Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

काँग्रेसचे माजी मंत्री पंडितराव दौंड राष्ट्रवादीत!
बीड, १ मार्च/वार्ताहर

विधानसभेच्या रेणापूर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दौंड यांचा

 

प्रवेश झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात जमवाजमव सुरू केली आहे. मागील महिन्यात बीड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाठोपाठ रेणापूर मतदारसंघातील आणि मुंडे यांचे स्थानिक विरोधक असलेले काँग्रेसचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचा नाशिक येथील अधिवेशनात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुंडेंसमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसच्या दोन माजी आमदारांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे शरद पवार उमेदवारी कोणाला देणार याकडे लक्ष लागले असून दौंड यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत आहे.