाले, संपादक झाले. विद्याधर गोखले, विजय तेंडुलकर, राजुरीकर, पुष्पा त्रिलोकेकर, जॉर्ज फर्नाडिस, विजय कुवळेकर, सुरेंद्र हसमनीस, रवींद्र पाथरे ही नावे आवर्जून घ्यावी लागतील. काही आघाडीच्या वर्तमानपत्रात दर्जेदार मुद्रितशोधकांचा भरणा होता. प्रभुगोखले, राधाकृष्ण वळंजू, मनोहर बोर्डेकर, मनोहर काणेकर ही नावे तर पत्रकारांच्या परिचयाची आहेत.
पुढे प्रमोद तेंडुलकर, दीपक म्हात्रे या लोकसत्तातील तर पांडुरंग जुनगरे, राधाकृष्ण वळंजू या महाराष्ट्र टाइम्समधील मुद्रितशोधकांनी मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. आजही ही परंपरा कायम राखली आहे. आज कित्येक मुद्रितशोधक अनेक वर्तमानपत्रांतून सातत्याने लिखाण करीत आहेत. काहींनी पुस्तकेही लिहिली आहेत. पण मुद्रितशोधकाचा त्याच्यावर शिक्का बसल्याने त्याला आज सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. आज काही वर्तमानपत्रांतून मुद्रितशोधक हा विभाग कालबाह्णा होत चालला आहे, ही निश्चितच गंभीर बाब आहे.
नवनीत, चेतना प्रकाशन तसेच अनेक नामांकित पुस्तक प्रकाशनांना मुद्रितशोधकाची आवश्यकता असते. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या शालेय पुस्तकांत शुद्धलेखनाच्या शेकडो चुका आढळल्याने ही पुस्तके रद्द करावी लागली होती, हा ताजा इतिहास आहे. मराठी वाचवा म्हणून आवई उठवणारांनी शुद्धलेखनाची गांभीर्याने दखल घ्यावयास हवी. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी लोळण घेत आहे, त्यात आता थोडा बदल करून म्हणावे लागेल- मराठी भाषा शुद्धलेखनाच्या अभावी शेवटची घटका मोजत आहे. आज हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे मुद्रितशोधक कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा योग्य तो उपयोग करून घेतल्यास नवोदितांना मार्गदर्शक ठरेल. या मुद्रितशोधकांना चिंता आहे ती आपल्या नोकरीची नाही, तर पत्रकारितेत येऊ पाहणाऱ्या नवोदित तरुणांची. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण करणारांसाठी जर्नालिझमचा कोर्स सुरू करण्यात आला आहे. येथेही अनुभवी मुद्रितशोधक मुद्रितशोधनावर व्याख्यान देतात. आजच्या संपादकाला, वार्ताहराला आपली बातमी स्वत:लाच ऑपरेट करावी लागत असल्याने वाचण्यासाठी मुद्रितशोधकाकडे तो मजकूर जात नाही. यासाठी पत्रकारांनी शुद्धलेखनाचा अभ्यास करावयास हवा. लोकसत्ताचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी हे मुद्रितशोधक विभागाला ‘चेकनाका’ संबोधत. कारण इथे आलेला मजकूर तल्लख डोळ्यांखालून संस्कार होऊन संपादकाकडे येई. साहजिकच या चेकनाक्यावरील श्रमिक पत्रकारांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागत असे. प्रत्येक दिवशी लाखो शब्द त्याच्या डोळ्यांखालून जात असल्याने अक्षरावर एखादी जास्तीची पडलेली दांडीही त्याच्या लगेच लक्षात येते. मात्र आज हा चेकनाक्याला अखेरची घरघर लागली आहे, ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. अनेक राजकारणी मंडळी, विचारवंत, अभ्यासक व्यासपीठावरून आपली वैचारिक भूमिका मांडत असतात.
पण त्यांच्या छापून आलेल्या भाषणात गंभीर चुका असतात. मग हा दोष कुणाचा? मुद्रितशोधकापर्यंत हा मजकूर वाचण्यासाठी आलेलाच नसतो, मात्र बोटे त्याच्याच नावाने मोडली जातात. केवळ योग्य बोलूनच उपयोग नाही, तर योग्य छापून येण्यालाही तेवढेच महत्त्व आहे.
मराठी भाषेत शुद्धलेखनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुद्रितशोधकांमुळे वाचकांना शुद्ध भाषेमध्ये वृत्तपत्रे वाचायला मिळतात. शब्दाची व्युत्पत्ती, संधी, उच्चार याची त्याला चांगली जाण असते. अशुद्ध बातमी वा लेखामुळे किंवा चुकीच्या शीर्षकामुळे वृत्तपत्राची प्रतिमा डागाळू शकते. यासाठी मुद्रित तपासनीस विभाग बातम्या वा लेखांचे बारकाईने वाचन करीत असतात.
मुद्रितशोधकाला चुका काढायची सवय असल्याने त्याची शुद्धलेखनावर नजर बसलेली असते. म्हणूनच गडकरींचा हा ‘चेकनाका’ अबाधित राहावयास हवा; तरच भविष्यात वाचकाला संस्कारित वृत्तपत्रे वाचावयास मिळतील!